महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

देवाच्या अस्तित्वाबाबत सर्वात स्पष्ट, परखड आणि समर्पक मत मांडणारा फिलॉसॉफर म्हणजे “एपिक्युरस”.

शुभम राऊत

“देव आहे” म्हटलं तरीही अन “देव नाही” म्हटलं तरीही, दोन्ही परिस्थितीत ईश्वरवाद्यांना तोंडावर पाडणारा एपिक्युरस चा पॅराडॉक्स जगप्रसिद्ध आहे.
ह्या पॅराडॉक्स ला चॅलेंज करण्याचे अनेक केविलवाणे प्रयत्न जगभरातील ईश्वरवादी दार्शनिकांनी केले आहेत, परंतु असं करताना ते जे तर्क देतात ते अत्यंत हास्यास्पद आणि बालबुद्धी असतात.
एपिक्युरीअन पॅराडॉक्स मर्मभेदी आहे. अचूक आहे. अभेद्य आहे.

काय आहे एपिक्युरिअन पॅराडॉक्स?

एपिक्युरस ईश्वरवाद्यांना पहिला प्रश्न विचारतो. “DOES EVIL EXIST ?” (ह्या जगात दुष्ट प्रवृत्ती , दुर्दैवी /वाईट गोष्टी अस्तित्वात आहेत का?
ह्या प्रश्नाचं उत्तर “होय” असंच द्यावं लागतं. ते अन्यथा देता येत नाही. तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक तुम्हाला हे मान्य करावंच लागेल कि ह्या जगात दुष्ट प्रवृत्ती आणि दुर्दैवी घटना (खून बलात्कार दरोडा अन्याय अत्याचार इत्यादी) अस्तित्वात आहेच आहे.
आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर “होकारार्थी” दिल्यावर एपिक्युरस दुसरा प्रश्न विचारतो अन इथूनच आता तो आस्तिकांना लपेटायला सुरवात करतो.
दुसरा प्रश्न.. “CAN GOD PREVENT EVIL ?” अर्थात, देव ह्या दुष्टतेला रोखण्यास समर्थ आहे का?
आता ह्या प्रश्नाचं उत्तर “नाही” असं दिलं तर देवाच्या सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह लागतं. देव “सर्वशक्तिमान” नाही हे मान्य करावं लागतं.
पण जर का ह्या प्रश्नाचं उत्तर “होय” असं दिलं तर मग एपिक्युरस तिसरा प्रश्न विचारतो..
“DOES GOD KNOW ABOUT THE EVIL ?” अर्थात, देवाला ह्या दुष्टतेबद्दल संज्ञान आहे का?
आता जर “नाही” म्हटलं तर देव “सर्वज्ञ” आहे ह्यावर प्रश्नचिन्ह लागेल.
आणि जर का “होय” असं उत्तर दिलं तर मग एपिक्युरस चौथा प्रश्न विचारतो…
“DOES GOD WANT TO PREVENT EVIL ?” अर्थात, जगात दुःख नसावं असं देवाला वाटतं का ?
आता “नाही” म्हटलं तर देव दयाळू किंवा प्रेमळ नाही हे मान्य करावं लागेल. आणि जर “हो” म्हटलं तर मग एपिक्युरस पाचवा प्रश्न विचारतो..
“IF GOD WANT TO PREVENT EVIL, THEN WHY IS THERE EVIL ?” अर्थात, दुष्टता /दुःख दूर करण्याची इच्छा देवाची आहे तर मग त्याच्या इच्छेविरुद्धहि दुःख अस्तित्वात का बरं आहे ?
ह्याचं उत्तर देताना आता ईश्वरवाद्यांना चलाखी करावी लागते. ती अशी..
पहिला तर्क ईश्वरवादी देतात तो असा, “दुष्टतेला देव नाही तर सैतान कारणीभूत आहे” पण मग सर्वशक्तिमान ईश्वर सैतानाला नष्ट का करत नाही ? आता परत देवाच्या सर्वशक्तिमान असण्यावर शंका आली.
दुसरी चलाखी केली जाते हा दुसरा तर्क देऊन, “आपली सत्वपरीक्षा घेण्यासाठी देवाने दुष्ट प्रवृत्ती तयार केल्या आहेत” पण मग जर देव सर्वज्ञ आहे तर त्याला आपली परीक्षा घेण्याची गरज काय? त्याला तर सर्व माहीतच असते न ?
तिसरी चलाखी, “दुःख आणि नाकारात्मकतेशिवाय जगाचे अस्तित्व टिकून राहणे शक्य नाही” म्हणजे दुखविरहित जगाची निर्मिती करण्यात देव “असमर्थ” आहे तर ! आणि जर समर्थ आहे तर मग त्यानं दुखविरहित जगाची निर्मिती केली का बरं नाही?
आता इथं ईश्वरवादी कोंडीत सापडतात. कारण आता त्यांना तेच तेच तर्क घुमून फिरून द्यावे लागतील, “देवाची मर्जी”, “सैतान”, “लीला”, “सत्वपरीक्षा” इत्यादी इत्यादी. पण ह्यातला कोणताही तर्क दिला तरी एपिक्युरस म्हणतो कि, देव एकतर अस्तित्वातच नाही. किंवा असेलही तरी तो सर्वशक्तिमान नाही, सर्वज्ञ नाही किंवा सर्वव्यापी नाही. आणि जर का तो सर्वशक्तिमान सर्वज्ञ आणि सर्वव्यापी असूनही ह्या जगातलं दुःख दूर करत नसेल तर मग तो स्वतः दुष्ट असावा.
कोणत्याही परिस्थितीत एपिक्युरसला देवाची भक्ती करणे किंवा त्याला मानणे हे शहाणपणाचे कृत्य वाटत नाही. आणि गरजेचे तर नाहीच नाही.
एपिक्युरस शेवटी म्हणतो, जर देव नसेल तर प्रश्नच मिटला, परंतु तो जर असेलही तरी माझ्यासाठी तो “रिलीव्हन्ट” नाही अन पूजनीय नाही. दूर आकाशात बसून मानवी दुःखांकडे पाहून त्यातून आनंद लुटणारा निष्ठुर देव तुम्हाला लखलाभ असो, मला त्याची गरज नाही असे तो ठामपणे सांगतो.

(शुभम राऊत यांची पोस्ट )

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!