देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

बुध्दधम्मात श्रावण पौर्णिमेचे महत्व

सुमंगल रविंद्र अहिरे

बुध्दधम्मात पौर्णिमेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. वर्षातील बाराही पौर्णिमा महत्वाच्या आहेत. पौर्णिमेच्या दिवशी महत्वाच्या घटना बुध्दांच्या जीवनांत घडलेल्या आहेत. तसेच या महत्वाच्या दिवशी अन्य घटनाही घडलेल्या आहेत. श्रावण पोर्णिमादेखील महत्वाची अशी पौर्णिमा आहे.

 पौर्णिमेच्या दिवशी उपोसथ पाळले जाते, ते महत्वाचे आहे. उपोसथ दिवस जगातील बौध्दांकरिता अत्यंत महत्वाचा आहे. पौर्णिमेच्या दिवशी बौध्द भिक्खू भिक्खूणी पातीमोक्खाचे पठण करीत असतात. उपासक उपासिका अष्टशील ग्रहण करुन संपूर्ण दिवसभर शीलाचे आचरण करीत असतात.
 पौर्णिमेच्या दिवशी बौध्द उपासक उपासिका यांनी नजीकच्या बुध्दविहारात जाऊन, अष्टशील ग्रहण करून त्यानुसार आचरण करणे महत्वाचे आहे. पूजा, वंदना, शीलाचरण करणे आवश्यक आहे. ज्या विहारांत बौध्द भिक्खू आहेत, त्या विहारात जाऊन दानकर्म करणे आवश्यक आहे. बौध्द भिक्खूंची धम्मदेसना ऐकणे महतफलदायी असे आहे. यास्तव पौर्णिमा हा बौध्द लोकांचा महत्वाचा दिवस आहे.                                                आपण आता श्रावण पौर्णिमचे महत्व काय आहे? याबाबत मागोवा

घेऊया. श्रावण पौर्णिमेला दोन महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे या पौर्णिमेचे महत्व अधोरेखीत होते.
१) पहिली घटना म्हणजे अंगुलीमाल या दरोडेखोराची धम्म दिक्षा २) दुसरे महत्व म्हणजे पहिली धम्मसंगिती
अंगुलीमाल यांच्या बाबत आपणांस माहित आहे. पण सूज्ञ वाचकांना आठवण करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
अंगुलीमाल याचे मूळनाव अहिंसक असे होते. राजा प्रसेनजीत हा श्रावस्ती नगरीत राज्य करीत होता. त्याचवेळी त्याच्या दरबारात एक ब्राह्मण पुरोहित होता. तो लेखनिकाचे काम करीत असे. त्याचे नाव गार्ग्य असे तर त्याच्या पत्नीचे नांव मैत्राय असे होते. त्याच्यापोटी अहिंसक नावाचा गोड मुलगा जन्माला आला होता. अहिंसक हा मुलगा अत्यंत कुशाग्र बुध्दीचा होता. आचरणशील होता. तसेच अत्यंत बलवान होता. अशा सर्वगुणसंपन्न मुलाला त्यांच्या आई-वडिलांनी विद्या संपादनेसाठी त्यावेळच्या तक्षशिला विद्यापीठात पाठवू‌न दिले. तक्षशिला विद्यापीठ हे त्यावेळचे नावाजलेले विद्यापीठ होते. अहिंसक त्या विद्यापीठाचा विद्यार्थी होता. अत्यंत कुशाग्र बुध्दीचा तो मुलगा सर्व सहअध्यायीमध्ये अभ्यासात हुशार होता. अहिंसक हा असामान्य बुध्दीमत्तेचा होता. त्याच्या बरोबरचे वर्गमित्र त्याची ईर्ष्या करू लागले. त्याचा सतत हेवा करु लागले अहिंसक हा बलवान तर होताच त्याचबरोबर प्रज्ञावान होता. असा गुणश्रेष्ठ शिष्य असल्यामुळे त्यांचे गुरु यांचा त्याच्यावर विशेष लोभ होता. गुरुंची पत्नी हीदेखील त्यांच्यावर जिवापाड प्रेम करीत होती. असा सर्वगुणसंपन्न अहिंसक त्याच्या मित्रांच्या मनात खुपत होता. अहिंसकाचे दुर्गुण शोधून सापडत नव्हते. त्यामुळे त्याचे वर्गमित्र मनातून तडफडत होते. त्या सर्वांनी निश्चय केला की, अहिंसक आणि आचार्य यांच्यामध्ये कसा दुरावा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करुया. मग त्यांनी त्यासाठी गुरुंची पत्नी व गुरु यांचाच माध्यम म्हणून वापर करण्यास सुरवात केली. त्यांनी गुरुंच्या मनांत अहिंसकाबाबत खोटेनाटे आरोप लावले. गुरु, पत्नी व अहिंसक यांचे अभद्र संबंध आहेत, असे त्यांनी आचार्याजवळ सांगितले. प्रथम आचार्यानी याबाबींकडे दुर्लक्ष केले. परंतु, सहआध्यायी पुन्हा-पुन्हा अहिंसकाच्या बाबतीत खोटेनाटे सांगत होते. त्यामुळे आचार्य यांना ते सर्व खरे वाटले. त्यामुळे आचार्याना अहिंसकाचा राग आला. अहिंसक हा गुरुमातेशी अभद्र संबंध ठेऊन आहे, त्यामुळे अशा अहिंसकावर सूड उगवण्याचा निश्चय गुरुंनी केला. त्यांनी अहिंसकाला समोर पाहिल्याबरोबर अभद्र संबंधाबाबत त्याच्याशी वार्तालाप केला. आता तुझे शिक्षण पूर्ण झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्याने गुरुला गुरुदक्षिणा देणे, हे क्रमप्राप्त होते. त्याशिवाय घेतलेली विद्या ही फलदायी होत नाही, अशी त्यावेळची धारणा होती. वर्गमित्रांनी सांगितलेल्या गोष्टींचा राग गुरुंच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी अहिंसकाचा सूड उगवण्याचा निश्चय केला. त्यांनी त्याला सांगितले, ‘अहिंसका एक हजार लोकांची हत्या करुन ये, तिच माझी गुरुदक्षिणा’ याबाबतीतदेखील गुरुंनी कपट नीती अवलंबिवली आहे. लोकांची हत्या केली आहे, त्यावर गुरुंनी पुरावा मागितला. त्यावर अहिंसक निरुत्तर झाला. त्यानंतर तो पुन्हा जंगलात गेला व लोकांना मारुन त्यांची करंगळी कापून घेऊ लागला व त्याची माळ करून गळ्यात घालू लागला. त्यावरुनच त्याचे नाव अंगुलीमाल असे पडले.
लोकांची कुठलीच धनसंपत्ती तो लुटत नसे. फक्त व्हाटसरूला मारून त्याची करंगळी कापून घेत असे. त्याच्या अशा वर्तनामुळे तो ज्या जंगलात वास्तव्यास होता, त्या जंगलातून लोक जायला घाबरत. तो वर्षावासाचा काळ सुरु होता. श्रावस्ती नगरीतील सर्व प्रजाजन भयभीत झाले. ते राजा प्रसेनजिताकडे तक्रारी घेऊन येउ लागले. राजा प्रसेनजिताने आपले सैनिक त्या दरोडेखोरांकडे पाठविले. परंतु अंगुलीमाल याने त्यांना पिटाळून लावले. अंगुलीमालाच्या भितीने लोक त्या रस्त्याने जात नसत.
अंगुलीमालाच्या आईला मैत्रायणीला ही बाब कळली. तिला फार वाईट वाटले. आपला मुलगा अहिंसक हा असा कसा झाला. त्याला समजावण्यासाठी जावे, असे तिला वाटले. त्यावेळी ९९९ करंगळीची माळ झाली होती, फक्त एक हत्या बाकी होती.
त्यावेळी तथागत बुध्द श्रावस्तीतील जेतवनात विहार करीत होते. त्यांनी ठरविले की अंगुलीमालास योग्य मार्गावर आणावे. भगवंतांनी चिवर परिधान केले, हातात भिक्षापात्र घेऊन ते जंगलाच्या दिशेने जाऊ लागले. लोकांनी भगवंतांना अडविण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत. जंगलाच्या दिशेने जाऊ लागले. अंगुलीमालाने दुरुनच भगवंतांना पाहिले. त्याला फार आनंद झाला, कारण एकच करंगळी त्याला पाहिजे होती. त्याला वाटले, कोण हा काषायवस्त्रधारी येत आहे. नासमज आहे काय? बुध्द धीर-गंभीर मुद्रेने चालत आहे. अंगुलीमाल त्यांच्या मागे धावत आहे. शेवटी थकून तो ओरडला, ‘अरे सन्याश्या थांब तेथेच!’ तथागत म्हणाले, ‘अरे मी केव्हाचाच थांबलो आहे तू कधी थांबशील?’ हे ऐकूण अंगुलीमाल विचार करू लागला. मी तर थांबलो आहे आणि हा म्हणतो की, तू चालत आहे. बुध्द म्हणाले की, मी स्थिर आहे, परंतु तुझे मन चंचल आहे. बुध्दांनी त्याला उपदेश केला. हत्या करणे कसे पाप आहे, ते समजून सांगितले. बुध्दाच्या एक एक शब्दांनी तो भानावर आला. बुध्दांची वाणी ऐकूण तो शांत झाला. तो तथागताला शरण आला. त्याने हत्यार फेकून दिले. “मला क्षमा करा. मी अज्ञानापोटी हे सर्व केले. मला सन्मार्ग दाखवा’, असे म्हणून भगवंतास शरण गेला. भ. बुध्दांनी त्याला ‘येही भिक्खवे’ म्हणून दिक्षा दिली. संघात सामिल करुन घेतले. इ. स. पूर्व ५०४ मध्ये ही घटना घटली. तो दिवस श्रावण पौर्णिमचा होता. पुढे अंगुलीमाल हा अर्हतपदास पोहोचला.
श्रावण पौर्णिमेचे दुसरे महत्व म्हणजे, पहिली धम्मसंगिती याच दिवशी श्रावण पौर्णिमेला सुरु झाली. बुध्दांचे महापरिनिर्वाण इ. स. पूर्व ४८३ ला कुशिनारा येथे झाले. भ. बुध्दांनी आपल्या धम्मात आपल्यानंतर धम्मच मार्गदाता राहिल, असे आनंद यास सांगितले. कुणीही उत्तराधिकारी नेमला नाही. भगवंतांच्या महापरिनिर्वाणा नंतर संघात भिक्खुच्या वागण्यात बदल होऊ लागला. सुभद्र नावाच्या भिक्खूनी बुध्दांबाबत पुढील उद्‌गार काढले, ‘बरे झाले, तथागत गेले, त्यांच्या जाचाने कंटाळा आला होता, आपण आता मुक्त झालों’ हे त्यांचे शब्द महास्थविर भन्ते महाकश्यप यांनी ऐकले. त्यांनी यावर विचार केला व भिक्खूंची धम्मसंगिती घेऊन नियम केले पाहिजे, असे त्यांना वाटले. त्यांनी राजा अजातशत्रू यांच्या बरोबर विचारविनियम करून धम्मसंगिती भरविण्यासंबंधी स्थळ व राहण्याची तथा भोजनाची व इतर व्यवस्था करण्यासाठी सांगितले. राजा अजातशत्रू यांनी ती मान्य केली.
भिक्खूंची ही पहिली धम्मसंगिती इ. स. पूर्व ४८३ ला राजगृहाजवळ सप्तपर्णी गुंफा येथे भरविली गेली. सदर प्रथम धम्म संगितीचे अध्यक्ष भन्ते महास्थवीर महाकश्यप हे होते. यामध्ये ५०० अर्हन्त भिक्खूंनी सहभाग घेतला होता. या प्रथम धम्म संगितीला पंचशतिका संगिती असेही म्हणतात. भन्ते महास्थवीर आनंद यांना सुत्तपिटकाचे प्रमुख नेमण्यात आले. भन्ते महास्थविर उपाली यांना विनयपिटका करीता प्रमुख नेमण्यांत आले. यावरुन प्रथम धम्मसंगितीत धम्म आणि विनय यांचे संघायन करण्यात आले. भन्ते महास्थवीर महाकश्यप यांनी आनंद महास्थवीरांना सुत्तपिटकाविषयी प्रश्न विचारले आणि भन्ते महास्थवीर उपाली यांना विनयासंबंधी प्रश्न विचारण्यात आले. दोघांनी दोन्ही विषयांत सत्य माहिती उपस्थित भिक्षुना सांगितली.
पहिली धम्म संगिती यशस्वी झाली. सुत्तपिटकाच्या पाच निकायांचा आणि विनयपिटकातील महावग्ग व चुल्लवग्ग या सारख्या मौलिक ग्रंथाचे तोंडी संपादन केले. तथागत बुध्दांनी आपला धम्म ८४००० स्कंधांत सागितला आहे. त्यातील ८२००० स्कंद महास्थवीर आनंद यांचे मुखपाठ होते. सुत्तपिटकात १) दिध निकाय २) मज्झिम निकाय ३) संयुक्त निकाय ४) अंगुत्तर निकाय ५) सुद्दक निकाय यांचा समावेश होतो. विनयपिटकात १) पाराजिक २) पाचित्तिय ३) महावग्ग ४) चुल्लवग्ग ५) परिवार यांचा समावेश आहे. या धम्मसंगितीत उपरोक कोणताही ग्रंथ लिपीबध्द नव्हता. केवळ मौखिक संपादन कार्यालाच संगिती असे म्हणतात. ही प्रथम धम्म संगिती ९ महिने चालली होती. या धम्मसंगितीचा आरंभ श्रावण पौर्णिमेला झाला होता. म्हणून या पौर्णिमेला महत्व आहे.
पौर्णिमेच्या दिवशी चिंतन, मनन करून सर्वांनीच आपले जीवन सुखमय करावे. सर्वांनी धम्म मार्गावर आरुढ होऊन पुण्य संपादन करावे, हीच
मंगलकामना.
सुमंगल रविंद्र अहिरे
धम्म संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!