माईसाहेब आंबेडकर…
‘रमाई’ बाबासाहेबांच्या पुर्वायुष्यातील प्रेरणा होती, तर ‘माईसाहेब’ उत्तरार्धातील ‘सावली.’ बाबांच्या उत्तरार्धात माई साहेब हीच खरी बाबासाहेबांची काठी होती. या काठीचा आधार घेत बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली, धर्मांतराची प्रतिज्ञा पूर्ण केली.
बाबासाहेबांच्या बेंबीच्या खाली एक फोड झाला होता. त्याचे ड्रेसिंग माईच करायच्या. त्यामुळे त्यांना लाकडी खुर्चीवर बसण्याचा त्रास होत असे. संविधान सादर करतांना एक खास खुर्ची त्यांच्यासाठी तयार करण्यात आली होती.
” ही खुर्ची मी आजतागायत जपून ठेवली होती. पुण्याच्या सिंबायोसिस संस्थेच्या विद्यमाने होणाऱ्या ‘ डॉ. आंबेडकर स्मृती विहार ‘ या स्मारकात ती जनतेला दिसेलच. ” माईच्या पुढील वाक्यात पुन्हा आपल्या पतीच्या मोठेपणाचे कौतुक वाचकांपुढे ठेवल्याचे दिसते. “ भारतवासीयांचे गीता , बायबल , कुराण व त्रिपिटक म्हणजे या देशाची सार्वभौम घटना होय. तो ऐतिहासिक क्षण मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. डोळे धन्य झाले. मी धन्य झाले. ”
माईसाहेब आंबेडकर
(बाबासाहेबांच्या सहवासात)
(मुक्तीदाता विशेषांक)
एकट्या बाबासाहेबांवर घटना लिहिण्याचे काम येऊन पडले होते तो उल्लेख मागे आलाच आहे. मधुमेह , संधीवात, मज्जातंतूंचे दुखणे असूनही ते अंगावर पडलेले काम पूर्ण करण्यासाठी १८-१८ तास प्रकृतीची जराही पर्वा न करता खपले. त्यांच्या पायातील वेदनांनी उचल केली की १५-१५ दिवस डोळ्याला डोळा लागत नसे . माईसाहेबांनी त्यांच्या त्यावेळच्या सेवेत काही कसूर ठेवली नाही. त्यात त्यांना कृतार्थता वाटते. त्यांचे हातपाय दाबणे, पायांना तेलाने मालीश करणे , वीट गरम करून कपडा लावून त्याचा शेक देणे असे एक ना अनेक उपाय करून त्यांना आराम कसा पडेल याची त्या सदैव चिंता वाहात असत. बाबासाहेबांना मधुमेह होता. त्यांना वेळच्या वेळी सुयोग्य जेवण , काटेकोर पथ्य पाळणे , नियमित औषधे घेणे या अत्यावश्यक बाबी माईसाहेब कसोशीने पाळत होत्या. त्या काळात आजच्या सारखी संशोधनाद्वारे निर्माण झालेली प्रभावी औषधे नव्हती. इन्शूलीनची इन्जेक्शन व पथ्य , नियमित व्यायाम एवढेच होते . तेवढे तर जीवापाड श्रम घेऊन सुरू ठेवले होते . हे सांगत असतांना माईसाहेब आपल्या पतीचे श्रेष्ठत्व सांगायला विसरत नाही , ” प्रकृतीची वा जेवणाची कसलीही पर्वा न करता ते अतिशय कष्ट घेत असत . अहोरात्र वाचन , लेखन व चिंतनात दंग असलेला त्यांच्या सारखा नेता भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर देखील क्वचितच असेल . “
(मुक्तीदाता विशेषांक)
बाबासाहेबांच्या सहवासात माईसाहेब
आकाशापेक्षाही अनंत अखंड प्रचंड असे ज्ञानवृक्ष प्रज्ञासुर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सावलीत राहुन प्रत्येक परिस्थितिमधे बाबांना आधार देणारी माऊली म्हणजेच माईसाहेब. बाबांच्या ढासळत्या प्रकृती ला खंबिरपणे सामोरे जावुन त्यांना जगन्याचा आधार देनारी डाॅक्टर म्हणजेच माईसाहेब. बाबासाहेबांप्रती निस्सीम प्रेम जोपासनार्या व त्यांच्या जिवनात अतुलनिय योगदान देणार्या माईसाहेबांना त्यांच्या जन्मदिनी..
विनम्र अभिवादन….!
(‘द बुद्ध अॅन्ड हिज् धम्म’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत बाबासाहेबांनी त्यांना ८ वर्ष अधिक जगविण्याचे श्रेय डॉ. सविता आंबेडकरांना दिले होते. ती प्रस्तावना नंतर पुस्तकातून गाळण्यात आली…
संदर्भ : रावसाहेब कसबे त्यांचे ‘भक्ती आणि धम्म’.
(मुक्तीदाता विशेषांक)
“साहेबांना विश्रांती मिळावी, मनस्वास्थ्य लाभावे म्हणून भेटीस येणाऱ्या लोकांवर मी निर्बंध घालीत असे. त्यामुळे काही लोकांना माझा राग येत असे, पण त्याला इलाज नसे. कारण कटूतादेखील पत्करून मला साहेबांची प्रकृती सांभाळायची होती. त्यांच्या भेटीला येणारे बहुतांश नेते, अनुयायी व कार्यकर्ते काही ना काही कामे घेऊनच येणार. तसेच ते वेळ काळ न पाहता कधीही येत आणि तासन् तास बसत असत.त्यामुळे बऱ्याच वेळ त्यांना मला परत पाठवावे लागे. साहेब आधीच पेशंट, त्यात कोणी फिर्याद घेऊन आले की ती ऐकून साहेब अस्वस्थ बेचैन होत असत. शरीराने विकलांग झाल्याने ते चरफडत.पण इतरांना त्याची जाणीव नसे.त्यामुळे कटूता पत्करून मला साहेबांची प्रकृती सांभाळायची तारेवरील कसरत करावी लागत होती.”
पूजनीय डॉ सविता (माईसाहेब) आंबेडकर
संदर्भ आत्मचारित्र्य
मुक्तीदाता डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेषांक…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व सवितामाईंचा विवाह…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रथम पत्नी रमाई यांचे २७ मे १९३५ रोजी क्षयरोगाने निधन झाले होते. त्यानंतर बाबासाहेबांनी पुन्हा विवाह न करण्याचा निश्चय केला होता.
रमाईच्या निधनानंतर अनेक मित्रांनी व सहकाऱ्यांनी बाबासाहेबांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र ते आपल्या निर्धारावर ठाम होते. १९४२ नंतर बाबासाहेबांना मधुमेह व उच्च रक्तदाब याचा आजार गंभीर प्रमाणात जाणवू लागला. यामुळे त्यांनी देखभाल करण्यासाठी व वेळेवर जेवण, पथ्यपाणी याची काळजी घेण्यासाठी एखादी नर्स ठेवावी असाही सल्ला त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी व डॉक्टरांनी दिला. मात्र तसे करणे लोकनिंदेला कारण ठरेल म्हणून त्यांनी या सूचनेस नकार दिला. पुढे १९४६-१९४७ मध्ये त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब याच्याबरोबरच संधिवाताचाही प्रचंड त्रास जाणवू लागला. यावेळी दिल्लीतील नामवंत डॉक्टरांनी त्यांना स्पष्टपणे सूचित केले की, त्यांनी वेळेवर वैद्यकीय उपचार, वैद्यकीय सल्ल्यानुसार आहार व पथ्यपाणी केले नाही तर ते फार काळ जगणार नाहीत. याच काळात त्यांनी मधुमेहाच्या व संधीवाताच्या दुखण्यासाठी डॉ. मालवणकर यांच्याकडे उपचार घेणे सुरु केले होते. येथे सवितामाईंशी त्यांचा परिचय वाढला होता. त्याच्याशी झालेल्या परिचयातून व चर्चेतून बाबासाहेबांनी २५ जानेवारी, १९४८ रोजी सवितामाईना पत्र पाठवून लग्नाची मागणी घातली. अशाच प्रकारे त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी कमलकांत चित्रे यांना २० फेब्रुवारी, १९४८ रोजी, दौलतराव गुणाजी जाधव यांना २१ फेब्रुवारी, १९४८ रोजी व भाऊराव गायकवाड यांना १६ मार्च, १९४८ रोजी पत्र पाठवून आपल्या निर्णयासंदर्भात माहिती दिली. सवितामाईंचा होकार मिळाल्यानंतर शेवटी सर्व सहकार्यांशी विचार विनिमय करून त्यांनी सवितामाईंशी १५ एप्रिल, १९४८ रोजी दिल्लीत नोंदणी पद्धतीने विवाह केला. बाबासाहेब व माईसाहेब यांच्या विवाहामागील पार्श्वभूमी व यासंदर्भात त्यांचा उपलब्ध असलेला पत्रव्यवहार पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते की, सवितामाईंमध्ये असीम करुणा, सर्वोच्च त्याग करण्याची वृत्ती आणि स्वतंत्रपणे उचित निर्णय घेण्याची क्षमता हे गुण ओतप्रोत भरलेले होते. सवितामाईंनी बाबासाहेबांशी विवाह करताना जात, वयातील अंतर, आजारपण यापैकी काहीही पाहिले नाही. विवाहाच्या वेळी बाबासाहेबांचे वय ५६ वर्षे व सावितामाईंचे वय ३६ वर्षाचे होते. सवितामाईंना हे ठाऊक होते की अनेक व्याधींनी ग्रस्त असलेल्या डॉ. आंबेडकरांना कधी काय होईल यांचा नेम नाही. त्यांच्याकडून अपत्यप्राप्तीची अपेक्षा नाही. तरीही त्यांनी जाणूनबुजून बाबासाहेबांशी विवाहाच्या प्रस्तावास मान्यता दिली. अशा प्रकारचा धीरोदात्तपणाचा निर्णय केवळ एक असामान्य स्त्रीच घेऊ शकते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर “….त्यांच्याबद्दल माझ्या मनात आत्यंतिक सहानुभूती निर्माण झाली. तत्क्षणी माझ्यातील डॉक्टर जागा झाला आणि मी विचार केला की,ही एक अशी गरजू व्यक्ती आहे की, जिला वैद्यकीय मदतीची अत्यंत जरुरी आहे. वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन, पथ्यपाणी व नियमित उपचार जर त्वरित दिले तर या व्यक्तीचे आयुष्य निश्चितच वाढणार आहे.माणुसकीच्या व डॉक्टरांच्या नितीधर्माशी इमान राखण्याच्या विचाराने मी मनोमन निश्चय केला की,या व्यक्तीसाठी आपण निश्चितच काहीतरी केले पाहिजे….”
(डॉ. आंबेडकरांच्या सहवासात- डॉ. सविता आंबेडकर पृष्ठ- ५१(मुक्तीदाता विशेषांक)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत