वाघाला वाघासारखेच जपूया !
डॉ.सुधीर कुंभार .
जागतिक व्याघ्र दिन २९ जुलैला साजरा केला जातो.कोणे एके काळी भारताला वाघांचा आणि सापांचा देश म्हणून ओळखले जात होते. भारतात आजघडीला पन्नासहून अधिक व्याघ्र प्रकल्प सुरु आहेत.त्यासाठी वनविभागाने काही तथ्य व काही पथ्य लक्षात ठेवलेली आहेत.त्यातलाच एक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आपल्या पश्चिम घाटात अस्तित्वात आला. पर्यावरण अभ्यासक, नागरिक, राजकीय व्यक्ती, प्रशासन, प्रसार माध्यमं यात याबाबतीत मत-मतांतरे असणारचं. अशी मत-मतांतरे असलीच पाहिजेत त्याशिवाय प्रश्नाचे अनेक कंगोरे समजणार नाहीत. सर्वांच्या मते पुनर्वसन योग्य प्रकारे झाल्यास, आश्वासनापेक्षा कृती दिसल्यास लोक अशा व्याघ्र प्रकल्पाला विरोध करणार नाहीत अफवांवर, त्यावर होणाऱ्या राजकारणावर लोक विश्वास ठेवणार नाहीत.
सापळा लावा वाघ पकडा, सापळा लावा बिबट्या पकडा... हे म्हणायला सोपं आहे. याचा मात्र दोन ठिकाणच्या अन्नसाखळीवर परिणाम होणार आहे. हा प्राणी जिथून पकडला तिथल्या आणि जिथं सोडणार तिथल्या अन्नसाखळीत होणारी त्याची घुसखोरी परिणाम करुन जाईल.
वाघ आपल्या भारतात असणे,जंगलात असणे ही पर्यावरण दृष्ट्या संपन्नतेचे लक्षण आहे .कांही महत्वाच्या गोष्ट आहेत.
वाघ शेड्यूल एक मधला प्राणी आहे.
व्याघ्र प्रकल्प कोठेही सुरु करता येत नाही.
वाघांचे पुनरुत्पादन कोणत्याही जंगलात होत नसते.
वाघांच्या खाद्याच्या प्रमाणावर त्याचा वंश विस्तार होतो.
अन्नसाखळीतील थोडासा बदल प्रचंड संकट निर्माण करतो.
वणवा, शिकार, तस्करी, लाकूडतोड या घटना वाढल्या की वाघ कमी होतात.
वाघ वाचला पाहिजे यासाठी स्थानिक लोकांचे सहकार्य हवे.
प्रत्येक वाघाचे ठराविक भटकण्याचे क्षेत्र असते.ते कितीही लांबी रुंदीचे असू शकते.
वाघांच्या क्षेत्रात दळणवळण, मानवाचा वावर यामुळे संघर्ष निर्माण होतात.
त्याच्या क्षेत्रात वावरणे धोकादायक असते अशा क्षेत्रातून वाहतूकीस दिवसा व रात्रीही बंदी असावी.
नैसर्गिक पर्यावरणाचा विचार करता वाघ आणि मानव हा संघर्ष नवा नाही. मानव आणि बिबट्याच्या संघर्षाच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत.मानव महत्वाचा की वाघ महत्वाचा ? या प्रश्नाची अनेक उत्तरे आहेत. विचार करणारा कोण ? त्याने कोणत्या घटना पाहिल्यात ? कोणते अनुभव घेतलेत ? काय काम करतो फायदा तोटा कशात मोजतो ? त्या क्षेत्रातले त्याचे ज्ञान किती ? कोणी सांगितलेल्या अफवेवर विश्वास ठेऊन मत मांडतो त्याचा राजकीय पक्ष कोणता? त्याचा नेता कोणता ? नेत्याचे हितसंबंध त्या जंगलात, त्या वनक्षेत्रात किती गुंतलेत ? आर्थिक फायदा राष्ट्राचा होईल का ? या सारखे हजारो प्रश्न त्याच्याशी संबंधीत आहेत.
माणसांना कोठेही वस्ती करु दिली जाते. वाघा बाबत मात्र तसे नाही. स्वतःच्या अडथळ्यावर स्वतःच कशी मात करायची असते हे वाघांना बिबट्यांना ठावूक आहे. मानवी ढवळाढवळ सर्वत्र होत रहाते. त्याचा परिणाम दिर्घकाळ रहातो. वाघांना बिबट्यांना स्वतंत्र अस्तित्व, जागा, खाद्य याची हमी हवी असते, त्याची आवश्यकता असते ती दिल्यास त्याच्या संख्येत वाढ होते. हे १९७२ नंतरच्या प्रोजेक्ट टायगर योजनेद्वारे जगाला दिसून आले आहे. राष्ट्रीय प्राणी वाघाला प्रोजेक्ट टायगर भारताचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. वाघ वैज्ञानिक, आर्थिक, सौंदर्यपुरक, सांस्कृतिक आणि परिसंस्थापुरक घटनेचे ठिकाणाचे चिन्ह आहे. त्याचे अस्तित्व त्या भागाच्या विकासाचा मानबिंदू समजला पाहिजे. इंटरनॅशनल युनियन फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ नेचर अॅन्ड नॅचरल रिसोर्सेस च्या २०२२ च्या आकडेवारी नुसार वाघ बांगलादेश, भूतान, कंबोडिया, चीन, भारत, म्यानमार, नेपाळ, उत्तर कोरीया, जावा, इराण, रशिया, थायलंड, विएतनाम इत्यादी १३ देशात वाघ शिल्लक आहेत. आता त्यातल्या काही वाघांच्या जाती नष्ट झाल्या तर पुन्हा प्रयोग शाळेत, निसर्गातही तयार करता येणार नाहीत. जसा आशियायी चित्ता संपला तसा वाघही संपू नये. आता वाघ महत्वाचा की माणूस तुम्हीच ठरवा.
सन २००८ सालच्या गणने नुसार भारतात सध्या १४११ वाघांचे अस्तित्व दिसले होते.सन २०२२ च्या गणनेनुसार ३१६७ वाघ भारतात प्रत्यक्षात आढळले आहेत . मार्जार कुळातला सर्वात मोठा दादा सदस्य म्हणजे वाघ. कधीकधी वजन ३०० किलो पर्यंतही असू शकते.मादीचे वजन १७० किलोपर्यंत असते. नर वाघाचे कार्यक्षेत्र १०० ते ४०० चौ. कि. मी. विस्तार पावू शकते. वाघांची आयुर्मर्यादा १० ते१५ वर्षापर्यंत आहे. वाघाला आठवड्याला कांही किलो भक्ष लागते रोज शिकार त्याला मिळणार नाही हेही खरे. वाघाने केलेल्या शिकारीत ५ ते १० टक्के यशस्वीता असते. एका रात्रीत २० ते २५ किमी. फिरल्याचेही आढळून आले आहे.कांही वेळा वाघ नरभक्षक बनल्याची उदाहरणे आहेत. मिलन कालावधित अथवा क्षेत्र हक्कासाठी दोन नर वाघांच्या मध्ये आक्रमक लढे होतात.मिलनानंतर वाघिणीचा गर्भावधी १५ आठवड्यांचा असतो. जन्मावेळी पिल्लांचे वजन किलो-दिड किलोचे असते. वाघाची हत्या मांस, रक्त, हाडे, नखे,शेपटी, केस,लिंग, मेंदू व मुख्य म्हणजे कातडीसाठी होते. ज्यांचा वापर औषधासाठी आणि अंधश्रध्देपायी केला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापार तस्करीत वाघाच्या अवयवांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. वाघाची शिकार करण्यासाठी सापळा लावणे, बंदूकीचा वापर,विषारी पदार्थाचा वापर, वाहनांचा वापर वापर माणूस करु लागल्याने त्यांची संख्या घटली. माणसे जनावरे झाली आणि त्यामुळे जंगली जनावरे माणसात आली.
बाली ,कॅस्पीयन आणि जावा प्रजातीचे वाघ जगातून १९७० च्या आगोदर नष्ट झालेत.पांढरा वाघ ही भारताने जगाला दिलेली अत्यंत सुंदर भेट आहे. बिबट्या, वाघ ज्या क्षेत्रात त्याला सुरक्षित करावे ही आपली जबाबदारी मानणे नागरिक, निसर्गप्रेमी व शासकीय अधिकाऱ्यांनी वाघाच्या संरक्षण व संवर्धनासाठी एकत्र आले पाहिजेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे महत्व लवकरात लवकर समजून घेतले पाहिजे. त्या विषयीच्या शंकांना उत्तरे मिळाली पाहिजेत,बिबट्या किंवा वाघ गावात फिरल्याची, जनावरे उचलल्याची अनेक उदाहरणे घडतात. खाद्य नसल्यास गावातील कुत्री, शेळ्या, मेंढ्या, वासरे, मोठी जनावर लहान मुले, शेतात वाकून बसून काम करणारी माणसे, गुराखी याला बळी पडतात. आणि या प्राण्याविषयी गैरसमज पसरतात. वाघ बिबट्या अन्नसाखळीत सर्वोच्य भक्षक आहेत. तसेच अन्न जाळ्यातील त्यांची भूमिका महत्वाची आहे. त्यांची खालावणारी संख्या इतर शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढवेल. त्या शाकाहारी प्राणी शेतपिकाकडे वळू लागतील . ते होणारे नुकसान टाळता न येणारे असेल. वाघ, बिबट्याला माणूस अजूनही घाबरतो. त्यामुळेच जंगले काही प्रमाणात टिकून राहिली आहेत.
भौगोलिकदृष्ट्या भारतात वाघांना संरक्षण देणारी व्याघ्र प्रकल्पातील सहा क्षेत्रे शिवालीक टेकड्या गंगेचे खोरे,मध्यभारत, पूर्वेकडील क्षेत्र,पश्चिमी घाट,ब्रम्हपुत्रेचे खोरे, सुंदरबन (पश्चिम बंगाल) अशी आहेत.
यातील जैवविविधतेने संपन्न असणाऱ्या पश्चिम घाटात आपण रहातो. वाघांचे वाढण्याचे सुरक्षित ठिकाण आपल्या आसपास आहे याचा अभिमान ठेवा. व्याघ्र प्रकल्पामुळे योग्य पुनर्वसन होवून व्याघ्रांचे साम्राज्य निर्माण करण्याच्या योजनेस पाठिंबा द्या.आपली पिल्ले काय किंवा वाघाची पिल्ले काय दोघांनाही जगण्याचा समान हक्क आहे. वाघ हा राष्ट्रीय प्राणी आहे त्याला वाघासारखे जपूया !
डॉ.सुधीर कुंभार .
विज्ञान प्रसारक व पर्यावरण अभ्यासक ,
विद्यानगर ,कराड मो.९४२१२१४१३६
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत