कायदे विषयकमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

संविधान जाणून घेणे गरजेचे आहे, असे आपणास वाटते का?

नुरखॉं पठाण

संविधानाने मला काय दिले?
2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘भारतीय संविधान’ हा देखील एक प्रमुख मुद्दा असल्याचे आपण बघितले. लोकसभेचा निकाल देखील भारतीय संविधानाचे महत्त्व निश्चितच अधोरेखित करणारा आहे आणि म्हणूनच प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या देशाचे संविधान समजून घेणे आवश्यक आहे. आपण ज्या देशात राहतो, तो देश आणि त्या देशाचा मूलभूत कायदा जोपर्यंत आपण योग्य प्रकारे जाणून घेत नाही, तोपर्यंत आपण आपल्याच देशाचे एक जबाबदार नागरिक होऊ शकत नाही. सोबतच भारतीय संविधान हे आपल्यासह प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रतिष्ठित तथा सन्मानजनक जीवन बहाल करण्याविषयी भाष्य करते. याचे कारणच मूळात, भारतीय संविधान हे प्रचंड संघर्षातून निर्माण झालेले असून यात जी आदर्श व मुल्ये आहेत, ती आमच्या महापुरुषांनी सामना केलेल्या राजकीय तथा सामाजिक स्वातंत्र्य लढ्यांमधून प्रतिबिंबित आहेत. ह्या दोन्ही लढ्यांचे नेतृत्व करणाऱ्या तथा यांमध्ये सहभागी असलेल्या आमच्या सर्व महापुरुषांनी भारतीय जनतेला सोबत घेऊन उद्याच्या आदर्श भारताचे पाहिलेले स्वप्न म्हणजे आपले ‘भारतीय संविधान’ आहे आणि या स्वप्नामध्ये अधिक गडद व अर्थपूर्ण रंग भरण्याचे महान कार्य विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. संविधानाने आपल्या भारतीय समाजात केवळ राजकीयच नव्हे, तर आर्थिक तथा सामाजिक क्षेत्रात देखील एक अभूतपूर्व अशी क्रांती घडवली. संविधान लागू होण्यापूर्वीच्या भारतातली सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थिती आणि संविधान लागू झाल्यानंतर त्यात झालेला आमूलाग्र बदल, ही संविधानाने घडवलेल्या क्रांतीचीच फळे आहेत.
केवळ वर्णव्यवस्थेमुळेच नव्हे, तर उतरंडीच्या आधारावर असलेल्या जातीव्यवस्थेमुळे नाकारण्यात येणाऱ्या सर्व समाजघटकांना कायद्यापुढे कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांसोबत समान दर्जा तथा कायद्याचे समान संरक्षण संविधानाने बहाल केले. आज भारतीय समाजातील सर्वच समाज घटकांना लिहीण्यावाचनाच्या अधिकारासोबतच विविध माध्यमातून अभिव्यक्त होण्याचे अधिकार देणारे संविधानच आहे. संविधान लागू होण्याअगोदर ही व्यवस्था सर्वांसाठी मूळीच नव्हती. अगदी उपजिवीकेचे साधन निवडण्याचे नसलेले स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधानाने दिले. यातूनच आर्थिक न्याय्य समाजाची निर्मिती प्रक्रिया सुरू झाली. ‘एक व्यक्ती-एक मत-एक मूल्य’ ह्या तत्वावर आधारित राजकीय क्षेत्रात व्यवस्था निर्माण करुन प्रत्येक नागरिकाला राजकीय महत्त्व प्राप्त करून दिले. शिवाय गणराज्य व्यवस्था अंगिकारून कोणत्याही भेदभावाशिवाय राजकीय पदांवर विराजमान होण्याचा अधिकारही प्रत्येक भारतीय नागरिकाला दिला.
पुरुषप्रधान संस्कृतीत महीलांना सन्मान मिळवून देत अनुच्छेद-१५ च्या खंड (३) च्या माध्यमातून महिला कल्याणासाठी झुकते माप देण्यात आलेले आहे. महिलांसाठी संविधान खरं तर एक वरदान आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला भगिनींना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी ही संविधानानेच उपलब्ध करून दिलेली आहे.
कोणत्याही भारतीय नागरिकाला स्वतः वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा देखील अतिशय महत्त्वाचा असा अधिकार संविधानाने मिळवून दिला. संविधान लागू होण्याअगोदर ही व्यवस्था सर्वसामान्यांसाठी अतिशय दुर्मिळ होती. अगदी ‘संविधानाने आम्हाला काय दिले?’ हा प्रश्न उपरोधिकपणे विचारणाऱ्या संविधान विरोधकांना तो विचारण्याचे धाडस देखील संविधानानेच दिलेले आहे. कारण संविधान लागू होण्याअगोदर जी काही व्यवस्था आपल्या येथे होती, तिला खरच हा प्रश्न विचारण्याची सोय कोणाला होती का? संविधानाने आपल्याला काय काय दिले, ही यादी खुप मोठी आहे. आणि ते सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला संविधानाच्या अंतरंगात डोकावून बघणे गरजेचे आहे.
???????? संविधान जाणून घेणे का गरजेचे आहे?:-
संविधानाच्या माध्यमातून भारतात सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवनात अभूतपूर्व क्रांती झाली, हे जरी खरे असले, तरी अद्यापही ही क्रांती अपुर्ण आहे. आजही अनेक समस्या आम्हा सर्वांसमोर आहेत. बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, महीलांच्या समस्या, आदिवासी बांधवांच्या समस्या, सर्वच मागासवर्गीय बांधवांच्या समस्या, अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या, अशा अनेक समस्या आजही आहेत. ही यादी बरीच मोठी करता येऊ शकते. ह्या सर्व समस्या अद्यापही आहेत किंवा त्यात नवनवीन समस्यांची भर पडत आहे, हे जरी खरे असले तरी याचे कारण म्हणजे संविधानात काही कमतरता आहे, असे अजिबात नाही. तर ह्या ज्या काही समस्या आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे संविधानाची प्रामाणिक अंमलबजावणी झाली नाही किंवा होत नाही, हे आहे. भारतीय नागरिकांनी संविधानाचे अंतरंग व्यवस्थितपणे समजून घेऊन त्यानुसार शासन प्रणालीला अंमलबजावणी करण्यास भाग पाडले नाही, हे कटू सत्य आहे. लोकशाही शासनव्यवस्थेत जागरूक मतदाता हा ह्या व्यवस्थेचा मुख्य कणा असतो. परंतु हे गृहीतकच बहुसंख्य भारतीयांच्या लक्षातच आलेले नाही. वर नमूद केलेल्या किंवा आपणास वाटत असलेल्या सर्व समस्या फक्त संविधानाच्याच माध्यमातून सुटू शकतात. परंतु यासाठी आवश्यकता आहे, ती संविधानाला शास्त्रशुद्ध पद्धतीने जाणून घेऊन त्यानुसार त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करण्यास शासन व्यवस्थेला भाग पाडण्याची. संविधान अभ्यासाच्या माध्यमातून आपण आपले जीवन अधिक आनंदी, सुखी व समृद्ध करू शकतो. संविधान हाच आम्हा सर्व भारतीयांच्या सुखी, समृद्ध तथा प्रतिष्ठापुर्वक जीवन जगण्याचा आधार आहे. पण तो नक्की कसा? हे संविधानाचा अभ्यास केल्याशिवाय समजणे शक्य नाही आणि म्हणूनच आपणास आपल्या संविधानाचे अंतरंग त्याच्या प्रत्येक अनुच्छेदानुसार जाणून घ्यावे लागणार आहे. यात असलेली कायद्याची ‘अवघड भाषा’ ही ते आपणास अपेक्षेनुसार समजून घेण्यातला निश्चितच एक अडथळा आहे, हेही नाकारता न येणारे वास्तव आहे. नेमकी हीच समस्या सोडविण्यासाठी व आपल्या सर्वांना संविधानाचा प्रत्येक अनुच्छेद शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वांगाने समजून देण्यासाठी आम्ही आपणासाठी घेऊन येत आहोत ‘आपले संविधान… राज्यपद्धतीच नव्हे, तर जीवनपद्धती’ नावाची एक केवळ दोनच मिनिटांची लेखमाला. या लेखमालेच्या माध्यमातून आपणास केवळ त्या अनुच्छेदाचा शब्दशः अर्थच सांगितला जाणार नाही; तर त्या त्या अनुच्छेदाची पार्श्वभूमी, त्या अनुच्छेदाच्या अनुषंगाने बनवण्यात आलेले कायदे व योजना, त्या संबंधित असलेल्या घटनादुरुस्त्या, तसेच इतर अत्यावश्यक माहिती देखील अगदी साध्या व सोप्या पद्धतीने आपल्यासमोर मांडली जाईल.
उद्या सकाळपासून ही लेखमाला एक दिवसाआड आपणास वैयक्तिक स्वरूपात पाठवली जाईल. आपण ती वाचून ह्या संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपल्या किमान ७५ बंधू आणि भगिनींपर्यंत ती वैयक्तिक स्वरूपात पाठवावी, एवढीच अपेक्षा. शक्यतो गृपवर सदर पोस्ट शेअर करण्यापेक्षा ब्रॉडकास्ट लिफ्टच्या माध्यमातून वैयक्तिक स्वरूपात पाठवली तर अधिक उत्तम. कारण गृप मधे असलेल्या असंख्य पोस्टच्या गर्दीत ही पोस्ट पण हरवली, तर पोस्ट पाठवण्याचा आपला उद्देश निश्चितच साध्य होणार नाही. संविधान जाणून घेऊन त्याचा प्रसार प्रचार करणे, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. आपण निश्चितच आपल्या कर्तव्याला जागून आमच्या ह्या प्रयत्नाला योग्य तो न्याय द्याल, ही अपेक्षा. शेवटी संविधानाच्या अस्तित्वातच आपले पण अस्तित्व निहित आहे. संविधान आम्हा सर्वांना जे सन्मानपूर्वक आणि प्रतिष्ठित जीवन बहाल करू शकते, ते अन्य कोणतीही व्यवस्था देऊ शकत नाही. चला तर मग, संविधानाच्या ह्या अमृतमहोत्सवी वर्षात आपण स्वतः पण संविधानाचे अंतरंग शास्त्रशुद्ध पद्धतीने साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेऊया आणि आपल्या संपर्कातील सर्वांना देखील समजावे, यासाठी सदर पोस्ट ब्रॉडकास्ट लिफ्टच्या माध्यमातून आपल्या इतर बंधू भगिनींनी पर्यंत पोहोचवून संविधान जनजागृतीच्या ह्या जनचळवळीत सहभागी होऊया.
आपण निश्चितच संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात सदर उपक्रमाचे स्वागत कराल, अशी अपेक्षा.

     ✍️ नुरखॉं पठाण
          गोरेगाव रायगड
          7276526268

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!