स्तूपांची सांची आणि बौद्ध अवशेषांची कांची
संजय सावंत
मध्यप्रदेशातील सांची म्हणजे सम्राट अशोक आणि त्यांची पत्नी विदिशादेवी, पुत्र महेंद्र, कन्या संघमित्रा यांच्या पदस्पर्शाने पुलकित झालेली धम्मनगरी होय. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मानाचे स्थान पटकावून असलेले हे स्थान सर्व बौद्ध बांधवांना अत्यंत पूजनीय आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्यप्रदेशात जाऊन एकदा तरी सांची पहावे अशी अभिलाषा प्रत्येकाच्या मनात असते. स्तूपांचे माहेरघर असलेले मध्यप्रदेश राज्य हे खरे धम्मराज्य आहे. बुद्धांचे अग्रशिष्य सारिपुत्त आणि महामोग्गलान यांचे अस्थिकलश देखील सांची स्तूपाजवळच आहेत. जणू काही त्या परिसराचे ते रक्षणच करीत आहेत आणि दररोज मुख्य स्तूपाला वंदन करीत आहेत असे भासते.
सांची सारखेच स्थळ तामिळनाडूत राज्यात आहे आणि त्याचे नाव कांची (कांचीपुरम) आहे. फरक एवढाच की स्तूपांच्या ऐवजी कांची येथे बौद्ध संस्कृतीचे असंख्य क्षतिग्रस्त अवशेष रस्त्याच्या कडेला, शेतात, गावात, देवळात, उद्यानात दृष्टीस पडतात. यावरून कुठलाही सुज्ञ माणूस कांचीची आद्य संस्कृती कोणती होती याचा अनुमान काढू शकतो. अगदी चौदाव्या शतकापर्यंत कांची मध्ये बौद्ध संस्कृती नांदत होती. इथली असंख्य जुनी देवळे म्हणजे प्राचीन काळाची बौद्ध विहारे आहेत. कामाक्षी मंदिर, करूकिनील अमरंथवल अम्मन मंदिर, पल्लुर मंदिर, कानिकीलूप्पाई, एकांबरेस्वरार मंदिर, कचपेश्वरार मंदिर, एनाठुर, कान्हेरीकूप्पम मंदिर, अर्पक्कम, कुव्वम, शोलिंगुर, कावेरीपक्कम अशा अनेक देवळातून बुद्धमूर्ती प्राप्त झाल्या असून त्यातील काही मूर्ती चेन्नई म्युझियममध्ये विराजमान झाल्या आहेत.
दुसऱ्या शतकात कांची हे बौद्ध शिकवणुकीचे मोठे केंद्र होते. येथे बुद्धिझम मधील अनेक तत्ववेत्ते जसे बोधिधर्मा, दिघनागा, धर्मकिर्ती, धर्मपाला, बुद्धघोष तयार झाले. गुरु पद्मसंभव यांनी सुद्धा या द्रविड प्रदेशात वज्रयान पंथाचा प्रसार केला. विशुद्धीमग्ग ग्रंथ लिहिणारे बुद्धघोष सुध्दा कांची मधलेच होते. वज्रयान पंथांचे सिद्ध नागार्जुन हे नावाजलेले ८४ महासिद्धक देखील कांची मधलेच होते. मनीमेख्खलाई, सिलापट्टीकरण आणि मदुराईकांची अशा जुन्या साहित्यात कांचीचा उल्लेख येतो. चिनी भिक्षू हुएनत्संग यांनी ७ व्या शतकात कांचीला भेट दिली होती. तेव्हा त्यांनी तिथे महायान पंथाची अनेक विहारे आणि दहा हजार भिक्षू पाहिल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी कांचीमध्ये सम्राट अशोक यांनी बांधलेला शंभर फूट उंचीचा स्तूप देखील बघितला आणि कांची मधील लोक बौद्ध धम्माचे पालन कसोशीने करतात असे म्हटले आहे. बिहारमधील कुर्कीहार बौद्ध विहारा जवळील उत्खननात सापडलेली अनेक शिल्पे कांचीतील लोकांनी दान केल्याचे दिसून येते.
तेराव्या शतकात युरोपियन प्रवासी मार्कोपोलो हा इथे आला होता तेव्हा त्याने कांची जवळील महाबलीपुरम समुद्रकिनारी सात पॅगोडे (चैत्य) पाहिल्याचे म्हटले आहे. चौदाव्या शतकातील कवी जावा यांनी देखील त्यांच्या लिखाणात १३ बौद्ध विहारे कांची मध्ये असल्याचा उल्लेख केला आहे. कोरिया देशात सापडलेल्या १४ व्या शतकातील शिलालेखात उल्लेख आहे की ध्यानभद्रा हे कांची मधील भिक्षू येथे आले आणि त्यांनी महायाना बौद्ध विहार स्थापिले. अशा सर्व बाबी आणि नोंदी वरून दिसून येते की तामिळनाडूतील कांची नगरामध्ये चौदाव्या शतकापर्यंत बौद्ध धर्म फुलला होता. वज्रयान पंथानुसार कांची हे २४ पवित्र ऊर्जा स्थांनापैकी एक उर्जास्थान आहे.
आता कांचीचे सर्वसाधारण शिव कांची आणि विष्णु कांची असे दोन भाग पडतात. तेथे आता शिव आणि विष्णूची अनेक देवालये आहेत. परंतू अशा कांचीपुरममध्ये आज सर्वत्र फक्त बुद्ध आणि बोधिसत्वाचीच शिल्पे उत्खननात आढळून येतात. मध्यप्रदेशातील सांचीतील स्तूपांची दुरुस्ती झाली आणि जागतिक वारसा स्थळांच्या यादीत त्याचे नाव गेले. आता निदान कांचीपुरम मधील विखुरलेले प्राचीन बौद्ध अवशेष गोळा करून त्याचे मोठे संग्रहालय तरी तेथील शासनाने उभारावे, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे.
— संजय सावंत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत