“चैतन्याचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर”(सोलापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळ!)- दत्ता गायकवाड
साम्यक समीक्षा डॉ. डी. एस. सावंत
वर्णाश्रम धर्माच्या साखळदंडात जोर जबरदस्तीने जखडून ठेवलेल्या कोट्यावधी अस्पृश्य समाजाचे जगणे हीन, दिन, बहिष्कृत आणि तिरस्कृत केले गेले होते, अशावेळी युगान युगाच्या साखळदंडातुन मुक्त करणारा मुक्तिदाता, गुलामांचे जोखडदंड भिरकावून देऊन येथील अस्पृश्य समाजाला आपल्या स्थितप्रत प्रज्ञेने स्वतंत्र करून… त्यांना स्वाभिमानाचा ऑक्सिजन दिल्याने त्यांच्यात “चैतन्याची” लहर आली नसती तर नवलच!!! म्हणून लेखकाने आपसूकच आणि अचूकपणे “चैतन्याचे” प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे समर्पक शीर्षकानयुक्त असा ठेवा, पर्वणी रूपाने देऊन सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळींचा इतंभूत आढावा घेण्याचे काम “चैतन्याचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर” या पुस्तका मधून केले आहे.
चैतन्याचे प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोलापूर आगमनाने भारून गेलेल्या गोरगरीब, दबलेल्या, पिचलेल्या लोकांची स्तंभने, भावविभोरता अचूकपणे टिपण्याचे काम दत्ताजी गायकवाड यांनी आपल्या या पुस्तकांमध्ये केलेले आपल्याला पावलोपावली आढळते अशा प्रकारचे लेखन जर महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यातून झाले तर त्यावेळची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक तसेच राजकीय परिस्थितीचे जिल्हावार इतंभूत आणि यथायोग्य दर्शन घडू शकते. तसेच काळाच्या ओघामध्ये लुप्त झालेली अनामिक आणि ऐतिहासिक नावे की ज्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ अंगा-खांद्यावर नाचवली, वाढवली आणि स्वतःचा उद्धारही करून घेतला ते पुढे येतील त्यामुळे आंबेडकरी चळवळ प्रगल्भ होऊन चळवळीत काम करणार्यांना एक दिलासा तसेच प्रेरणा मिळेल. त्यामुळे “चैतन्याचे प्रणेते” या पुस्तकामुळे असे राहून गेलेले संदर्भ जिल्ह्या जिल्ह्यातून विविध पुस्तकांद्वारे पुढे आल्याशिवाय राहणार नाहीत अशी अपेक्षा वाटते त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडून एक प्रकारची सामाजिक ऊर्जा मिळाल्या शिवाय राहणार नाही.
“रायटींग एन्ड स्पीचेस” मध्ये तसेच बाबासाहेबांच्या इतर प्रकाशित स्तोत्र साधनांमध्ये अनेक गोष्टीचा उल्लेख आणि उहापोह झालेला आहे तरीही आंबेडकरी चळवळ एवढी प्रचंड आणि प्रगल्भ होती की, सरकारच्या, प्रकाशकांच्या नजरेतून अनेक गोष्टी राहून जाणे अपरिहार्य होते. राहून गेलेल्या गोष्टी अशा पुस्तकाच्या माध्यमातून आल्यामुळे अशा पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित होते.
2016 मध्ये म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांमध्ये सोलापुरातील आंबेडकरी चळवळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोलापूर भेटीवर विचारपुष्परुपी “ज्ञानयोगी आंबेडकर” असा कार्यक्रम सोलापूर आकाशवाणी वरती सादर करण्याची संधी दत्ताजींना मिळाली आणि त्यातूनच या पुस्तकाची बिजे रोवली गेली असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावी “मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेच्या” निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1924 साली भेट दिली बाबासाहेबांनी या परिषदेत दिलेले भाषण हा इथल्या अस्पृश्य समाजाचा, देशाच्या परिस्थितीचा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीचा उहापोह करणारे,ज्ञानाचा उत्कृष्ट नमुना असणारे आणि लोकांचे डोळे उघडणारे असे अत्युच्च श्रेणीचे ते भाषण होते ते ऐकून मंत्रमुग्ध झालेल्या अस्पृश्य समाजाला आमचा उद्धार करता “भगवंत” भेटला आहे अशा प्रकारची भावना निर्माण झाली नसती तर नवलच!! म्हणूनच बार्शी पंचक्रोशीतील अस्पृश्य समाजाला तिथे बार्शी चे ग्रामदैवत असलेल्या भगवंता पेक्षा आमचा उद्धारकर्ता भगवंत आम्हाला मिळाला आहे अशी भावना झाली. त्याचं दुसरं कारण असं आहे की तिथल्या भाषणाचा व्याख्यानाचा विषय “देशांतर, नामांतर, धर्मांतर” असे होते. या भाषणांमध्ये 1935 च्या धर्मांतराच्या घोषणेची पूर्वकल्पनायुक्त झलक होती. भावी धर्मांतराची बीजे या भाषणांमध्ये अधोरेखित होतात. त्यामुळे आमचा आता उद्धार होणार आहे अशी भावना अखिल समाजामध्ये निर्माण झाली. अस्पृश्य समाजावर नऊ लाख आरोप करण्यात येतात पण याला जबाबदार कोण? असा रोखठोक सवाल करून चातुर्वर्ण्य समाज पद्धतीची लक्तरे वेशीवर टांगणेचे काम बाबासाहेबांनी या भाषणात केलेले आपणाला दिसून येते.
तसेच त्यांच्या सहृदयी बाबासाहेब आणि कारुण्य मूर्ती रमाई मध्ये बाबासाहेबांच्या अनंत स्वभावछटाचे दर्शन घडते रमाबाई बद्दल असलेला जिव्हाळा प्रेम आणि ती आपल्या आजारातून बरी व्हावी म्हणून बाबासाहेबांच्या जीवाची तगमग झालेले आपणाला दिसून येते रमाई ची इच्छा आपणाला पूर्ण करता येत नाही त्यामुळे अस्वस्थ झालेले बाबासाहेब याचेही दर्शन लेखकाने अत्यंत मार्मिकपणे घडवलेले आहे
बाबासाहेबांच्या विधायक कामाची सुरूवात सोलापुरातून त्यामध्ये बहिष्कृत विद्यार्थ्यांची बोर्डिंग असो,अस्पृश्यांना शेत जमिनीचे वाटप असो, त्यांना घरासाठी जागा मिळवून देण्याचे काम असो, अनेकांना नोकरी लावण्याचे काम असो तसेच अस्पृश्य समाजाचे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बाबासाहेबांनी सोलापुरातून दिलेले संदेश अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वाचे वाटतात त्या सर्व बाबी लेखकाने अत्यंत कौशल्याने अधोरेखित केलेल्या आपल्याला दिसून येतात.
1927 ची बहिष्कृत वर्गाची स्वाभिमान संरक्षक प्रांतिक परिषद असो, सोलापूर अस्पृश्य समाजातर्फे बाबासाहेबांना मानपत्र आणि थैली अर्पण करताना येथील कार्यकर्त्यांनी बाबासाहेबा प्रती असणारा विश्वास तसेच बाबासाहेबा प्रति असणारी आत्मीयता आदर आणि प्रेम व्यक्त होणारी भाषणे अत्यंत कौशल्याने अंतर्भूत केलेली आपणाला पाहायला मिळतात.
कोणाच्या शिकवणीने आपापसात बेकी होऊ देता कामा नयेअसा महत्वपूर्ण संदेश बाबासाहेबांनी सोलापुरात आपल्याला दिलेला पाहायला मिळतो.
स्वतंत्र मजूर पक्षाचा प्रचार दौरा,धाकटे महारवाड्यास भेट, 1927 दुसरी महारवतन परिषद वळसंग चा प्रचार दौरा तेथील विहिरीचे बाबासाहेबांच्या हस्ते झालेले उद्घाटन प्रसंग हुबेहूब उभा करण्याचा प्रयत्न दत्ताजींनी आपल्या पुस्तकात केला आहे. बाबासाहेबांची बैलगाडीतून केलेली काढलेली मिरवणूक जुन्या आठवणींना उजाळा देणारे आणि तो प्रसंग साक्षात उभा करण्याचे किमिया दत्ताजीने लीलया साधलेली दिसून येते.
बार्शी चा प्रचार दौरा, करमाळ यांचा प्रचार दौरा,
कुर्डूवाडी भेट त्यामध्ये कार्यकर्त्यांशी केलेली चर्चा, दिलेले संदेश, राहणीमान, स्वच्छता, आर्थिक प्रगती याबाबत बाबासाहेबांनी दिलेले महान संदेश अत्यंत महत्त्वाचे आहेत
जुलूम करणार्याविरुद्ध दोन हात करण्याची तयारी ठेवा असे बाबासाहेब पंढरपूर येथून गरजले होते.
अस्पृश्य समाजात एकी नाही याचे कारण जातिभेद हेच आहे हे अधोरेखित करकंब येथील भाषणामध्ये केलेल आपणाला दिसून येते.
सोलापूर महापालिकेचे मानपत्र जानेवारी 1938
ख्रिस्त सेवा मंदिरात बाबासाहेबांचे अप्रतिम भाषण महार मांग परिषद कसबे तडवळे ढोकी येथे केलेले मौलिक मार्गदर्शन हा अमूल्य ठेवा दत्ताजीने अत्यंत सुसूत्र पद्धतीने आणि क्रोनोलॉजिकल पद्धतीने दिला आहे.
बाबासाहेबांची सोलापूर जिल्ह्याची शेवटची भेट व प्रचार सभा,बाबासाहेब कायदे मंत्री असताना 1951 साली पहिली घटना दुरुस्ती सोलापूरची स्पिनिंग अँड विव्हिंग मिल च्या संदर्भात होती खाजगी संपत्तीच्या अधिकार रद्दबातल संदर्भात केलेली होती.
पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 ते 1954
घटनाकाराचा काँग्रेसने कम्युनिस्टांनी केला पराभव कोणाचीही भीड ठेवता सडेतोडपणे मांडली आहे.
बाबासाहेबांचे समकालीन 1924 ते 1956 पर्यंत कालखंड व सोलापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचा नव्हे तर इतरही महत्त्वपूर्ण चळवळीचा तपशीलवार माहिती पटच उलगडून दाखवण्याचे काम दत्ताजींच्या या पुस्तकाने केले आहे. केवळ आंबेडकरी चळवळी बद्दलच माहिती या ग्रंथात येते असे नाही तर एकंदरीत सोलापूर जिल्हा आणि आजूबाजूचे लोक त्यांच्या चालीरीती, त्यांची आर्थिक परिस्थिती, सामाजिक मागासलेपणा, साधे भोळेपणा, आर्थिक दुबळेपणा, एक आगतिकता तसेच गावाची रचना, वेशभूषा, बोलीभाषा, सण-उत्सव, सर्वधर्मीयांचा सहभाग,धर्म, परंपरा इत्यादी सर्व समावेशक सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचा पट आपल्याला उलगडताना दिसतो आंबेडकरी चळवळीचा सोलापूर जिल्ह्यातील पट उलगडून दाखवताना सोलापूर जिल्हा आंबेडकरी चळवळीच्या केंद्रस्थानी कसा होता, अनेक निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भविष्यातील चळवळीचे सूतवाचक सोलापूर येथे केलेले दिसून येते.
सोलापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील वाघ जीवाप्पा ऐदाळे, निंगाप्पा ऐदाळे आणि हरिभाऊ तोरणे यांच्या संदर्भात अधिक लिहिता आले असते?
जीवाप्पा तथा अण्णासाहेब ऐदाळे यांना तर 24 जानेवारी 1937 स्वतंत्र मजूर पक्षाच्या निवडणूक प्रचार सभेमध्ये बाबासाहेब म्हणाले होते हा ऐदाळे उभा नाही तर आंबेडकर उभा आहे!!! म्हणून मतदान करावे तसेच मी दगडाला शेंदूर छापला आहे तुम्ही त्याला देव मानलं पाहिजे!!असा झंझावाती प्रचार बाबासाहेबांनी केल्यामुळेच अण्णासाहेब ऐदाळे प्रचंड बहुमताने निवडून आले आणि नव वर्ष सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. पुढील येणाऱ्या आवृत्त्या मध्ये या गोष्टीचा समावेश दत्ताजी करतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही
गतकालीन घडामोडीवर व तदनुषंगिक तपशीलवार ऐतिहासिक कामावर प्रकाश टाकण्याचे अवघड काम अत्यंत सोप्या पद्धतीने या पुस्तकात केले आहे. साधारण तीन दशकांचा काळ, तोही साधारण शतकपूर्ती होताना मांडणे! आणि ते वयाच्या 79 व्या वर्षी करणे हे दत्ताजींच्या ऊर्जा स्तोत्राचे लक्षण आहे असेच म्हणावे लागेल हे काम अतिशय जिकिरीचे असतानाही येथे दत्ता गायकवाड यांनी लीलया पेललेले दिसते त्यांच्या हातून अशाच साहित्य कृतींना उधाण येवो ही सदिच्छा व्यक्त करतो तसेच इथून पुढे सोलापूर जिल्हा आंबेडकरी चळवळीचा इतिहास लिहिणाऱ्यांना या ग्रंथाशिवाय पुढे जाता येणार नाही हा ग्रंथ मैलाचा दगड ठरेल तसेच या ग्रंथाला आमचे मित्र प्राध्यापक एम आर कांबळे साहेब यांनी प्रस्तावना लिहिल्यामुळे हा मौलिक ग्रंथ सोलापूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचा इतिहासाचा संदर्भ ग्रंथ ठरेल ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.
जय-भीम.
आपला
डी एस सावंत
“चैतन्याचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर”
रमाई आणि बाबासाहेब यांच्या पदस्पर्शाने पुनित झाले सोलापूर!
लेखक- दत्ता गायकवाड
प्रकाशक सुविद्या प्रकाशन सोलापूर
किंमत मूल्य तीनशे पन्नास रुपये मात्र
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत