महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

हा देश सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन विश्वास देऊन एकत्र चालविण्याशिवाय पर्याय नाही

२७ मे, २०२४… पं. जवाहरलाल नेहरू स्वर्गवासी होऊन ६० वर्षे होतील. एखाद्या देशाकरिता हा काळ फार मोठा आहे. त्याच्या पूर्वी महात्मा गांधी यांची हत्या झाली. त्याला ७६ वर्षे झाली. नेहरूंच्या नंतर बरोबर २० वर्षांनी श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यालाही आता ४० वर्षे झाली आहेत. त्यानंतर ७ वर्षाने १९९१ साली राजीव गांधींची हत्या झाली. देशासाठी एका महात्म्याचे बलिदान झाले. एका पंतप्रधानाची आणि एका माजी पंतप्रधानाची कट करून हत्या झाली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर या अवाढव्य देशात त्या काळात वैज्ञानिक पायाभरणी करून पं. नेहरूंनी देश उभा कसा केला? हे शेकडो ग्रंथातून आजपर्यंत सांगण्यात आले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी गांधी-नेहरू घराण्याचा त्याग तोही जगाला माहिती आहे. महात्मा गांधींनी कितीवेळा तुरुंगात डांबण्यात आले, त्याचाही तपशील सगळ्यांना माहिती आहे. सत्य, अहिंसा या अमोघ शस्त्राने महात्मा गांधी यांनी जगाला एक नवा रस्ता दाखविला आणि त्याच वैचारिक पायावर पंडितजींनी विज्ञानाची जोड देऊन या देशाला समर्थ केले. ६५ वर्षांपूर्वी देशात पाच आय.आय.टी. संस्था उभ्या करण्याची वैचारिक भूमिका पंडितजींची. भाक्रा-नानगल सारखे अवाढव्य धरण उभे करण्याची संकल्पना पंडितजींची. आजच्या विद्यार्थ्यांना हे माहितही नाही. भाक्रा-नानगल उभे राहात असताना अनेक शाळा-कॉलेज विद्यार्थ्यांच्या सहली या भव्य धरणाचे बांधकाम पाहण्यासाठी जात होत्या. महाराष्ट्रातील ख्यातनाम कादंबरीकार गो. नी. दांडेकर यांची प्रख्यात कादंबरी ‘आम्ही भगिरथाचे पुत्र’ ही तळेगाव-दाभाडे या त्यांच्या गावी बसवून त्यांनी लिहिली नाही. धरणाच्या जागेवर तीन वर्षे राहून ही कादंबरी वाचकांच्या हातात आली. १ कोटी निर्वासितांचा लोंढा आलेला असताना, अन्नधान्यात देश स्वयंपूर्ण नसताना त्यावेळच्या ४० कोटी भारताला आणि त्यातील सर्व जाती-धर्माला या लोकशाही ढाच्यात पंडितजींनीच अतिशय विवेकपूर्ण भूमिका घेऊन देश उभा केला आहे. पहिली निवडणूक ७ जानेवारी, १९५२ ला झाली. त्यावेळी देशातील अनेक जिल्ह्यात महाविद्यालये नव्हती. महाराष्ट्र्रात फक्त मुंबई विद्यापीठ होते. तरीही फार न शिकलेल्या या देशातील जनतेने ७० टक्के मतदान केले होते. नेहरूंना त्यावेळीही विरोध झाला होता. त्या काळातही अशोक मेहता आणि दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लाखा-लाखाच्या सभा होत होत्या. पण त्यानंतर पं. नेहरूंची एक सभा झाली की, अगोदरचे सगळे वाहून जात होते. देशातील जनतेने पंडितजींवर मनापासून प्रेम केले. पंडितजींनी देशावर तेवढेच प्रेम केले. गांधी-नेहरू घराण्याने देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो काही त्याग केला त्याची जाणीव त्यावेळच्या भारतीय जनतेला होती. नेहरू घराण्यातील एकही व्यक्ती अशी नाही ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास भोगलेला नाही. मोतीलाल नेहरू यांची महिन्याची त्यावेळची वकिलीची कमाई लाखामध्ये होती. म. गांधीजींचा विचार स्वीकारल्यावर त्यांच्या अंगावरचे मखमलीचे कपडे एका दिवसात बाजूला झाले आणि खादीचे कपडे अंगावर चढले. मोतीलाल नेहरू, त्यांच्या पत्नी. पं. नेहरू, त्यांच्या पत्नी कमला, पंडितजींची बहीण विजयालक्ष्मी, त्यांचे पती, दुसरी बहीण कृष्णा, तिचे पती राजा हाथीसिंग, पंडितजींची मुलगी इंदिरा अशा नेहरू घराण्यातील सर्व सदस्यांची स्वातंत्र्य चळवळीसाठी भोगलेली एकूण शिक्षा १९ वर्ष ६ महिन्याची आहे. खुद्द पं. नेहरूंनी स्वत: भोगलेली स्वातंत्र्य चळवळीतील शिक्षा साडेनऊ वर्षाची आहे. राजा हाथीसिंग यांचे निधन ब्रिटिशांविरोधातील चळवळीत तुरुंगामध्येच झाले आहे. देशासाठी एका घराण्याने केलेला हा त्याग जगात कोणतेही दुसरे उदाहरण नाही. हे संपूर्ण कुटुंब देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, तुरुंगात गेले.
म. गांधी यांच्या नेतृत्वाला तर जगात तोड नाही. नेल्सन मंडेला यांचा सगळा लढा महात्माजींना गुरुस्थानी मानून झाला. महात्माजींचे तत्त्वज्ञान हा जगाने आपला सिद्धांत मानला. त्यामुळे आजही जगातील ६०० विद्यापीठात म. गांधी तत्त्वज्ञान शिकविले जाते.
अशा या गांधी-नेहरू कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूला बलिदानातून त्यागाची फार मोठी परंपरा आहे. पण दुर्दैवाने या देशात सत्ताधार्‍यांना, म. गांधी जाऊन ७६ वर्षे झाल्यानंतर आणि नेहरू जाऊन ६० वर्षे झाल्यानंतरही गांधी-नेहरूंवर टीका केल्याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नाही. कारण जे लोक टीका करत आहेत, त्यांच्याजवळ स्वत:चे तत्त्वज्ञान नाही. हा देश जगात लोकशाहीचा सर्वश्रेष्ठ देश ठरला. कारण भारतरत्न बाबासाहेबांच्या घटनेने या देशातील जनतेच्या सामर्थ्याचे ‘सर्वांना एकमत’ हे शस्त्र हातात दिले. त्याच श्रेष्ठ लोकशाहीने आणि येथील मतदाराने जगाला स्तिमीत करून टाकले आहे. अमेरिकेत लोकशाही आहे, निवडणूक आहे, तेथे मतदान यंत्रात गडबड होत नाही. पण त्या देशामध्ये ९९ टक्के एका धर्माचे लोक आहेत. रशियातील लोकशाही वरवंट्याखालची लोकशाही. हाच जगामधील एकमेव देश असा आहे की, अनेक जाती-धर्म-पंथ-अज्ञान-गरिबी-अंधश्रद्धा हे सर्व असतानाही या देशातील विविधतेने एकतेचे दर्शन घडविलेले आहे. ते सामर्थ्य गांधी-नेहरूंच्या विचारात आहे. त्यामुळे काँग्रेस हा पक्ष ‘राजकीय पक्ष’ म्हणून विचारात घेतला जात नाही. काँग्रेस हा एक विचार आहे. गांधी-नेहरू हा एक विचार आहे. त्यामुळे महात्माजींची हत्या करून गांधी विचार जसा मारता आला नाही त्याचप्रमाणे इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांची हत्या केल्यानंतरही या देशाच्या सर्वधर्म समभावाचा विचार मारता आलेला नाही आणि मारता येणार नाही. काँग्रेसच्या विचाराचे हे सामर्थ्य आहे, त्यामुळे नेहरू जसे ‘अमर्त्य’ आहेत, कारण त्यांचा विज्ञाननिष्ठ विचार अमर्त्य आहे. इंदिराजींनी तर मृत्यूच्या आदल्या दिवशी – ३० ऑक्टोबर १९८४ – जाहीरपणे सांगितले होते की, ‘मै आज जीवित हूँ, शायद कल नहीं रहूंगी। लेकिन मेरे खून का कतरा-कतरा देश की एकता रखने में काम आएगा।’ देशासाठी त्याग करणार्‍या अशा नेत्यांसमोर आजचे नेते ‘मी परमेश्वराचा अंश असल्याचे सांगितले’ तरीही लोक त्यांच्यातील भोंदूपणाला पारखून घेतात. लोकशाहीच्या नावावर देशात जे काही चालले आहे, ते या देशातील सामान्य जनता शांतपणाने सहन करेल आणि कितीही धार्मिक उन्माद निर्माण केला तरी या देशातून गांधी-नेहरू विचार कोणालाही हद्दपार करता येणार नाहीत. गांधी-नेहरू विचाराचे ते सामर्थ्य आहे. गांधी-नेहरूंना जाऊन आणखी १००-२०० वर्षे उलटतील तेव्हाही हाच विचार देशातील सामर्थ्य एकत्र ठेवणारा ठरेल. कारण कोणी कितीही आवाज केला तरीही हा देश सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन विश्वास देऊन एकत्र चालविण्याशिवाय पर्याय नाही, हेच या विचाराचे सामर्थ्य आहे. गंधाचा टिळा लावणारे हिंदू मदनमोहन मालवीय यांचा उजवा हात मौलाना अबुल कलम आझाद यांच्या हातात होता आणि डावा हात वीर नरीमन या पारशी नेत्याच्या हातात होता. पलिकडे सरदार पटेल होते. ही काँग्रेस संस्कृती आहे. त्या संस्कृतीचे जनक गांधी-नेहरू आहेत आणि म्हणून हा देश सर्व जाती-धर्मांना एकत्र ठेवूनच देश चालू शकेल. पंडितजींच्या वैज्ञानिक दृष्टीमध्ये जगाच्या ज्ञानाची झेप होती. पण येथील वास्तवही ते विसरले नव्हते आणि तोच त्यांचा विचार या देशाला तारणारा आहे.
६० वर्षे होऊन गेल्यानंतरही देशातील अशा सत्ताधार्‍यांना गांधी-नेहरूंवर टीका केल्याशिवाय पर्याय नाही, याचे कारण टीका करणार्‍यांजवळ सांगण्यासारखे दुसरे काहीही नाही, हेच नेहरूंचे सामर्थ्य आहे.
पंडितजींना आदरांजली! ????9869239977

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!