जयंतीला धम्माल नाचू या , बाकीचे दिवस बाबासाहेब वाचू या !
अरुण निकम.
9323249487.
सध्याच्या काळात गरीब, श्रीमंत ,अगदी कंगाल माणसाच्या हातात देखील भ्रमणध्वनी दिसतो. त्यातील यू ट्यूब सर्वजण बघतात. असाच मी यू ट्यूब बघत असतांना एका व्हिडिओने माझे लक्ष वेधून घेतले. त्यातील दोन मित्रांचा संवाद खालील प्रमाणे आहे.
पहिला मित्र :. तो झेंडा कुठे मिळतो रे ?
दुसरा मित्र : कोणता रे?
पहिला : अरे, त्यात नाही का अशोक चक्र असते. निळा झेंडा.
दुसरा: कशाला हवाय तो झेंडा ?
पहिला: अरे, आता जयंती आलीय ना, मिरवणुकीत नाचताना फडकवायला नको का?
दुसरा: घरात बाबासाहेबांचा फोटो आहे का?
पहिला: आहे ना. वडिलांनी मोठा फोटो आणून लावलाय. तेच त्याची पूजा वगैरे करतात.
दुसरा: बरं, मला सांग. बाबासाहेब कोण होते? त्यांची तत्त्व काय ? शिक्षण काय होते ? त्यांनी देशासाठी काय केलंय? त्यांनी संविधान कसे लिहिले?
पहिला: ते आता आठवत नाही.
दुसरा: तुला जर मिरवणुकीत झेंडा फडकवताना कुणी हे प्रश्न विचारले तर तू काय सांगशील? एकमेकांच्या खांद्यावर बसुन मिरवण्यापेक्षा त्यांचे विचार मनात साठवून घ्या. जयंती साजरी करा रे, आणि ती धुमधडाक्यात साजरी करा. त्याबद्दल कुणाचेच दुमत नाही. परंतु बाकीच्या दिवसांमध्ये बाबासाहेब वाचून समजून घ्या. त्यांनी दाखवलेल्या मार्गाने पुढे जा. बाबासाहेब इतरांनाही समजून सांगा. त्यांची चळवळ का आणि कशासाठी होती? त्यांचे राष्ट्र प्रेम आणि त्यावरील निष्ठा, त्या प्रती त्यांचे योगदान हे ही सांगायला विसरू नका.
वरील संवादातून बदलत्या काळातील तरुणांची मानसिकता दिसून येते. कालानुरूप जयंतीला भव्यता आली आहे. तो दिवस सर्वजण आनंदात आकंठ बुडून जातात. तसेच. त्यानिमित्त आकर्षक रोषणाई, विविध देखावे, लॉरी, ट्रक, टेम्पोवर विविध प्रकारची आरास केली जाते. त्यात बाबांची आणि तथागतांची तसबीर किंवा मूर्त्या ठेऊन, मिरवणूक काढली जाते. त्यात डि. जे. च्या ठणठणातात तरुण, तरुणी बेधुंद होऊन नाचतात. एकूणच मिरवणुकीत बेधुंद नाचणे हा प्रमुख भाग झाला आहे. जयंती निमित्ताने आंबेडकरी अनुयायांना ऑक्सिजन मिळून त्यांच्यात एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा
निर्माण होते. तुम्ही नाचा, धमाल करा, त्याला कुणाची हरकत असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. खरे तर, त्यातून ओसंडत जाणारा आनंद, उत्साह दिसतो पण त्याचबरोबर ती ऊर्जा पुढील वर्षभर आंबेडकर वाचून आत्मसात करण्यात खर्च करा. तसेच ह्या निमित्ताने आपण जयंती साजरी का करतो ? ह्याचे भान ठेवणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने आपण कार्यक्रमाचे नियोजन करतो का ह्याची काळजी घेतली पाहिजे. जयंती निमित्ताने बाबांचे कार्य, त्यांचा त्याग, विचार, राजकिय चळवळ आणि दिलेला धम्म ह्याचे स्मरण करून त्याची उजळणी करणे अपेक्षित आहे. तसेच त्या निमित्ताने भावी पिढीच्या ज्ञानात किती आणि कशी भर पडेल ह्याचा देखील विचार होणे आवश्यक आहे. परंतु असे होतांना दिसते का? हा प्रश्न प्रत्त्येक अनुयायांनी स्वतःला विचारावा. पुढील दीड महिना जयंती साजरी होणार आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. ह्या काळात आपण त्यांच्या उद्दिष्टांना बळकटी मिळेल असे काय कार्यक्रम, उपक्रम राबवतो ? ह्याचाही अंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक आहे. हे उपदेशाचे डोस नाहीत. तर ते सांगायची अपरिहार्यता निर्माण झाल्यामुळे व्यक्त होणे गरजेचे झाल्यामुळे हे सर्व लिहिणे क्रमप्राप्त झाले आहे.
आपला देश महापुरुषांची खाण असून, त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या कोहिनूर हिर्याने
जन्म घेऊन ह्या देशावर अनंत उपकार केले आहेत. त्यांच्या युगप्रवर्तक कार्याला मानवंदना देण्यासाठी जगातील दीडशे पेक्षा जास्त देशांमध्ये जयंती साजरी केली जाते. विशेष गोष्ट म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची 125 वी जयंती जागतिक संघटना यूनोमध्ये साजरी केली गेली. . अशा प्रकारे युनोमध्ये जयंती साजरी होणारे ते पहिले भारतीय आहेत. ह्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे.
बाबा हयात असतांना
त्यांना मानवंदना देऊन चळवळीचा प्रसार आणि प्रचार अधिक जोमाने होण्यासाठी पुण्यामध्ये सदाशिव रणपिसे ह्यांनी 14/04/1928 ला पहिल्यांदा जयंती साजरी केली. नंतरच्या काळात ती नित्यनियमाने साजरी होऊ लागली. तेव्हा तिचे स्वरुप मर्यादित होते. परंतु ती साजरी करण्यामागे समस्त समाजाला जागृत करून संघर्ष करण्यास प्रोत्साहित करण्याची भूमिका होती. बाबांच्या महापरिनिर्वाणानंतर जसजसा काळ लोटला तसतसे तिचे स्वरुप बदलत गेले. बाबांच्या संघर्ष पर्वाची माहिती भावी पिढीला व्हावी व त्यातून त्यांना स्फूर्ती मिळावी म्हणुन जयंती निमित्त भीमगीते, लोकनाट्य, जलसा, सभा, व्याख्यान आणि परिसंवाद या सारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. त्यामुळे मनोरंजना बरोबर जनजागृती होण्यास मदत झाली.
परंतु गेल्या काही वर्षांमध्ये जयंतीचे स्वरुप पूर्ण बदलून गेले आहे. एक गोष्ट मान्य आहे की, काळाच्या ओघात बदल होणे अपेक्षित आहे. आताच्या इंटरनेटच्या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. दूरदर्शन वरील अनेक वाहिन्या, त्यावरील विविध कार्यक्रम तसेच भ्रमणध्वनीने सर्वांचा ताबा घेतला आहे. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजांमध्ये भ्रमणध्वनीने
जागा पटकावली आहे. इतका लोकांना त्याचा लळा लागला आहे.
माणसाच्या दैनंदिन जीवनात फरक पडला आहे. माणूस संकुचित होऊन मर्यादित विचार आणि आचार करू लागला आहे. गतिमान जिवन आणि जीवघेणी स्पर्धा ह्याच्या गर्तेत तो सापडला आहे. तशात अनेक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे तो काहीसा सुस्त झाला आहे. ह्या बदललेल्या परिस्थितीत जयंती साजरी करण्याची पद्धत ही बदलली आहे.
पूर्वी 13 तारखेच्या रात्री 12 वाजता बाबांना मानवंदना देऊन मिरवणूक निघत असे. तो जल्लोष रात्रभर चाले. लेझीम, लाठीकाठी, ढोलीबाजा, बॅण्ड च्या तालावर नाचणे आणि बाबांच्या नावाचा सातत्याने जयजयकर होई. वेगवेगळ्याने घोषणांनी आसमंत दुमदुमून जाई. परंतु मुंबईतील बॉम्बस्फोटानंतर त्यावर बंदी आणली जाऊन मिरवणूक 14 तारखेला दिवसभरात निघू लागली. त्या निमित्ताने घरावर तोरण, विद्युत रोषणाई केली जाते. एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. विहारांमध्ये धार्मिक विधी केले जातात. खीर वाटप केली जाते. घरात गोड धोड पदार्थ केले जातात. काही लोक नवीन कपडे देखील घेतात. सगळीकडे आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. देखावे तयार केले जातात. सगळीकडे आनंद दुथडी भरून वाहत असतो.
मग प्रश्न पडतो की, फक्त एव्हढ्यासाठी जयंती साजरी करायची का ? ज्या महामानवाने स्वतः उच्च विद्याविभूषित आणि प्रखर बुद्धिमत्ता असतांना, तहहयात वैयक्तिक सुखाचा त्याग करून, वर्षानुवर्षे जातीयतेच्या गर्तेत पिचलेल्या बहिष्कृतांना माणूस असल्याची जाणीव करून देत संघर्षास प्रेरित केले. त्यांना अधिकार मिळवून देत ताठ मानेने जगण्याचे बळ दिले, ज्या विभूतीने प्रतिकूल परिस्थितीत प्रस्थापितांचा प्रखर विरोध सहन करीत जातीयतेच्या बेड्या तोडण्यासाठी खंबीरपणे जातीअंताची लढाई केली, ज्या बोधीसत्त्वाने सतत 21 वर्षे अनेक धर्मांचा अभ्यास करून मानवतेचा बुद्ध धम्म दिला, ज्या ज्ञान तपस्वीने शरीर साथ देत नसतांना अहोरात्र जागून ह्या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता आणि बहिष्कृतांच्या उत्थानासाठी खास आरक्षण देणारे संविधान दिले.
त्यांची जयंती साजरी करतांना आपण फक्त बेधुंद होऊन नाचायचे? आकर्षक रोषणाई करून मिरवणुकीत मिरवायचे? यासाठी त्यांनी आयुष्यभर देह झिजवला का ? स्वताच्या मुलाचे निधन झाले असताना, बहिष्कृतांची गार्हाणी जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी गोलमेज परिषदेत हजेरी लावली का ? त्यांना भावी पिढ्यांकडून हे अभिप्रेत होते का? हे आणि असे कितीतरी प्रश्न निर्माण झाले आहेत.
गेल्या काही वर्षापासून देशामध्ये देवा, धर्माच्या नावाने उच्छाद मांडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आरक्षण संपवण्याची जाहीर चर्चा होऊ लागली आहे. एस.सी,एस. टी. मुर्दाबाद, भगवा झेंडा झिंदाबादच्या उघडपणे घोषणा दिल्या जात आहेत. संविधान बदलण्याची भाषा वारंवार केली जात आहे. दलितांवरील अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.
आपण हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म अंगीकारला. ह्याचे शल्य त्यांना अध्याप बोचते आहे म्हणुन बौद्धांवरील अन्याय, अत्याचारात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याच्याच परिणामस्वरुप, मुस्लिम समुदाया बरोबर बौद्ध समाजाला लक्ष केले जात असल्याचे भितीदायक चित्र सगळीकडे दिसत आहे. त्यात आंबेडकरी चळवळीतील
फाटाफुटीच्या राजकारणामुळे त्यांची होणारी फरपट उघड्या डोळ्यांनी बघण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
ह्या सर्व परिस्थितीत बाबासाहेबांची चळवळ, विचार,
कार्य, जीवंत ठेवणे आपले आध्य कर्तव्य आहे. त्या दृष्टीने स्वतः बाबांना समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तेच जर आपल्याला ज्ञात नसेल तर इतरांना बाबासाहेब कसे समजून सांगणार? मुळात आडात नसेल तर पोहर्यात येणार कुठून? याचा अर्थ असा होत नाही आपल्याकडे अभ्यासू लोक नाहीत. परंतु त्यांच्या ज्ञानाचा
उपयोग करून घेण्याची मानसिकता नाही. आता वाचन संस्कृती मागे पडत चालली आहे. परंतु त्यासाठी इंटरनेट, फेसबुक, यू ट्यूब, गुगल ह्या आधुनिक साधनांचा वापर करता येणे सहज शक्य आहे. मुळात बाबा हयात असल्यापासून त्यांचा सनातनी लोकांकडून कायम द्वेष केला गेला. त्यामुळे त्यांच्याविषयी गैरसमज, खोट्या गोष्टी पसरविण्यात आल्या. काही अपवाद वगळता, बहुतांशी लोकांचा तोच समज असल्याचे दिसते. म्हणुन आपण आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेब वाचून इतरांना
वस्तुस्थिती समजावून सांगणे आवश्यक आहे. त्यासाठी वर म्हंटल्याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाचा मुक्त वापर करता येऊ शकतो. जर आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येत नसेल तर इतरांकडून बाबा समजून घ्या. त्यासाठी माहितगार लोकांना पाचारण करून त्यांच्याशी चर्चा करा अथवा त्यांचे कार्यक्रम आयोजित करा. बाबा समजून घेणे आणि इतरांना समजवून सांगणे ह्यातच समाजाचे आणि देशाचे भले होणार आहे. जर आपण त्याप्रमाणे करू शकलो तर, ह्या ज्या काही वल्गना सुरू आहेत. त्याला निश्चित पायबंद बसुन ही कोल्हेकुई मूग गिळून गप्प बसेल.
वाचाल बाबा, तर वाचेल संविधान, जगातील सर्वांत मोठी लोकशाही, देश आणि समाज सुद्धा.
जयभीम.
अरुण निकम.
9323249487.
30/04/2024.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत