बुद्ध तत्त्वज्ञानाच्या शत्रूंपासून बुद्ध धम्माला तुम्हाला खरोखरच वाचवायचे आहे काय?

जयवंत हिरे
त्या साठी नक्की कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतील?
“””””””””””””””'”””””””‘”””””””””””””””””””””””””””””””””””‘”””””””””
आपण जितक्या मोठ्या प्रमाणात अशोक विजया दशमीच्या दिवशी आंबेडकरी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतोय, तितक्याच मोठ्या प्रमाणात १४ऑक्टोंबरलाही आंबेडकरी धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करून बुद्ध -आंबेडकरी वैज्ञानिक समताभिमुख समाज निर्मितीच्या जणीवा-बांधीलक्या जागवतोय.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांना हिंदू धर्माच्या पशूतूल्य गुलामीतून स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी हिंदू धर्म त्याग आणि हिंदू धर्माधिष्ठीत अमानुषतेला मानवी मूल्यांचा पर्याय म्हणून बुद्धाच्या धम्माची दीक्षा १४ऑक्टोंबर १९५६ला नागपूर येथे;तर १६ऑक्टोंबर१९५६ ला चंद्रपूर येथे दिली.त्याहीपुढे जाऊन देशभरात अस्पृश्यांसह सर्वच भारतीयांना बुद्धाच्या वैज्ञानिक मानवता आणि समताधिष्ठीत समाज व्यवस्थेकडे आणायचे त्यांचे स्वप्न होते.
त्या दृष्टीने त्यांनी “संपुर्ण भारत बौद्धमय करण्याची” प्रतिज्ञा करतांनाच बुद्धाचे तत्वज्ञान सर्व सामान्यांना समजण्यासाठी लोक जागरण करण्याचा जनमार्ग म्हणून प्रत्येक बौद्ध कोणत्याही मध्यस्थ/पुरोहिताशिवाय परस्परांना दीक्षा देवू शकतील;असे स्पष्ट करतांनाच या बौद्धांना बुद्ध विचारांचे आकलन होण्यासाठी बुद्ध विचार प्रशिक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचाही मानस व्यक्त केला होता.
परंतु धम्मदीक्षेनंतर अवघ्या पावणे दोन महिन्यांतच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे नव दीक्षित परंतु मोठ्या प्रमाणावर अशिक्षित आणि गरीब अस्पृश्य समुहाचा हिंदू धर्माच्या गुलामीतून आझाद होऊन बुद्ध धम्म पथावरील वाटचालीचा मार्ग खीळयांवरुन चालण्याचाच ठरला होता.अश्या स्थितीत या नवदीक्षित बौद्धांनी सत्ताधाऱ्यांनी नाकारलेल्या आरक्षणावर मात करत “बाबासाहेबांसारखं शिकायचं,ज्ञानी व्हायचं” म्हणत अतुलनीय प्रगती केली.माय्राच्या जागांवर झेप घेतली.
भ.बुद्धांनी आपल्या विचार आकलनासाठी निर्माण केलेला भिक्खू संघ आणि लोकांशी साधलेले वैचारीक आदानप्रदान
सिद्धार्थ गौतम बालपणापासूनच प्रश्न पडणारा आणि ती उलगडण्यासाठी चिंतन/आकलन करणारा चिकित्सक वृत्तीचा सर्जनशील -सृजनशील मुलगा होता.त्यामुळेच त्याला तान्हूले मुलाच्या चेहऱ्यावरचे निर्मळ हास्य पाहून जेव्हढे नवल वाटायचे,तेव्हढीच अस्वस्थता आजारी माणसाच्या वेदना पाहून वाटायची.एखाद्या वृद्धाची जगण्याची यातायात पाहून त्याला जेव्हढी अस्वस्थता वाटायची, तेव्हढीच अस्वस्थता मरण पावलेल्या व्यक्तीला अंतेष्ठीसाठी घेवून जाणाय्रा त्या मृतांच्या आप्तांचा आक्रोश पाहून वाटायची.
या साय्रा घडामोडींनी अस्वस्थ असलेला सिद्धार्थ निरंजना नदीच्या पाण्याच्या हिस्सेदारीवरून हिंसकतेने युद्धाला एकमेकांविरूद्ध उभे राहिलेल्या पैतृक शाक्य आणि मातृक कोलीय या आप्तांच्या युद्ध पिपासेने अस्वस्थ झाला.त्याने शाक्य आणि कोलीयांनाही “या युद्धाने तुमचा नदीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल की रक्ताच्या नद्या वाहतील?” असे प्रश्न विचारून त्यांना युद्धापासुन प्रवृत्त केले.
सिद्धार्थाच्या या युद्ध विरोधाची सजा म्हणून त्याने गृहत्यागही केला आणि तिथूनच त्याच्या प्रवाहाविरुद्धच्या संशोधन-अभ्यासाचा आरंभ झाला.
गॅलेलियो जसा आपल्या दूर्बीणी घेऊन धर्मग्रंथात सांगितल्यानुसार सपाट पृथ्वी भोवती फिरणारे सूर्य , चंद्र,तारे न्याहाळत फिरतांना त्याला पृथ्वीचे गोल असणे आणि त्या पृथ्वीनेच सूर्याभोवती फेय्रा घालत पिंगा घालणे जाणवल्यावर ह्या सत्याच्या शोधनाची सजा म्हणून सूळावर चढवले जाण्याच्या धर्म परायणतेला सामोरे जावे लागले.
उकळत्या चहा वरील थडथडणारे झाकण पाहून एखाद्या जेम्स वॅटच्या भेजात वाफेच्या ताकदीचे आकलन होत होते.
झाडावरून जमीनीवर पडणारे सफरचंद पाहून एखाद्या न्यूटनला पिरथीमायच्या वस्तु खेचून घ्यायच्या ताकदीचा आदमास लागत होता.
सिद्धार्थ नामक या तरूण समाज वैज्ञानिकाला मानवी जगण्या-मरणाच्या आसक्ती आणि हेतूंबाबत अगदी अस्सेच निरनिराळे प्रश्न पडत होते.
भेजात निर्माण झालेली ही कोडी उलगडायसाठी मोठ्या असोसिने तो तत्कालीन साय्राच दिव्य शक्तींच्या ठेकेदारांच्या आश्रमांचे, ऋषिमुनींचे,अभ्यासकांचे उंबरठे झिजवत होता.
त्याला पडलेल्या जन्मा अगोदरचे जीवन,मरणानंतरचे जीवन,जन्म ते मृत्यू या काळातील जीवन जगत असतांना उद्भवणाऱ्या समस्या-अडिअडचणी,समाज जीवनातील शोषक-शोषीत नाते,समाज जीवनातील असमानतेची-दु:खाची कारणे तृष्णा आणि त्या वरील उपाय योजना या बाबत त्याला उलगडा होत गेला.
हेच तर खरे ज्ञान याची जाणीव त्याला झाली आणि हीच सिद्धार्थ गौतमाला झालेली ज्ञान प्राप्ती होती.
तथागत बुद्धांना झालेली ही ज्ञानप्राप्ती एका समाज शास्रज्ञाने संशोधनाच्या असोसितून लावलेला शोधच होता.
पण, एखाद्या संशोधकाने लावलेला शोध, प्राप्त झालेले ज्ञान कितीही मोलाचे असले;तरी ज्या मानवी समाजाचा तो घटक असतो.त्या समाजात बदल घडविण्यासाठी, समाज जीवन विकसित-उन्नत करण्यासाठी कुचकामी ठरत असल्यास काय कामाचे?
ज्ञान प्राप्त झालेल्या सिद्धार्थ गौतमानेही मानवी समाज जीवनात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान लोकांपर्यंत पोहचवण्याचे ठरवले.त्यासाठी सिद्धार्थ गौतमाने आपल्या ज्ञान प्राप्तीच्या धडपडींचा भाग म्हणून केलेली तपश्चर्या सोडल्यानंतर त्याची सोबत सोडून गेलेल्या पंचवर्गिय ब्राह्मणांशी प्रथम संवाद साधला.या संवादातच तो “जन्मा अगोदरच्या जीवनबाबत विचार केल्याने आपल्या वर्तमान जीवनात जसा काही बदल घडणार नाही,तसाच पुढच्या जन्माबाबतच्या कल्पनांमध्ये रममाण झाल्यानेही घडणार नाही.
त्यामुळेच जन्मा अगोदरच्या आणि मरणानंतरच्या माहित नसलेल्या जीवनाबाबत जाणून घेण्यासाठी वेळ घालवण्यापेक्षाया जन्मातल्या समस्या-दु:खांबाबतचा उलगडा झाला पाहिजे;या जाणीवे-नेणीवेतून दु:ख, त्या दु:खाचे वास्तव स्विकारले पाहिजे आणि ती दु:खे नष्ट करण्याच्या उपाय योजनांची दिशा;ही चार आर्य सत्ये;उलगडून त्या पाच ब्राह्मणांना केलेले दिशा दिग्दर्शन म्हणजेच बुद्ध धम्म पथावरील समाजाच्या वाटचालीचा आरंभ बिंदू होय.तेथून बुद्धांच्या या धम्म पथावर चांडाल-नाभिकापासून ते स्रियांपर्यंत साय्रांनाच ज्ञानाचे आकाश बुद्धाने मोकळे करून दिले.
बुद्धाकडून आपल्याला प्राप्त झालेल्या या ज्ञानपथावर बुद्ध आपल्याला प्रश्न विचारण्याची मुभा देतो.आपण विचारलेल्या प्रश्नांना उलगडून सांगता सांगता आपल्या जगण्याच्या ज्ञान जाणीवा समृद्ध करतानाच समाजाप्रति आपली कर्तव्ये आणि जबाबदाय्रांचे भान संवेदनशीलपणे विकसित करतांना त्या बाबत डोळसपणाही आणतो.आपल्या सत्यशोधनाच्या या प्रक्रियेचे अंतिम टोक (कॉपीराईट)(माझ्या पासूनच ज्ञानाचा प्रवाह सुरु होऊन माझ्यापाशीच संपते.मी सांगीतलेल्या शिकवणूकीच अंतिम सत्य आहे);स्वत: जवळ ठेवण्याचे नाकारून नवनव्या सत्यांचा शोध घेण्याला प्रोत्साहन देतो.आपल्या तत्वज्ञानास कालानुरूप खळखळत्या प्रवाहित नदी प्रमाणे बदलते ठेवण्याची मांडणी करतानाच आपण आणि आपल्या शिकवणूकींना दैवी पावित्र्याचे वलय देण्याचे नाकारून निरोगी/नितीमान समाज निर्मितीसाठी माणसाने शोधलेली तत्वप्रणाली अशी आपल्या तत्वज्ञानाची मांडणी करतो.
तथागत बुद्ध आपल्याला झालेली ज्ञानप्राप्ती/बुद्धत्वही अखेरचे न म्हणता बुद्धत्व प्राप्तीचे दरवाजे सर्वांसाठी सताड उघडतो.बुद्धाची ही चर्चा/संवादाची अखंड प्रक्रिया त्याने आपल्या निर्वाणापर्यंत अखंडित चालू ठेवल्याने तत्कालीन बुद्ध प्रणीत श्रमण संस्कृती विरोधात ब्राह्मणी संस्कृतीने बुद्धाच्या कार्य काळातच चालवलेली बुद्ध तत्त्वज्ञानाच्या विपर्यस्तिकरणाची मोहिम अपयशी ठरून बुद्ध तत्त्वज्ञान अवघ्या भारतीयांनी स्विकारले.
बुद्धाने चालवलेल्या सत्य शोधनाची,ज्ञानाच्या आदानप्रदानाची ही प्रक्रिया बुद्धांनंतर पहिल्या, दुसऱ्या आणि सम्राट अशोकाने आयोजित केलेल्या तिसऱ्या धम्मसंगिती पर्यंत गतीमान राहीली.
बुद्धाने समाज जीवनाला नैतिक अधिष्ठान देण्यासाठी दिलेल्या १)मी हिंसा करणार नाही.२)मी असत्य बोलणार नाही.३)मी नैतिकतेने आचरण करीन.४)मी असत्य बोलणार नाही.५)मी मादक पदार्थांपासून अलिप्त राहीन.या स्वयंनिर्धारित पंचशीलांऐवजी अनेक तोतये चीवरे पांघरून १)मद्य२)मांस३)मैथून४)मिथ्या५)मंत्र या पंच “मकारां”चा बुद्धांनी प्रतिपादन केलेला पंचशील विचार म्हणून प्रचार-प्रसार करू लागले.या तोतया चीवरधाय्रांना भिक्खू संघाबाहेर हाकलून लावण्याच्या पहिल्या धम्मसंगिती पासून सुरू झालेल्या प्रक्रियेत तिसऱ्या धम्मसंगितीमध्ये साठ हजार तोतया चीवरधाय्रांना भिक्खू संघाबाहेर हाकलण्यात आले;बुद्ध तत्वज्ञानाच्या उध्वस्तिकरणाचे हे ब्राह्मणी कारस्थान उधळून लावण्यासाठी तोतया भिक्खूंच्या हाकालपट्टीचा हा मोठाच उच्चांक होता.
बुद्ध काळापासून सुरू झालेल्या या ज्ञान प्रक्रियेला बुद्ध धम्म लोक/ज्ञानाभिमुख होण्यासाठी अनेक विद्यापीठांद्वारे ज्ञानाचे तेजही लाभले होते.
सम्राट अशोकानंतर मात्र पुष्यमित्र शृंगाने बृहदरथाच्या केलेल्या खूनापासून बौद्धांच्या वंशसंहारास केलेल्या सुरवातीमुळे बुद्ध तत्वज्ञानाची ही ज्ञान प्रक्रिया थांबून त्यामध्ये बुद्ध विचारांशी विपरीत अनेक दुषीत प्रवाह जसे निर्माण झाले,तसेच जगभरात बुद्ध तत्त्वज्ञान जिथे जिथे पोहोचले, तिथल्याही विचारांचा संकर बुद्ध तत्त्वज्ञानाशी झाला.
पर्यायाने भारतात बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द तत्वज्ञानाचे पुनरागमन करे पर्यंत भारतात बुद्ध विचारांवर ब्राह्मणी विचारांना थोपवले गेले होते.
भारतात “महाबोधी सोसायटी” सारखी बौद्ध धम्म प्रसार संस्था अस्तित्वात असली वा बुद्ध गया,सांची, अजिंठा,त्रिरश्मी लेणी अश्या अनेक लेणी,गुंफा,शीलालेखांमधून देशभरात बुद्ध विचार आपले अस्तित्व दाखवून देत असले;तरी भारतात भंते चंद्रमणी,भंते आनंद कौसल्यायन, बुद्धाकडून मार्क्सकडे वळलेले राहूल सांकृत्यायन असे केवळ अडिच भिक्खू शिल्लक असल्याचे बोलले जात होते.या शिवाय काश्मीर,लडाख, अरुणाचल प्रदेश,त्रिपुरा,आसाम अश्या काही राज्यांमध्ये पारंपरिक बौद्ध लोक मोठ्या आढळतात.ह्या पारंपरिक बौद्धांवर बुद्ध तत्वज्ञानात घूसडलेल्या अनेक अंधश्रद्धांचा फार मोठा प्रभाव आढळून येतो.
बुद्ध तत्त्वज्ञानातील हे विपर्यस्तिकरण रोखण्यासाठी आणि बुद्धाकडे पुन्हा परतणाऱ्या भारतीयांना बुद्ध विचारांमधिल हिनयान,महायान,वज्रयान,झेन आदी विविध भेसळी/प्रवाहांपासून बुद्धाच्या डोळस मानवी मूल्यांकडे वळवण्यासाठी पर्यायाने आधुनिक जगातील बौद्धांचा बुद्ध तत्त्वज्ञानाबाबत संभ्रम न होण्यासाठी आणि बुद्ध तत्वज्ञानानुसार शोषणरहित नितीमान समाज आणि सत्य शोधनाची अखंड प्रक्रिया/सातत्य समाजात कायम ठेवण्यासाठी आपल्या शेवटचा श्वास थांबेपर्यंत कार्यरत राहून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी “THE BUDDHA AND HIS DHMMA हा ग्रंथ लिहीला.”
बाबासाहेब आंबेडकरांनी सदर ग्रंथावर शेवटचा हात फिरवल्यानंतर त्याच रात्री ६डिसेंबर १९५६ रोजीच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले.त्या नंतर काही काळाने सदर “THE BUDDHA AND HIS DHMMA” ग्रंथ प्रकाशित झाला.
बाबासाहेब आंबेडकरांना उपेक्षित बौद्ध जगतासाठी नवसमाजाची जडणघडण करणारी बुद्धीस्ट सेमिनरी अस्तित्वात येण्याऐवजी बाबासाहेबांनीच स्थापन केलेल्या “भारतीय बौद्ध महासभा” या धम्म संस्थेने “बौद्धाचार्य” ही नवी चीवरविरहीत, शुभ्र वस्त्रधारी संसारी व्यवस्था निर्माण केली.हे बौद्धाचार्य त्रिसरण, पंचशील,पूजापाठ पाठ केलेले संसारी लोक होते.ते धम्म दीक्षा देणे,साक्षगंध,लग्न,नामकरण, गृहप्रवेश आदी विविध विधी करून धम्म दीक्षेनंतर धम्म शिकवणुकी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपापल्या परिने प्रयास करीत होते.पुढील काळात ह्या बौद्धाचार्यांनाही विधी करण्यासाठी धम्म दान घेणारे बौद्ध पुरोहित असे स्वरूप प्राप्त झाले.
हे कमी म्हणून की काय?
पारंपरिक चीवरधारी बौद्ध भिक्खू त्यांच्यातील पारंपरिक प्रथा-परंपरा काहीश्या अंधश्रद्धा -कर्मकांडांत मोडत असल्या तरी त्यांना नैतिकतेचे अधिष्ठान तरी होते.
पण,आंबेडकरी धम्म दीक्षेद्वारे बौद्ध झालेल्यांपैकी बरेचजण बाबासाहेब आंबेडकरांची भिक्खू संघाबाबतची मते नजरेआड करून स्वत:ही चीवरधारी भिक्खू होऊ लागले.
१९५६ च्या धर्मांतरातून बौद्ध झालेल्यापैकी बहुतांश जणांचा बौद्ध तत्त्वज्ञानाचा बय्रापैकी अभ्यास होता;असे म्हणणे जितके धाडसाचे होते,तितकेच पारंपारिक बौद्ध भिक्खूंमध्ये बौद्ध धम्मावरील श्रद्धेनुसारचे जसे नैतिक आचरण होते,तसे या नवबौध्दांमधील भिक्खूंचे आचरण नैतिकदृष्ट्या योग्य नव्हते.
हे नव्याने बौद्ध झालेले आणि त्यानंतर लागलीच भिक्खूंची चीवरे पांघरणारे अनेकजण बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांनीही नाकारलेले बुद्धाचे व बुद्धांसोबतच स्वत:चेही दैवतीकरण-पवित्रीकरण करण्याची मोहीम राबवत असताना अनिती-अनाचारासोबतच धम्म दानाच्या नावाने लूट करीत आहेत.चीवरे पांघरून आपला परिवार पोसत आहेत.दान मिळवण्याच्या धंद्यासाठी हे नवचीवरधारी आंबेडकरी धम्मक्रांतिच्या शत्रू असलेल्या आणि या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी अनेक कट कारस्थाने रचणाऱ्या संघाच्याही कच्छपी लागले आहेत.
याच काळात इंग्लंड येथील बौद्ध भिक्खू संघरक्षित यांनीही त्यांच्या “त्रैलोक्य बौद्ध महासंघ आणि सहायक गण” या NGO धम्म संस्थेमार्फत भारतात धम्म प्रचारास सुरवात केली.त्यांनी आपल्या संघटने मार्फत भिक्खू आणि बौद्धाचार्यांऐवजी धम्म मित्र,धम्माचारी,अनागरीक धम्मपाल अशी नवी बांधणी करून ध्यान शिबिरे,प्रवचने असे धम्म कार्याचे स्वरुप असलेल्या या संस्थेनेही आंबेडकरी बौद्धांमध्ये आपल्या कामाचा काही काळ ठसा उमटवला होता.
बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षे अगोदरपासूनच कलकत्तास्थित असलेली “महाबोधी सोसायटी” ही बौद्धांची धम्म संस्था भारतीय बौद्धांचे जगभरातील बौद्ध धम्म परिषदांमध्ये प्रतिनिधित्व करीत आहे.या महाबोधी सोसायटीवरही ब्राह्मणी व्यवस्थेचा मोठ्ठाच प्रभाव आजतागायत आहे.
बिहारमध्ये सिद्धार्थ गौतमाला जिथे ज्ञान प्राप्त झाले,त्या बुद्धगयेसह बौद्धांची अनेक ऐतिहासिक स्थळे दिसून येतात.अनेक बौद्ध धम्म स्थळांवर,लेणी,गुंफा,शीलालेखांवर हिंदू देवळांचे अतिक्रमणे केलेली आढळतात.बुद्ध धम्माच्या वारसा स्थळांना भेट देण्यासाठी येणारा जगभरातील बौद्धांचा मोठा ओघ बिहारच्या अर्थव्यवस्थेचा कणा ठरला आहे.बुद्ध गयेच्या महाविहारावर कब्जा मात्र ब्राह्मण आणि चीवरे पांघरून बौद्ध भिक्खू बनून बसलेल्या ब्राह्मणांचाच आढळतो.
पर्यायाने तेथे बौद्ध धम्माच्या नावाने येणाय्रा निधीचा विनियोग बौद्धांच्या शैक्षणिक-सामाजिक उत्थानासाठी होण्याऐवजी हिंदू धर्म प्रचारासाठी होत असल्याचा भारतीय बौद्धांचा आरोप असून त्यामुळेच गेली अनेक वर्षे भारतीय बौद्ध बुद्ध गया महाविहार मुक्तीचे आंदोलन करीत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पेरलेले चीवरधारी तोतये बौद्ध भिक्खू बौद्ध वस्त्यांमध्ये बस्तान बसवून बौद्ध धम्म म्हणून अनेक हिंदू रूढी-परंपरा पसरवीत आहेत.
“I am Buddha” अश्या हिंदू प्रतिगाम्यांनी चालवलेल्या संस्था जागतिक धम्म परिषदांमध्ये भारतीय बौद्धांचे प्रतिनिधीत्व करून जगभरातील बौद्धांकडून धम्म प्रसारासाठी अब्जावथी रूपयांचा निधी आणून हिंदू धर्म राष्ट्राच्या धर्म युद्धासाठी “काश्मीर फाईल्स” सारख्या प्रपोगंडा चित्रपटांसाठी वापरण्यात येत आहेत.
गगनमलीक सारख्या लोकांनी बुद्धांच्या कथित अस्थिंच्या मिरवणूका काढून थोतांडे -अंधश्रद्धा रूजवण्याच्या कार्यक्रमात नवदीक्षीत बौद्धांना बौद्ध धम्माचे आकलन करून देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या “भारतीय बौद्ध महासभा”सारख्या संस्थाही बेभान होत नाचू लागतात,त्या वेळी जगाने स्विकारलेले बौद्ध तत्वज्ञान भारतिय ब्राह्मणी व्यवस्थेने कसे उध्वस्त केले असेल;याचा अंदाज येऊ शकतो.
याच काळात “आंबेडकरी मानव मुक्ती लढ्या”चा भाग म्हणून वैज्ञानिक मानवतावादी बुद्ध स्विकारलेल्या बौद्धांचे लोंढे विपस्सनेचे मनोरूग्ण होण्यासाठी विपस्सनेच्या थोतांडांकडे धावताना दिसतात, तेव्हा ” विपस्सना हा संघी डाव तर नसावा ना?” हा प्रश्न अस्वस्थ करू लागतो.
आंबेडकरी विचारांच्या बौद्धांचे प्रेरणास्थान असलेल्या दीक्षाभूमीवर बौद्धांकडूनच संघाच्या स्वयंसेवकांना प्रस्थापित केले जात असतांनाच बाबासाहेब आंबेडकरांच्या चीतेला अग्नी दिलेल्या चैत्यभूमीवर कब्जा कुणाचा,तेथे जमा होणारे धम्म दान कुणाच्या हाती जावे;हा वाद गेली अनेक वर्षे सुटता सुटत नाही.
बौद्धांच्या वस्त्यांमधील बुद्ध विहारे एक तर कुणाची खाजगी मालमत्ता म्हणून वापरली जात आहेत अथवा संघी कब्जात तरी गेली आहेत.ही सर्व स्थिती आंबेडकरी जनतेला अस्वस्थ करीत नाही काय?
२१व्या शतकात बौद्ध धम्मावर सुरू असलेले ब्राह्मणी आक्रमण उध्वस्त करण्यासाठी आणि बुद्धांची वैज्ञानिक मानवता रूजवण्यासाठी नक्की काय करावे लागेल?
१) आपणास भारतीय बौद्ध महासभा,महाबोधी सोसायटी, त्रैलोक्य बौद्ध महासंघ आणि सहायक गण, बुद्धीस्ट रिसर्च सेंटर यांच्या प्रत्येकी १-१ प्रतिनिधींचा समावेश असलेले आणि साहित्य ,कला,संस्कृती,पर्यावरण,विज्ञान,तत्वज्ञानासह विविध विषयांवरील तज्ञांना घेऊन बौद्ध विद्यापीठाची स्थापना करणे.
२)त्या बौद्ध विद्यापीठाचा अभ्यासक्रम आणि त्याचा कालावधी निश्चित करणे.
३) सद्य:कालातील सर्व भिक्खू आणि बौद्धांचार्यांना तेथील अभ्यासक्रम पुर्ण करण्यास कटीबद्ध करणे.
४) प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थींना प्रत्येक महिन्यातील एक आठवडा धम्मसेवक म्हणून कोणत्याही जाती-धर्मिय वसाहतींमध्ये स्वच्छता, रूग्ण सेवा,शिक्षण-प्रशिक्षण,क्लास घेणे , प्रशिक्षणार्थी ज्या विषयातील उच्च शिक्षीत आहे,ते ज्ञान समाजापर्यंत पोहचवणे अश्या कामांवर;तर एक आठवडा धम्म आणि आधूनिक जगासमोरील अडचणी,ज्ञान-विज्ञाना संदर्भात तज्ञांशी चर्चा, प्रश्नोत्तरे घडवणे.
५)महिन्यातील इतर शिल्लक दिवशी प्रशिक्षणार्थींनी स्वयं अभ्यास-आकलन-टीपने काढणे.
६)सहा महिन्यात प्रत्येक प्रशिक्षणार्थीनी एखादा प्रोजेक्ट तयार करून दर सहा महिन्यांनी प्रशिक्षणार्थींनी ज्युरींसमोर त्याचे प्रेझेंटेशन सादर करुन प्रश्नोत्तरे करणे.
७)तीन वर्षांत अभ्यासक्रमाच्या शेवटी वर्तमान समाजासमोरील विविध प्रश्नांपैकी एखाद्या प्रश्नावर प्रबंध सादर करणे.
८)या तीन वर्षीय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून प्रत्येक प्रशिक्षणार्थीने ३ते५ नव्या प्रशिक्षणार्थींना प्रवेशास प्रोत्साहीत करणे.
९) अश्या प्रकारे प्रशिक्षण पुर्ण करणाय्रा विद्यार्थ्यांना “बॅचलर ऑफ धम्म सेवक” अश्या पदवीने सन्मानित करणे.
१०)या साठी पुर्व शिक्षणाची अट नसावी.
११) प्रशिक्षणार्थीं या कालखंडापुरतेच बौद्ध संस्कार विधी संचलक म्हणून पार पाडणार असून नंतरच्या बॅचचे विद्यार्थी त्यांच्या प्रशिक्षण काळापुरतेच विधी संचलन करु शकतील.
१२)धम्म सेवक पदवीधरास त्याही पुढे अधिक शिक्षण घ्यायचे असल्यास त्यांच्यासाठी “मास्टर ऑफ बुद्धिझम” हा अधिक संशोधनपर अभ्यासक्रम तयार केला जावा.त्या अभ्यासक्रमात आधुनिक विज्ञानाशी बौद्ध धम्माची सांगड घालण्याचा प्रयत्न असावा.तसेच मानवी मूल्ये रूजवण्यावर भर असावा.
१३)त्याही पुढे जाऊन पीएचडी/स्थविर/महास्थवीर आदी अभ्यासक्रम तयार करून ते यशस्वीरित्या पुर्ण करणारासच या पदव्या दिल्या जाव्यात.
हे सर्वोच्च अभ्यासक्रम पुर्ण करणारांनाच अनागरीक चीवरधारी आजन्म राहण्याचा अधिकार असावा आणि अश्या भिक्खूंचाच भिक्खू संघ असावा.
१४)या भिक्खू संघामधीलही भिक्खू जर बुद्धांच्या मानवी विचारांपासून भरकटतांना आढळल्यास त्यांची भिक्खू संघातून हाकालपट्टी करण्यासाठी योग्य नियमावली निर्माण करण्यात यावी.
असा उच्च शिक्षित आणि विज्ञान-तत्वज्ञान पारंगत भिक्खू संघ असेल;तरच बुद्धाला अपेक्षित आधूनिक जगातील सत्यासत्याची पडताळणी करू शकणारा आणि आधूनिक समताधिष्ठित समाजाचे आर्किटेक्ट म्हणून या भिक्खू संघाला समाजासमोर दिशादर्शक म्हणून उभे राहता येईल आणि २१व्या शतकात भिक्खू अथवा बौद्धाचार्य म्हणून घूसखोरी करू पाहणाऱ्या बौद्ध तत्त्वज्ञानाच्या शत्रूंना रोखता तर येईलच.त्याही पुढे जाऊन बुद्ध तत्त्वज्ञानाचे कालानुरूप वैज्ञानिक डोळसपणे मानवी मूल्ये रूजवणारे प्रवाही खळाळते तत्वज्ञान हे स्वरूप कायम राहू शकेल.
अश्या प्रकारे विधी करणाय्राचे पुरोहितीकरण तर थांबेलच.
पण, बुद्ध,कबीर,फुले, आंबेडकरी विचारांचे आकलन आणि समाजाच्या जीवन- मरणाच्या प्रश्नांशी धम्म/ज्ञान जाणीवा समृद्ध होऊ शकतील.
संकल्पित बौद्ध सेमिनरी/विद्यापीठाच्या उभारणीसाठी निधी कसा उभा करता येईल?
१)संकल्पित बौद्ध विद्यापीठ/सेमिनरीसाठी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करणे.
२)आंबेडकरी जनतेने या नियोजित प्रकल्पासाठी १-१ दिवसाचे वेतन देणे.
३) गुरुद्वारा नियंत्रक समितीच्या धर्तीवर “बुद्ध विहार नियंत्रक समिती”ची निर्मिती करुन महाबोधी विहार ते दीक्षाभूमी/चैत्यभूमीसह देशभरातील सर्व बुद्ध विहारे या “बुद्ध विहार नियंत्रक समिती”च्या अखत्यारीत आणून तेथे शिक्षण, आरोग्यासह धम्म शिकवणूकींचे कार्यक्रम राबविण्यात यावेत.
५) बुद्ध, कबीर,फुले आंबेडकरी विचारांचे विपर्यस्तिकरण रोखणारे विचारवंत/अभ्यासक निर्माण करण्यासाठी चर्चा, अभ्यास शिबीरांचे आयोजन करणे.
६) आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन/संरक्षण देणे.
या विविध उपाययोजना आपण करू शकू काय?
आपण २१व्या शतकातील बुद्ध धम्मावरील ब्राह्मणी आक्रमण उध्वस्त करू शकू काय?
होय!आपल्याला बुद्ध धम्मावरील ब्राह्मणी आक्रमणापासून खरोखरच वाचवायचे असल्यास वैज्ञानिक मानवतावादी बुद्ध आणि त्याच्या धम्म मार्गाभोवती रचलेले कर्मकांडे आणि थोतांडांचे ब्राह्मणी मायाजाल उध्वस्त करावेच लागेल.चीवरे,श्वेत वस्त्रे,पूजापाठ,विपस्सना ही थोतांडे आणि त्या भोवती रचलेले पवित्र -अपवित्रतेचे, अंधश्रद्धा आणि आवडंबरांचे खूळ नाकारले पाहिजे.
आपण सर्वच या दृष्टीने वेगवेगळया नजरेतून आपली मांडणी आणि कृतीशील कार्यक्रम मांडण्यास आरंभ करण्याची अपेक्षा व्यक्त करतोय.
जयवंत हिरे.
२१ऑक्टोंबर२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत