पुस्तक परिक्षण: साहित्याचे निकष विस्तृत करणारे चरित्र “महाउपासिका मीराताई आंबेडकर अर्थात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा दस्ताऐवज.”

–सत्येंद्र तेलतुंबडे, राहुरी
संपर्क क्रमांक -9623808868
कथा, कविता, ललित,कादंबरी, चरित्र आत्मचरित्र इत्यादी वेगवेगळे प्रकार साहित्य क्षेत्रात रूढ आहेत. या प्रत्येक प्रकारात ग्रामीण , दलित ,आदिवासी ,ख्रिस्ती, ऐतिहासिक, सामाजिक ,राजकीय इत्यादी विभागणीही केली जाते. या सगळ्या विभागणीला आधिक विस्तृत करणारे “महाउपासिका मीराताई आंबेडकर अर्थात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा दस्ताऐवज”चरित्र नुकतेच प्रकाशित करण्यात आलेले आहे. रुढ अर्थाने हे चरित्र नाही. चरित्रात जन्म, वंश, वारसा, वैयक्तिक कार्य इत्यादीच्या अतिशयोक्ती पूर्ण नोंदी आढळतात. काही चरित्र जाणीवपूर्वक लिहून घेतलेले दिसतात. त्यातही कौटुंबिक,राजकीय स्वार्थ दडलेला असतो. 1980 – 90 च्या दशकात आत्मचरित्राने मोठा धुमाकूळ घातला होता. आठवणीचे पक्षी, तराळ- अंतराळ, बलुतं, उपरा ,उचल्या आदी दलित-आदिवासी आत्मचरित्रांनी मराठी भाषेचा परीघ विस्तृत केला. सामाजिक जाणिवा सदाशिव पेठेपर्यंत पोहोचवल्या. उपेक्षित ,वंचित असे सांस्कृतिक विश्व जगाच्या वेशीवर या आत्मचरित्रांनी मांडले. या चरित्रांना दलित ,आंबेडकरी ,बौद्ध अशा वेगवेगळ्या चौकटीत कोंबण्याचे प्रयत्न अद्यापही चालू आहेत. महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचे हे चरित्र सर्वार्थाने वेगळे आहे. हे चरित्र एका व्यक्तीच्या जीवनासोबत एका संस्थेच्या वाटचालीचेही चित्र रेखाटते. बौद्ध समूहात या ग्रंथाचे प्रचंड स्वागत झाले. साहित्य विश्वात अद्यापही याची फारशी दखल घेतल्याचे आढळत नाही. आतापर्यंतच्या साहित्य संमेलनाचा अभ्यास करता त्यांच्याकडून विशेष अपेक्षा करण्यातही अर्थ नाही. महात्मा फुले यांनी या ग्रंथकारांकडून घेतलेली फारकत दोनशे वर्षानंतरही टिकून आहे. भारतीय संविधानाने दिलेला लोकशाही जीवन मार्ग वास्तवात उतरलेला नाही. याच अनुषंगाने या ग्रंथाची समीक्षा करणे क्रमप्राप्त ठरते.
मीराताई आंबेडकर या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकुलत्या एक सुनबाई आहेत . बाबासाहेबाचे एकुलते एक पुत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब यांच्या त्या सुविद्य धर्मपत्नी आहेत. त्यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या बाबासाहेब आंबेडकर संस्थापित धार्मिक संस्थेचे सलग 45 वर्षे अध्यक्षपद भूषविले. त्या संदर्भात संपादकीय मध्ये केलेली नोंद महत्वपूर्ण आहे. संपादकीय मंडळ येथे लिहिते,”एका महिलेने एखाद्या धार्मिक संस्थेचे अध्यक्ष पद 45 वर्षे भूषविणे ही जगातील आश्चर्याची घटना असून त्यासाठी आद मीराताई आंबेडकर यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नमूद होणे आवश्यक आहे.” या ग्रंथाचे संपादन एस. के. भंडारे, बी.एच. गायकवाड, ॲड. एस. एस. वानखडे या भारतीय बौद्ध महासभेच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेले आहे. अर्थात ते स्वतःला सातत्याने कार्यकर्ते म्हणून घेतात. मीराताई आंबेडकर यांच्या वाटचालीचे ते प्रत्यक्ष साक्षीदार व सहकारी आहेत. भारतीय बौद्ध महासभा आणि मीराताईंची जीवन यात तफावत करता येत नाही. ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,”माझ्या चरित्रात अर्धेअधिक चरित्र भाऊराव गायकवाड यांचे असेल.” त्याच धर्तीवर मीराताई आंबेडकरांचे चरित्र लिहिताना दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची पाच दशकाची वाटचालीत मीराताई आंबेडकर यांचे चरित्र उलगडत जाते. त्यात विलगपणा करताच येत नाही.
चरित्र लेखकांनी मीराताईंचे बालपण, शिक्षण, जडणघडण, विवाह आदी गोष्टींना स्थान दिले नाही. चरित्रातील पहिल्याच प्रकरणाचे नाव आहे,” मीराताई आंबेडकरांचे महान धम्मकार्य” . चरित्राची सुरुवातच धम्मकार्यापासून केलेली आहे. 1980 च्या वर्षावास प्रवचन मालिकेपासून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे धम्मकार्य गतिमान करा, या 62 मुद्द्यांत मीराताईंचा जीवनपट उलगडत नेला. त्यांची महाराष्ट्रासह भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केलेली धडपड यात चित्रीत होते. जाती अंताची लढाईतील वैधानिक योद्ध्याची चळवळ यातून दिसते. यासाठी आवश्यक मीराताईंच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची झलक लेखकाने दुसऱ्या प्रकरणात स्पष्ट केली. तिसऱ्या प्रकरणात मीराताई जनमानसात रुजवत असलेल्या बहुमोल संदेशांचा मागोवा घेतला.
राजकारणापेक्षा मला धम्म प्रिय असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले. त्याला अनुसरूनच प्रत्यक्ष वाटचालीत “राजकारण विरहित धम्मकार्य करण्याचा ” क्रांतीकारी निर्णय त्या १९८०ला नागपूर येथे झालेल्या बौद्ध महासभेच्या दुसऱ्या आणि त्यांनी घेतलेल्या पहिल्याच राष्ट्रीय अधिवेशनात घेतला. केंद्रीय प्रशिक्षण विभाग, 7 डिसेंबरला नियमित राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, केंद्रीय महिला विभागाची निर्मिती, संस्थेत एकसूत्रीपणा आणण्यासाठी महासभेची कामकाज व नियमांची पुस्तिका प्रकाशित करण्याचे निर्णय त्यांनी घेतले. घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली. याचा सारांश तिसऱ्या प्रकरणात येतो. याची दखल बौद्ध जगत घेते. भिक्खू संघ मीराताईंना महाउपासिका पदवीने गौरवितो. याचा इतिहासही चरित्र ग्रंथात अधोरेखित केला आहे. गांधीजीची महात्मा पदवीही कोणत्याही संघटीत कार्यक्रमात दिल्याची नोंद इतिहासात आढळत नाही. अनेक जण अशा पदव्या स्वयंघोषित स्वीकारतात. या पार्श्वभूमीवर महाउपासिका पदवीचा इतिहास आवर्जून वाचायला मिळतो.
सहाव्या प्रकरणात मीराताई यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय व महत्त्वाची अधिवेशने परिषदा यांचा सारांश दिलेला आहे. यामध्ये अधिवेशनात झालेली ठराव, उद्गाठकीय भाषणे, अध्यक्षीय भाषणे, प्रमुखाची अतिथीची भाषणे, दिलेले पुरस्कार यांच्या नोंदी घेतल्या आहेत. या नोंदीतून भारतीय बौद्ध महासभेची वाटचाल लक्षात येते. सोबत महाराष्ट्र आणि भारतातील तत्कालीन सामाजिक, ऐतिहासिक परिस्थितीचे आकलन होण्यास मदत होते. महासभेने धसास लावलेल्या समस्या, प्रलंबित राहिलेल्या समस्या यांची ही माहिती नवीन कार्यकर्त्याला मिळते. पुस्तकातील दहा प्रकरणातील हे सर्वात मोठे प्रकरण आहे.
आंबेडकर चळवळ समता सैनिक दलाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. समता सैनिक दलाला मीराताईंनी पुन्हा गतिमान केले. सातव्या प्रकरणात समता सैनिक दलाच्या केलेल्या उभारणीचा इतिहास समजतो. या प्रकरणात समता सैनिक दलाची झालेली अधिवेशने माहिती होतात. स्वतंत्र प्रकरण घेऊन समता सैनिक दल आणि मीराताईंच्या चरित्राला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आठव्या प्रकरणात महाउपासिका मीराताई आंबेडकर यांचे 37 पैलू दिले आहेत. नवव्या प्रकरणात ताईंचे संकल्प दिलेले आहेत. हे फक्त संकल्प नाहीत. दुर्लक्षित राहिलेले ऐतिहासिक पवित्र स्थळांची उभारणीही या संकल्पात आहे. जन्मभूमी, स्फूर्तीभूमी ,मातृभूमी, मुक्तीभूमी ,चैत्यभूमी, कर्मभूमी, बुद्धभूमी या सात स्थळांचा केलेला आणि चालू असलेला विकास या प्रकरणात येतो. बुद्धिस्ट सोसायटीने बाबासाहेबांच्या चळवळीला श्रामनेर शिबिर आणि धम्म परिषद यांची जोड देत धम्म कार्याला सातत्य आणि कायमस्वरूपी गती दिलेली आहे. विशेष म्हणजे या सर्व स्थळांचे विकेंद्रीकरण केलेले आहे. तेथील जिल्हा शाखा, राज्य शाखा या शिबिर आणि परिषदाचे आयोजन करतात. त्यांना जबाबदारी सोबत अधिकारही दिल्यामुळे हे धम्मकार्य अव्याहत चालू आहे.
विधी संस्कार पुस्तके, धम्मयान दिनदर्शिका , सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्यावरील ग्रंथ इत्यादी पुस्तके दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ने प्रकाशित केली. डी.डी. कसबे, बी.के अहिरे, एस. के. भंडारे ,बी.एच.गायकवाड,एम.डी. सरोदे आदि कार्यकर्त्यांना ताईंनी लिहिते केले. त्यांची पुस्तके प्रकाशित करण्यास प्रोत्साहित केले.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चा इतिहास या प्रकरणात संस्थेच्या कायदेशीर बाबीची माहिती प्रथमच अधिकृतरित्या प्रकाशित करून कार्यकर्त्याच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला . ही या ग्रंथाची फार मोठी जमेची बाजू आहे. सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरानंतर महाउपासिका मीराताई आंबेडकर यांना साथ दिलेल्या आजी, माजी, जिवंत मृत सहकाऱ्यांची फोटोसह संकीर्ण मध्ये नोंद घेतलेली आहे. मीराताई आंबेडकरांचा जीवनपट तारखेसह दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चा दस्तऐवजही अभ्यासकांसाठी उपलब्ध करतो. ग्रंथ धम्म कार्य करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांना समर्पित केला आहे. ट्रस्टी आणि बुद्धिस्ट सोसायटीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचे प्रकाशकीय मनाला भावून जाते. ग्रंथांमध्ये अनेक छायाचित्रे दिलेली आहेत. मुखपृष्ठावर मीराताईंचा फोटो तर मलपृष्ठावर चैत्यभूमी चा फोटो पुस्तकाचे सौंदर्य वाढवतो.
हा ग्रंथ व्यक्तिगत, ऐतिहासिक,सामाजिक धार्मिक, संघटनात्मक माहितीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. प्रत्येकाच्या हा संग्रही आवश्यक आहे.
ग्रंथाचे नाव :
“महाउपासिका मीराताई आंबेडकर अर्थात दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा दस्तावेज”
लेखक व संपादक-
एस. के. भंडारे,
बी.एच. गायकवाड,
अॅड.एस.एस. वानखडे
प्रकाशक-
डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर ट्रस्टी/राष्ट्रीय कार्याध्यक्ष, दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
पृष्ठे -२८०
किंमत-रु.२००/-
संकलन व संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत