“ नामदेवे रचिला पाया, तुका झालास कळस.”-प्रा. डॉ. आर. जे. इंगोले-



आपल्या देशात एक एक मानिकता आहे की, एकदा कोणतीही एक पद्धत किंवा विचार सुरू झाला की, मग त्याला सतत मान्य करणे मग त्याची चिकित्सा करायची नाही आणि त्यावर विचार सुद्धा करायचा नाही. कारण ते पूर्वीपासून चालत आले आहे. आणि जर ते धार्मिक आणि देव भक्ती याबाबत असेल तर मग तर विचाराची सोय नाही. कारण एवढे मोठे बंड कोणी करावे ? पण आपल्याकडे चार्वाकापासून चिकित्सा सुरू झाली पुढे तथागत बुद्धापर्यन्त आणि मग थोडे का असेना पण लोक चिकित्सा करू लागले ,विचार करू लागले आणि सत्य काय आहे हे लोकांना सांगू लागले. याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली आहे हा मोठा इतिहास आहे. आपल्या देशात आणि विशेष करून महाराष्ट्रात संत परंपरा आहे आणि यात अनेक बाबी चुकीच्या सांगितल्या आहेत. अनेक कीर्तनकार किर्तन करतात पण जे पूर्वी सांगितलेले आहे तेच पुढे चालू ठेवले आहे पण आता विरोध कोणी करावा ? आणि मुळात विरोध करण्याची मानसिकता सुद्धा नाही. जे आहे ना ते चालू द्या अशी आपली मानसिकता आहे. यामुळे सत्य काय आहे ते समाजाला कळाले पाहिजे असे विचार जोपासणारे कांही लोक समाजात असतात. असेच आमचे पुरोगामी आणि परखड लेखक मराठवाडयातील हिंगोली येथील प्रा. गंगाधर गिते होते. त्यांनी अनेक संदर्भ देत संत परंपरा कशी असावी आणि लोकांनी त्याची काय अवस्था केली असा विचार एका ठिकाणी मांडला आहे. त्याचा काही संदर्भ घेत मी याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.
आपण म्हणतो सर्व संत एकच आहेत त्यांनी सांगितलेले विचार समान आहेत पण असे नाही एक तर ही आपली भाबडी समजूत आहे किंवा आपण सत्य काय आहे हे सांगण्याच्या खोलात जात नाही तिसरे आपल्यावर ब्रह्मामणी प्रभाव आहे. आणि असे असेल तर आपल्या समाजाला सत्य कधी कळणार आहे ? आणि असेच चालले तर आपल्या पुढील अनेक पिढया सत्यापासून दूर राहतील. पण आता समाजाची मानसिकता असते की, सत्य कोणी सांगावे ? कारण सत्य सांगणारा कधी कधी बळी दिला जातो हा इतिहास पहिला तर एक स्वतंत्र लेखाचा किंवा एका ग्रंथाचा विषय होईल. पण सत्य सांगितले पाहिजे आणि तसे लोक कमी का असेना पण प्रत्येक काळात असतात. पण समाज यांचे म्हणणे समजून घेत नाही. अनेक संत आणि इतर पात्र असतात त्यांचे उदात्तीकरण केले जाते कारण लेखक तेच असतात आणि बहुजन समाजाला दिशाभूल केली जाते. आता आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये शामची आई हे पुस्तक खूपच ग्रेट आहे आणि ते वाचले पाहिजे असे आपले अर्धवट विद्वान सांगतात पण त्यांनी यातील बारकावे त्यांना माहीत नसतात आणि विनाकारण त्या पुस्तकाबद्दल चर्चा केली जाते. अगदी अशीच अवस्था आपली संत साहित्य आणि संतांचे चरित्र याबद्दल झाली आहे. आता संत एकनाथ याबद्दल ते विनाकारण ते अस्पृश्याचे मूल कडेवर घेतले आणि तो नदीचा प्रसंग सांगितला जातो. पण आपल्याला प्रत्येक घटना आता चिकित्सकपणे पहावी लागेल आणि तरच आपणास सत्य काय ते कळेल पण यासाठी एक तर खूप अभ्यास करावा लागेल आणि जेंव्हा सत्य समजेल तेंव्हा ते सांगण्याचे धाडस ठेवावे लागेल. बहुजन समाजात धाडसी लोक कमी झालेत हे जरा वाईट आहे आपला मोठा इतिहास असतांना असे का होत आहे ? चार्वाक ,बुद्ध ,कबीर ,संत तुकाराम ,संत रोहिदास ,संत सावता अशा बंडखोर आणि पुरोगामी महान संतांची आपली परंपरा असतांना आपण आज का घाबरत आहोत ? त्यांना तर त्याकाळात कायद्याचे संरक्षण सुद्धा नव्हते आज आपल्याला भारतीय संविधनाचे संरक्षण आहे. आपल्याला संविधानाने आपले विचार मांडण्याचे अधिकार दिले आहेत. आपण कुणाबद्दल चुकीचे बोलायचे नाही तर जे सत्य आहे आणि ज्याला सत्याचा आधार आहे तेच आपल्या बहुजन समाजाला सांगितले पाहिजे. आणि एक उच्च शिक्षित व्यक्ती म्हणून आपले ते कर्तव्य सुद्धा आहे. राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी सांगितलेले आहे की, “ जे सत्य आणि असत्या यातील फरक स्पष्ट करते ते शिक्षण आहे.” इतकी साधी आणि स्पष्ट व्याख्या शिक्षणाची केली आहे. आपण तो अर्थ जरी समजून घेतला तरी आपणास काय करायचे आहे ते समजेल.
आपल्याला संत विचार सांगतांना असे सांगितले जाते की, “ ज्ञानदेवे रचिला पाया ,तुका झालास कळस .” आणि आपले बहुजन हे सर्व अनेक पिढयापासून ऐकत आले आहेत त्यांनी कधी यावर विचार केला नाही आणि करणार सुद्धा नाहीत. कारण याची सांगण्याची परंपरा ब्रह्मामणी होती आणि ब्रह्मामण त्यांचे संत , विचारवंत ,शिक्षक ,राजकीय नेते आणि इतर कोणीही असू द्या त्यांना मोठे करण्याचा सतत प्रयत्न करतात आणि आपल्या लोकांना पूर्वीपासून फक्त ऐकण्याचे काम आहे विचार करण्याचे नाही त्यामुळे हा अनर्थ झाला आहे. आज सुद्धा वर्तमानात जे जे आपणास मोठे वाटतात ते मोठे नाहीत पण त्यांना मोठे केले गेले आणि याचे कारण आपल्याला शिक्षण नाकारले आणि त्यामुळे आपण फक्त ते जे म्हणतील ते ऐकत राहणे एवढेच आपले काम आहे. आज अनेक आधुनिक संत मानले गेले आहेत त्यांचा जर तुम्ही सत्य इतिहास वाचला तर तुम्हाला धक्का बसेल पण आपण वाचत नाही. नविन काळात आपल्याला रेडिमेडची सवय लागली आहे पण रेडिमेड विचार हा घातक असतो त्याला आपण तपासून घेतले पाहिजे आणि ती आपली परंपरा आहे. आपले आदर्श चार्वाक ,बुद्ध , कबीर ,संत तुकाराम यांनी आपल्याला चिकित्सा शिकविली आहे हे आपण विसरता कामा नये. आपल्याला हे माहीत नाही की, संत साहित्यात दोन विचारप्रवाह आहेत आणि ते स्पष्ट आहेत पण आपल्याला सांगितले जाते की, सर्व संत एकच आहेत सर्वांचे विचार सारखेच आहेत आणि आपण ऐकतो पण यातील सत्य वेगळे आहे तेच सांगण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. एक संत परंपरा वैदिक आहे आणि दुसरी अवैदिक आहे आणि हा संघर्ष चार्वाकापासून सुरू होतो आणि आज सुद्धा चालू आहे. पण आपली दिशाभूल केली जाते म्हणून आपणास लक्षात येत नाही. आणि आपले ह.भ.प. महाराज असतात त्यांना एवढा अभ्यास असेल असे वाटत नाही. तर ते अभंग पाठ करतात आणि आपले किर्तन चालू ठेवतात यात सुद्धा आर्थिक लाभ मोठया प्रमाणावर सुरू झाला आहे. आता याला आधार आपल्या महाराष्ट्रातील एक किर्तनकार जे एक हसवणूक आणि करमणूक करतात ते इंदुरीकर महराज स्वत: किर्तनात सांगतात की, एका किर्तनाचे मानधन किती आहे आणि एका दिवसात किती किर्तन करतात आणि सांगतात लावा हिशोब ? आता असे जर असेल तर मग सत्य कुठे जाईल आणि संत परंपरा ज्या सहा षडरिपु पासून दूर रहा लोकांना सांगायचे आणि आपण मात्र धनाचा लोभ ठेवायचा मग संत तुकाराम सांगतात की, सोने रुपे आम्हा मृतीके समान याचे काय किंवा पुढे ते एका ठिकाणी किर्तन करणार्या व्यक्तीबद्दल म्हणतात की,
“तुका म्हणे द्रव्य घेती | तेही नरकात जाती ||”
जर आपण याचा विचार केला आणि आजच्या किर्तनकार लोकांचा केला तर आपल्याला किती विरोधाभास दिसेल. आणि मग हे व्यवहारी किर्तनकार जर लोकांना संत तुकाराम महाराज सांगत असतील तर किती पटेल लोकांना हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे हा वरील अभंग ते लोकांना सांगणार नाहीत कारण मग यामुळे यांचे पितळ उघडे पडेल. आणि त्यामुळे यांच्या सोयीचे अभंग हे लोकांना सांगतात. आणि अशी जर स्थिती असेल तर आपले किर्तन करणारे लोक कधी सांगतील आपल्या समाजाला सत्य आणि कधी सांगतील पुरोगामी विचार ? हा प्रश्न आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांना एकत्र आणणे हे फार मोठी चूक आहे जे आपले लोक आजपर्यंत करीत आले आहेत. त्यांना आपण एकत्र आणून काय उपयोग त्यांचे विचार जर परस्पर विरोधी असतील तर ? आणि हे आपण किंवा कोणी मनाने सांगत नाही तर त्यांचे साहित्य पाहिले तर सहज लक्षात येते. आता आपण ते स्पष्ट करण्यासाठी त्यांचे एक एक अभंग पाहू .
संत ज्ञानेश्वर म्हणतात, शास्त्र म्हणेल ते सांडावे , ते राज्य ही तृण मानावे , जे जे घेवी ते न म्हणावे..
याचा अर्थ आहे की, तुम्ही कितीही विद्वान असाल तरी तुम्हाला शास्त्राच्या विरोधात जाता येत नाही. म्हणजे एखादा बहुजन आहे आणि तो खूप विद्वान आहे त्याला अनेक अभंग पाठ आहेत त्याचा अर्थ सांगू शकतो ,त्याला संस्कृत येते पण तरी त्याला शास्त्राच्या विरोधी भूमिका घेता येत नाही. कारण ते शास्त्र आहे. आणि आपण जर संत तुकारामाचा विचार केला तर ते शास्त्रा विरोधी होते म्हणजे त्यांना मानवाला आलेला अनुभव मोठा वाटतो आणि आपण म्हणत नाही का अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे आणि हे सत्य सुद्धा आहे माणसाला एखाद्या घटनेचा अनुभव आला तर तो सर्वात मोठा असतो. त्याला इतर ज्ञान सांगण्याची गरज नाही. परंतु शास्त्र अनुभवाला स्थान देत नाही. आणि त्यामुळे असे दोन परस्पर विरोधी विचार असणारे दोन संत एकत्र येऊन पाया आणि कळस कसा होईल हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे संत तुकाराम वेद आणि शास्त्र याला महत्व देत नाहीत. याबद्दल संत तुकाराम म्हणतात
“ न पढवे वेद नव्हे शास्त्रबोध | नामाचे प्रबंध पाठ करा || ( शा. तू. गा. अ. ३११३ )
आणि पुढे ते दुसर्या एका अभंगात म्हणतात की,
तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका | अनुभवाविना नका वाव घेऊ ||
आणि असाच अनुभव संत नामदेवांचा सुद्धा आहे. ते म्हणतात की, अनुभवामुळे सर्व समजले शास्त्रामुळे नाही असे स्पष्ट सांगतात याचा अर्थ संत तुकाराम आणि संत नामदेव यांचे विचार एक आहेत आणि त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की, या बहुजन संतांची विचारधारा ही बुद्धीप्रामाण्यवादी आहे . त्यांना अनुभवाच्या कसोटीवर जे पटले तेच ते मानतात आणि जे नाही पटले ते मानीत नाहीत. जो विचार चार्वाक आणि बुद्धाने सांगितला आहे तोच विचार आमच्या संतांनी आम्हाला सांगितला आहे. पण आम्ही संत विचार सांगणर्यांनी त्याची गल्लत केली आणि आजवर आपण विनाकारण उलट विचार दिले. संत तुकाराम आणि संत नामदेव यांनी धर्मशास्त्राची मते आणि जुन्या कालबाह्य परंपरा नाकारल्या आणि आपल्या बहुजन समाजाला दिशा देणारे विचार त्यांनी दिले. आणि म्हणून संत तुकाराम महाराज यांचा पुन्हा एक प्रसिद्ध अभंग आहे जो पूर्ण विज्ञानवादी आहे तो म्हणजे
“ सत्य असत्याशी मन केले ग्वाही , मानियले नाही बहुमता ||”
आता यापेक्षा विज्ञानवादी विचार कोणता असेल ? म्हणजे एखाद्या शास्त्रात सांगितले असेल किंवा परंपरा असेल तरी जर असा विचार आपल्या विवेकाला पटला नाही किंवा आपण त्याची चिकित्सा केली तर आपल्या तर्काच्या कसोटीवर उतरला नाही तर त्याला मानू नये. आणि त्यामुळे आपण बर्याच वेळा म्हणतो की, सत्य हे फार कमी लोकांना माहीत असते पण शेवटी ते सत्य असते. जास्त लोक एखादा विचार स्वीकारतात म्हणजे तो सत्य आहे असे नाही तर तो सत्य असला पाहिजे. आणि आपण व्यवहारात सुद्धा पाहतो की, समजा एखाद्या मतदारसंघात एखादा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आला आणि तो जर जनतेची कामे करीत नसेल तर त्याला निवडणारे लोक हे सत्य समजू शकले नाही आणि त्यामुळे पुढील पाच वर्ष मग ते पश्चाताप करतात. याचा अर्थ आपल्या भागात कोण प्रतिंनिधी योग्य आहे म्हणजेच सत्य काय आहे हे फार थोडया लोकांना माहीत असते.
आपण जर सत्य विचार केला तर वारकरी पंथाचा पाया संत नामदेवांनी घातला आहे. वारकरी संतांनी विठ्ठलास दैवत मानले कारण विठ्ठल अवैदिक आहे. पण आपले वारकरी हे मान्य करीत नाहीत. कारण त्यांना याचा खोलवर अभ्यास नाही. वारकरी फक्त ऐकीव माहितीवर पुढे जातात त्याचा चिकित्सक आणि सत्य अभ्यास करीत नाहीत. संत ज्ञानेश्वर ,संत एकनाथ ,संत निळोबा आणि रामदास हे संत म्हणजेच यज्ञ संस्कृतीचे पुरस्कर्ते आहेत. आपल्या ग्रामीण भागात भागवत पुराण चालू असते त्यामध्ये काय आहे तर ब्रह्मामण महात्म्य आणि इतर बहुजन स्त्रियांना मानसिक गुलामगिरीत ठेवणे हेच आहे. पण लोकांना एवढे माहीत नसते आणि लोक गर्दी करतात यात स्त्रिया जास्त प्रमाणात असतात. आणि बहुजन समाजाने ब्रह्मामणांच्या विरोधात जाणे हे कसे भयंकर आहे ते स्पष्ट करतात आणि आपला बहुजन पहिलाच यांना देव मानतो आणि घाबरतो मग तो विरोध कसा करेल ? आणि मग हे ब्रह्मामण खरे –खोटे सर्व एकत्र सांगतात आणि आपल्या समाजाला मानसिक गुलाम कारणासाठी सतत प्रयत्न करतात. आणि जातीव्यवस्था कशी सतत पुढे चालू ठेवायची हे ब्रह्मामण समाजास चांगले माहीत आहे. हेच संत एकनाथ भागवातच्या २८ व्या ओवीत म्हणतात,
अंत्यजाचा विटाळ ज्यासी | गंगास्नाने शुद्धत्व त्यासी ||
ते गंगास्नान अंत्यज्यासी | शुद्धवासी अनुपयोगे ||
याचा अर्थ असा की, एखाद्या ब्रह्मामण व्यक्तीस अंत्यजाचा विटाळ झाला तर त्याने गंगास्नान केले तर तो शुद्ध होईल पण जर एखाद्या अस्पृश्यांने गंगेत कितीही वेळा स्नान केले तरी त्याचा विटाळ नाहीसा होणार नाही. म्हणजे त्याना वर्णव्यवस्था कायम ठेवायची आहे. आणि त्यामुळे आपले बहुजन संत आणि हे ब्रह्मामणी संत यांचे विचार एक होऊ शकत नाहीत. याचा अर्थ ज्ञानेश्वर वारकरी पंथी नव्हते असे स्पष्ट होते. ज्ञानेश्वर नाथपंथी होते आणि संत एकनाथ दत्तपंथी आहेत. त्यांना दत्तपंथाची दिक्षा जनार्धन स्वामीने दिली आहे. आणि जो दत्त संप्रदाय स्वीकारतो तो सोवळे-ओवळे आणि कर्मठ असतो आणि त्यामुळे विठ्ठहलाची उपसना करणारे वारकरी यांचा मेळ या दत्तसंप्रदायाशी कसा होणार आहे ? यावरून आपणास आपल्या राज्यात जी वारकरी परंपरा आहे यात किती मोठी समस्या आहे हे लक्षात येते. आपल्या वारकरी संप्रदायाने चिकित्सक झाले पाहिजे आणि प्रत्येक विचारधारा तपासून घेतली पाहिजे म्हणजे आपल्या बहुजन समाजाची दिशाभूल होणार नाही. आणि आपल्या जीवनातील जो वेळ आपण समाजाला जागृत करण्यासाठी खर्च केला त्याचा जर मार्गच चुकला तर नंतर जीवनात व्यक्तीला पश्चाताप होणार नाही. या ब्रह्मामनांनी आपल्या बहुजन समाजाच्या मनावर हे विचार लादले आणि त्यामुळे आजपर्यंत आपण प्रत्येक व्यक्तीला ज्ञानेश्वर माऊली का म्हणतो असा प्रश्न आपणास का पडत नाही. कधी तरी आपण नामदेव माऊली ,तुकाराम माऊली किंवा जनाबाई माऊली का म्हणत नाही. असा चिकित्सक विचार आपण केला पाहिजे. याचा अर्थ आपल्यावर कोणीतरी जाणीवपूर्वक ही लादले आहे. पण आपला भोळा समाज याचा विचार करीत नाही पण हे मात्र धूर्त आहेत. आणि त्यामुळे आपण सुद्धा यापुढे सावध झाले पाहिजे. गोवर्धन पिठाचे शंकराचार्य कांही वर्षापूर्वी म्हणले होते की, “ हिंदू धर्माने अस्पृश्यता स्विकारली असून कांही माणसे जन्मजात अस्पृश्य आहेत असेही हा धर्म मानतो.” आणि नेमकी हीच मानसिकता या ब्रह्मामणी लोकांची आहे. आणि त्यामुळे ते आपल्या बहुजन समाजाला नेहमी खाली ठेवतात आणि ते संख्येने कमी आणि समाजहिताचे विचार करीत नाहीत तरी स्वत:ला मोठे मानतात आणि तशी समाजमानवर छाप पाडतात.
आपल्या बहुजन समाजावर ब्रह्मामणांचे धार्मिक वर्चस्व का टिकून आहे याचा विचार केला तर लक्षात येते की, आपल्या समाजात ब्रह्मामण संख्येने जरी कमी असले तरी त्यांचे हाती असलेली धार्मिक आणि राजकीय सत्ता आहे. आणि याचे उदाहरण म्हणजे पेशवाई आहे. आणि जेंव्हा राजकीय सत्ता बहुजन समाजाच्या हातात जाईल तेंव्हा या जुलमी ब्रह्मामणांचा पापाचा घडा भरला समजा आणि तो दिवस लवकर येईल अशी आपण अशा बाळगू या. यासाठी बहुजन समाजाने जागृत होऊन लढा दिला पाहिजे. आपला भारतीय समाज श्रेद्धेच्या या मायाजालात इतका अडकला आहे की, या देशाचे भविष्य अंधारात वाटत आहे. एक विचार असा मांडला जातो की, “ जेंव्हा डोक्यातून विचार हद्दपार होतात तेंव्हा व्यक्तिच्या मनात श्रद्धा जन्म घेते असे पुरोगामी लेखक मा. बाळासाहेब गरुड म्हणतात.
प्रा. डॉ. आर. जे. इंगोले
नाशिक ( 9423180876 )
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत