सत्यशोधक विचारधारा :खणखणीत सत्यशोधकाशी गुळमुळीत सत्य प्रयोगींना जोडण्याचा प्रयत्न
डॉ. अनंत दा. राऊत
‘सत्यशोधक विचारधारा’ हे शिवाजी राऊत यांचे पुस्तक अलिकडेच प्रसिद्ध झाले आहे. शिवाजी राऊत यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण अशी कामगिरी केलेली आहे. ते परिवर्तनवादी प्रबोधन चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातूनही त्यांनी समाजप्रबोधन केलेले आहे. महात्मा जोतीराव फुले यांचे क्रांतिकारी विचार व्यवस्थितपणे आत्मसात करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. यात त्यांनी सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांच्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधातील बौद्धिक संघर्षाचीही नोंद केली आहे. ‘सत्यशोधक म्हणजे निर्भयता. सत्यशोधक म्हणजे आव्हान देणे. सत्यशोधक म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेला न जुमानणे. सत्यशोधक म्हणजे समोरासमोर विचाराचा प्रतिवाद करण्याचे धाडस अंगी असणे’ अशी अनेक प्रकारची विधाने ते सत्यशोधक समाजासंदर्भात करत जातात. शिवाजी राऊत यांनी आपल्या या पुस्तकात महात्मा गांधी यांच्या विचारधारेचाही सत्यशोधक विचारधारेत समावेश करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यांची ही भूमिका खूप मोठ्या चिकित्सेस पात्र आहे.
भारतातील ऐतखाऊ दांभिकांनी धर्म नावाच्या प्रतिष्ठित संकल्पनेत कर्मकांडी असत्याचा विषारी भुस्सा भरला. या भुश्श्याच्या सहाय्याने कष्टकरी लोकांना सत्यापासून खूप दूर नेले. आणि त्यांचे पिढ्यानपिढ्या शोषण करत त्यांचे मानवी हक्क हिरावून घेतले. म्हणूनच महात्मा जोतीराव फुले या आभाळकाळजी माणसाला असत्य धर्माचे स्तोम असहाय्य झाले. त्यांनी भारताला सत्यशोधनाच्या, सत्य प्रस्थापनेच्या समतावादी व बुद्धिवादी दिशा दिल्या. त्यांच्या हयातीनंतरही सत्यशोधक समाजातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सत्यशोधक विचारधारा जनमानसात रुजवण्यासाठीचे खूप मोठे प्रयत्न केले. परंतु सत्यशोधक विचारधारा भारतीय जनमानसात पुरेशा प्रमाणात रुजू शकली नाही. असत्याचे स्तोम माजवून ऐते खाणाऱ्या धूर्तजणांची शोषणखेळी भारतात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या धुर्तांच्या काव्यांना लोक सातत्याने बळी पडतात. वर्तमानातही लोकांचे अशा प्रकारे धूर्त काव्यांना बळी पडणे सुरूच आहे. अशा अवस्थेत सत्यशोधकी विचारधारेची पुन्हा एकदा गंभीर अशी चिंतनशील उजळणी करणे गरजेचे होते. ही गरज ओळखून शिवाजी राऊत यांनी 'सत्यशोधक विचारधारा' या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे लेखन केले आहे.
शिवाजी राऊत यांचे हे पुस्तक महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारधारेचा केवळ परिचय करून देत नाही, तर या विचारधारेची वर्तमानाशी सांधेजोड करत वर्तमानाबद्दल मूल्यवान असे चिंतनशील भाष्य करते. हे पुस्तक महात्मा फुले यांच्या विचारातील क्रांतिकारकता स्पष्ट करते. स्वतःला सत्यशोधक म्हणवून घेणाऱ्यांमधील अनेकांना प्रखर बुद्धिवादी अशी सत्यशोधक विचारधारा अजूनही कशी आचरणात आणता येत नाही, या वास्तवाची नोंद करते. उदाहरणार्थ ‘ब्राह्मणेतर समाज ब्राह्मणी प्रभुत्वापासून दूर झाला नाही. ब्राह्मणी गुलामी मानसिकतेमधून मुक्त झाला नाही. ब्राह्मणी श्रद्धेच्या धर्मजंजाळातून अर्थातच भयाच्या उपासना मार्गातून बहुजन मुक्त झाला नाही. तो पुन:पुन्हा ईश्वर व प्रतीके यांची पूजाअर्चा करण्यात व्यस्त राहतो आहे. तो विचारविहीन श्रद्धेचा गूढ मार्ग चालत राहतो आहे. त्यामुळे विचार व तर्क विचार व दुःख शोध, विचार व कारण प्रयत्न या सत्यशोधकी वर्तनाच्या पुढील गुणवैशिष्ट्यांकडे व लाभाकडे आजचा सत्यशोधक पोहोचत नाही. सनातन विचार श्रद्धेचे ओझे आणि ईश्वरवादाचे भय बाळगून वाटचाल करणारा, फुल्यांचा सार्वजनिक सत्य धर्माचा नामगजर करणारा, फुल्यांचे नामसंकीर्तन करणारा फुल्यांना क्रांतिकारक ठरवणारा आणि फुल्यांचा ईश्वर विरोध याबद्दल त्यांनी सांगितलेली सत्यशोधकाची कारणे न तपासता विचार न करता वैयक्तिक व सार्वजनिक जीवनात गतानुगतीक धर्म व्यवस्थेला अभिप्रेत असलेले वर्तन करीत आहे.’(पृष्ठ क्र.५२) ही विधाने वर्तमानातील स्वतःला सत्यशोधक म्हणवून घेणाऱ्यांनी प्रखर बुद्धिवादी बनले पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करणारी आहे. प्रस्थापित शोषकांचे विषारी दात आजही कष्टकरी शोषितांना निरनिराळ्या पद्धतीने कसे दंश करतात याची जाणीव हे पुस्तक देते. महात्मा जोतीराव फुले यांनी ज्या भावंडभावी, बुद्धिवादी व समतावादी भूमिकेच्या एकमय लोकांची अपेक्षा व्यक्त केली तसे एकमय लोक निर्माण व्हावेत अशी अपेक्षाही यातून व्यक्त केलेली आहे. २४ मे १८९१ पर्यंत महात्मा फुले यांच्या संघटनेचे नाव सत्यशोधक समाज असे होते. परंतु पुढे त्यात बदल करून सत्य धर्म समाज असे करण्यात आले अशी नोंदही राऊत यांनी या पुस्तकात केली आहे.
हे पुस्तक सत्यशोधक समाजातील सावित्रीबाई फुले यांच्या महत्त्वपूर्ण कार्याची गंभीरपणे नोंद घेते. भारतीय स्त्री शूद्रांवर त्यांचे मानवी हक्क नाकारणारे अमानुष कायदे लादणाऱ्या मनूची सावित्रीबाई फुले यांनी कशी कठोर चिकित्सा केली याची सोदाहरन मांडणी करते. महात्मा फुले यांच्या नंतरच्या सत्यशोधकांचा बुद्धिवादी प्रवास अपूर्ण राहिला असल्याबद्दलची खंत व्यक्त करते. तसेच सत्यशोधकांचा शोषण व्यवस्थेला केला जाणारा विरोध सत्तेत विलीन झाल्याची नोंदही करते. या पुस्तकात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सत्यशोधकी विचारांचाही वेध घेतलेला आहे.
महात्मा गांधी हे भारताच्या राजकीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वात महत्त्वाचे नेते होते. असहकार आणि कायदेभंगाच्या चळवळीतून गांधीजींनी इंग्रज सरकारच्या नाकीनऊ आणले. त्यांनी आपल्या चळवळीला सत्याचा आग्रह धरणारी चळवळ असे म्हटले. सत्य, शांती, अहिंसा, अपरिग्रह इत्यादी महत्त्वाच्या तत्त्वांचा पुरस्कार केला. आधुनिक भारतातील जनमानसात सर्वसमावेशकतेची भूमिका रुजवण्याच्या संदर्भात गांधीजींचे योगदान फार मोठे आहे. काही संघटनांच्याकडून एकांगी धर्मांध भूमिका घेतल्या जात असलेल्या वर्तमान काळात तर गांधीजींची सर्वसमावेशक अशी सहिष्णुतेची भूमिका फारच महत्त्वपूर्ण ठरते. असे असले तरी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारधारेशी गांधीजींच्या विचारधारेला जोडण्याचा प्रयत्न करणे पटणारे नाही.शिवाजी राऊत यांनी सदर पुस्तकात हा प्रयत्न केला आहे. अर्थात हा प्रयत्न संशोधनात्मक स्वरूपाचा नाही. त्यांनी सदर पुस्तकात गांधीजींच्या संदर्भातील सात स्फुट लेख समाविष्ट केले आहेत. स्फुट लेखांना त्यांची एक मर्यादा असते. महात्मा फुले यांची सत्यशोधक विचारधारा आणि गांधीजींची सत्य विषयक भूमिका यात बराच फरक आहे. ‘खरे तर म. गांधी हे महाराष्ट्रदेशी सत्यशोधकांना स्वातंत्र्य लढ्यातील रूपांतरीत करणारे कृतिशील वर्ण वर्चस्व विरोधक ठरतात.’(११०) हे लेखकाचे विधान निर्विवादपणे मान्य करण्यासारखे नाही.गांधीजींचे प्रारंभीच्या काळातील वर्ण व्यवस्थेच्या संदर्भातील विचार कोणत्याही समतावद्याला मान्य होणार नाहीत.अस्पृश्यांसाठीच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या विरोधात गांधीजींनी केलेले आमरण उपोषण ही सर्वात वादग्रस्त ठरलेली गोष्ट आहे. या मुद्द्यावरून गांधी आंबेडकरांच्यामधील संघर्ष शिगेला पोहोचलेला होता. गांधीजींनी बाबासाहेब आंबेडकरांना पुणे करार करण्यास भाग पाडले होते. गांधीजींनी महात्मा फुले यांचा खरा महात्मा म्हणून गौरव केलेला आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जसे निःसंदिग्धपणे महात्मा फुले यांना आपला गुरु मानले तसे काही गांधीजींनी केलेले नाही. त्यांनी गोपाळकृष्ण गोखले यांना आपल्या गुरुस्थानी मानलेले होते. महात्मा फुले यांचा जन्म १८२७ चा तर गांधीजींचा जन्म १८६९ चा.१८९० साली महात्मा फुले यांचे निधन झाले तेव्हा गांधीजी २१ वर्षांचे तरुण होते.शिवाजी राऊत यांनी सदर पुस्तकात महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक विचारधारेसोबत गांधीजींच्या विचारधारेला जोडण्याचा केलेला प्रयत्न सुस्पष्ट तौलनिक मांडणी करणारा नाही.
गांधीजींचा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या संदर्भात व त्यांनी घेतलेल्या अस्पृश्यता वगैरे संदर्भातील सामाजिक प्रश्नांच्या संदर्भात स्वतंत्र विचार नक्कीच होऊ शकतो. परंतु महात्मा जोतीराव फुले यांचा दाभिकांच्या धर्म सत्तेविरुद्ध विद्रोही भूमिका घेणारा कणखर बाणा आणि कुठल्याही धर्माची कठोर चिकित्सा न करणारी गांधीजींची गुळमुळीत भूमिका हे एकत्रित जोडणे योग्य ठरत नाही. महात्मा फुले यांनी ईश्वर संकल्पना नाकारून निर्मिकाची संकल्पना मांडली. ब्राह्मणी वर्चस्वाच्या विरोधात त्यांच्या पुण्यासारख्या राजधानीतच त्यांच्याविरुद्ध दंड थोपटले.
गांधीजी ईश्वर संकल्पना नाकारत नाहीत. कुठल्याही धर्माची कठोर चिकित्सा करत नाहीत. त्यांचे सर्वधर्मसभा घेणे, सर्वधर्म प्रार्थना म्हणणे हे सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी ठीक. परंतु महात्मा जोतीराव फुले जशी कठोरपणे बुद्धीवादी, विज्ञानवादी भूमिका घेतात तशी कुठोर बुद्धिवादी, विज्ञानवादी भूमिका गांधीजींनी घेतलेली दिसत नाही. म्हणून या दोघांच्या विचारधारेला एकच सत्यशोधक विचारधारा मानून एका पुस्तकात बद्ध करणे उचित नाही. महात्मा फुले यांची सत्यशोधक भूमिका खणखणीत स्वरूपाची होती. गांधीजींनी सत्याचे प्रयोग केले. सत्याग्रह केले तरी धर्म क्षेत्रातील दांभिकता आणि शोषणाच्या विरुद्ध महात्मा जोतीराव फुले यांनी जसे प्रहार केले तसे प्रहार करण्यास गांधीजी कधी धजावलेले दिसत नाहीत. त्यांची धर्मविषयक भूमिका नेहमीच गुळमुळीत ‘हेही चांगले तेही चांगले’ असे मानणारी राहिलेली आहे. शिवाजी राऊत या पुस्तकात असे विधान करतात की ‘गांधीजींनी ईश्वराला सत्य मानले नाही. त्यांनी सत्यालाच ईश्वर मानले आणि या सत्याच्या आकलनालाच ईश्वरी साक्षात्कार मानले.’शिवाजी राऊत यांच्या म्हणण्यानुसार असे होते तर गांधीजी प्रार्थना कोणाची करत होते? ‘ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान’ हे कोणाला म्हणत होते? नथुराम गोडसे नावाच्या माथेफिरूने गोळ्या घातल्यानंतर शेवटच्या क्षणी ते ‘हे राम’ म्हणाले ते सत्यालाच की आणखी कोणाला? असे कितीतरी प्रश्न उभे राहतात. गांधीजींच्या मनात सर्वांप्रती असलेला सद्भाव, सहानुभूती हे सारे ठीक आहे. परंतु केवळ सद्भाव आणि सहानुभूती तळस्तरातील पीडितांना स्वाभिमानाने उभे करत नसते. तळसरातील चिंतांची हिरावरी केलेली मानवी हक्क त्यांना परत मिळवून देण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तळसरातील पीडीत माणसांची माणूस असलेली असती ताज्या ग्रुप करावी लागते. हे सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांचे शिषोत्तम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्ध केलेले आहे.
सदर पुस्तकात शिवाजी राऊत महात्मा गांधी यांच्या प्रार्थनेवर, म. गांधी: श्रद्धांजली साहित्य, म.गांधी अपरिग्रह स्पर्धा इत्यादीवर लिहितात. ‘म. गांधी: पंडित रवींद्रनाथ टागोर' या लेखात ‘आज भारतामध्ये हिंदुत्ववादी अंधसेना ही सत्ताधाऱ्यांच्या कृपाकटाक्षाने शस्त्रसेनेमध्ये रुपांतरीत होऊ लागली आहे.दुसऱ्या बाजूला पर्यायी स्वदेशी राष्ट्रवादासाठी काम करू पाहणारी प्रबोधनकारी शांतीसेना ही निर्माण करण्याची सुद्धा गरज कोणास वाटत नाही. ही विपरीत अवस्था आहे.’अशी वर्तमानाबद्दलची खंत व्यक्त करतात. म. गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांनी पर्यायी स्वदेशी राष्ट्रवाद मांडल्याचे सांगतात. ‘हिंदू राष्ट्रवाद हा नवा ब्राह्मण राष्ट्रवादच आहे. दुसऱ्या परिभाषेमध्ये हा क्षत्रियांचा ब्राह्मण प्रयोजित वंशवाद हाच पाया असलेला राष्ट्रवाद हिंदुत्ववादाच्या नावाखाली पुढे आणला जातो आहे. म्हणून हिंदुत्ववाद्यांचे आव्हान हे फार मोठे आहे. पर्यायी स्वदेशीनिष्ठ राष्ट्रवाद यामध्ये न्यायबुद्धी, समतेची कायम दृष्टी, सर्व संस्कृतींबद्दलचा समान आदरभाव सर्वांनी बाळगणे, जीवन जगणे आणि त्याच वेळेला सर्वांच्या प्रती समंजस विवेकी उदार भाव बाळगत अस्तित्वाचा आदर करीत समाज म्हणून विकसित होत राहणे ही पर्यायी स्वदेशी राष्ट्रवादाची मांडणी’(१००) हे स्वदेशी राष्ट्रवादाबद्दलचे शिवाजी राऊत यांचे विवेचन समजून घेण्यासारखे आहे. तसेच ‘स्वतःला हिंदू म्हणवून घेणे, इतरांना हिंदू म्हणण्यास भाग पाडणे आणि कोणतेही निकष नसलेल्या हिंदू व्याख्येमध्ये सक्तीने अनेक जनसंस्कृतींना ठोकून बसवणे हे फार मोठे अत्याचारी षडयंत्र कार्य चालू आहे. हे रोखले पाहिजे. भारतीय लोकशाही राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद, स्वातंत्र्य चळवळीचा भक्तीभाव यातून निर्माण झालेला शांती सद्भावाचा राष्ट्रवाद बहुसंख्यांक हिंदुत्ववाद्यांचा राष्ट्रवाद आणि पर्यायी स्वदेशी राष्ट्रवाद या राष्ट्रवादाच्या शास्त्रशुद्ध संकल्पनांचे मंथनही भारताच्या ज्ञान विश्वातील सततची गोष्ट व्हायला हवी आहे. (पृष्ठ १०१) ही लेखकाची भूमिका चिंतनीय आहे.
सदर पुस्तकात वाक्यरचना, व्यवस्थित मांडणी, लेखन विषयक नियम इत्यादीसंदर्भात बऱ्याच गडबडी झालेल्या आहेत. पुस्तक निर्मिती करताना अशा गडबडी करून चालत नसते. कारण ग्रंथ व्यवहार हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा ज्ञान व्यवहार असतो. हे पुस्तक म्हणजे खणखणीत बुद्धिवादी, विज्ञानवादी सत्यशोधकांशी कठोर धर्मचिकित्सा करू न शकलेल्या सत्यप्रयोगीशी जोडण्याचा केलेला प्रयत्न आहे. हा प्रयत्न काही एक परिवर्तनवादी, समतावादी विचार मांडण्याचा प्रयत्न करतो हे स्वागतार्ह आहे. सदर पुस्तक निर्मितीच्या निमित्ताने शिवाजी राऊत यांनी केलेल्या बौद्धिक कष्टाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.
सत्यशोधक विचारधारा
शिवाजी राऊत
प्रकाशक: रा.ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई/पुणे
पृष्ठ संख्या ११६
किंमत २००/₹
लेखकाचा संपर्क क्र.९४२३०३२२५६
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत