उमेदवार कोण हा प्रश्नच कसा होवू शकतो?
महाराष्ट्रद्रोही असुरांच्या सत्तेची गर्दन छाटायला नवरात्रोत्सवात जनता आपली मताधिकाराची हत्यारे परजवून सिद्ध करेल.
येवू घातलेली विधानसभा निवडणूक ही गुत्तेदारसेना, चिरीमिरीसेना, लाभार्थीसेना, गद्दारसेना, महाराष्ट्रद्रोहीसेना, संविधानविरोधीसेना, लोकशाहीविरोधीसेना, खोकेबाज व धोकेबाज सेना विरुद्ध निष्ठावंत, संविधानवादी, लोकशाहीवादी, महाराष्ट्रवादी विचारांची सेना अशी असणार आहे. सद्य राजकीय लढाई ही ‘भाजप-मोशा’ने घातलेल्या हैदोसाचा सामना करण्यासाठी त्यांच्याविरुद्ध उभे ठाकलेले आणि खोके मिळवण्यासाठी अगर मिळवलेले खोके टिकविण्यासाठी त्यांच्यासोबत गेलेले यांच्यातील लढाई आहे.
राजकीय विचारांच्या लढाईत उमेदवार म्हणून उतरलेली व्यक्ती ही त्या-त्या राजकीय विचारधारेचे प्रतिनिधित्व करीत असते. मतदार मतदान करीत असताना केवळ व्यक्ती म्हणून करीत नाहीत तर उमेदवार असलेली व्यक्ती त्या-त्या राजकीय परिस्थितीत कुठल्या विचारधारेच्या बाजूने, कुठली भूमिका घेवून उभी आहे हे बघून करीत असतो. म्हणूनच संसदीय लोकशाहीत व्यक्तीपेक्षाही त्याच्या राजकीय पक्षाला अगर राजकीय भूमिकांना महत्व असते. तत्वाचे राजकारण संपले अशा कितीही हाकाट्या पसरवल्या तरी राजकीय भूमिकांचे निवडणूकांच्या मैदानातील महत्व कमी होत नसते हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीने तसेच आजवरच्या अनेक राजकीय प्रसंगांच्या परिणामाने सिद्ध झालेले आहे.
निवडणूकांत राजकीय पक्ष व भूमिकांपेक्षा जर का व्यक्तीला महत्व असते तर चांगल्या चांगल्या व्यक्ती राजकीय पक्षांच्या उमेदवाऱ्या मिळवण्यासाठी तिष्ठत बसल्या नसत्या.
येवू घातलेल्या विधानसभा निवडणूकीत विद्यमान लोकप्रतिनिधी ज्या पक्षाचा आहे त्या ठिकाणच्या त्या पक्षाच्या उमेदवारीचा प्रश्न वगळता इतर सर्वच उमेदवाऱ्यांचा पक्षा-पक्षातील तसेच पक्षांतर्गत तिढा अजून मिटलेला नसल्याने राज्यातील बहुतांश भागात उमेदवारी कुणाला मिळणार याबद्दल तर्कवितर्कांना उधान आलेले आहे. असे असले तरी ज्याला कुणाला उमेदवारी मिळेल त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाव्यतिरिक्त अगर जातीय समीकरणापलिकडे उमेदवार असणारी व्यक्ती कुठल्या राजकीय विचारधारेची अगर कुठल्या राजकीय भूमिकेच्या बाजूने असलेली आहे याला मतदारांच्या दृष्टीने जास्त महत्व असणार आहे. त्यामूळे महायुतीचा विद्यमान लोकप्रतिनिधी असलेल्या भागात दुसऱ्या बाजूचा उमेदवारच जाहीर झालेला नाही या बाबीचा प्रचार अगर अपप्रचार निवडणूकांच्या निकालावर परिणाम करणारा नाही हे नीट लक्षात घ्यावे लागेल.
महायुतीचे विद्यमान आमदारच उमेदवार असणार अशी परिस्थिती असलेल्या भागात विरुद्ध बाजूचा उमेदवार कुठल्या पक्षाचा आणि कोण असणार हे निश्चित नसल्याने कुणाला निवडून आणायचे याबाबत निश्चितता नाही. पण अशा भागात कुणाला पाडायचे हे मात्र जनतेने सुनिश्चित केलेले आहे. म्हणजेच अशा भागात कुणाला निवडून आणायचे यापेक्षा कुणाला पाडायचे हे जनतेने सुनिश्चित केलेले आहे. देशात आणि राज्यात हैदोस घालणाऱ्या भाजप-मोशाच्या मनसुब्यांना बळ देणाऱ्यांना धडा शिकवायचा निश्चय मराठी माणसाने केलेला आहे. दिल्लीच्या तख्तापुढे न झुकणारा मराठी बाणा आता खोक्यातील कितीही पैसे वापरात आणले तरी त्याला बळी पडणार नाही हेदेखील निश्चित आहे.
राजकारणातील दुर्गा समजल्या जाणाऱ्या इंदिरा गांधीला या देशातील त्या काळच्या जनतेने आणीबाणीतून धडा घेत धडा शिकवला होता. आता तर ‘स्मार्ट’ जमाना आहे. आताची जनता ऐन नवरात्रीत लोकशाही बुडवायला निघालेल्या असुरांच्या सत्तेची गर्दन दुर्गा बनून छाटण्यासाठी आपली मताधिकाराची हत्यारे परजून सिद्ध करेल याबद्दल तिळमात्र शंका नाही.
© ॲड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत