भारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ

मोदींचा हा पराभव लाजिरवाणा का आहे ?

या लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा (२४०) मिळाल्या आहेत तरीही मोदींचा हा लाजिरवाणा पराभव आहे, हे नेमक्या राजकीय संदर्भात लक्षात घेतले पाहिजे.

१. एकट्या भाजपला २४० जागा आणि इंडिया आघाडीला २३३ जागा मिळाल्या, असे भक्त सांगत आहेत. मुळात भाजपला एकटे म्हणणे हा इडी, सीबीआय, इनकम टॅक्स डिपार्टमेंट, न्यायसंस्था, निवडणूक आयोग, गोदी मिडिया या सर्वांचा अवमान आहे. या संस्थांना नेमक्या किती जागा मिळाल्या, हे आपल्याला दिसत नसले तरी त्यांचे भाजपच्या २४० जागांमध्ये अमूल्य योगदान आहे. या अमूल्य योगदानानंतरही मोदींना चारशे सोडा, २७२ सोडा, २५० चा आकडाही गाठता आला नाही.

२. निवडणूक रोखे, पीएम केअर आणि इतर अनेक घोटाळ्यांमधून मिळालेला रग्गड पैसा भाजपकडे होता. मोदींच्या प्रत्येक उमेदवाराकडे असलेली धनशक्ती आणि इंडिया आघाडीकडे असलेली आर्थिक क्षमता याची तुलनाही होऊ शकत नाही. निवडणुकीची समान भूमी नसतानाही इंडिया आघाडीने २३३ आकड्यापर्यंत मजल मारली.

३. मतदानाच्या टक्केवारीच्या भाषेत बोलायचे तर एनडीए आघाडीला मते आहेत ४२.८ टक्के तर इंडिया आघाडीला मते आहेत ४०.६ टक्के. म्हणजे एकूणात या दोन आघाड्य़ांमधला फरक आहे २.२ टक्के इतका. इंडिया आघाडीला मिळालेला हा प्रतिसाद अभूतपूर्व आहे.

४. हिंदुत्वाच्या मूळ मुद्द्यावर भाजप यावेळेस उतरली आणि बालेकिल्ला समजल्या जाणा-या उत्तर प्रदेशमध्ये तोंडावर आपटली. मोदी, योगी आणि अवघी हिंदुत्वाची सेना असतानाही अयोध्येत हरली. राम मंदिराचे राजकारण लोकांनी नाकारले. हिंदुत्वाच्या मुद्द्याला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. प्रभू राम आस्थेचा मुद्दा, राजकीय आखाड्याचा नाही, हे लोकांनी मतदानातून दाखवून दिले.

५. कलम ३७० रद्द केल्याचा डंका पिटूनही मोदींनी काश्मीरच्या तिन्ही जागांवर स्वतःचे उमेदवार उभे करण्याची हिंमत केली नाही. इतर भागातही या मुद्द्यावर भाजपला नॅरेटीव उभा करता आले नाही.

६. एक नव्हे, दोन नव्हे मोदी सरकारचे तब्बल १९ केंद्रीय मंत्री या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. स्वतः मोदीही टपाल मतदानात पिछाडीवर होते. दीड लाखाच्या फरकाने जिंकले खरे पण त्यांच्याहून अधिक मताधिक्याने शिवराजसिंग चौहानांपासून ते राहुल गांधींपर्यंत अनेकजण जिंकले.

७. महाराष्ट्रामध्ये भाजपने दोन पक्ष फोडले. कॉन्ग्रेसच्या अशोक चव्हाणांना सोबत घेतले. फुटलेल्या गटांना मूळ पक्षाचे चिन्ह दिले. मूळ पक्षांच्या चिन्हांसोबत गफलत व्हावी म्हणून अपक्षांना तसेच चिन्ह दिले. एवढे सगळे उपद्व्याप करुन भाजप २३ जागांवरुन आली ९ वर आणि एनडीए ४२ जागांवरुन आली १७ वर. तब्बल २५ जागा एनडीए हारली. महाविकासने विशाल पाटलांसह ३१ जागा मिळवल्या. मोदींनी वीसहून अधिक सभा महाराष्ट्रात घेतल्या. जवळपास सर्वच ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्राने अशी सणसणीत चपराक लगावली. दिल्लीच्या पाशवी ताकदीसमोर शिवरायांचा महाराष्ट्र झुकला नाही.

८. पश्चिम बंगालमध्ये भाजपने कमालीचं ध्रुवीकरण केलं. संदेशखाली प्रकरण गाजवलं. त्यातल्या काही महिलांना धमकावून त्यांच्याकडून खोट्या तक्रारी लिहून घेतल्या. हिंदू-मुस्लिम जमातवादी राजकारणाला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. भाजपच्या सहा जागा कमी झाल्या आणि तृणमूल कॉन्ग्रेसला मात्र २९ जागा मिळाल्या.

९. महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमधल्या शेतकरी वर्गाने मोदींना सुस्पष्ट विरोध केला आहे. महाराष्ट्रातल्या दूध आणि कांदा उत्पादक भागातील भाजप उमेदवारांची अवस्था पहा. राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधल्या शेतक-यांचा रोष पहा. लखीमपूर खेरीमध्ये शेतक-यांना चिरडून टाकणा-या आशीष मिश्रा यांचे मंत्री असलेले वडील अजय मिश्र टेनी पराभूत झाले. ग्रामीण भागातून मोदींना झालेला विरोध लक्षणीय आहे.

१०. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्याकरता राखीव असलेल्या जागांमध्ये भाजपची पिछाडी झाली आहे. संविधान धोक्यात आहे, हा मेसेज या मतदारसंघांमध्ये सुस्पष्टपणे पोहोचला. त्यामुळे २० हून अधिक जागा भाजपला गमवाव्या लागल्या.

थोडक्यात, या निकालाचा अन्वयार्थः मोदींचे गर्वहरण झाले. ‘एक अकेला सब पर भारी’ हा माज या निकालाने उतरवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अवमान भाजप अध्यक्षांनी केला. संघाला गरजेपुरतं वापरण्याची भाषा त्यांनी केली. एनडीए मध्ये असलेल्या २८ पक्षांना मोदी शहांनी गृहीत धरले. त्याचा तोटा त्यांना झाला.
दुसरीकडे, राहुल गांधी यांना आशादायी नेतृत्व म्हणून पाहिले गेले. त्यांच्या जाहीरनाम्यात सकारात्मक बाबी होत्या. इंडिया आघाडीला घवघवीत यश मिळाले. अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार, स्टॅलिन या सगळ्यांनी आपापल्या भागात उत्तम कामगिरी पार पाडली.

मुळात इंडिया आघाडी एकत्र लढत होती. मोदी मात्र स्वतःच्या अहंकारामुळे एकटेच लढत होते. स्वायत्त संस्था, मित्रपक्ष, संघ यांच्या सहकार्याचा उल्लेखही करत नव्हते.

मोदींचा या पराभवामुळे भाजपच्या अंतर्गतही दिलासादायी वातावरण निर्माण झाले आहे कारण मोदी-शहा यांची भाजप घुसमटून टाकणारी आहे, याचा अनुभव भाजप नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी घेतला. वाजपेयींच्या भाजपहून ही भाजप विखारी होत चालल्याचे अनेकांनी खाजगीत कबूल केले आहे.

आता मोदी मजबूर आहेत. मुस्लिमांना आरक्षण देण्याची घोषणा करणा-या चंद्राबाबू नायडूंकडे हात पसरण्याशिवाय त्यांना पर्याय नाही आणि बिहारमध्ये जात जनगणना करणा-या नितीशबाबूंना मनवण्याशिवाय पर्याय नाही. असे मोदी अगतिक झाले आहेत.

मोदींच्या या लाजिरवाण्या पराभवाने मोदी-शहा यांच्या गोटात स्मशानशांतता असली तरी उर्वरित भाजप, इंडिया आघाडी आणि एकूणात जनता खुश आहे. जनतेने असा कौल देऊन भारताची लोकशाही वाचवण्यासाठी आणि ‘आयडिया ऑफ इंडिया’ टिकवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. म्हणूनच ४ जून २०२४ हा दिवस भारताच्या लोकशाहीच्या इतिहासात महत्वाचा ठरेल.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!