अस्वस्थ मनातील द्वंद: जामिनावर सुटलेला काळा घोडा

आजूबाजूची भयानक परिस्थिती आणि मनातील घुसमट यांचा सुंदर मिलाप झाला की संवेदनशील मनातून वास्तवाच्या विस्तव कवितेचा जन्म होतो. आपल्या सुखासीन आयुष्याच्या पलीकडे एक विपन्न अवस्थेतील जीव जगत असतो. त्यांच्या जगण्याचा संघर्ष चढ-उतार, भरती-ओहोटी मोहरणे- कोमजणे त्यांचा दु:खोत्सव,विषमतेचा लाव्हा मनातून उसळी मारुन बाहेर येण्याचा मार्ग शोधत असतो. समाजव्यवस्थेतील विसंगती ताटातूट, दुरावा, विरह,आपत्ती ,दुःख, वेदना ,रितेपणा अशा अवस्था कवीच्या मनात थैमान घालतात.जेव्हा अशा घटना अस्वस्थ करतात तेव्हा कवीची लेखणी आपोआप कागदावर उतरते. जळजळीत विदारक सत्य बाहेर येते .कवीने जे रंजले गांजले… ते आपले मानले. अस्वस्थता हा कवितेचा आत्मा असतो. अंतर्मुख करणाऱ्या कविता या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. नैतिक, तात्विक व भौतिक या चाकोरीतून कविता प्रवास करतात. भावभावनांचा कल्लोळ, चैतन्याचा संचार ,जीवनानुभवाचे अधिष्ठान, शाश्वत मूल्याचे तेज यामुळे कविता पूर्णत्वाकडे वळते.कविता वाचकांच्या मनात रुंजी घालते. कवीचे जगणे आणि त्याची कविता या वेगळ्या करता येत नाहीत. किंबहुना त्यांची प्रत्येक कविता त्यांच्या आत्मचरित्राचा एक पान असते.वेदनेची पीळ सैल करण्याचे काम डोळसपणे कवी धनाजी धोंडीराम घोरपडे यांनी समाज मनाचे द्वदं समर्थपणे शब्दबध्द करण्यात यशस्वी झालेत. दुध जास्त असले की त्याला सायही भरपूर येते, तसेच आजूबाजूच्या विदारक समाज व्यवस्थेला अवाढव्य कढईत दु:खाची कढ येते.
कल्पनेपेक्षाही वास्तव विदारक असते. याची जाणीव करून देणारा म्हणून या कवितासंग्रहाकडे पाहता येते.”जामिनावर सुटलेला काळा घोडा” हे शीर्षक अधिक बोलके आहे. या कवितासंग्रहातून सामाजिक जाणिवेची भयरसयुक्तपर दुःखाबद्दल कळवळा, समाजातील दंभ, दैना,भेदभाव,अज्ञान ,वैषम्य अशी अभिव्यक्ती कवितेतून वाचकासमोर येतो. आणि वाचक हेलावून जातो त्यांना आत्मपरीक्षण करायला लावते.
मराठी साहित्य काव्यविश्वात, वर्तमान काळात कवितेतून ज्वलंत सत्य भावविश्व साकारणारे कवी म्हणून धनाजी धोंडीराम घोरपडे यांचे नाव अधोरेखित केले पाहिजे. त्यांच्या काव्यात सल आहे म्हणून त्या अस्सल कविता आहेत. त्यांच्या सशक्त कविता या कविसंग्रहातून पुढे येतात.
जसे सोसणे,भोगणे तशी अभिव्यक्तीला मनातल्या कल्लोळाला बाहेर काढण्याची प्रेरणा प्रतिमात्मक शब्द योजनेतून प्रगट होते. त्यांच्या कविता आपणाला डसत राहतात.
“कोरा कागद “या कविकेत उद्घोषित होते.
“आयुष्याच्या या कोऱ्या कागदावर
चार ओळी तरी लिहाव्या म्हणतोय
नाहीतर ही माणसं
असाच जाळतील हा कोरा कागद”
कवीला “दस्तऐवज “या कवितेतही खंत जाणवते.”
आमच्या आयुष्याच्या दस्तऐवजांवर आम्हालाच लिहिता येत नाही
आमच्या जगण्याचा खुला राजीनामा”
नाही रे वर्ग दु:ख,यातना,पीडा,यांचाआक्रोश करत बसत नाही. तर जगण्याचा उत्सव साजरा करतात. घोरपडे यांची कविता आजूबाजूंच्या जीवनभाष्याचा वास्तव कोलाहाल ठळकपणे मांडते.
समाजकारण करणारे लोकप्रतिनिधित्व आता लुप्त व्हायला लागलेत. त्यांची जागा राजकारण या गोंडस नावाखाली आपले नेते मतदारांना अधिकच अंध गुलाम करत आहे. याचं ज्वलंत भाष्य “मोर्चा” या कवितेत कवींनी अत्यंत पोटतिडकीने अधोरेखित केलेले आहे. या कवितासंग्रहाला” जामीनावर सुटलेला काळा घोडा” हे शीर्षक समर्पक आहे
“तुझ्यावर एक तरी मोर्चा काढावा म्हणतोय
काळ्या गोऱ्या
खऱ्या खोट्या
बऱ्या वाईट
दंतकथेचा छडा
लावावा म्हणतोय
तुझ्या नावाखाली ज्यांच्या पोटाचा घेर
झाडाच्या बुंध्यासारखा वाढलाय
त्याच्यावर एक तरी आसूड सपकन ओढावा म्हणतो”
कवीला जे समोर दिसतंय त्याची तो पूजा बांधतोय. जे दिसत नाही त्याची ते पूजा करीत नाही.आणि तेच खरं वास्तव्य आहे. अंधश्रद्धा ही माणसाच्या उन्नतीसाठी फार मोठा अडसर आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजाच्या युक्तीप्रमाणे "बुडती हे जन न देखवे डोळा" याचा प्रत्यय या कविते येतो.
“घरोघरी असतो स्वतंत्र देव
त्यासोबत स्थानापन्नासाठी सजावटीतला
मार्बल देव्हाराही
माणसं कमी
देव जादा
हा आमच्या संस्कृतीचा अमर्याद अनंत इतिहास.”
अशाच आशयाची परंतु आपल्या संस्कृतीला छेद देणारी वास्तवाशी निगडित असलेली ही रचना “माफीचा साक्षीदार” या रचनेतून ते अधिक स्पष्ट होते.” तुम्हाला उभं केलं आहे प्रार्थनाच्या रांगेत शतकानुशतके
समोर बडव्यांच्या गुलामीत अडकून पडलेला मूकबधिर ईश्वर
डोळं नसलं तरी पापण्या फासटून उभा आहे
माफीचा साक्षीदार म्हणून …!
डोळे उघडे ठेवून जे सत्य आहे आपण स्विकाराला हवे हीच कवीची माफक इच्छा आहे.
“खाली पेट” ही हिंदी रचना वाचकांना खिळवून ठेवते “बुद्ध ” ही अल्पाक्षरी कविता शांतीचे व सत्याचे प्रतीक आहे.
या संग्रहातील ही संदेश देणारी कविता मला अधिक भावते.
“नुसतीच कविता लिहून किंवा वाचून
पेटत नसते कोणाच्या घरची चूल
पण कविता समजल्यावर
आपल्या चुलीत पाणी ओतणाऱ्यांच्या
बुडाखाली लावता येतो जाळ”
अनिष्ठ प्रथेविरुद्ध प्रहार, बंडाची भाषा, वास्तवाचा विस्तव या कवितेतून उतरतो. क्लेषकारक व चिंतनशील वाचकांचा जीव कासावीस करणाऱ्या वास्तव कविता कवितासंग्रहाची उंची वाढवणाऱ्या अंतर्मुख करणाऱ्या आहेत.कवीने ८५ कवितेत वेदनेची कैफियत मांडताना प्रत्येक कवितेच्या पात्रात समरस झालेत म्हणून त्यांची कविता तिन्ही काळात मुक्त संचार करते. काव्यसौंदर्य,भावसौंदर्य ,
शब्दकळा यांची सांगड घालून अंतरंगातील कवितेची उत्कंठा वाढविणारा ,व्याकुळ करणारा हा कवितासंग्रह आहे.काही कवितेच्या शीर्षकांचा नामोल्लेख करतो. अम्मा, कागदातला गांधी दिसावा म्हणून, आंबट शौकीन देव, टाळभाग चाळीतली गुलीबाई,
गेल ओॅम्वेट: विचारांचा समृद्ध शिवार,अशा काही कविता वाचकांना चटक आणि चटका लावतात
ललित पब्लिकेशनने आपली पंरपरा उन्नत करत दर्जेदार,सकस आशयसंपन्न,प्रतिभासंपन्न कवितासंग्रह साहित्य दरबारात दाखल केला आहे.याचे चर्चात्मक स्वागत होईल हा माझा विश्वास आहे.नाहीरे वर्गाचा आणि कवीचा या हृदयाशी त्या ह्दयाशी शब्दसंवादाचा फुलोरा फुलला आहे.
या कवितासंग्रहाची पाठराखण करणारे ज्येष्ठ साहित्यिक वीरधवल परब यांनी समग्र अभ्यासून या संग्रहाची उंची वाढवली आहे. कवीने डोळसपणे स्व:नुभवाची बुरसटलेल्या विचारांना छेद देण्याचे विचार, नवीन उमेद देण्याची प्रेरणा, वास्तव स्वीकारण्याची मानसिकता असे प्रश्न कवीने वाचकांपुढे ठेवले आहे. आजूबाजूचे जगणे कवीने नेमक्या शब्दात पकडले आहे. भाषाशैली साधी परंतु थेट काळजाला भिडणारी प्रवाही आहे.
कवीचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या मधील फरक मी उद्घोषित करतो
” पिढीजात जे लाभले ते आनंदाने सोसून पाहिले
वेदनेचे वरदान होते जगले सोने करून पाहिले “
बुध्दभूषण साळवे यांनी साकारलेल्या मुखपृष्ठाची गुढता अंतरंग काव्याची उत्सुकता वाढविते. प्रशीक पाटील यांच्या सर्जनशील कुंचल्यातून आकारास आलेल्या चित्रामुळे कवितांचे आकलन अधिक सुलभ होते. समीक्षक व कवी धनाजी धोंडीराम घोरपडे यांच्या या कलाकृतीस माझ्याकडून मन:पूर्वक शुभेच्छा!
*मारुती कटकधोंड सोलापूर भ्र.९८८११२४४५०*
-जामिनावर सुटलेला काळा घोडा "
- धनाजी धोंडीराम घोरपडे
- ललित पब्लिकेशन मुंबई
- पृष्ठसंख्या-१३७
- मूल्य- २०० रु
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत