देश-विदेशभारतमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

एक अमेरिकन मुलगी क्लारी ड्रोस्ते भारतात अभ्यास करायला आली होती.

पाटकर काॅलेज चे प्रोफेसर ज्युनियर काॅलेज चे प्रिन्सिपल यांनी पाठविलेली पोस्ट…….

२००८ च्या नोव्हेंबर महिन्यातील गोष्ट! मला भेटायला एक अमेरिकन मुलगी आली होती. तिचं नाव क्लारी ड्रोस्ते. ती अमेरिकेवरून भारतात अभ्यास करायला आली होती.

तिचं वय साधारणत: २१-२२ असावं! तिच्याशी चर्चा केल्यानंतर कळले की, ती बी.ए. करीत असून ‘बुद्धिझम ऍण्ड आंबेडकर’ हा तिच्या लघुशोधप्रबंधाचा विषय आहे.

मला क्लारीचं कौतुक वाटलं! डॉ. आंबेडकरांविषयी तुला माहिती कशी मिळाली आणि तू हाच विषय का निवडला? असे दोन्ही प्रश्‍न एकदमच तिला विचारले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘डॉ. आंबेडकरांविषयी अमेरिकेत सर्वांना माहिती आहे.

डॉ. आंबेडकरांविषयी ऑक्सफर्ड प्रकाशनाची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अमेरिकेतील नव्या पिढीला डॉ. आंबेडकरांचे विशेष आकर्षण वाटते.’’

‘‘नव्या पिढीला डॉ. आंबेडकरांचे का आकर्षण वाटते?’’ – माझा प्रश्‍न.
‘‘का म्हणजे? डॉ. आंबेडकरांचे विचार आणि कार्य सर्वच देशातील लोकांसाठी भूषणास्पद आणि आदर्श आहेत.

डॉ. आंबेडकरांच्या संदर्भात एक अमेरिकन तरुणी भरभरून बोेलत होती. तिच्या बोलण्यात आत्मविश्‍वास आणि स्पष्टता होती. तिच्या डोळयात दुर्दम्य इच्छाशक्ती दिसत होती.

ती पुढे म्हणाली, ‘‘डॉ. आंबेडकर महान तर आहेतच, पण आणखी महत्वाची बाब म्हणजे त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. आधुनिक काळात अमेरिकन लोकांंना बुद्ध धम्माविषयी विशेष रूची आहे.

ते बुद्ध धम्माचा अभ्यास करू लागलेत.’ आज भारतातील नवीन पिढीला अमेरिकेचे आकर्षण आहे. तर अमेरिकेतील नव्या पिढीला बुद्ध अणि डॉ. आंबेडकरांमुळे भारताचे आकर्षण आहे.

फ्लोरेन्सिआ कोस्टा ही ब्राझीलची पत्रकार २००७ मध्ये भारतात गांधींना भेटायला आली होती. महात्मा गांधींचे निधन १९४८ मध्ये झाले. मग कोस्टा कशी काय गांधींना भेटायला आली?

फ्लोरेन्सिआने एक लेख टाईम्स ऑफ इंडियाच्या १२ ऑगस्ट २००७ या अंकात लिहिला होता. त्या लेखात ती लिहिते की, ‘‘आमच्या ब्राझील देशात गांधींचे खूप नाव आहे.

भारतातील लोक गांधीच्या आदर्शानुसार कसे जगतात हे बघायचे होते, म्हणून मी भारतात आली. भारतात मद्रास पासून दिल्लीपर्यंत सर्वत्र फिरली. परंतु मला कुठेच गांधी दिसले नाही.

गांधी लोकांमध्ये, लोकांच्या मनात दिसले नाही. फ्लोरेन्सिआ लेखाच्या शेवटी नमूद करते की, ‘‘आजच्या भारतात गांधी आणि त्यांच्या विचारांना कुठेही जागा नाही.’’ परंतु तिने एक गोष्ट नम्रपणे कबूल केली. ती म्हणजे, पण मला सर्वत्र डॉ. आंबेडकर दिसले. लोकांमध्ये गांधी दिसले नाही पण मला डॉ. आंबेडकर लोकांमध्ये दिसले’.

निग्रो अमेरिकन लेखिका आणि पत्रकार वॅलेरी मॅसोन जॉन मार्च, २००८ मध्ये नागपूरमध्ये एका कार्यक्रमात आली होती. तिची एक मुलाखत ४ मार्च २००८ च्या ‘हितवाद’ मध्ये प्रकाशित झाली होती. ती म्हणाली की, मी डॉ. आंबेडकरांच्या कार्याने प्रेरीत झाली आहे.

ती पुढे म्हणाली की, ‘‘मी बुद्ध धम्माकडे आकर्षित झाली. म्हणून अनेक बौद्ध स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर मला सम्राट अशोकाविषयी माहिती मिळाली. बुद्ध धम्माचा अभ्यास करताना मी डॉ. आंबेडकरांबद्दल वाचले.’’ वॅलेरी मॅसोन जॉनच्या मते, ‘‘डॉ. आंबेडकर हे आधुनिक भारतातील सम्राट अशोक आहेत.’

’ इग्लंडमधील मजूर पक्षाचे माजी नेते मायकेल फुट यांनी डॉ. आंबेडकराबद्दल एक अतिशय महत्वाचे विधान केले आहे. ते म्हणतात की, ‘‘गांधी, नेहरू सारखे भारतीय नेते फारच महान होते. परंतु डॉ. आंबेडकर हे त्या महान नेत्यांमध्ये महानतम होते.’’ त्यांचे हे विधान आज सत्य ठरले आहे.

९ डिसेंबर १९५६ च्या ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ ने डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करतांना लिहिले होते की, ‘‘जेव्हा लोक आपल्या देशातील आमच्या समकालीन तथाकथित महान नेत्यांना विसरतील, तेव्हा डॉ. आंबेडकरांचीच आठवण केली जाईल’.

पाकिस्तानमधील कराची येथे १४ एप्रिल २००७ ला डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या परिषदेत मला अतिथी आणि वक्ता म्हणून निमंत्रित केले होते.

तेथील मुस्लिम लोकांना, डॉ. आंबेडकरांविषयी आपणास विशेष आस्था का वाटते? असा प्रश्‍न मी विचारला होता. तेव्हा डॉ. इब्राहिम खान म्हणाले की, ‘डॉ. आंबेडकर हे आशिया खंडातील एक महान मानवतावादी होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची अद्वितीय अशी राज्यघटना लिहिली म्हणून देशातील कोणत्या मोठ्या विद्यापीठाने त्यांना एलएल.डी पदवी दिली नाही. परंतु १९५२ मध्ये अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने मात्र त्यांना ‘डॉक्टर ऑफ लॉ’ ही सर्वोच्च पदवी देऊन त्यांच्या संविधान तयार करण्याच्या महान कार्याचा सन्मान केला.

भदंत सुरेई ससाई हे जेव्हा सुरूवातीला भारतात आले होते, तेव्हा त्यांच्यासोबत गांधीजींचा फोटो होता. येथील बौद्धांना सुरेई ससाई यांचे आश्‍चर्य वाटत होते. नंतर सुरेई ससाई यांना वास्तविकता कळली.

त्यानंतर ससाई यांच्या माध्यमातून जपानला डॉ. आंबेडकर कळले आणि त्यांचा गांधीबद्दचा भ्रम दूर झाला. आता तर सर्वच बौद्ध राष्ट्रात डॉ. आंबेडकरांना अतिशय सन्मानाचे स्थान आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील दलित शोषित, पिडीत समाजाच्या उत्थानासाठी केलेला संघर्ष हा विविध देशातील शोषित पिडीत जनतेच्या उत्थानाच्या दृष्टीने जगाला प्रेरक ठरला आहे. यासंबंधीचे एक अत्यंत महत्वाचे उदाहरण हंगेरियन लोकांचे आहे.

हंगेरियन लोकांवर डॉ. आंबेडकरांचा प्रचंड प्रभाव
आहे. श्‍वेत हंगेरियन डेरडाक टिबोर हे हंगेरी देशातील एक समाजसुधारक आहेत. टिबोर हे २००४ मध्ये फ्रान्समध्ये गेले होते.

फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरातील एका बुक स्टॉलवर फ्रेंच लेखक ख्र्रिस्तोफरजेफरलॉट यांनी लिहिलेले एक पुस्तक टिबोरने बघितले. ते त्यांनी विकत घेतले.

ते पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकाचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला. त्यांनी आपला मित्र आणि जिप्सी नेता जानोस ओरसोस यांना त्या पुस्तकाबद्दल सांगितले. जानोस देखील खूप प्रभावित झाला.

फ्रेंच भाषेतील ज्या पुस्तकाचा टिबोर आणि जानोस यांच्यावर प्रभाव पडला ते पुस्तक म्हणजे ‘डॉ. आंबेडकर ऍण्ड अनटचेबिलीटी’ हे होय. डॉ. आंबेडकरांच्या जीवन कार्याचा आणि विचारांचा टिबोर आणि जानोस यांच्यावर इतका प्रभाव पडला की, त्यांनी आपल्या सामाजिक कार्यासाठी डॉ. आंबेडकरांना आपला आदर्श मानले.

त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांनुसार जिप्सी लोकांच्या उद्धाराची चळवळ सुरू केली. जिप्सी लोकांवर डॉ. आंबेडकरांचा प्रभाव आहे.

त्याचप्रमाणे श्‍वेत हंगेरियन लोकांवर देखील फार मोठा प्रभाव आहे. श्‍वेत हंगेरियन लोक देखील डॉ. आंबेडकरांना मानतात. बर्‍याच श्‍वेत लोकांनी बुद्ध धम्म स्विकारला.

जिप्सी लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, त्यांची सामाजिक आणि आर्थिक प्रगती व्हावी, म्हणून श्‍वेत हंगेरियन लोकांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. यांच्या प्रयत्नातूनच ‘लिटल टायगर स्कूल’ २००५ मध्ये स्थापन केले आणि इतर अनेक प्रकल्प राबविलेत.

जिप्सी लोकांवर डॉ. आंबेडकरांचा आणि बुद्ध धम्माचा प्रचंंड प्रभाव पडल्यामुळे जिप्सी नेता जानोस यांनी जिप्सी लोकांच्या उद्धारासाठी ‘जयभीम नेटवर्क’ किंवा ‘जयभीम संघ’ची स्थापना केली.

हंगेरियन लोकांवर डॉ. आंबेडकरांचा आणि बुद्ध धम्माच्या पडत असलेल्या प्रभावाची हंगेरियन सरकारला देखील दखल घ्यावी लागली, हे येथे उल्लेखनीय.

आजपर्यंत भारतीय नेत्यांनी डॉ. आंबेडकरांची ओळख जगाला होऊ दिली नाही. परंतु त्यांच्या विचार आणि कर्तृत्वामुळे त्यांची जगाला ओळख झाली. इतकेच नव्हे तर पुढील काही वर्षात जगातील तरूणांचे आदर्श हे केवळ डॉ. आंबेडकर राहतील! ही केवळ कल्पना नाही, तर ती वास्तविकता असेल…

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!