महान रतन टाटानागपुरात बुलेटवर फिरायचे !
🌻रणजित मेश्राम
लेखक ज्येष्ठ विचारवंत अभ्यासक समीक्षक आहेत
महान रतन टाटा हे नागपुरात 'बुलेट'वर फिरायचे ! ऐकायला स्वप्नवत आहे. पण ते खरेय. तो त्यांचा तारुण्यातील उद्योगीय प्रशिक्षण काळ होता.
ही बात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी सांगितली. ते मंत्री असतांना एका कमेटीचे अध्यक्ष होते. तिथे रतन टाटा उपाध्यक्ष होते. ओळख वाढली. कोणत्यातरी चर्चेत टाटांनी ते सांगितले.
नागपुरातील एम्प्रेस मिल हा आमचा पहिला उद्योग होता. त्यामुळे कुटुंबीयांचे या उद्योगावर पूर्ण लक्ष असायचे. नुकतेच विदेशातील माझे शिक्षण पूर्ण झाले. त्याच काळात उद्योगाचा प्रत्यक्ष अनुभव म्हणून मला नागपुरात पाठविले. तेव्हा बैरामजी टाऊन येथे रहायचा. बुलेटवर येजा करी.तेव्हा खूपकाही शिकता आले.
सदरचे कॅफे हाऊस, अशोका, मोतीमहल, माऊंट हाॅटेल चीही आठवण टाटांनी काढली.
टाटा उल्लेखित बैरामजी टाऊन आजही आहे. पण कालची रया नाही. ५० वर्षाआधी व त्याआधीचे बैरामजी टाऊन अतीश्रीमंतांची वसाहत असेच होते. सदरछावणी भागातील ही वसाहत. प्रचंड मोठ्या भुखंडावर एकच बंगला ! भुखंडाला लागून दुसरे मोठे भुखंड ! पुन्हा बंगला ! आसपास विस्तिर्ण वनराई ! शांत .. निवांत परिसर. एकट्यादुकट्याने जायची भीती वाटायची. शांततेचे दडपण येई. बहुतेक पारशी रहायचे.
अशीच एक छोटी वसाहत कडबी चौक लगतच्या क्लार्क टाऊन ला होती. रेल्वेत काम करणारे इंग्रज या वसाहतीत रहायचे. ती पण आपल्याच जगण्यात जगणारी वसाहत होती. बहुतेक पारशी व इंग्रज यांचेकडे खानसामा (स्वयंपाकी) दलित असायचे.
आज बहुतेक खानसामांची मुले उच्चशिक्षित व संपन्न आहेत.
टाटांची एम्प्रेस मिल ही दलितांच्या जीवनातील सोनेरी पान आहे. सोबत असलेल्या माॅडेल मिल चाही उल्लेख करावा लागेल. या दोन गिरण्यांनी आर्थिक पहाट दिली. शहर आणि अस्तित्व दोन्ही दिले. तीन पाळ्यांत हजारो कामगार काम करायचे. स्त्रीपुरूष दोन्हीही ! प्रारंभीचे सारे दूरदुर्गम खेड्यापाड्यातून आले होते.
या दोन्ही गिरण्यात ८० टक्के ‘मिल वर्कर्स’ हे दलित (आजचे बौध्द) होते.
गिरणी सोडतांना टाटांनी मोकळेपणी सर्व दिले. मालकीची शेकडो एकर जमीन वाटून दिली. कामगारांचे हित तेव्हढे जपले.
उत्तर नागपुरातील एका गृहनिर्माण सहकारी संस्थेला ८१ एकर जमीन विनामोबदला दिली. अपेक्षा एव्हढीच ठेवली की, भुखंड देतांना ज्याने एम्प्रेस मिल मध्ये सेवा दिली त्याचा तो वंशज असावा !
टाटा ला टाटा करतांना मन जड होतेय. अस्थैर्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यप्रवासात या समूहाचे योगदान कायम स्मरणात आहे ! शिवाय राहील !
० रणजित मेश्राम
👤
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत