आर्थिकदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

नरेंद्र मोदीजी,”विश्वकर्मा” बलुतेदार/अलुतेदार “अस्पृश्य” आणि “शूद्र” कसा काय होता !

विजय अशोक बनसोडे

बलुतेदार हे समृद्धीचा पाया आणि बलुतेदारी पद्धत ही भारताच्या समृद्धीचा मजबूत पाया होती.असे म्हणणे म्हणजे एक प्रकारे पुरोगामी महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या जातीत विखरून ठेवलेल्या बहुजन समाजातील नागरिकांनी,सबंध जग आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करून विज्ञानवादी युगात माहिती व तंत्रज्ञानात गवसणी घालत आहे,अशा या विज्ञानवादी काळात सुद्धा बहुजन समाजातील नागरिकांनी मनुस्मृतींनं लादलेली पारंपारिक कामेच करावी आणि मनुस्मृतीचं योग्य आहे,याचे समर्थनच काल परवा वर्धा मध्ये येऊन भारताच्या प्रधानमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांनी केले.मागच्या दहा वर्षाच्या सरकारमध्ये नरेंद्र मोदी यांनी विविध कायदे करून देशातील कामगारांची वाट लावली.किमान कौशल्य कार्यक्रम अर्थात “स्किल इंडिया” च्या नावाखाली देशातील नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त केले त्यांनी वर्धा मध्ये 12 बलुतेदारीचे समर्थन करणं म्हणजे नेमकं काय ? हा मोठा प्रश्न आहे.

त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रच नव्हे,तर भारतातील एस.सी/एस.टी/ओ.बी.सी बहुजन बांधवांनी संविधानातून मिळालेले परिवर्तन मान्य करून संविधानाचे कडवे समर्थन केले पाहिजे.अन्यथा फसव्या आणि फक्त फसव्या योजनाच्या नादात आपण आपले हक्क आणि अधिकार गमवू शकता,हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

बहुजन समाजातील तरुण पिढीने बलुतेदार व अलुतेदार पद्धत समजून घ्यावी,मग कळेल शत्रू-मित्र कोण !

खरं तर आत्ताच्या तरुण पिढीने बारा बलुतेदारी पद्धत म्हणजे काय हेच मुळात पहिल्यांदा समजून घेणे गरजेचे आहे.त्या शिवाय आपला शत्रू कोण आणि मित्र कोण यातील फरक कळणार नाही.गाव गाड्यांमध्ये 12 बलुतेदारांना खूप मान आणि सन्मान होता असं म्हटलं जातं.आज ही स्वतःला जुनी जाणती समजणारी सवर्ण जातीयवादी टाळकी बारा बलुतेदारीच समर्थन करताना दिसतात.म्हणजे हे बारा बलुतेदार कोण ? बलुतेदारी म्हणजे नेमकं होती तरी काय,? अलुतेदार कोण व अलुतेदारी म्हणजे काय ? याचा विसरचं भारतीय संविधानातील मूलभूत अधिकारांचा लाभ घेऊन आपल्या जीवनामध्ये प्रगती आणि उन्नती साधणाऱ्या तरुणांना पडलेला आहे.त्यामुळेच नरेंद्र मोदींनी केलेल्या बारा बलुतेदारी पद्धतीचं समर्थन करण्यात येतं किंवा एवढं विघातक वक्तव्य करून सुद्धा महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराचा बहुजन समाज गप्प आणि शांत आहे.

बलुतेदार व अलुतेदारांना “धन,शस्त्र,विद्या” बंदी का करण्यात आली होती !

कदाचित आपल्या सर्वांना माहीत असेल की,सिद्धार्थ,तथागत गौतम बुद्धाच्या बौद्ध धर्मीय विचाराच्या शासनकाळ अर्थात राजपाटानंतर बौद्ध सम्राट बृहद्रथाच्या मर्डर नंतर विषमतावादी,मानवतावाद विरोधी विचारसरणीच्या ब्राह्मण आणि ब्राह्मण्यग्रस्त पुष्यमित्र शृंगाच्या राजवटीमध्ये गुण्या-गोविंदाने एकत्र राहणाऱ्या नागरिकांमध्ये व्यवसायाच्या नावावर फूट पाडून,यांनी भविष्यात कधी ही आपले डोके वरी करू नये.अशी व्यवस्था सुमती भार्गवाच्या लेखणीतून मनुस्मृतीच्या माध्यमातून तयार केली.त्यासाठी विविध कपोलकल्पित काल्पनिक धर्मग्रंथाची निर्मिती सुद्धा केली आणि ही बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार पद्धत बहुजन समाजामध्ये मजबूत केली. यास सर्वात मोठे कारण म्हणजे,याच सुमती भार्गवाच्या मनुस्मृतीने बुद्ध शासन काळानंतर “धन,शस्त्र,विद्या” तिन्ही मूलभूत घटक भारतीय बहुजन समाजासाठी बंद केले.त्यामुळे इथल्या बहुजन समाजाने मनुस्मृतीने लाभलेल्या पारंपारिक व्यवसायालाच मुख्य व्यवसाय मानत प्रगतीची दारे स्वतःहून बंद करून घेतली.या बारा बलुतेदारी मध्ये विविध वर्गाने विविध कामे करायची आणि त्यांना सांगायचे की गावाच्या विकासासाठी हे आपण खूप मोठे आणि महत्त्वाचे कार्य करत आहात,असा गोड गैरसमज उदाहरणार्थ चांभार समाजाच्या मनामध्ये निर्माण करून ठेवला,ज्याने उभं आयुष्य जोडेच शिवायचे,नाव्ह्याने केसेस कापायची, महारा-मांगांनी येसकरकी (भिकनं मागून खायचं) करायची.अशा अनेक रूढी परंपरा,ज्या रूढी परंपरांनी इथल्या बारा बलुतेदारांचा मेंदूच कुलूप बंद करून ठेवला.त्यांनी दुसरा कोणताही विचार करायचाच नाही.अशी व्यवस्था म्हणजे बारा बलुतेदारांची व्यवस्था होती.तर मग आज नरेंद्र मोदी आशा बलुतेदारी पद्धतीचा समर्थन का करतात ? हा मोठा संशोधनाचा विषय आहे आणि बहुजन समाजाने समजून घेण्याचा ही विषय आहे.

बारा जातीची माणसं एवढीच महत्त्वाची सेवा देणारी होती,तर मग ती “अस्पृश्य” का होती ?

याच पुरोगामी महाराष्ट्रातील कुंभार,कोळी,गुरव,चांभार,मांग,तेली,न्हावी,परीट,महार,लोहार,सुतार, या विविध जातीत विखुरलेल्या जातीसमूहातील नागरिकांना कृषी प्रधान भारताच्या गोंडस नावाखाली गाव गाड्यात सेवा पुरवणारी महान मंडळी म्हणून यांच्याकडून विविध कामे करून घेतली जायची,हे बारा बलुतेदार अर्थात बारा जातीची माणसं जर एवढीच महत्त्वाची आणि सेवा देणारी होती,तर मग ती “अस्पृश्य” का होती,हा मोठा प्रश्न आहे.यांना “विद्या-शिक्षण” घेण्याचा अधिकार नव्हता,यांना “धन” संचय करण्याचा अधिकार नव्हता,ना यांना कोणत्याही प्रकारचे “शस्त्र” चालवण्याचा अधिकार नव्हता,यांना विविध हक्क आणि अधिकारापासून या व्यवस्थेने वंचित-अलिप्त का ठेवले होते.याचा ही विचार आजच्या तरुण पिढीने करणे गरजेचे आहे.तरच आपल्या लक्षात येईल की,बलुतेदारी,अलुतेदारी पद्धत मानवाच्या विकास,प्रगती आणि उन्नतीला खुंटीत करणारी होती की, ही चांगली होती.

प्रधानमंत्री असणाऱ्या सुद्धा व्यक्तीचा आपण निषेधच व्यक्त केला पाहिजे !

संविधान पूर्व भारतामध्ये गाव गाडा आणि शहरांमध्ये प्रत्येक जातीला आपली नेमून दिलेली कामे होती. त्याच्या पलीकडचा विचार त्या जातींनी आणि समूहांनी करायचाच नाही असा दंडूक मनुस्मृतीचा होता. परंतु या भारताला संविधान मिळाल्यानंतर संविधानाच्या माध्यमातून भारतातील पिचलेल्या,
रंजलेल्या,गांजलेल्या,शोषित, पीडितांना हजारो वर्ष “शस्त्र,धन,विद्या” पासून वंचित असलेल्या जाती समूहातील नागरिकांनी शिक्षणामध्ये प्रगती करून देशातील विविध सत्ता क्षेत्रामध्ये मनुस्मृतीचे कायदे पायदळी तुडवून आपली हिस्सेदारी सिद्ध केली.मुळात बहुजन समाजातील छोट्या मोठ्या जातीने संविधानाच्या बळावर देशातील विविध सत्तेत मिळवलेली हिस्सेदारी ही बाबच इथल्या गांधीवादी आणि मनुवादी राजकीय पक्षांच्या नेत्यांना टोचत आहे.त्यामुळेच ते कायमस्वरूपी भारतीय संविधानाला विरोध करत असतात आणि विश्वकर्मा सारख्या योजना बहुजन समाजावर लादण्याचा प्रयत्न करतात.अशा या भोंदू आणि आपल्याला जाणीवपूर्वक जुन्या चालीरीती आणि परंपरेत गुंतवू पाहणाऱ्या प्रधानमंत्री असणाऱ्या सुद्धा व्यक्तीचा आपण निषेधच व्यक्त केला पाहिजे.

गाववाड्यात बलुतेदारांना व आलूतेदार आत्मसन्मान व स्वाभिमान जोपासण्याची मुभा होती का !

गाव गाड्यात बलुतेदारांना व आलूतेदार आत्मसन्मान व स्वाभिमान जोपासण्याची मुभा होती का ? अलुतेदार हा अठरा जातींचा समूह आहे.यांचे महाराष्ट्रातील प्रमाण ३०% पेक्षा अधिक आहे,आणि हा इतर मागास वर्ग (ओ.बी.सी) मध्ये मोडतो.अलुतेदारांनाच ’नारू’ म्हणतात.कासार,कोरव,गोंधळी,
गोसावी,घडसी,ठाकर,डवऱ्या,तराळ,
तांबोळी,तेली,भट,भोई,माळी,जंगम,वाजंत्री,शिंपी,सनगर,साळी
या अठरा गाव कामगारांचा समावेश अलुतेदारांमध्ये होत होता.याशिवाय इतर भटक्या जाती व जमातींचाही ग्रामीण विभागाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा होता.अलुतेदारांची यादी काही ठिकाणी वेगळी दिली आहे.कळवंत,खाटीक,गोंधळी,घडशी,डावऱ्या,तराळ,तांबोळी,माळी,शिंपी,साळी,सोनार हे बारा अलुतेदार.तर काही ठिकाणी बारा अलुतेदारांची कळवंत,घडशी,चौगुला,मुलाणा,
ठाकर,डवऱ्या,तराळ,तांबोळी,तेली,माळी,साळी,सोनार अशी दिली आहे.याचा अर्थ असा की गावा-गावाप्रमाणे अलुतेदारांची यादी वेगवेगळी असे.पुन्हा प्रत्येक गावात हे सर्व अलुतेदार असतीलच असे नाही.त्यात ही एक नक्की की,अलुतेदार हे बलुतेदारांच्या मानाने दुय्यम असत.

विश्वकर्मा उपेक्षित कसा काय असू शकतो !

भारतीय संविधानाचा लाभ घेऊन आज ज्या ज्या आदिवासी, मागासवर्गीय आणि ओ.बी.सी बांधवांनी प्रगती साधली,नोकऱ्या मिळवल्या,वेगवेगळ्या उद्योग व्यवसायामध्ये गवसणी घेतली,अशा बहुजन समाजातील नागरिकांनी विचार केला पाहिजे की,काय आलुतेदारी आणि बलुतेदारी पद्धत आपल्या हिताची होती का ? त्यामध्ये जीवन जगणाऱ्या नागरिकांना सन्मान होता का ? आज ही आपण पाहतो की,आदिवासी आणि ओ.बी.सी समाजातील कित्येक छोट्या मोठ्या जाती पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागतात,दारोदार जाऊन जोगवा मागतात.असं मागून घराचा उदरनिर्वाह भागवण्यात कोणता सन्मान आहे.याचा विचार आपण करावा,RSS प्रणित भारतीय जनता पार्टीने या 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदारांचे जीवनमान उंचावण्यासाठी “विश्वकर्मा” नावाची योजना जाहीर केली.विश्वकर्मा कोण ? विश्वकर्मा म्हणजे करता करविता असे तर नव्हे ना ? या बारा बलुतेदारी आणि 18 आलुतेदारीच्या हिनकस रुडी परंपरेचं समर्थन करण्यासाठी केंद्र सरकारने या योजनेला “विश्वकर्मा” अर्थात विश्वाचा निर्माता,करता करविता असं मोठं गोंडस नाव देऊन जुनाट बुरसटलेल्या जातीव्यवस्थेचं समर्थन करण्याच काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतात.हे विषारी षडयंत्र बहुजन समाजातील नागरिकांनी आता तरी लक्षात घ्यावं,यासाठीच हा लेख प्रपंच आहे.

लेखक,विजय अशोक बनसोडे
जि.सं.उपाध्यक्ष,8600210090
भारतीय बौध्द महासभा,धाराशिव

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!