महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

‘अ’ से अधिकार लिखा तो वे भडक गये!


-डॉ.प्रतिभा जाधव ————————————
लहान असताना मला शाळेत कुणी चिडवले वा मारले तर मी रडत घरी यायचे. तेव्हा आमचे दादा म्हणजे वडील म्हणायचे, “तुझी चूक नसेल तर तिथेच समोरच्याला दोन वाजवून घरी यायचे. जाब विचारायचा. लढायला, बोलायला शिक, मी प्रत्येकवेळी तुझ्यासोबत नसेल. घाबरायचे नाही, घाबरलीस की जग बाईला अजून भय दाखवते.” दादा जाऊन आज बावीस वर्षे झाली पण त्यांचे शब्द कायमचे मनावर कोरून ठेवले आहेत. आज जेव्हा भवताल बघते, अनुभवते तेव्हा दादांचे बोल आठवू लागतात आणि कितीही अडचणी आल्या तरी पाय रोवून भक्कमपणे उभे राहायला बल मिळते.
बावीस वर्षांपूर्वीचा काळ आणि आज यात तफावत नक्की आहे ती म्हणजे सर्वच प्रकारची विषमता कमी होण्याऐवजी वाढलेलीच आहे. आपल्याकडे अनेक बाबतीत आजही विषमता आहे आणि दुर्दैवाने ती उघड आणि छुप्या दोन्ही पद्धतीने पाळली जाते. लिंगभेद आणि स्त्रिया हा मोठा प्रश्न आजही आहेच. त्यात पुन्हा हा लिंगभेद आणि किती टोकदार असावा त्याला आणखी इतर परिमाणे बिनदिक्कत लावली जातात उदा. स्त्रीचा जात,धर्म, पंथ, सामाजिक, आर्थिक स्तर इ. व इतरही अनेक. आजही स्त्रियांच्या वाट्याला मानसिकदृष्ट्या विचलित करण्यापासून आयुष्य उद्ध्वस्त करेपर्यंत मजल गाठणारे अनुभव असतात. हे आपल्या पुरुष वर्चस्ववादी व्यवस्थेचे पातक आहे. समाजात, सार्वजनिक ठिकाणी अगदी कार्यालयातही किती सहज स्त्रीची खिल्ली उडवली जाते, कमी लेखले जाते. त्यातच ती जर अल्पसंख्य समूहातील असली, स्वयंसिद्धा असली तर तिची वाट अधिकच खडतर बनत जाते. तिचा वर्ग सांगणारी नजर तिला सतत टोचत राहते. साधारणतः बहुसंख्यांकांनी अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटेल असे वातावरण व भवताल द्यायला हवा पण घडते ते अगदी विपरीत. जात,धर्म,लिंग,प्रदेश, भाषा यांनुसार अल्पसंख्य असणाऱ्यांना अधिकाधिक भयभीत व दपडपणाखाली ठेवण्यात बहुसंख्यांक आसुरी धन्यता मानत असतात हे वास्तव भयंकर आहे तेवढेच वैषम्यपूर्ण! पण वैषम्य वाटावं त्याच बाबीचा उन्मादी गर्व का वाटत असावा बरं ? हे बौद्धिक दारिद्र्य शिक्षित लोकांत तर अलीकडे अधिक दिसून येते आहे.
आपल्याकडे स्त्री-पुरुष समानता, सर्वधर्मभाव,सौजन्यशीलता आणि संवेदनशीलता ही मुल्ये केवळ पुस्तकात, अभ्यासक्रमात वा प्रश्नपत्रिकेत अमुक गुणांसाठी असू शकतात पण अंगभूत व व्यवहारात क्वचित दिसतील. माणसं बेगडी-दांभिक होण्याच्या ह्या काळात ही काय भाबडी, वेडपट अपेक्षा? असे वाटणे स्वाभाविक आहे. ‘लिंगसमानता’ वा ‘महिला सबलीकरण’ ह्या विषयांवर टाळ्या घेणारी भाषणे देणाऱ्या माणसांच्या वर्तनात मात्र त्यांच्या भाषणांचे प्रतिबिंब किंचितही पाहायला मिळत नसते, ‘कथनी अन करणी’ अगदी भिन्न! वास्तव फार वेगळं आणि अस्वस्थ करणारं असतं. ‘महिला सबलीकरण’ हा शब्द तर वापरून वापरून पार गुळगुळीत झालेला आहे. महिला सुरक्षा व सबलीकरण यासाठी अनेक कार्यालये, शाळा, महाविद्यालये उपक्रम, मोहिमा राबविल्याचे ‘ऑन रेकॉर्ड’ दाखवितात पण खरोखर महिला सबल स्वतंत्र व्हावी व सुरक्षित राहावी असे किती लोकांना वाटते? शासनास अहवाल पाठवायचा म्हणून कागदावर महिला सबलीकरण आणि सुरक्षेच्या खोट्या योजना अतिरंजितपणे रेखाटल्या जातात प्रत्यक्षात हेच मुख्याधिकारी महिलांना अपमानित करून दुय्यम लेखतात हे वास्तव बहुसंख्य ठिकाणी दिसते. कामगारांना सतत तणावाखाली ठेवण्यात अनेक मुख्य अधिकाऱ्यांना फार आनंद मिळत असतो, म्हणजे तुम्ही तुमचे काम कितीही प्रामाणिकपणे आणि परिपूर्ण करत असाल तरीही! अनेकदा तुमचे ‘परफेक्टनेस’ हेच त्यांचे अवघड जागेचे दुखणे बनत जाते.
असे अनेकदा ठळक लक्षात येते कि , एखादी स्त्री तिच्या कामात कमकुवत असली तरी चालते पण आपले काम व्यवस्थित करणारी परंतु स्पष्टवक्ती, न्यायप्रिय, प्रामाणिक स्त्री अधिकतर द्वेषाची धनीण होत असते. सुमार बुद्धीचे लोक अधिकाऱ्यांना फार आवडतात कारण त्यांना ना प्रश्न पडत ना ते विरोध करत. ते ‘हो ला हो’ म्हणतात व मग ते अधिकाऱ्यांचे लाडके बनतात. एकूणच काय तर बाईने एक तर सारं सहन करत जगावं अन तक्रार केलीच तर दुप्पट छळवादास सामोरे जायला सज्ज व्हावं. शासनाने महिलांसाठी राबवलेल्या तक्रार निवारण समित्या अनेक कार्यालयात असल्या तरी त्या म्हणजे निव्वळ फार्स आहे असे माझे ठाम मत आहे. यासाठी विविध कार्यालयांमधील तक्रारींच्या संख्या बघता येतील. महिलांच्या भयंकर तक्रारी असल्या तरी वार्षिक अहवाल छानपैकी निरंक जातात. समित्यांचे फलक केवळ दर्शनी भाग सजवण्यासाठी असतात असे म्हंटले तर त्यात वावगे काय? संशोधन व अभ्यास केला तर अनेक कार्यालयात अनेक दडपलेली तक्रार प्रकरणे दिसतील.
कार्यालयीन कामकाज हे समूहकार्य असते व ते प्रभावी होण्यासाठी सर्वांना न्याय्य वातवरण लाभणे हिताचे असते त्याचा परिणाम थेट कामावर होत असतो. पण मानवी वृत्ती-प्रवृत्ती, हितसंबंध आड येतातच. ह्या व्यवस्थेला सुमार बुद्धीचे ‘हो ला हो’ म्हणणारे लोक प्रचंड आवडतात. त्यांच्या लाख चुका पोटातही घेतल्या जातात. आणखी एक महत्वाचे निरीक्षण इथे नोंदवता येईल कि , ‘बाईने केवळ नवीन भाजीची रेसिपी, साड्यांचा रंग पोत, दागिने खरेदी, सासरच्या, कामवालीच्या, एकमेकींची निंदा(चहाड्या) केवळ यावरच बोलले पाहिजे’ अशी मध्ययुगीन धारणा असणारे उच्चशिक्षित लोक आपल्या कार्यालयात आसपास असतात. राजकारण, क्रिकेट, अर्थकारण, तत्वज्ञान, कायदे, अधिकार, फिटनेस, नवीन पुस्तके व त्यांचे वाचन यावर बोलणाऱ्या व खऱ्या अर्थाने सुशिक्षित महिला अनेक अनेक ठिकाणी खपत नाहीत. मुळात अशा महिलांचा अनेक उच्चशिक्षित द्वेषच करतात. त्यांच्या मनात ‘आदर्श भारतीय नारीच’ ठसलेली असते. ज्या केवळ घरगुती तक्रारींचे पाढे वाचत, स्त्री म्हणून सवलती घेतात, नवीन काही शिकत नाहीत, रोज पाट्या टाकतात, लाडे-लाडे बोलत वरिष्ठांना खुश ठेवतात, वरिष्ठ लाख चूक,खोटे आणि भ्रष्ट असले तरी त्यांचेच गोडवे गातात अशाच सोयीच्या महिलांना इतर कार्यालयीन लाभही सहज विनाप्रयत्न मिळत जातात. खमक्या, कर्तव्यदक्ष, गुणवत्ताधारक धडपड्या अडगळीत पडतात, डावलल्या, दुर्लक्षिल्या, वगळल्या जातात. आज स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटूनही अस्तित्व, आत्मसन्मान व न्यायासाठी स्त्रियांना मोठा लढा द्यावा लागणार आहे असे एकूण आजचे चित्र आहे.
सामान्यतः एक चित्र समाजात दिसते कि, तत्वनिष्ठ प्रामाणिक व सरळमार्गी व्यक्तीला शून्य किंमत असते कारण ती ‘निरुपद्रवी’ असते, तिला उपद्रव्य मूल्य नसते. पण याउलट उपद्रव्य मूल्य असणाऱ्या अनैतिक अप्रामाणिक, धूर्त व्यक्तीस उपद्रव्यमूल्य असते त्यामुळे वरिष्ठांना त्यांचे भय वाटत असते. निरुपद्रवी माणूस नेहमी भरडला जातो व लबाडांना प्रतिष्ठा मिळते. याला किंचित क्वचित काही सन्माननीय अपवाद असू शकतात त्यांच्याबद्दल आदर आहेच. इथे मला जसिंता केरकेट्टा कार्यकर्ता कवयित्रीची कविता उद्धृत करणे समर्पक वाटते. ती लिहिते कि,
‘अ’ से अनार लिखा तो उन्होने कहा आह! कितना सुंदर !!
‘आ’से आम लिखा तो उन्होने आम के गुण गाये ,
पर जब अ’ से अधिकार लिखा तो वे भडक गये!
नेमका हा अधिकार नाकारण्याचा विषयच मुळात खोल गंभीर चिंतनाचा आहे. इथल्या मनोधारणांमध्ये अजून खूप परिवर्तन होणे शिल्लक तेवढेच अत्यावश्यक आहे.
-डॉ. प्रतिभा जाधव , नाशिक
pratibhajadhav279@gmail.com
(आज रविवार दि.७ जुलै २०२४ रोजी दैनिक गावकरीच्या रविवार विशेष आस्वाद पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!