अनंतात विलीन झालेल्या माझ्या आजोबाला पुरणपोळी पाठवण्याची पावर या बालक बामनाकडे कोठून आली?
सुरेश खोपडे
पितृ पंधरवडा नुकताच संपल्याने ती घटना आठवली. घरी पितर होती . शाळेला बुट्टी मारली. चुलीभोवती घुटमाळताना पाहून खेकसून वडीलानी बाजरीवरची पाखर हाणायला आम्हाला पिटाळल .पण पुरणपोळीचा खमंग वास बसू देईना. स्वयंपाक कोठवर आला हे पाहण्यासाठी घरात डोकावलं तर बामनचा किश्या ज्याच शाळेतील पटावरच नाव किशोर होत तो ताटात पाय ठेवून बसला होता. माझे वडील तांब्याच्या गडव्यामधून त्याचे पाय धूत होते. मग त्याने कसले तरी श्लोक म्हणत कसली तरी अंगठी सारखी वस्तू वडिलांच्या बोटात घातली. वडील मनोभावे त्याच्या पाया पडले. मग ते पाणी व पोळीचा नैवेद्य घराच्या छपरावर फेकला. तो बामनाचा पोरगा आमच्या घरी जेवला नाही. फक्त साखर घालून ग्लासभर दूध प्याला. पिशवीमध्ये बराच कोरडा शिधा कोंबून दुसऱ्या घराकडे कूच करता झाला.
त्या दिवशी अनेकांच्या घरी पित्र असल्याने त्याचा पिता अण्णा बामण मालदार पित्राच्या घरी गेला होता.
माझे वडील साक्षर नसले तरी अण्णा बामना पेक्षा दहापट हर हुन्नरी होते. ते माझ्या दृष्टीने खरेच हिरो होते. शाळेत माझ्या बराच पाठीमागे असलेल्या कीशा बामनाचे पाय धुताना पाहून मला मोठे आश्चर्य वाटले होते. माझ्या वर्गात अनेक ब्राह्मण मुले मुली होती. पण वासरात लंगडी गाय शहाणी याप्रमाणे इतर विषयाप्रमाणे संस्कृत मध्येही मला त्यांच्यापेक्षा जास्त मार्क्स पडत असत. माझे वडील स्वतःला क्षत्रीय समजत. पोहायला शिकवताना त्यांनी मला उचलून विहिरीत फेकून दिले होते. नाका तोंडात पाणी गेल्यावर मी बोंब मारली तर मला म्हनाले होते “आर तू छत्रियाचा पोरगा ना? असं काय मुळूमुळू रडतोयेस बामनाच्या पोरावाणी.” बामणी कावा हा शब्द पहिल्यांदा मी त्यांच्याकडूनच ऐकलेला होता व त्याचे ते समर्पक विश्लेषण ही करत असत. असा माणूस माझ्यापेक्षा एका बारक्या पोराचे पाय धुतो याचे कोडे मला समजले नव्हते.
किशा बामन मोठ्या वाड्यात राहायचा. आमचं काडान शाकारलेल छप्पर होत. 1972 च्या दुष्काळात आम्ही सगळे शेतकरी,बलुतेदार दुष्काळी कामावर गेलो. हे घराबाहेर पडले नाहीत. ना नांगर धरला,ना विहिरी फोडल्या,ना गुर वळली, तरी हे वरणभात,तूप, सात्विक आहार खात राहिले. पित्राच्या आदल्या दिवशी उर फुटे पर्यंत लाकड फोडणाऱ्या महाराच्या दशरथ व गंगाराम यांना सगळ्यांच्या शेवटी व काही वेळा शिळ पाक अन्न पण कीशा बामनाला सगळ्यांच्या आधी आणि सात्विक भोजन.
हा किशा बामन धोंडीबा भाऊ, दगडू दादा, माझे वडील अशा वडीलधारी मंडळीना अरे तुरे बोलत पहिल्या नावाने हाका मारत असे. हे सगळे श्रेष्ठत्वाचे व शोषण करण्याचे अधिकार यांना कोणी दिले? मनुस्मृती वाचल्यावर मला त्याच्या वागण्याचा उलगडा झाला.” शंभर वर्षाचा क्षत्रिय व दहा वर्षाचा ब्राह्मण यात बाप कोण आणि मुलगा कोण?” माझा हिंदू धर्म सांगतो की “दहा वर्षाचा ब्राह्मण हा बाप असतो.” एवढेच नव्हे तर तो सत्वगुणी भूतलावरील देव असतो तर माझ्या वडिलांसह सर्व क्षत्रिय हे रजो गुणी राक्षस असतात असे भगवद्गीते मध्ये स्पष्ट म्हटलेले आहे.(खरे तर याच्या पूर्वजांनी आमच्या मूळ ग्रंथात घुसडले आहे). ‘जो ब्राह्मणास प्रतिप्रश्न करेल राजाने तापलेले शिषे त्याच्या कानात ओतावे.’ तसेच ‘ जो ब्राह्मणा शेजारी बसेल (म्हणजे ब्राह्मणाच्या बरोबरीचा आहे असे दाखवेल) त्याचा कुला कापून राजाने त्यास नगराबाहेर हाकलून द्यावे’ अशी आज्ञा मनुस्मृतीमध्ये दिलेली आहे.मग या किशा बामनाला कोण प्रश्न विचारणार? ‘ सर्वच बहुजन अनंत काळा पासून गलेलठ्ठ दक्षिणा व शिधा त्यांच्या पिसवित कोंबत पुन्हा त्यांच्याच पाया का पडतात? अगदी गाडगे बाबा पर्यंत सुधारकांनी टीका केली तरी उच्च विद्या विभूषित आम्ही बहुजन ब्राह्मण व त्याने सोबतीला घेतलेल्या कावळ्याचे आहारी का गेले आहेत? सगळ्यांचेच दिवंगत वडील काळे कावळे कसे बनले? कुणीतरी राजहंस, मोर अगर पोपट तरी बनायला हवा होता. इतर वेळी सफाई कामगार म्हणून ओळखले जाणारे भोवतालचे कावळे हे फक्त पुरणपोळी आणि भात खात नाहीत तर ते मेलेले कुजलेले कोणतेही प्राणी खातात हे आम्हा बहुजनांना माहित नाही का? चर्चा केली तर हे उडवा उडविची उत्तर देतात. घरचे लोक म्हणतात म्हणून करतो. करावे लागते. एक दिवस गोडधोड केल्याने उलट चांगलं खायला मिळतं. यासारखी उत्तरे दिली जातात.पण घास न टाकण्याचे धाडस करीत नाहीत ! आत्ता पूर्वीसारखे राहिलेले नाही असे म्हणत किशा आणि मंडळी आपणास गप्प करण्याचा प्रयत्न करतात. पूजा घाला असं सांगायला ब्राह्मण तुमच्या घरी येतो का? असा प्रश्न माझे फेसबुक मित्र विचारतात. पण मनुस्मृति संपलेली नाही ती वेगळ्या स्वरूपामध्ये अस्तित्वात आहे.
आम्ही बहुजन कीशा बामन व कावळा यांना मिठी मारून का आहोत, ब्राह्मण नाही आले तरी आम्हीच त्यांच्या मागे का लागतो त्यामागील कारणे समजून घेण्यासाठी मला फ्रेडरिक नीत्से यांच्या ‘ On the genealogy of morals’ (वंशावळ वाढत असता त्या कुटुंबाची नैतिक मूल्य कशी निर्माण होतात या अर्थाने) या निबंधाची मोठी मदत झाली.
खरे तर कीशा बामन आणि माझ्या कुटुंबाचा वंशावळ वाढीचा इतिहास अभ्यासावा लागेल.
जगभर मान्य केलेल्या शास्त्रीय सिद्धांतानुसार सुमारे दोन लाख वर्षांपर्वी साउथ आफ्रिकेमध्ये चिंपांजी या माकडापासून आमची दोन्ही कुटुंबे तसेच आपण सर्व उत्क्रांत झालो. माझे पूर्वज सुमारे 70 हजार वर्षांपूर्वी भटकंती करत भारतात स्थायिक झाले. कीशाचे पूर्वज हे आफ्रिकेतून उत्तर ध्रुव ते युरोपमध्ये व त्यानंतर सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी भारतात आले. किश्या बामणाचे पूर्वज ग्रीक लोकांच्या सहवासात असल्याने त्यांच्याकडे संस्कृत सारखी प्रगत भाषा होती. जडीबुटीचे ज्ञान होते.शिवाय लोखंडी शिरस्राण, चिलखत, भाले, घोडे , रथ,…., होते .माझ्या पूर्वजाकडे तसे काहीच नव्हते. ते सर्व शांतता प्रिय व शेतीमध्ये रममान होते. या दोन्ही लोकांमध्ये अनेक वेळा युद्ध झाली. त्यात शेवटी किशाचे पूर्वज जिंकले. ते मालक master बनले व हरणाऱ्याना गुलाम slave बनविले. आजही आम्ही गुलाम आहोत. सुरुवातीला त्यांनी शस्त्राच्या साह्याने आम्हाला गुलाम बनवले. आम्ही त्यावेळी तांत्रिकदृष्ट्या मागास कमकुवत होतो शारीरिक व बौद्धिक दृष्ट्या नव्हे. नंतर त्यांनी आम्हाला मानसिक दृष्ट्या कमकुवत ठेवले व ती प्रक्रिया अव्यवाहातपणे आजही चालू आहे.
जगातील प्रत्येक संस्कृतीमध्ये मालक आणि गुलाम असे वर्ग होते आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये मुठभर लोकच मालक होते व मोठा वर्ग हा गुलामांचा होता. प्रत्येक संस्कृतीत मालकांनी आपले श्रेष्ठत्व कायम ठेवण्यासाठी व गुलामांचे शोषण करण्यासाठी वेगवेगळ्या छळाच्या पद्धती अनुसरल्या. जर्मनीमध्ये हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी या मालक गटाने ज्यू लोकांना गुलाम ठरवून नाझी छावण्यामध्ये गॅस चेंबर मध्ये ढकलून अनेक ज्यू लोकांना खलास केले होते. याच हिटलर व मुसोलिनी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंजे यांनी अभ्यास करून त्याच धर्तीवर भारतात आरएसएसची स्थापना केली आणि बघता बघता सगळी समाज व्यवस्था व राज्य घटना उध्वस्त केली .
आजार, बाल मृत्यू,अपघात, मृत्यू, ….. या सगळ्या दुःख देणाऱ्या बाबी याची कारणे आम्हा गुलामांना माहित नव्हती. किस्याच्या पूर्वजांनाही माहीत नव्हती, पण स्वतःचे व पुढील असंख्य पिढ्यांचे श्रेष्ठत्व कायम रहावे. कोणतेही श्रम न करता शोषण करीत ऐश्य आरामात राहता यावे यासाठी इतर असंख्य भाकड कर्मकांडाबरोबर आताच्या पितृ पंधरवड्याचे विधी कर्मकांड त्यांनी तयार केले. ते संस्कृत मधे धर्म ग्रंथात लिहिले. या दुःखातून सुटका मिळवायची असेल तर तुम्हाला तुमच्या मृत पितरांचा आत्मा शांत केला पाहिजे. त्यासाठी ब्राह्मणाला बोलावून त्याचे पाय धुवून, मोठे ब्राह्मण भोजन देऊन व नंतर प्रत्येकाला दक्षिणा देऊन केले पाहिजे. हा विधी केला नाही तर निव्वळ तुम्हीच नव्हे तर तुमच्या पुढील पिढ्यांना याचा त्रास होईल. म्हणजे पुढील पिढ्यांच्या जिवंत राहण्याशी, सुखा समाधानाने जगण्याशी यांनी बामनाची पूजा, पित्राना घास टकणे, दक्षिणा देणे असा संबंध जोडला.
कोणत्या माणसाला आपली पुढची पिढी जन्मू नये व जन्मली तर सुखी समाधानाने जगू नये असे वाटेल? माझ्या हरहुंनरी वडिलांनी त्या बाल ब्राह्मणाचे पाय धुतले त्याला एकच कारण म्हणजे त्यांनाही आपली पुढची पिढी जिवंत राहावी ही मूलभूत प्रेरणा व इच्छा होती. आपले जीन्स/ रक्त पुढे चालत राहावे ही कोणत्याही प्राण्यांमध्ये असलेली आदिम प्रेरणा त्या बामणाचे पाय धुण्यासाठी प्रवृत्त करून गेली.बामणी कावा हा शब्द पहिल्यांदा मी वडिलांकडून ऐकला होता. तरीही माझ्या हर हुंनरी समर्थ वडिलांनी एका पोर सवदा बामणाचे पाय धुतले व घास टाकला. पुढे मी वडिलांचा दहावा घातला नाही की कोणतेही कर्मकांड केले नाही. त्यांच्या अस्थी त्यांच्या आवडीच्या शेतीत विखरून टाकल्या.
गुलामांना जिवंत राहायचे असेल तर त्यांना मालकांनी घालून दिलेल्या अटी मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता. या गुलामांना मुले असल्याने ती जिवंत राहावीत व सुखा समाधानाने जगावित यासाठी गुलामांनी आपल्या मुलांच्या वर संगोपनातून असे संस्कार केले की त्यांनी मालकांनी जे सांगितले ते ऐकलेच पाहिजे. अशा प्रकारे ब्राह्मण श्रेष्ठत्वा चे महत्त्व व त्यांच्या कर्मकांडांचे महत्त्व लहानपणीच आमच्या
मेंदूच्या अबोध मनामध्ये बिंबविले जाते. हे अजूनही चालू आहे. अबोध मनातील गोष्टी बोध मनात आणण्याचा प्रयत्न केला तर? अंधश्रद्धा व कर्मकांडांना विरोध करणाऱ्या डॉक्टर दाभोळकर व पानसरे यांच्या हत्या करण्यात आल्या. त्यामुळे कितीही डिगऱ्या मिळवल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फाईव्ह जी टेक्नॉलॉजी ,थ्रीडी प्रिंटिंग ही क्रांती पाहिली तरी आम्ही किशा बामणाचे पाय धरतो.
हा प्रश्न एका भटाचे पाय धुणे त्याला पिशवीभर कोरडा शिधा देणे एवढ्याशी मर्यादित नाही. तो आहे आत्म सन्मान self esteem या मानवी मूलभूत गरजेचा. आत्म् सन्मान माणसांमध्ये कार्य प्रेरणा motivation निर्माण करतो. प्रेरणा माणसातील सर्जशीलता creativity जागृत करते. या सर्जनशीलतेतुन नवा बहुजन समाज निर्माण होऊ शकतो.
शंभर वर्षांपूर्वी दिनकरराव जवळकर यांनी देशाचे खरे शत्रू हे ब्राह्मण आहेत. त्यांना लोक विसरले. स्वातंत्र्यानंतर गुलामांचे नेते बहुसंख्यांकाच्या जोरावर सत्तेच्या मागे राहिले. सगळीकडे सतरंज्या उचलणाऱ्यांची फौज उभी राहिली. ‘हिंदू खतरे मे’ या ब्राह्मणी प्रचाराला बळी पडले.या ब्राह्मणांनी सत्ता देणारी राज्यघटनास नव्हे तर गुलामांच्या नेत्यांनी उभे केलेले पक्ष देखील संपविले. आता ब्राह्मणांना ताटात मांडून पाय धुऊन घेण्याची व पिशवीभर कोरडा शिधा घेऊन जायची गरज नाही. आज या गुलामांचे भले भले नेते त्यांची पालखी उचलण्यासाठी, खोकी भरून कोरडा शिधा देण्यासाठी व जयजयकार करण्यासाठी हजर झालेले आहेत. यावर इलाज? आम्ही काही मोजके चळवळीतील कार्यकर्ते या विषयावर लिहितो. पण खरा परिणाम होण्यासाठी गुलामामधील राजकीय नेत्यांनी ठरवले पाहिजे की काही वर्ष सत्ता नाही मिळाली तरी हरकत नाही. सत्ता नसेल तर आमची चूल पेटणार नाही अशातला भाग नाही. पण या देशातील पहिला आणि खरा शत्रू किशा बामन व मंडळी हे आहेत. त्यांचे विरुद्ध लोकशाही पद्धतीने लढा उभा केला पाहिजे. कसा करायचा, याची व्यूह रचना कशी असू शकेल हे त्यांनाही माहित आहे पण मतपेटीला भिऊन ते गप्प बसतात. त्यांना माहीत नसेल तर याबद्दल आमच्यासारखे यथाशक्ती यथा बुद्धी नक्कीच व्यूह रचना आखून देवू शकतो.
सुरेश खोपडे
(संदर्भ: माझे पुस्तक ‘तिसरी क्रांती’) उपलब्ध ,अविनाश +919503031699
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत