महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

संत तुकाराम महाराजांचा वयाच्या 42 व्या इतक्या तरुण वयात मृत्यू कसा झाला ?

एखाद्या व्यक्तीच्या मोठेपणाचे मूल्यमापन करायचे असेल, तर व्यक्ती जगली कशी हे पाहणे जसे महत्त्वाचे असते, तसेच ती व्यक्ती मृत्यूला सामोरी कशी गेली, हे पाहणेही आवश्यक असते. संत तुकारामांना वयाच्या केवळ बेचाळिसाव्या वर्षी गूढ अशा मृत्यूला सामोर जावे लागले.

“अंतकाळीं विठो आम्हांसी पावला |
कुडिसहीत जाला गुप्त तुका” ||

संत तुकाराम महाराज कुडिसहीत गुप्त झाला असं आम्हाला सांगितलं जातं, याचा अर्थ गुप्त होण्याची क्रिया पूर्ण झाली आहे. तुकाराम महाराज जर हे सांगत असतील तर ते गुप्त झाले असं होत नाही. आणि गुप्त झाल्यावर तुकाराम महाराज मी गुप्त झालो असं कसं सांगतील? याचा अर्थ असा होतो की तुकाराम महाराज कुडीसकट गुप्त झाल्यावर त्यांनी हा अभंग लिहिला आहे. असे सांगितले जाते परंतु गुप्त झाल्यावर ते अभंग कसा लिहू शकतील? जितका विचार करावा तितका हा गुंता वाढतच जातो.

अधभक्तांचं एक बरं असतं, ते चिकित्सा न करता जे सांगितलं जातं त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात पण असं करणं, “सत्य असत्यासी मन केले ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमता ।।” म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांच्या खऱ्या वारसांना शक्य होत नाही. ते सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. सत्याचा पाठपुरावा करतात. म्हणून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले या विधानाचा विचार करावा लागतो.

वैकुंठ म्हणजे काय?

वैदिक मान्यता अशी आहे की आयुष्याची दोरी तुटली म्हणजे माणसाचा देह जो मातीचा असतो तो मातीत मिसळतो आणि आत्मा मुक्त होऊन स्वर्गात किंवा नरकात जातो. तिथे आपलं कर्मफळ भोगल्यावर पुन्हा चौऱ्यांशीच्या फेऱ्यात अडकतो. जर पुण्यात्मा असेल तर त्याला मुक्ती मिळते आणि आत्मा परमात्म्यात विलिन होऊन जातो.

पण वास्तविक पाहता वारकरी संप्रदायाने तर स्वर्ग नाकारला आहे तुकाराम महाराज तर स्पष्ट शब्दात सांगतात,
“येथे मिळतो दहीभात |
स्वर्गी ते नाही मात ||”
मेल्यावर स्वर्गात गेलो तरी पुण्य संपल्यावर स्वर्गातून बाहेर ढकलून देतात. असा अशाश्वत स्वर्ग कशाला हवा? असा तुकाराम महाराजांचा प्रश्न आहे.”ब्रह्मादिक पदे दु:खाची शिराणी ।” असल्याने तिथे माझं मन गुंतू देऊ नको असं तुकाराम महाराज सांगतात.

तुकाराम महाराज जसा स्वर्ग नाकारतात तशीच मुक्ती हनी नाकारतात…
“सांडुनी सुखाचा वाटा |
मुक्ती मागे तो करंटा ||”
असं म्हणून तुकाराम महाराज थांबत नाहीत तर
“का रे ना घ्यावा जन्म |
प्रेम लुटावे नाव ||”
असा प्रश्न विचारतात. आम्हाला मुक्तीचं कौतुक नाही, ती तर आमच्या गाठोडिल आहे असं सांगून पुढे जाऊन
“तुका म्हणे आता मज |
न लगे सायुज्जता ||”
इतक्या स्पष्ट शब्दात मुक्ती नको, मोक्ष नको, सायुज्जता नको असं सांगतात. सायुज्जता का नको? कारण एकदा त्या परमात्म्यात विलिन झाल्यावर भक्तीप्रेमसुखाचा अनुभव घेता येत नाही. उलट मी कीर्तनात असा रंग भरीन की स्वर्गस्थ असेल त्याला स्वर्गवास कडू वाटेल आणी जो मुक्त झाला आहे त्याला मुक्ती सोडून पुन्हा जन्म घ्यावा वाटेल. असंख्य अभंगातून तुकाराम महाराज मुक्ती, स्वर्ग, वैकुंठ नाकारतात आणि भक्ती प्रेमरसाचा आनंद घेण्यासाठी आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घाल अशी पांडुरंगाला विनवणी करतात, हे जर सत्य असेल तर मग ते वैकुंठाला जातील कसे?

संत तुकाराम महाराज सांगतात. हे काल जितकं सत्य होतं तितकंच आज सत्य आहे आणि उद्याही ते तितकंच सत्य असेल तुकाराम महाराज जीवनाचा किती सूक्ष्म पातळीवर विचार करतात त्याची झलकच प्रत्येक अभंगातून पहायला मिळते. बाप जसा आपल्या लेकराला पावला पावलावर सावधतेचा इशारा देत असतो तसा हा तुमचा माझा सर्वांचा बाप आपल्या हजारो अभंगातून आपल्याला सतत सावध करत आहे. हे अनुभवाचे बोल आहेत. हे प्रज्ञावंतांचे बोल आहेत. हे एका दृष्ट्याचे बोल आहेत.

ज्याने सर्वसामान्यांविषयी असलेल्या अतिव कळवळ्यापोटी प्राणावर उदार होऊन एका क्रूर वैदिकधर्म व्यवस्थेविरुद्ध एकट्याने निकराने लढा दिला अशा महामानवाचे हे बोल आहे म्हणून आपण ते समजावून घेतले पाहिजेत. नव्या पिढीपर्यंत पोचवले पाहिजेत. तुकोबारायांनी जो मार्ग प्रकाशित केला त्या मार्गावरुन वाटचाल केली पाहिजे. तुकोबारायांच्या छायेत जो गारठलेला आहे त्यासाठी ऊब आहे. जो तापलेला आहे त्याच्यासाठी शीतलताही आहे. मार्ग चुकलेल्याला दिशादर्शन आहे. भयभीत झालेल्याला आश्वासन आहे. संकटाने घेरलेल्याला संरक्षण आहे. म्हणून हे अभंग घराघरात, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचले पाहिजेत, पोचवले पाहिजेत. तुकाराम महाराजांच्या पितृऋणातून अंशतः मुक्त होण्याचा हाच एक मार्ग आहे………..

धुळवडीच्या दिवशी तुकाराम महाराज आपल्यातून गेले, आपल्याला सोडून गेले. आपण तुकोबांना कायमचं अंतरलं. या दु:खाने धरणी फाटावी इतकं दु:ख त्यांच्या कुटुंबियांना झालं. “शोके मेदीनी फुटो पाहे” अशा शब्दांत ते व्यक्त झालं. हा दिवस सणाचा नाही. आनंदाचा तर मुळीच नाही. हा दु:खाचा दिवस आहे, परमदु:खाचा दिवस आहे. ह्रदयाला यातना देणारा दिवस आहे. यादिवशी आपण गंभीर झालं पाहिजे. तुकाराम महाराजांनी हयातभर आपल्यासाठी जो संघर्ष केला, जो छळ सोसला, ज्या यातना सहन केल्या, त्यांचं स्मरण करुन तुकाराम महाराजांना आदरांजली वाहून त्यांचा विचार सर्वदूर पसरवण्याचा, त्याचं अपूर्ण कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी संकल्पबद्ध होण्याचा, त्याचं अधुरं स्वप्न साकार करण्याची प्रतिज्ञा करण्याचा हा दिवस आहे. तुकोबांच्या वारसांना ज्या क्षणी याचं भान येईल तो क्षण म्हणजे परिवर्तनाची सुरुवात असेल…

डॉ आ ह साळुंखे “विद्रोही तुकाराम” पुस्तकातील “परिशिष्ट” मध्ये आपले मनोगत व्यक्त करताना सांगतात की !!

तुकाराम सदेह स्वर्गाला गेले असल्यामुळे मृत्यू नंतर केले जाणारे विधी त्याच्यासाठी करण्याचा प्रश्न नाही, त्यांचे आशौच वा सुतक पाळण्याची गरज नाही, असे रामेश्वरभटांनी कान्होबांना सांगितले, असे म्हणतात.
पण रामेश्वरभटांच्या डोक्यात काही वेगळा विचार,धर्मशास्त्रांचे काही वेगळे नियम असण्याची शक्यता आहे, असे मला वाटते.

गौतमधर्म- सूत्रामध्ये आलेला एक नियम (२.५.८) गो’ब्राम्हणहतानामन्वक्षम’ असा आहे. अर्थात ‘गाय आणि ब्राह्मण यांनी ज्याला मारले असेल, त्याच्या नातेवाईकांचे सुतक त्याच्या मृत्यू नंतर ताबोडतोब फिटते’, असा या सूत्राचा अर्थ आहे.
यानंतरच्या एका सूत्रावर (२.५.११) टीका लिहिताना हरदत्त नावाच्या लेखकाने मिताक्षरा नावाच्या वृत्तीमध्ये ब्रम्हपुराणातील पुढिल श्लोक उद्धृत केले आहेत.

ब्रम्हदण्डहताये च ये चैव ब्राह्मणैर्हताः।
महापातकिनो ये च पतितास्ते प्रकीर्तिताः।।
पतितानां न दाहःस्यान्न च स्यादस्थिसंचय।
न चाश्रूपाताः पिण्डो वा कार्या श्राद्धक्रिया न च।।

या श्लोकाचा अर्थ असा …..

जे ब्राह्मणांच्या काठीने मारले गेले असतील, ज्यांची ब्राह्मणा कडून हत्या झालेली असेल आणि जे महापातकी असतील ते पतित म्हटले जातात. अशा पतित लोकांचे दहन करू नये. त्याचा अस्थिसंचय करू नये.(म्हणजे तिसर्या दिवशी त्याच्या अस्थी गोळा करून त्याचे विसर्जन करण्याचा विधी करू नये) त्याच्यासाठी आश्रू ढाळू नयेत. त्यांना पिंड अर्पण करू नये वा त्यांच्यासाठी श्राद्धक्रियाही करू नये.

ब्राह्मणांनी ज्याची हत्या केली असेल, त्याच्या नातेवाईकांनी त्याच्यासाठी अश्रू ढाळायचे नाही, मग त्याच्यासाठी धार्मिक विधी करण्याचा तर प्रश्नच उदभवत नाही, असे सांगणार्या या नियमाच्या क्रूरपणावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. ब्राह्मणाचे वैर ओढवून घेणार्या माणसाच्या नातेवाईकांनी त्याच्या जिवंतपणीही आणि मृत्यू नंतरही त्याच्या बरोबरीचे आपले रक्ताचे नातेही नाकारावे,
असे हा नियम सुचवितो.

रामेश्वरभटांनी तुकारामांच्या मृत्यूनंतर त्याच्यासाठी काही ही विधी करू नये, असे कान्होबाला सांगितले, तेव्हा भटाचे शब्द कोणतेही असोत, रामेश्वरभटांच्या मनात मात्र धर्मशास्त्राचा हा नियम असण्याची शक्यता आहे असे दिसते.

संत तुकारामांबद्दलचा आदरभाव, श्रद्धा, भक्ती म्हणून आपण त्यांच्या खुनाला वैकुंठगमन म्हणायचं का? आणि त्यांचा खून करणार्‍या पाप्यांना शुद्धीपत्र बहाल करायचं का?

संत तुकारामांसाठी वैकुंठाहून विमान येते आणि त्यांना घेऊन जाते. ही घटना आपल्याला आजही खरी वाटत असेल तर आपल्याइतके मूर्ख आपणच असेच म्हणावे लागेल.


पंढरपूराला विठ्ठलाच्या वारीत पायी चालत जणार्या वेगवेगळ्या दिंड्या आणि पालख्यांची मुळ पंरपरा व उद्देश काय होता? …..

पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या परंपरेचे मुळ स्वरुप नेमके काय होते, हे समजून घ्यायचे असेल तर त्या परंपरांच्या चालीरीती, वैचारिक दृष्टीकोन, बौद्धिक तत्वज्ञानाचे साम्य शोधने महत्त्वाचे आहे
कारण,
ज्या बहुजन समाजाचा शिक्षणाचा मूलभूत अधिकार वैदिकांनी नाकारला होता तो बहुसंख्याक समाज चालीरीतीच्या माध्यमातून, परंपरेच्या माध्यमातून एका पिढी कडून दुसर्या पिढिला हा वारसा शाब्दिक, मौखीक किंवा कृतीतून देत असतो. उदा. दसरा-दिवाळी च्या दिवशी बहिण-भावाला ओवाळताना म्हणते…
ईडा पिडा जाओ | बळी चे राज्य येवो || अर्थात बळी राजा जो तुमचा-आमचा आदर्श महापूरूष त्याचे सुखी आणि आनंदी राज्य पुन्हा यावं… अशी आशा अपेक्षा व्यक्त करते.

म्हणूनच आपण वारीतिल पायी दिंड्याची हि परंपरा, हे संस्कार आणि संस्कृतीचे तर्क संगत आणि तटस्थपणे साम्य शोधन्याचा प्रयत्न करणार आहोत…..

वारीचा उद्देश …

वारकरी संप्रदायाने सांसारीक व्यवहार करत असताना अर्थात कुटूंब जवाबदारी, परिवाराच्या बांधिलकीचा स्विकार करून प्रपंच व परमार्थ यात समन्वय साधला पाहिजे. जेने करून वारकर्याच्या माध्यमातून लोकांमध्ये समाजिक नितीमत्तेला पोषक असे वातावरण निर्माण होईल हाच उद्देश “वारी”चा आहे आणि त्या करिता संतानी दिंडीच्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रबोधनाचे प्रचार आणि प्रसाराचे “वारी” प्रभावी मानवी सनसाधन निर्माण केले. दरवर्षी अठरापगड जातीतला बहुजन एकत्रित करून स्त्री व शूद्रांना बरोबरीने घेऊन पंढरपूरच्या मार्गावर जाणार्या पालख्या, दिंड्या समता आणि समानतेचे प्रतिक आहेत कारण दिंड्या, पालख्या मधला वारकरी समस्त समाजाला एक शिकवण देतो की,
एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्ती बरोबर कसे आचरण करावे हे आचरण म्हणजे *” सम्यक मानूसकी” आहे.
सम्यक मानुसकी अर्थात “निकोप संबंध” होय.
निकोप संबंध म्हणजे—–
तुमच्या पेक्षा ज्यांच्या कडे जास्त आहे त्याची निंदा न करणे.
ज्यांच्या कडे तुमच्या पेक्षा कमी आहे त्याचा अपमान न करणे.
ज्याचा कडे तुमच्या सारखे समान आहे त्याच्याशी स्पर्धा न करणे.
हा आहे “निकोप संबंध” असे म्हणतात.

एक साम्य दिंड्या …संतांची वारी आणि चारिका ………..

‘चारिका’ अर्थात चालत रहा !!! हा शब्द बुद्धांच्या धम्माशी संबधित आहे. तथागत बुद्धांच्या काळात त्यांच्या धम्माचा ‘भिक्खू संघ’ “चारिका” अर्थात चालत रहा !!! करीत असत. आजही बुद्धांच्या संघातील भिख्खू संघाची ही परंपरा आहे कारण बुद्ध आपल्या संघातील भिक्खू यांना सांगतात की,

चरिक भिक्खवे चरिक् |
बहुजन हिताय बहुजन सुखाय ||
लोकानुकंपाय …
देखेथ भिक्खवे धम्म् |
आदि कल्याण .. मज्जे कल्याण … परियोसन कल्याण् || ……..
—————-तथागत बुद्ध

बुद्ध आपल्या अनुयायांना आदेश देतात की, समस्त मानवाच्या कल्याणाकरीता गावोगावी फिरत रहा. लोकांना धम्म सांगून लोकांचे कल्याण कसे होईल ते पहा जे अज्ञानामध्ये असतील तर त्यांना चार आर्यसत्ये सांगून त्यांचेवर अनुकंपा करा.
(चार आर्यसत्य Four Noble Truth
१. जगात दुखः आहे.
२. दुखाःचे कारण आहे.
३. दुखाःचे निवारण आहे.
४. दुखाःच्या निवारणावर उपाय आहे.

तथागत बुद्धांच्या धम्म सुरवातीला, मधोमध आणि शेवटी देखील लोकांचे कल्याण कराणारा आहे. तेव्हा भिक्खू हो !! एकाच वाटेने दोघांनी जावून नका, दहाही दिशेला धम्म सांगण्यासाठी फिरत रहा.
जास्तीत जास्त लोकांना धम्म पालनासाठी प्रवृत्त करा. जेणेकरुन लोकांचे कल्याण होईल त्यांना दु:क्खमुक्ती मिळेल. त्यांना निर्वाणाचा साक्षात्कार होईल. याच उपदेशाचा भाग म्हणून चारिकाची अर्थात वारी ही परंपरा तथागतांच्या काळापासूनच सुरु झाली आहे. दुखः मुक्तीच्या प्रसारासाठी सुरु केलेली जगाच्या मानवी इतिहासातील बहुधा पहिली अराजकिय “संघचारिका” म्हटली पाहिजे …..

वारकर्यांची दिंडी किंवा वारी हे बौद्ध भिख्खूच्या “चारिकेचे” दुसरे रूप आहे.

तथागतांची ही ‘चारिका’ सारिपुत्ता सारख्या वरिष्ठ बौद्ध भिख्खूंच्या नेतृत्वाखाली निघत असे. या चारिकेत सामील झालेले भिख्खू पायी चालत असत. वाटेत जागोजागी लोक त्यांचे भोजन, निवासाची व्यवस्था करीत असत. त्या काळातील चारिके कडे उत्कट आशा श्रद्धेच्या भावनेने पाहिले जात होते. संतांच्या दिंड्या देखील याच चारिकेच्या स्वरूपाच्या आहेत वारकर्याची जातपात न पाहता त्यांना भोजन देणं हा जसा वारीच्या श्रद्धेचा भाग आहे तसेच वारकरी संप्रदाय जाती पाळत नाहीत तेंव्हा तुम्ही ही जातीभेद पाळू नका हा संदेश दिंडीकडे पाहिल्या नंतर आपल्या ध्यानात येवू शकतो.

पुण्यातील आळंदी व देहूगाव हे संत परंपरेतील महत्वाची गावे आहेत. देहू व आळंदी येथून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संत ज्ञानदेव यांच्या पादुकांच्या पालख्या पायी निघून त्या पंढरपूर येथे जातात. ह्या दोन पालख्या एक संत ज्ञानदेव आळंदीची पालखी आणि दुसरी संत तुकाराम देहूची पालखी या दोन पालख्यांचा इतिहासातील तपशील पाहता एकोणीसाव्या शतकाच्या सुरूवातीला पेशवाई संपुष्टात आली होती वारकरी संप्रदाय हा बहुजनांचा संप्रदाय असल्याने आणि त्यात ब्राह्मणांची मातब्बरी नसल्याने पेशवाईत वारकर्या कडे पुरेशा सहानुभूतीने पाहिले न जाणे हे स्वाभाविक होते.

एक इतिहासकार ज्यांना इतिहासिचार्य पदविने गौरव केला जातो ते राजवाडे यांनी भारतीय संशोधक मंडळात एका पुस्तकाचा उल्लेख केला आहे. पुस्तकाचे नांव आहे “देहुकर तुकारामाची ब्राह्मणात किंमत” त्या पुस्तकामध्ये पेशव्यांच्या श्रीवरधनात किर्तन करणार्या वारकर्यास संत तुकारामाचा अंभंग म्हटला म्हणून स्थानिक ब्राह्मण भटाने वाळीत टाकल्याचा उल्लेख आहे तसेच एकोणीसाव्या शतकाच्या मध्यावर देखील वैदिक ब्राह्मणी विद्वानांनी जाणीवपूर्वक, हेतूपुरस्कर वारकरी संप्रदायाच्या कार्याला दुर्लक्षित केलेले दिसून येते. असं स्वतः इतिहासकार राजवाडे वरील पुस्तकात लिहितात.

तुकाराम हनमंत पिंजण या संत तुकोबांच्या वंशजांचे नातेवाईक असलेल्या अभ्यासकाचे याबद्दलचे टीपण अतिशय मौलिक आहे. ते म्हणतात, त्याकाळात महात्मा जोतीराव फुले आणि त्यांचे सगळे सहकारी संत कबीर यांच्या ‘बिजक’ या ग्रंथाचे जाहीर वाचन करीत असत आणि त्यावर चर्चा व चिंतन-मंथन होत असे महान बौद्ध दार्शनिक अश्वघोष यांनी लिहिलेल्या “वज्रसुची” या ग्रंथावरचा सत्यशोधक तुकाराम तात्या पडवळ यांचा “जातीभेद विवेकसार” हा ग्रंथ १८६५ साली महात्मा जोतीराव फुले यांनी प्रकाशित केलेला होता. तुकोबांच्या साहित्याने तर जोतीराव फुले भारावलेलेच होते. अशा परिस्थितीत महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक समाज निर्मितीमागे संत चळवळीच्या योगदानाचा अतिशय गडद प्रभाव असणं स्वाभाविक होतं

सत्यशोधक समाजातले सगळे प्रमुख सहकारी हे वारकरी कुटुंबातून आलेले होते. सत्यशोधक समाजाच्या पहिल्या काही वर्षांचे अहवाल आपण जर नजरेखालून घातले तर आपल्याला कळेल की त्यातले ९० टक्क्यांहून अधिक साथीदार हे वारकरी होते.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी काळानुरूप वारकरी संप्रदायाच्या कार्याची दखल घेतली. म. फुले यांना बहुजनांच्या संताची समतामुलक विचारधारा आणि वारकरी संप्रदायाचा वारकरी , सामाजिक परिवर्तनाची प्रभावी ताकद बनुशकते हे जाणून घेतले. सत्यशोधक अंदोलना मध्ये सुरवातीच्या काळात म. फुले यांना जे अनुयायी मिळाले ते वारकर्याच्या प्रभाव क्षेत्रातील आणि परंपरेचे वारकरी कुटुंबामधून मिळाले.

म. ज्योतिराव फुले यांच्या काव्यरचने मध्ये संताच्या शैलीचा बराचसा प्रभाव जानवतो म. जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक अंदोलना मध्ये संताचे अंभंग, गाथा बहुजनांना मध्ये जागृती आणि जाग्रणात कलेला उपयोग आणि प्रयोग म. ज्योतिराव फुले यांच्या समग्र वाड्मयात वाचायला मिळतात.

मित्र हो !!!

पंढरीच्या वारीच्या दिंड्या आणि त्यामध्ये सहभागी होणारा वारकरी हा बहुजनांचे प्रतिनिधित्व करणारा आहे कारण हा वारीकरी जातीव्यवस्थेत तळागाळातला आहे जर हा वारीकरी तळागळातला आहे तर तो निश्चितच वैदिक धार्मिक व्यवस्थेचा बळी आहे कारण तो जातीव्यवस्थेत खालच्या थराला आहे आणि जर तो खालच्या थराला आहे तर तो मनुवादि जातीव्यवस्थेचा बळी आहे. जर तो जातीव्यवस्थेचा बळी आहे तर तो दु:खी आहे, कष्टी आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे उचनिचतेच्या ह्या जातीय वेदना, दुखः, कष्ट, एकसारख्या नाहीत कारण मनुवाद्याची ही जाती व्यवस्था एक उतरंड आहे अर्थात जाती जाती मध्ये असमानता आहे. वास्तविक पाहता जातीव्यवस्थेचा निर्माण करता वैदिक ब्राह्मण आहे म्हणजे समस्त बहुजनांच्या दुखः, कष्ट, वेदनांचा निर्माता जर ब्राह्मण आहे तर बहुजनांने संगठित होऊन जातीव्यवस्थेचा विरोध करायला पाहिजे परंतु चित्र मात्र उलट आहे इथं बहुजनांचे काही महाभाग जाती व्यवस्थेचे समर्थन करतात आणि विशेष म्हणजे ब्राह्मणाच्या बाजूने आपल्याच जाती बांधवावर वैचारिक आणि शारीरिक हल्ले करतात

वैदिकब्राम्हणी धार्मिक दहशतवादाच्या विरोधात आमच्या बहुजनांची वैचारिक लढाई तथागत बुद्धांच्या “चारिके” पासून ते संतांच्या “वारी” पर्यंत तुमच्या आमच्या वेदनेचा सहवेदनेचा तसेच सहकार्यशील संवदनशील “समातामुलक समाज” निर्माण करण्याचा संघर्ष चालू आहे.

परंतु जेव्हा स्पृश्य जातीतले संत आणि अस्पृश्य जातीतले संत यांच्या पालख्यांमध्ये अंतर राखन्या साठी घोडे घालण्यात येतात तेंव्हा शेकडो वर्षांपासून समतेचा जागर करणाऱ्या संतांच्या वारीतच अस्पृश्य संतांच्या पालख्यांनाही दुजाभावाची वागणूक मिळते तेव्हा नाईलाजाने म्हणावं लागेल की, संताचे सत्य विचार बहुजन समाजापर्यंत पोहचलेच नाहीत त्याचा स्पष्ट परिणाम आजही वारी मध्ये पहायला मिळतो.
माणसामाणसात भेद करणारे, जातीवाद मानणाऱ्यांनी दिंडीतल्या वारकऱ्यात घुसखोरी करुन वारकरी चळवळ संत विचारांपासून भरकटवली जातं आहे म्हणून सच्च्या वारकऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करुन या संतद्रोह्यांना उघडं पाडून, त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे…….

आजही वारकरी संप्रदायात काही कीर्तनकार, प्रवचनकार असे आहेत की ते ज्ञानबा-तुकोबांचं नाव घेतात, माऊलीचं पसायदान गातात, चराचरात परमेश्वर भरला आहे सांगतात आणि कीर्तनातून धर्मांधतेचा, परधर्मद्वेषाचा प्रचार करतात याचा अर्थ या लोकांना संतांचा विचार, संतांची शिकवण समजलीच नाही. त्यांनी ज्ञानेश्वरी तोंडपाठ केली असली, संपूर्ण गाथा त्यांचा तोंडपाठ असेल, कुठला अभंग कोणत्या पानावर आहे तेही ते क्षणात सांगू शकत असतील, पण तुकोबारायांचा “अवघी एकाचि च विण ।” ही शिकवण जर त्यांच्या ,डोक्यात शिरली नसेल, त्यांच्या वागण्याबोलण्यातून या शिकवणूकीचा प्रत्यय येत नसेल तर ते तुकाराम महाराजांच्या शब्दात ओझ्याचे गाढव आहेत, ओझ्याचे बैल आहेत, ओझेवाहक ऊँट आहेत.

आजकाल काही कीर्तनकार माऊलीचं, तुकाराम महाराजांचं नाव घेतात आणि खुशाल जातीद्वेष, धर्मद्वेष पसरवतात. हा माऊलीचा, तुकाराम महाराजांचा, नामदेव महाराजांचा अपमान आहे. त्यांचीच नावं घेऊन त्यांच्याच नावाखाली त्यांनी जे विचार मांडले त्याच्या विरुद्ध विचार जे कीर्तनातून मांडतात ते तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं तर मातागमनी आहेत. अशा लबाडांना, दुष्टांना, मूर्खांना वारकरी धर्मात स्थान नाही. हे अस्तनीतले निखारे आहेत. ते वेळीच झटकून टाकले पाहिजेत…….

पंढरपूर- वारीच्या ह्या संपूर्ण वैचारिक प्रवासात आपण पुढे जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत की……..

○ पंढरपूरचा विठ्ठल कोण आहे?
संतांच्या अभंग गाथेत कोणत्या महामानवाची प्रेरणादायी वाणी आहे?

○ संतांच्या करणी आणि कथणी मध्ये ह्या आदर्श महामानवाच्या विचारधारेचे “वैचारिक साम्य” आहे का?

○ संत संप्रदाय ज्या महामानवाचा उल्लेख आपल्या अंभग गाथेतून करतात त्या महामानवाचे प्रत्यक्ष पुरावे आहेत का?

○ ज्या महामानवाने “वैदिकांच्या ब्राह्मणी धार्मिक” दहशतवादा विरूध्द बहुजनांचा मानवी हक्काच्या स्वातंत्र्या करिता ” संघर्ष ” केला आणि वैदिकावर या महामानवाने महानक्रांती केली तो अनुकरणीय आणि अनुसरणीय महामानव संतांच्या अभंग काव्यात, वाणीच्या गाथेत ज्याचे साक्षीदार आहेत ते आपण वैचारिक वारीच्या पुढील प्रवासात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत…..
•••••••••••••••••••••••••••
#mn_sonawane_pune
•••••••••••••••••••••••••••

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!