आंबेडकरी राजकारणातील वाद-विसंवाद आणि संवाद—————————————
डॉ. मनोहर नाईक, नागपूर
९४२३६१६८२०
भारतीय राजकारण लोकशाहीच्या जीवावर उठले आहे. संविधान नावापुरते उरले आहे. लोकशाहीच्या आणि संविधानाच्या गळ्याभोवतीचा फास दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. विषमतेची दरी अधिकाधिक रुंदावत चालली आहे. सर्वसामान्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने त्या दरीत आत्महत्या करू लागले आहेत. प्रस्थापित राजकीय पक्षांचे एकूणच राजकारण धर्मांधता वाढविणारे व जातियता जोपासणारे आहे. भांडवलशाहीने देशाभोवती अजगरी विळखा घातला आहे. संविधानातील समाजवाद कधीचाच हद्दपार झाला आहे. देशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष स्वतःचे वेगळेपण टिकवून परस्पर पूरक भूमिका घेऊ लागले आहेत. या प्रस्थापित पक्षांनी देशातील कॅम्युनिस्ट व समाजवादी चळवळी आणि विचार जवळजवळ संपवला आहे. या विचारांचे परिणत व उन्नत रूप आंबेडकरवाद आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या राजकारणाला सुरुवातीपासूनच वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. येथील सर्वार्थाने शोषित, पीडित, उपेक्षित, वंचित राहिलेला बहुजन समाज त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे.बहुजन समाजाने सत्ताधारी होण्याच्या दिशेने आगेकूच केली पाहिजे. या व्यापक उद्देशानेच त्यांनी ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ या सर्वसमावेशक पक्षाच्या स्थापनेचा आराखडा तयार केला होता. धर्मांध राजकारणाचे मनसुबे रचणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा सत्तेला चिकटून बसलेली कॉंग्रेस या दोन्ही प्रवृत्ती सारख्याच आहेत. या दोन्ही पक्षांकडून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास होणे आणि बहुजनवादी विचार सत्तेच्या केंद्रस्थानी जाणे शक्य नाही. हे भवितव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखले होते. त्यामुळेच त्यांनी संघ आणि काँग्रेसच्या राजकारणाला नवा पर्याय म्हणून वेगळा पक्ष स्थापन करण्याचा विचार केला होता. बाबासाहेबांच्या पश्चात त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या विचाराचा पक्ष स्थापन केला. परंतु संकुचित दृष्टीमुळे व वृत्तीमुळे ते ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ’ चा विस्तार करू शकले नाही . आणि बहुजन समाजातील वंचित घटकही या पक्षाशी जुळू शकले नाही. तरीही या पक्षाने सुरुवातीच्या काळात राजकीय क्षेत्रात आपली शक्ती दाखवून दिली.
ही राजकीय शक्ती भारतीय राजकारणात आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्यात यशस्वी झाली ;आणि या विचाराचा प्रभाव वाढला तर,आपल्या राजकारणापुढे आव्हान उभे राहू शकते. या भयाने सत्ताधारी कॉंग्रेस पछाडली. आंबेडकरी राजकारण स्वतंत्रपणे अस्तित्वात राहू नये. यासाठी काँग्रेसने वेळोवेळी मैत्रीचा हात पुढे करून आंबेडकरी चळवळीत फुटीची बीजे पेरली.चळवळीत कुठल्या ना कुठल्या निमित्ताने नाव पुढे आलेल्या साधारण कार्यकर्त्यांच्या मनात नेतेपणाच्या आशा जागवल्या. छोट्यामोठ्या कार्यकर्त्यांवर नेतेपणाची झूल पांघरुण थोडाफार सत्तेचा प्रसाद चाखायला दिला. कायमचे अंकित करून घेतले. आणि नेत्यागणिक गट निर्माण व्हावेत अशी खेळी कॉंग्रेस पक्ष खेळला. आंबेडकरी राजकारणाने राजकीय क्षेत्रात जी काही थोडीफार जागा निर्माण केली होती. ती जागा काँग्रेसने संघ- भाजपाच्या राजकारणाकरिता बेमालुमपणे रिती करून घेतली . आणि त्याच रिक्त जागेत पुढे संघ-भाजपाने हातपाय पसरले. संघ-भाजपाच्या अकल्पित विस्तारामुळे आज काँग्रेस आक्रसून गेली आहे. प्रसरण पावण्यासाठी आता काँग्रेसला आंबेडकरी मतदारांचीच गरज भासत आहे. त्यासाठी काँग्रेसने कधी नव्हे तो ‘ संविधान बचाव ’ चा जप सुरू केला आहे .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राजकीय दृष्टिकोन अतिशय व्यापक होता. सर्वसमावेशक होता. बहुजन समाजातील सर्व वंचित घटकांनी एकत्र येऊन सत्ताधारी व्हावे ही त्यांची भूमिका होती. मात्र बहुजनांनी त्यांची ही भूमिका समजून घेतली नाही. आणि ‘ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ’ तील स्वयंघोषित नेत्यांच्या मर्यादांमुळे हा पक्ष जातिबाहेर जाऊ शकला नाही . स्वार्थासाठी सत्ताधाऱ्यांकडे चळवळ गहाण टाकण्यापलीकडे या नेत्यांनी दुसरे काही केले नाही . सत्ताधारी काँग्रेसची मनोभावे चाकरी करणे. सत्तेचा कोर कुटका चवीने चघळत बसणे . पुढारपण सिद्ध करण्यासाठी नवीन गट तयार करणे. आणि नेतृत्वासाठी वाद करणे. यातच
आंबेडकरी राजकीय चळवळीला काँग्रेसने गुंतवून ठेवले ! डॉ. बाबासाहेबांचा राजकीय वारसा सांगणाऱ्या चळवळीची काँग्रेसने अशी वाताहत केली. ही राजकीय शक्ती स्वतंत्रपणे उभी होऊ नये याची काँग्रेसने सर्वतोपरी काळजी घेतली. दुहीची बीजे पेरून आणि नेतृत्वाचा वाद पेटवून आंबेडकरी राजकीय चळवळ संपविण्याचा अक्षम्य दुष्टपणा काँग्रेसने केला आहे ! विशेष म्हणजे यात ‘ जाणता राजा ’ पूर्णपणे यशस्वी ठरला आहे !
आंबेडकरी राजकारणातील स्वयंघोषित नेत्यांच्या गळेपडू व लोटांगणवृत्तीमुळे तसेच पदलालसा,लाळघोटेपणा आणि तत्त्वशून्य विचारसरणीमुळे आंबेडकरी राजकारण गटा-तटात विभागले. विसंवादाच्या भोवऱ्यात सापडले . रसातळाला गेले. पुढाऱ्यांच्या या गहाण प्रवृत्तीने चळवळीचे अतोनात नुकसान केले. नेत्यांच्या लाचार वृत्तीमुळे आंबेडकरी चळवळ आणि समाज दिशाहीन झाला. या राजकीय अधोगतीतून चळवळ बाहेर काढण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा व स्वतंत्र मार्ग निवडला . त्यांनी सर्व गटा-तटांच्या आणि सत्ताधारी काँग्रेसच्या विरुद्ध स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. एकाच वेळी अंतर्गत शत्रूंशी आणि काँग्रेससारख्या सत्ताधारी शक्तीशी लढणे ही सहज सोपी बाब नाही ! हे आव्हान स्वीकारण्यासाठी स्पष्ट भूमिका, अढळ तत्त्वनिष्ठा, स्वाभिमानी बाणा आणि ताठ कणा आवश्यक असतो. हे आणि इतर पूरक गुणही त्यांच्या व्यक्तिमत्वात आहेत. त्यामुळेच ते अनेक पराभव पचवून आणि आरोप झेलुनही आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहेत. इतरांसारखे ते कुणाला शरण गेले नाहीत. किंवा कुणात विलीन झाले नाहीत. हा एका अर्थाने एकूणच आंबेडकरी चळवळीचा विजय आहे ! आणि त्यांचं राजकारणातील हे तत्त्वनिष्ठ, दिशादर्शक व आशादायक नेतृत्व आंबेडकरवादी बुद्धिवंत दूरदर्शी वृत्तीने समजून घेऊ शकले नाहीत. हा त्यांचा वैचारिक पराभव आहे. बाळासाहेब आंबेडकर हे काही बाबासाहेब नाहीत. ते बाबासाहेबांची चळवळ निष्ठेने पुढे घेऊन जाऊ पाहणारे त्यांच्या रक्ताचे व विचारांचे वारसदार आहेत. ते चुकू शकतात, परंतु इमान विकू शकत नाही. हे आपण सर्वांनी कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपण बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या आईबापापेक्षाही महान मानतो. आपले सर्वस्व समजतो. मग प्रकाश आंबेडकरांच्या मनात त्यांच्या आजोबांबद्दल, त्यांच्या विचार आणि कार्य- कर्तृत्वाबद्दल काय भावना असतील ? त्यांच्या मनात आजोबाबद्दल किती आदर, अभिमान, निष्ठा असेल ? याचा आपण माणूस म्हणून मानसशास्त्रीय पातळीवर कधी विचार करणार आहोत की नाही ? त्यामुळेच त्यांच्यासंबंधी बोलताना आपण सर्वांनी विचारपूर्वक बोलण्याची आणि त्यांची भूमिका नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे.
भारतीय समाज बहुजिनसी आहे. येथे अनेक जाती, धर्म, पंथ, वर्ण, वर्ग आहेत. प्रत्येकाची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी भिन्नभिन्न आहे. सर्वांच्या समस्या व हितसंबंध वेगवेगळ्या बाबींशी निगडित आहेत. त्यामुळेच भारताने बहुपक्षीय लोकशाही पद्धती स्वीकारली आहे. परंतु सद्यस्थितीत भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही प्रस्थापित पक्षांनी एनडीए आणि इंडिया आघाडीच्या नावावर भारतीय लोकशाहीला द्विपक्षीय पद्धतीचे स्वरूप दिले आहे. हे भारतीय लोकशाहीला संकुचित करणे आहे. भारतीय लोकशाहीला नामशेष करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. एखाद्या स्वतंत्र किंवा छोट्या प्रादेशिक पक्षाला ए टीम वा बी टीम म्हणणे किंवा त्या पक्षाचा संबंध जबरदस्तीने प्रस्थापित पक्षाशी जोडणे म्हणजे द्विपक्षीय पद्धतीला बळकटी देणे होय. हे देखील सूज्ञ व सुजाण लोकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. याचा अर्थ तुम्ही द्विपक्षीय पद्धतीचे समर्थक आहात असा आहे ! आपण स्वतःला लोकशाहीवादी, आंबेडकरवादी म्हणायचे आणि आपणच बहुपक्षीय पद्धती मानणाऱ्या आंबेडकरवादाला सुरुंग लावायचा असा हा प्रकार आहे . इतर छोटेमोठे प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत म्हणूनच भारतीय लोकशाही टिकून आहे. ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे .
सद्यस्थितीत ‘वंचित बहुजन आघाडी’ हा स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखून असलेला पक्ष आहे. हा पक्ष सोडला तर, निखळ आंबेडकरी भूमिका घेऊन स्वतंत्रपणे राजकारण करू पाहणारा अन्य पक्ष अस्तित्वात नाही. हे वास्तव कितीही नाकारतो म्हटले तरी, नाकारणे शक्य नाही . गटा-तटांना जिवंत ठेवणारे . याला-त्याला लोटांगण घालणारे;आणि भिकाऱ्यागत राजकारण करणारे सर्व नेते आता अस्तंगत झाले आहेत. जोगेंद्र कवाडे , रामदास आठवले सारखे काही चिल्लर महाभिकारी भिकेचा कटोरा घेऊन संघ-भाजपाच्या दारात उभे आहेत. या ना त्या पद्धतीने आंबेडकरी राजकारण संपविण्याचा विडा उचललेल्या सर्व नेत्यांची आता पांगापांग झाली आहे. अशा कसोटीच्या काळात आंबेडकरी राजकारणाचा स्वाभिमानी झेंडा घेऊन ॲड. प्रकाश आंबेडकर एकटेच राजकीय मैदानात उभे आहेत. अशा अटीतटीच्या वेळी काल्पनिक संकटाला न घाबरता सर्व बुद्धिवंतांनी, विचारवंतांनी आणि सुजाण आंबेडकरी जनतेने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे आवश्यक आहे. आजघडीला सर्वांनी एकत्र येणे आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने हिताचे आहे. राजकीय क्षितीजावरून प्रकाश आंबेडकरांना वजा केले तर, एकही आशेचा व प्रकाशाचा किरण आपल्याला दिसत नाही. अशी अंधारग्रस्त स्थिती आपल्या सभोवती निर्माण झाली आहे.
एकूणच परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. संपूर्ण यंत्रणा आंबेडकरी विचाराच्या व समाजाच्या विरुद्ध उभी ठाकली आहे. देशातील संविधाननिष्ठ आंबेडकरी आवाज दडपून टाकण्यासाठी शासन नवनवीन आदेश आणि न्यायव्यवस्था नवनवीन निर्देश पारित करीत आहे. जवळजवळ सर्व प्रसारमाध्यमांनी लोकशाहीवादी भूमिका घेणाऱ्या नेत्यांच्या व चळवळींच्या विरुद्ध बातम्या देण्याचे कंत्राट घेतले आहे . अनेक पत्रकारांची, लेखकांची खास या कामाकरिता नियुक्ती करण्यात आली आहे . एकूणच आपल्या चळवळीविरुद्ध लिहिण्याची व बोलण्याची अनेकांनी सुपारी घेतली आहे . सद्यस्थितीत आंबेडकरी चळवळीत केवळ ॲड. प्रकाश आंबेडकर हेच एकमेव नेतृत्व आहे. बदनामीच्या शस्त्राने हे नेतृत्व संपवायचे; आणि आंबेडकरी चळवळ नष्ट करायची. अशी आंबेडकर विरोधी शक्तीची योजना आहे . या उद्देशाने प्रस्थापित पक्ष व व्यवस्था कामाला लागली आहे . या बदनामी अभियानात आपल्यातील काही बेईमान लोक हेतुपूर्वक सहभागी झाले आहेत. कुठल्याही गोष्टीचा शेंडा-बुड माहीत नसताना काही लोक खोट्या गोष्टी दाव्याने सांगताना दिसत आहेत. आपल्यातील काही महाभाग कॉंग्रेसचे साधे सदस्य नाहीत , परंतु कॉंग्रेसचे प्रवक्तेपद अंगात आल्यासारखे बोलू लागले आहेत ! प्रवक्ते पदाची भूमिका भक्तिभावाने पार पाडू लागले आहेत. या सर्व आंबेडकरवादी चळवळीकरिता मारक गोष्टी आहेत. आपल्यापैकी काहींचे असे स्वार्थांध वागणे म्हणजे, आपणच आपल्या हाताने आपल्या अस्तित्वाला सुरुंग लावण्यासारखे आहे…
आंबेडकरी चळवळ केवळ तुमच्या माझ्या नव्हे तर, या देशाच्या दृष्टीने सुद्धा फार महत्त्वाची आहे. आंबेडकरवादी विचार, चळवळ आणि आंबेडकरी समाज अस्तित्वात आहे, म्हणून येथील लोकशाही ऑक्सिजनवर का असेना पण टिकून आहे. ही वस्तुस्थिती आपल्यापेक्षा आपले हितशत्रू चांगले ओळखून आहेत. हा विचार आणि चळवळ नामशेष व्हावी यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व बाजूंनी संकटे चाल करून येत आहेत. अशा प्रतिकुल स्थितीत आपण अंतर्गत विवादात शिरणे टाळले पाहिजे. शत्रूंच्या बहकाव्यात येणे नाकारले पाहिजे. आंबेडकरी राजकारणातील सर्व गट-तट काळाच्या ओघात आपोआप नष्ट झाले आहेत. आता केवळ एक आशादायी, प्रामाणिक व स्वाभिमानी नेतृत्व आपल्या नजरेपुढे आहे. ते आपण मान्य केले पाहिजे. हे मान्यच आहे की, बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर होणे शक्य नाही. हेही मान्य आहे की, बाळासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक मर्यादा आहेत. परंतु राजकीय प्रगल्भता, दूरदर्शीता तत्त्वनिष्ठा व स्वाभिमानी बाणा हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विशेष गुण आहेत. त्यामुळेच या भीषण वर्तमानात त्यांच्या मर्यादांसह त्यांचे नेतृत्व स्वीकारणे हे आंबेडकरी समाजाच्या, चळवळीच्या आणि आपल्या स्वतंत्र राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीने फार आवश्यक आहे.
अनेक समाजगटातून अनेक नेते पुढे आले आहेत . या नेत्यांमध्ये अनेक दुर्गुण आहेत. अनेक दोष आहेत. नको त्या भानगडीत गुंतले आहेत. अनेकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. अनेकांची लज्जास्पद प्रकरणं बाहेर आली आहेत. तरीही ते त्यांच्या समाजघटकाचे नेतृत्व करीत आहेत. आणि समाजही अशा नेत्यांच्या नेतृत्वात आपले राजकीय अस्तित्व टिकवून आहे. या सर्व बाबी आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर हे निष्कलंक, प्रामाणिक, निर्भीड व आदर्शवत नेतृत्व आहे. त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट, सडेतोड, कणखर व स्वाभिमानी आहे. भूमिकेशी तडजोड न करता धिम्या गतीने का होईना ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारी आहे. शेवटी तेही व्यक्ती आहेत. व्यक्तिकडून चुका होणे स्वाभाविक आहे. मात्र चुका सुधारणे आवश्यक आहे. वेळ, काळ आणि परिस्थितीचे भान ठेवल्यास चुका टाळणेही शक्य आहे .
अहंकार हा सुसंवादातील मुख्य अडसर आहे. अहंकाराने अनेक राज्ये खालसा झाली आहेत. अनेकांना सर्वार्थाने भुईसपाट केले आहे. या संसर्गाची लागण आपल्यात सर्वाधिक झाली आहे. आपल्यातील नेते, कार्यकर्ते एवढेच नाही तर, सर्वसामान्य लोकही या रोगाने ग्रस्त आहेत . या दुर्गुणाने आपल्या चळवळीचे बरेच नुकसान केले आहे . संवादातून अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. याचा आपल्याला विसर पडला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आंबेडकरी साहित्यिकांच्या व विचारवंतांच्या भूमिकेमुळे ‘ वंचित बहुजन आघाडी ’ ला नुकसान सहन करावे लागले. हे सत्य आहे.भाजपामुळे संविधान धोक्यात आले. काँग्रेस पक्षच ‘संविधान बचाव ’ करण्यास समर्थ आहे. हे
सांगण्यात कॉंग्रेस यशस्वी ठरली. भितीने भांबावलेले साहित्यिक, विचारवंत कॉंग्रेसच्या पाठीशी उभे राहिले. संघ-भाजपाला कुणी मोठे केले ?, काँग्रेसच्या राजवटीत झालेल्या एवढ्या घटना दुरुस्त्या आवश्यक होत्या का ? किंवा दिल्लीच्या जंतरमंतरवर संविधानाची होळी झाली, तेव्हा काँग्रेस कुठे होती ? हे साधे प्रश्न विचारण्याचे भान देखील विचारवंतांना राहिले नाही. हेही खरे आहे. विचारवंतांनी एकांगी विचार करून राजकीय भूमिका घ्यायला नको होती. हे देखील काही अंशी बरोबर आहे. परंतु आपल्या अपयशाचे खापर पूर्णतः त्यांच्यावर फोडून त्यांच्या घरापुढे निदर्शनं करणे हे सर्वथा चूक आहे. हे पक्ष नेतृत्वाने लक्षात घेणे आवश्यक आहे .
आंबेडकरी समाज बहुजन समाजातील इतर समाज घटकांसारखा निर्बुद्ध नाही. तो प्रबुद्ध आहे. तो वाचणारा, लिहिणारा आणि विचार करणारा आहे. तो साहित्यावर प्रेम करणारा, साहित्यिकांचा सन्मान करणारा आणि विचारवंतांचा आदर करणारा आहे. हीच त्याची वेगळी ओळख आहे. या वेगळेपणामुळेच आंबेडकरी समाजाचा दरारा आहे. साहित्यिकांना व विचारवंतांना हा समाज आपला मार्गदर्शक मानतो आहे. नेता राजकारणात मोठा असतो. परंतु साहित्यिक व विचारवंत हा एकूण समाजातच मोठा असतो. ही बाब ‘ वंचित बहुजन आघाडी ’ च्या नेतृत्वाने लक्षात घेणे आवश्यक आहे. नेतृत्व विचारवंतांचे मोठेपण समजून घेण्यात व त्यांच्याशी संवाद साधण्यात कमी पडले हे नमूद करणे भाग आहे. स्वतःला मोठं समजणारा व्यक्ती लहान व्यक्तिजवळ गेल्यास तो लहान न होता अधिक मोठा होतो. हे समजून घेणे स्वतःला मोठं समजणाऱ्यांची जबाबदारी आहे. राजकारणात वेळ, काळ, संयम आणि नम्रता असणे फार आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीत विचारवंतांच्या भूमिकेमुळे नुकसान झाले हे जर मान्य आहे. तर त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांचे विचार व भूमिका नीट समजून घेणेही आवश्यक आहे. साहित्यिकांच्या व विचारवंतांच्या घरापुढे निदर्शने करून आपल्याला येत्या निवडणुकीत मते मिळवता येतील. या भ्रमात राहणे ही फार मोठी चूक आहे. उलट संवादातून आपल्या उणिवा आपल्या लक्षात येऊ शकतात . मनं आणि मतं जुळू शकतात ; आणि विखुरलेली चळवळ पुन्हा एकजूट होऊ शकते . त्यातूनच आपले स्वतंत्र राजकीय अस्तित्व उभे राहू शकते.
भारताची वर्तमान राजकीय स्थिती अतिशय भीषण आहे . आपला राजकीय विचार पुढे घेऊन जाऊ शकेल किंवा आपले सामाजिक हीत सुरक्षित राखू शकेल असा एकही राजकीय पक्ष देशात अस्तित्वात नाही. वर्तमान राजकारणात सर्वच राजकीय पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा, त्यांच्या फोटोचा , निळ्या झेंड्याचा व भारतीय संविधानाचा वापर करू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांना सभेत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे आवश्यक वाटू लागले आहे. परंतु नाव घेणारा पक्ष आपला आहे, असे समजणे ; आणि त्या पक्षावर विसंबून राहणे ही आपली सर्वात मोठी चूक आहे. भाड्याचे घर कितीही प्रशस्त, सुसज्ज आणि सुरक्षित वाटत असले तरी , ते आपले नसते. स्वतःची कुडाची ,मातीची झोपडी असली तरी ती आपली हक्काची असते. ही बाब लक्षात घेऊन आपण सर्वांनी आपली राजकीय भूमिका निश्चित करणे आवश्यक आहे !
—————————————
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत