जन्मभूमी ते चैत्यभूमी–अशोक सवाई

(ऐतिहासिक)
लेख लिहिण्याच्या आधी मी इथे एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. माता रमाई व डॉ. बाबासाहेब यांच्या मध्ये जो छोटा संवाद आहे त्यात माता रमाई त्यांच्या बोलण्यातून तिर्थक्षेत्र हा शब्द वापरतात. डॉ. बाबासाहेब सुद्धा त्यांची समजूत घालण्यासाठी तोच शब्द वापरतात. हा त्यांचा संवाद स्वातंत्र्य पूर्व काळातील म्हणजे खूप वर्षे आधीचा आहे. तेव्हा आपले पूर्वज हिंदू रिवाजाप्रमाणे आचरण करत होते. त्यामुळे माता रमाई यांनी सुद्धा तीर्थक्षेत्र शब्द वापरला. तोच शब्द लेखासाठी वापरणे अपरिहार्य होते. ज्या स्थळांना इतिहासाचा वारसा लाभलेला असतो ती ऐतिहासिक स्थळे असतात. म्हणूनच मी लेखाच्या शेवटी या स्थळांना ऐतिहासिक स्थळे म्हटले आहे. वैदिक धर्माप्रमाणे कदापिही लेखणातील स्थळे तीर्थक्षेत्र होवू शकत नाही.
त्यामुळे मी लिखाणात तीर्थक्षेत्र हा शब्द वापरला म्हणून कोणीही गैरसमज करून घेवू नये. तो लेखाचा एक अपरिहार्य भाग आहे. मी ऐतिहासिक स्थळांना तिर्थक्षेत्र कधीही म्हणणार नाही. धन्यवाद!
*”स… सा… साहेब मला एकदा तरी घेवून चला हो पंढरपूरी तीर्थक्षेत्री”… “रामू जे लोक आपल्याला ज्या मंदिरात जावू देत नाही, तेथे दर्शन घेवू देत नाहीत तिथं आपण का व कशासाठी जायचे?”… “हे बघ रामू आपण नवीन तीर्थक्षेत्र निर्माण करू जिथं कोणीही कुणाला मनाई करणार नाही”…* वरील ऐतिहासिक संवाद आहेत माता रमाई व डॉ. बाबासाहेबांचे. वरीलप्रमाणे डाॅ. बाबासाहेब म्हटल्यावर माता रमाईने पंढरपूरला जाण्याचा तगादा सोडून दिला. शेवटी रविवार दि. २६ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता माता रमाईने शेवटचा श्वास घेतला. ती पंढरपूरला जाण्याची इच्छा मनात ठेवूनच. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. १३ आक्टोबर १९३५ रोजी जाहीर सभेत येवला, जिल्हा नाशिक येथे प्रतिज्ञाच करून टाकली की *”मी हिंदू धर्मात जन्मलो ते माझ्या इच्छा शक्तीच्या बाहेर होते. परंतु मी हिंदू धर्मात मरणार नाही हे माझ्या इच्छा शक्तीच्या बाहेर नाही “* आणि त्यांनी त्यांची ही प्रतिज्ञा बरोब्बर २१ वर्षांनी म्हणजेच दि १४ आक्टोबर १९५६ रोजी पूर्ण केली. ही त्यांची प्रतिज्ञा ऐतिहासिक ठरली. असो.
मध्य प्रदेशातील इंदोर शहरा जवळील महू गावात १४ एप्रिल १८९१ रोजी बाल भिवाचा जन्म झाला. तेव्हा तिथे सैन्याची छावणी (मिल्ट्री कॅम्प) होती. सुभेदार बाबा रामजी आंबेडकर याच छावणीत राहात होते. इथेच डाॅ. बाबासाहेबांचा जन्म झाला. ही डाॅ. बाबासाहेबांची *जन्म भूमी* आज त्या जागेवर बाबासाहेबांचे शुभ्र रंगात सुंदर भव्य स्मारक उभे आहे. त्या स्मारकात डाॅ. बाबासाहेबांच्या जिवन संघर्ष प्रसंगाचे तैलचित्र आहेत. मुख्य हाॅलमध्ये बाबांची मुर्ती आहे. बहुजन समाज हजारोंच्या संखेने त्या स्मारकाला पावनक्षेत्र समजून दरवर्षी १४ एप्रिल ला सकाळ पासूनच तेथे डाॅ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी यायला सुरवात करतात. हे माता रमाईच्या मताप्रमाणे किंवा शब्दाप्रमाणे माता रमाईसाठी *पहिले तीर्थक्षेत्र* बाबांनी निर्माण केले.
सन १९१७ मध्ये बडोदा संस्थानाच्या करारा प्रमाणे डाॅ. बाबासाहेब इंग्लंड मधून शिक्षण घेवून सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या संस्थानात संरक्षण विभागाचे सचिव या पदावर रुजू झाले. परंतु तेथील जातीयवादी शक्तींनी तिथे त्यांना धमकावून राहायला मनाई केल्या मुळे ते नाईलाजाने आपली कपड्यांची बॅग घेऊन तेथून दूर एका झाडाखाली येवून ढसाढसा रडले. तेव्हा तेथेच त्यांनी जातीयवादाचा बिमोड करण्याचा संकल्प केला ती आज *संकल्प भूमी (संकल्प पार्क)* (बडोदा, गुजरात.) म्हणून प्रसिद्ध झाली. त्या भूमीला आज लाखो पर्यटक भेट देतात. हे डाॅ. बाबासाहेबांनी निर्माण केलेले माता रमाईसाठी *दुसरे तीर्थक्षेत्र.*
दि. १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेबांनी भीमा कोरेगाव (जि.पुणे) येथे जाऊन भिमा कोरेगावच्या विजय स्तंभाला भेट देऊन मानवंदना दिली व ५०० महार वीरांच्या शौर्य गाथेवर डाॅ. बाबासाहेबांनी तिथे जमलेल्या लोकांसमोर स्फुर्ती दायक भाषण दिले. आपण सर्व नागवंशीय आहोत आणि नागवंशीय हे पूर्वीपासूनच शूर होते. या देशात राजे होते. असे तेथे जमलेल्या लोकांसमोर त्यांची चेतना जागृत करणारे भाषण दिले. डाॅ. बाबासाहेब कोणतेही आंदोलन करण्याआधी ते त्या आंदोलनाची तयारी दोन अडीच महिन्या आधीपासूनच करत असत. भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळ दिलेले भाषण सुध्दा पुढे २० मार्च १९२७ रोजी महाडचा सत्याग्रह घडवून आणण्यासाठीचा एक भाग होता. म्हणूनच महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात महाडच्या रहिवाशां सोबत महाडच्या बाहेरील लोक सुद्धा सहभागी झाले होते. येथील लोक महाडच्या सत्याग्रहात सामिल व्हावे म्हणूनच तर बाबांनी तीथे त्यांची चेतना जागृत करणारे भाषण दिले होते. डाॅ.
बाबासाहेबांनी पुन्हा विजय स्तंभाला मानवंदना देवून आपले स्फुर्तीदायक भाषण समाप्त केले. तेव्हापासून त्या भूमीला शौर्य भूमी म्हणून ओळखले जाते. आज दरवर्षी १ जानेवारीला देशभरातून लाखो लोक शौर्य भूमीला येवून विजय स्तंभाला मानवंदना देतात. हे त्यांनी निर्माण केलेले माता रमाईसाठी तिसरे तीर्थक्षेत्र.
दि. २० मार्च १९२७ रोजी महाडला (जि.रायगड) समतेसाठी चवदार तळ्याचा बाबांनी सत्याग्रह केला. अस्पृश्य लोकांसाठी तळे खुले व्हावे म्हणून जिथे त्यांनी संघर्ष केला त्या ठिकाणाला आज *संघर्ष भूमी किंवा सत्याग्रह भूमी* म्हणून ओळखले जाते. दि. २० मार्च ला महाराष्ट्रातून हजारो लोक त्या महाडच्या चवदार तळ्याला भेट देऊन डोळ्यासमोर डाॅ. बाबासाहेबांची प्रतिमा आणून त्या तळ्याचे घोटभर पाणी चाखून धन्य होतात. हे डाॅ. बाबासाहेबांनी निर्माण केलेले माता रमाईसाठी *चौथे तीर्थक्षेत्र.*
डाॅ. बाबासाहेबांनी दिल्लीच्या राहत्या घरात संविधान लिहिले होते तिथे म्हणजे दिल्लीच्या २६, अलिपूर रोड ला आज संविधान पुस्तकाच्या प्रतिकृतीत भव्य स्मारक साकारले आहे ती भूमी म्हणजे *संविधान भूमी.* दिल्ली हे देशाच्या राजधानीचे शहर असल्याने इथे रोजच देश विदेशातील हजारोच्या संखेने लोक भेट देत असतात तीच *संविधान भूमी* हे डाॅ. बाबासाहेबांनी निर्माण केलेले माता रमाईसाठी *पाचवे तीर्थक्षेत्र.*
संत तुकोबा रायांच्या देहू गावाच्या पंचक्रोशीतील देहू रोड (जि, पुणे) येथे एक भूमी आहे ती आहे *धम्म भूमी* याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रम्ह देश (आताचे म्यानमार) येथून आणलेली शुभ्र तथागत गौतम बुद्धांच्या मुर्तीची त्यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाली. तो दिवस होता २५ डिसेंबर १९५४. याच दिवशी म्हणजे २५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अजून एक ऐतिहासिक घटना घडवून आणली होती. ती म्हणजे ज्या पेशवाईने शिवशाई नष्ट केली त्या पेशवाई ची लाडकी, प्यारी असलेली मनुस्मृती डाॅ. बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळून नष्ट केली. व शिवशाई नष्ट करणाऱ्यांचा बदला घेतला. अशा रीतीने डाॅ. बाबासाहेबांनी २५ डिसेंबर या दिवशी दोन ऐतिहासिक घटना घडवून आणल्या. २५ डिसेंबर १९५४ या दिवसापर्यंत डाॅ. बाबासाहेबांची बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. म्हणून त्यांनी तेथे जमलेल्या लोकांसोबत बुद्ध वंदना घेऊन लोकांना आधीचाच असलेला पण नव्याने धम्म मार्ग दाखवला. डाॅ. बाबासाहेबांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या या धम्म भूमीला २५ डिसेंबरला महाराष्ट्रातून हजारो लोक येतात. परत जातांना पुस्तके, धम्म कॅलेंडर, तथागत बुद्ध व बाबांच्या मुर्त्या, फोटो असे साहित्य घेऊन जातात. गरीबातील गरीब निदान एक पुस्तक तरी घेऊन जातोच जातो. बाबांच्या कोणत्याही संबंधित कार्य भूमीतून पुस्तक विकत घेवून जाण्याचा हा आता एक शिरस्ता बनला आहे. पूर्वी जसे मंदिरात गेल्यावर प्रसाद घेतल्या शिवाय लोकं पुढे जात नव्हते तसे आता बाबांच्या कार्य भूमीतून एखादं पुस्तक घेतल्याशिवाय लोकं पुढे जात नाहीत. एका दिवसात पुस्तकांसाठी लाखोंची उलाढाल होते. हे डाॅ. बाबासाहेबांनी निर्माण केलेले माता रमाईसाठी *सहावे तीर्थक्षेत्र.*
आमच्या सवाई परिवारासाठी अत्यंत अभिमानाची एक खास बाब म्हणजे बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या धम्म भूमीत आम्ही गेले ४४ वर्षापासून वास्तव्यास आहोत. ज्याला भाग्य भाग्य म्हणतात ना! ते या शिवाय दुसरे काय असू शकते?
जगाच्या नकाशावर ठळकपणे असलेले नागपूर शहरातील *दीक्षाभूमी* याच ऐतिहासिक स्थळावर देश, विदेशातील लाखोंच्या संख्येने लोक येतात. अगदी उडण खटोले बुक करून येतात. येथे आल्यावर स्वयंप्रेरणेने धम्म दीक्षा घेतात. व पावन होवून आपापल्या दिशेने परत जातात. परत जातांना पुस्तके घेऊन जाण्यास विसरत नाहीत. तो ऐतिहासिक दिवस म्हणजे १४ आक्टोबर १९५६ याच दिवशी डाॅ. बाबासाहेबांनी आपल्या पाच लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. व सोबतच २२ प्रतिज्ञा सुध्दा दिल्या होत्या. येथे दर अशोका विजया दशमीच्या दिवशी धम्म दीक्षात्सोव होतो. हे *दीक्षा भूमी* स्थळ डाॅ. बाबासाहेबांनी निर्माण केलेले माता रमाईसाठी *सातवे तीर्थक्षेत्र.*
आणि ६ डिसेंबर १९५६ पासून विशाल सागराच्या कुशीत चीर निद्रा घेत असलेले प्रज्ञा सूर्य डॉ. बाबासाहेबांचे ऐतिहासिक स्थळ म्हणजे *चैत्यभूमी.*(दादर, मुंबई) या ठिकाणी बौद्ध राष्ट्रातील व जगात ज्या ज्या देशात डाॅ. बाबासाहेबांचे अनुयायी आहेत ते आणि देशातील लाखो लोक त्यांच्या पवित्र स्मृतीस्थळाचे अश्रू नयनाने दर्शन घेतात व जड पावलाने आपल्या गावी परत जातात. पण परत जातांना गरीबातील गरीब व्यक्ती त्यांची आठवण म्हणून एक तरी पुस्तक घेऊन जाते. तो दिवस मोठा भावपूर्ण असतो. हे बाबासाहेबांनी त्यांच्या पश्चात निर्माण केलेले माता रमाईसाठी आठवे व अंतिम *तीर्थक्षेत्र होय.* याप्रमाणे त्यांनी माता रमाईला 'तीर्थक्षेत्राचा' दिलेला शब्द पूर्ण केला. माता रमाई पंढरपूर या एकाच तीर्थक्षेत्री जाण्यासाठी आग्रह धरत होत्या पण त्यांच्या साहेबांनी त्यांच्यासाठी आठ आठ तीर्थक्षेत्रे निर्माण केले. पण दुर्दैवाने माता रमाई यापैकी एकही पाहू शकल्या नाहीत. आपल्या पत्नीला शब्द देवून तो त्यांनी पूर्ण केला होता. धन्य त्या रमाई अन् धन्य ते बाबासाहेब. ज्यांनी आपल्या ऐतिहासिक महान कार्याने इतिहासाचे पानेही सोनेरी करून ठेवले.
वरील आठही ऐतिहासिक स्थळी धर्मभेद नाही, जातीभेद नाही, पंथभेद, लिंगभेद, स्पर्श भेद नाही ना आंतरदेशीय प्रांत भेद आहे ना ही आंतरराष्ट्रीय सीमा भेद. अखिल जगत मानवांसाठी वरील आठही ऐतिहासिक स्थळे सदैव खुले आहेत. या आठही स्थळी लोक शांततेने येतात बाबांना अभिवादन करून शांततेने परत जातात. या ठिकाणी आजपर्यंत एकही अशी घटना घडली नाही की, हल्लागुल्ला झाला, आपसात भांडणे झाली, मारामाऱ्या झाल्या त्यातून पोलीस तक्रार दाखल झाली अशा घटना कधी घडल्या नाहीत. वरील आठही ठिकाणी जाणारे लोक बाबांच्या संविधानाचे पालन करतात. ही मोठी अभिमानाची बाब आहे.
सन्मानिय वाचकहो, आपल्यापैकी कुणी ना कुणी, कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या वरील ऐतिहासिक स्थळांना अवश्य भेट दिली असणार. तेव्हा आपल्या तिथल्या भेटीचे अनुभव/वर्णन शेअर करावे, व्यक्त व्हावे. मग ते तोडक्या मोडक्या शब्दात का असे ना पण व्यक्त व्हावे.
संकल्प भूमीचा इतिहास थोडक्यात पाहू
आजपासून बरोबर १०७ वर्षापूर्वी म्हणजे सन १९१७ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या बडोदा संस्थानच्या कराराप्रमाणे संरक्षण विभागात सचिव या पदावर रुजू झाले तेव्हा ते एका पारशी आश्रमात आपली जात लपवून राहू लागले. ते आपल्या 'वेटिंग फाॅर व्हिजा' या पुस्तकात म्हणतात *"मी जेव्हा विलायतेत शिकायला होतो तेव्हा माझ्या डोक्यातून जात व अस्पृश्यता या गोष्टी पूर्णपणे निघून गेल्या होत्या"* बडोद्यात त्यांना पुन्हा भयंकर जातीयवादाचा सामना करावा लागला. ते बडोद्यात जून ते ऑगस्ट पर्यंत असे तीन महिने होते. त्यांच्या कचेरीत जातीयवादी शक्तींनी त्यांचा मोठा छळ केला. पारशी आश्रमात असतांना जेव्हा तिथल्या ही जातीवादी लोकांना त्यांची जात कळली तेव्हा त्यांचा राग अनावर होवून हातात लाठ्या काठ्या घेऊन बाबांना मारायला आले होते.
जिवाच्या भीतीमुळे डाॅ. बाबासाहेब मारेकऱ्यांना चुकवत तेथील एका घोर जंगलात येवून एका झाडाखाली ढसाढसा रडत बसले. ज्या झाडाखाली ते घोर अंधाऱ्या रात्री बसले होते त्या झाडाच्या अगदी जवळून एक नदी वाहते. त्यात मोठ्या मोठ्या खतरनाक मगरी होत्या. काळ्याकुट्ट रात्री त्या शिकारीसाठी नदीपात्रातून बाहेर पडत असत. जशा या खतरनाक मगरी होत्या तसेच त्या जंगलात खतरनाक हिंस्र पशूही होते. वाचकहो जरा कल्पना करा १०७ वर्षापूर्वीचे घनदाट जंगल. त्या जंगलातील काळीभोर भयावह, भयानक रात्र, पावसाळी मौसम, आकाशात अधूनमधून चमकणाऱ्या विजा, त्या काळ रात्रीत भयान जंगलात वेगवेगळ्या प्राण्या, पक्षांचे अंगाचा थरकाप उडवणारे चित्रविचित्र आवाज अशा भयानक परिस्थितीत डाॅ. बाबासाहेब एकटे एका झाडाखाली रडत बसलेले. कल्पना करा. जंगलातील याच हिंस्त्र जनावरांमुळे जातीयवाद्यांना जंगलात घुसण्याची हिंमत झाली नसावी. एका अर्थाने असे म्हणावे लागेल की या खतरनाक जंगली जनावरांनीच त्यांच्याही पेक्षा खतरनाक असणाऱ्या जातीवादी हिंस्त्र जनावरां पासून डाॅ बाबासाहेबांचे संरक्षण केले. जरा सोचा जर जंगली जनावरांनी किंवा मोठ्या मगरींनी डाॅ. बाबासाहेबांवर हल्ला केला असता तर... किंवा जातीवादी नराधमांच्या तावडीत डाॅ. बाबासाहेब सापडले असते तर... कल्पना करवत नाही. येथे लिहितांना ही आमच्या शरीरावर शहारे उभे राहतात. आज भारत आजचा भारत न राहता कट्टर मनुवादी भारत असता. आणि अशा भारतात आपण कुठे असतो हे सोचा
त्या काळ्याकुट्ट घनघोर जंगलात डॉ. बाबासाहेबांनी अख्खी रात्र रडून काढली असेल. तेव्हा तिथे त्यांना धीर द्यायला, सांत्वन करायला माणसा पैकी कुणीही नव्हते. होते फक्त ज्या झाडाखाली डाॅ. बाबासाहेब रडत बसले होते ते झाड, वर ढगाळ आकाश, खाली पावसाळी ओलसर जमीन व आजूबाजूला अक्राळविक्राळ झाडांचे भयान जंगल. जंगलात कुठेतरी असणारे हिंस्र पशू व नदी पात्रातील मगरी याशिवाय माणसांपैकी तिथे कुणीही नव्हते. सकाळी उजाडल्यावर त्याच झाडाखाली बाबांनी संकल्प केला की *'या देशातील मी जातीवाद मोडून काढल्या शिवाय राहणार नाही'* असा तिथे संकल्प करून डॉ. बाबासाहेब मुंबईला आपल्या परळ चाळीत परतले. तेव्हा बिछान्यावर रामजी बाबा डोळ्यात प्राण आणून डॉ. बाबासाहेबांची वाट पाहत होते. रामजी बाबांनी डॉ. बाबासाहेबांना डोळे भरून पाहिले व प्राण सोडले.
ज्या झाडाखाली डॉ. बाबासाहेबांनी जातींचा बिमोड करण्याचा संकल्प केला होता त्या परिसराला आता *संकल्प पार्क किंवा संकल्प भूमी* म्हणून ओळखले जाते. देशभरातून दररोज असंख्य लोक या संकल्प पार्कला भेट देतात. तिथल्या स्थानिक प्रशासनाने त्या पार्कला चौभोवताली तारेचे कंपाऊंड घातले. पाणी, लाईट अशा मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. इतिहास प्रेमी तेथे जावून धन्य होतात.
ब्राह्मणांच्या वैदिक धर्माने त्यांच्या विचारांच्या तीर्थक्षेत्राचे चार धाम निर्माण केले अर्थात तेही बौद्ध प्रतीकांची चोरी करूनच परंतु डॉ. बाबासाहेबांनी त्याउलट आपल्या विचारांचे आठ म्हणजे वैदिक धर्माच्या दुप्पट बाबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले ऐतिहासिक स्थळे निर्माण करून ठेवले. ज्याला इतिहासात तोड नाही. तर अशा तऱ्हेने बाबांनी माता रमाईला दिलेला शब्द पूर्ण केला. माता रमाईला जास्त आयुष्य लाभले असते तर त्यांना ही डॉ. बाबासाहेबांनी निर्माण केलेली ऐतिहासिक स्थळे पाहता आली असती तर त्या खरोखर धन्य झाल्या असत्या. धन्य त्या माता रमाई! अन् धन्य ते डॉ. बाबासाहेब!!
*जन्म भूमी ते चैत्यभूमी असा आपल्या जीवनाचा लंबा परंतु अतिशय संघर्षमय काळ बाबांनी व्यतीत केला. बाबा स्वतः उन्हात तापले, पावसात भिजले, थंडीत हुडहुडले परंतु आपल्याला सुखाच्या सावलीत आणून बसवले. त्यासाठी त्यांनी आपले चार लेकरे गमावले. संसार जीवनाच्या अर्ध्या वाटेवर आपली सोन्यासारखी पत्नी गमावली तरी आपल्याला साधी उन्हाची झळ बसू दिली नाही. व आपला भविष्यकाळ नेहमीसाठी उज्वल करून ठेवला. हे आपण कधीही विसरता कामा नये.*
आज महापरिनिर्वाण दिवस प्रज्ञा सूर्य, क्रांती सूर्य, भारताच्या भारत रत्नाला, म्हणजेच डॉ. बाबासाहेबांना नतमस्तक होवून आमचे अभिवादन!
तळटीप: माता रमाईचे महानिर्वाण रविवार दि. २६ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता झाले. (संदर्भ: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, चरित्र लेखक, चांगदेव भवानराव खैरमोडे, खंड ६, पान नं. ५९) चां. भ. खैरमोडे हे डॉ. बाबासाहेबांचे समकालीन चरित्र लेखक होते. त्यांचा जन्म १५ जुलै १९०४ चा आहे. बाबासाहेबांचा सहवास त्यांना लाभला होता. ते बाबासाहेबांचे खंदे कार्यकर्ते होते. डॉ. बाबासाहेबांच्या घरी त्यांचे जाणे येणे होते. यावरून त्यांनी माता रमाईच्या महानिर्वाणाची तारीख आपल्या खंडात नमूद केली ती विश्वसनीय आहे. २७ मे ही व्हाॅटसॲप वरून फिरणारी महानिर्वाणाची तारीख खरी वाटत नाही. ती गुगल सर्च ची तारीख वाटते.
– अशोक सवाई.
91 5617 0699
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत