रिपब्लिकनांची बोळवण करण्यामागील षडयंत्र
लोकसत्तामधील रिपब्लिकनांची बोळवण हा जेष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे यांचा प्रकाशित लेख अनेक अंगांनी विचार करायला भाग पाडतो.लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी महाविकास आघाडीला एकञित पाठिंबा दिला होता.त्याची परतफेड म्हणून विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात त्यांना स्थान देण्याचे ठोस आश्वासन महाविकास आघाडीकडून देण्यात आले होते.परंतु शेवटी ते वांझोटे ठरले.
या परिस्थितीचे गावंडे यांचे आकलन महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या गटांना मतदारांची साथ नाही.म्हणून आघाडीतील सर्व पक्षांनी त्यांच्यासाठी एकही जागा न सोडता थेट पक्षाच्या वतीने बौध्द उमेदवार देणे पसंत केले,या प्रकारचे आहे.त्यांचे हे मत काही अंशी खरे असले तरी रिपब्लिकन गटांना नाकारण्याचा उद्देश यापेक्षा वेगळा असणार.
रिपब्लिकन पक्षाचे असंख्य तुकडे झाल्याने कोणताही गट मतदारांना प्रभावित करू शकत नाही.ही वस्तुस्थिती असली तरी बौध्द मतदारांनी संविधानाला नख लावणाऱ्या आरएसएस,भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाआघाडीचा पर्याय निवडला आहे.म्हणून रिपब्लिकन गटांना काही न देता दान पदरात पडत असल्याने खच्चीकरण झालेल्या रिपब्लिकन पक्षाला महाविकास आघाडी पूनर्जीवन मिळू देणार नाही.त्यासाठी आता महाविकास आघाडीने पवित्रा बदलत बौद्धांना उमेदवारी देणे सुरू केले.यावरून बौध्द कोणाच्याही राहुटीत गेले तरी त्यांचा वापरच होणार.यावर उपाय एकच रिपब्लिकनांचा दबाव गट निर्माण होईल,इतकी ताकद एकञित प्रयत्न करणाऱ्या विविध गटांच्या मागे उभी करणे त्याशिवाय पिढ्यांचे भवितव्य सुरक्षित राहाणार नाही.
जागावाटपात महाविकास आघाडीने रिपब्लिकन गटांना खड्यासारखे बाजूला ठेवल्यानंतर बौध्द उमेदवार देण्याची दुसरी बाजू समजून घेतली पाहिजे. ही आघाडी लोकसभा निवडणुकीत राज्यात तरली,यात महत्वाचे योगदान बौध्द मतदारांचे आहे.म्हणून स्व: पक्षातील वा समाजावर पकड ठेवून असलेल्यांना उमेदवारी देऊन बौद्धांना खुष करण्याची रणनीती आघाडीतील तिन्ही पक्षांनी सारखीच अवलंबिली.
तत्पूर्वी तिन्ही पक्षात जागावाटपाची चर्चा सुरू असताना अत्यंत धोरणी राजकारणी शरद पवार हे रिपब्लिकन गटांना सोबत घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार बौध्द उमेदवार देतील,अशी आशा बाळगली जात होती.परंतु पवारांनी शेवटपर्यंत आशेवर ठेवत ताकास तूर लागू दिला नाही. सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांच्या स्वतंत्र बैठका घेत बौध्द उमेदवार निवडीच्या प्रक्रियेचा त्यांनी रिपब्लिकन गटांना थांगपत्ताही लागू दिला नाही.
उध्दव ठाकरे यांची सामाजिक अभिसरणाबाबतची जाण तितकी परिपक्व नाही.त्यांच्या पक्षाने पहिल्यांदा बौध्द उमेदवार दिले.बौध्द मतांवर डोळा ठेऊन त्यांनी हे केले हे समजायला उशीर लागत नाही.म्हणून यात विशेष नवल नाही.काॅंग्रेसची धर्मनिरपेक्षता सोयीनुसार बदलत असते.परंतु बौध्द मतदारांनी निवडीचा पर्याय नाही हे मनोमन ठरविल्याने तिला बौध्दांची मते फुकटात मिळतात.ती रिपब्लिकन गटांना नाकारतही नाही व सोबतही घेत नाही.याचे कारण हेच आहे.
काॅंग्रेस असो की शरद पवारांची राष्ट्रवादी यांना बौध्द उमेदवार नामधारी,स्वत:चे हित पाहणारे, हवेत.म्हणून निवडून आल्यानंतर समाजासाठी त्यांचा उपयोग शुन्य असतो.शिवाय मतदार संघातील विकास कामे,सोयीसुविधा याकडे ते फारसे लक्ष देत नाही.म्हणून त्यांचा मतदार संघ मागासलेपणातून कधी मुक्तच होत नाही.अशा छापाचे नामधारी दोन्ही पक्षात आहेत.अशा सर्वसाधारण परिचित नावांपैकी जयदेव गायकवाड, नितीन राऊत, प्रकाश गजभिये,शरद बनसोड हे या दोन्ही पक्षाकडे दत्तक आहेत.
बौध्द उमेदवार देणे हे या पक्षांचे औदार्य मुळीच नाही.बौध्द मतांची लुट करण्यासाठी ठरवून अंमलात आणलेली ती चाल आहे. रिपब्लिकन ताकदीचे खच्चीकरण करून नवीन नेतृत्व उभे राहू न देता सत्ता ताब्यात घेणे,यात हे पक्ष अशारितीने यशस्वी होत राहिले तर मग बौध्दांचे राजकीय अस्तित्व निर्माण करणारे नेतृत्व शिल्लक राहणार नाही.हे षडयंत्र ओळखून बौद्धांनी सद्याच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपली रिपब्लिकन म्हणून असलेली ओळख अधिकाधिक घट्ट केली पाहिजे.
जोगेंद्र सरदारे, पञकार
९४२२१३८३२२
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत