आरोग्यविषयकदेश-विदेशनिवडणूक रणसंग्राम 2024वातावरणविचारपीठ

पर्यावरण समस्यांनी आपण अस्वस्थ झालं पाहिजे ! – ग्रेटा थनबर्ग.

Repost……..
As it was. ????
ग्रेटा थनबर्ग, 20 ऑगस्ट 2018

मुंबईमध्ये अे सी मध्ये आरामशीर पणे बसणा-याला खूप उकडतंय, पुण्यात तर चटके असह्य होतायत, विदर्भ मराठवाड्यात सतत दुष्काळ पडतोय, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात चैत्रात पाऊस पडतोय, गारांचा मारा होतोय, वीज कोसळून माणसं मरतायत, इथे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात हवामानाचा कोप झालाय. पण आपल्याला त्याचे सोयरसुतक नाही. आपल्या निवडणुका जातीवर आणि धर्मावरच चालतात. इथे घशात घालायला दोन थेंब नाहीत, पण अली आणि बजरंगबलीचीच बोंब सुरू असते. आपण आपल्याच मस्तीत आहोत. पण साता समुद्रापार एका १६ वर्षांच्या मुलीने वादळ निर्माण केलंय. हे वादळ सर्व देशांवर घोंघावतंय. परंतु भारत मात्र या वादळाची दखल घ्यायलाही तयार नाही.
स्वीडनमध्ये गेल्या वर्षी जंगलच्या जंगल आगीत भस्मसात होत होते. सूर्य अक्षरशः आग ओकत होता. संपूर्ण उत्तर युरोपात उष्णतेची लाट आली होती. ग्रेटा तेव्हा १५ वर्षांची होती. शाळेत शिकत होती. आपल्या अवतीभोवती विपरीत काही घडतंय याची तिला जाणीव होत होती. तिच्या शाळेत चित्रपट दाखवायचे. प्लास्टीकमुळे पर्यावरणाची हानी कशी होते, झाडे तोडल्याने समतोल कसा बिघडतो ते पडद्यावर दिसायचे तेव्हा तिचे मन आतून रडायचे. ते लघुपट संपल्यावर तिच्या मित्रमैत्रिणी सर्व काही विसरून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात रमून जायच्या. अगदी तुमच्या माझ्यासारख्याच ! पण दोन वेण्या घातलेली ती हडकुळी, अबोल पोर मात्र हबकून गेली होती. आपण या संकटावर मात करू शकत नाही का? हा एकच प्रश्न तिला सतावू लागला.
ग्रेटा घरची श्रीमंत, वडील स्वीडनचे प्रसिद्ध नट, आई ख्यातनाम नृत्यांगना आहे. ती आपल्या आईवडिलांशी बोलू लागली. पर्यावरणाबद्दल माहिती शोधून शोधून त्यांना सांगू लागली. सुरुवातीला त्यांनी लेकीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. पण हळूहळू त्यांना तिचे म्हणणे पटू लागले. पर्यावरणाला हानी होईल अशा वस्तू वापरणे त्यांनी बंद केले. तरीही आपल्या एकट्याने काय होणार आहे असे त्यांना वाटायचे. ग्रेटा त्यांना सारखी म्हणायची की, हवामानातील या बदलामुळे पृथ्वी नष्ट होणार आहे. हे इतके मोठे संकट असताना स्वीडनमध्ये भलत्याच गोष्टींची चर्चा का करतात? आपण युरोप महासंघातून बाहेर पडू की नाही यावर बैठकावर बैठका घेण्यापेक्षा पर्यावरणावर चर्चा करायला हवी. ग्रेटाचे म्हणणे बरोबर होते. पण भारतात बहुसंख्यांची जी वृत्ती आहे तीच तिथेही होती. जेव्हा संकट येईल तेव्हा बघू आणि जग नष्ट वगैरे होणार नाहीय तेव्हा त्रास कशाला घ्यायचा असा सोयीचा विचार प्रबळ होता.
ती १५ वर्षांची चिमुकली मात्र गप्प बसली नाही. एक दिवस तिने बोर्ड रंगवला ‘पर्यावरणासाठी शाळेचे आंदोलन’ आणि तो बोर्ड घेऊन ती सरळ स्वीडनच्या संसद भवनासमोर जाऊन बसली. ती एकटीच बसली होती. येणारे-जाणारे तिच्याकडे कुतूहलाने पाहत होते, बोर्ड वाचत होते, पण तिच्या या आंदोलनात कुणीही सामील झाले नाही. तरी ती मागे हटली नाही. रोज तो बोर्ड घेऊन ती संसदेसमोर बसू लागली. ही हिंमत आपल्यात कधी येईल का? शाळा बुडते म्हणून तिचे आईवडील रागावले. तिने त्यांचेही ऐकले नाही. तिच्यासाठी पर्यावरण वाचवणे महत्त्वाचे होते. रोज तिला संसद भवनासमोर बसलेली पाहून हळूहळू एकेक सामील होऊ लागला. सकाळी ६ वाजता ही पोर घरातून निघायची, संसद भवनासमोर बोर्ड घेऊन बसायची आणि दुपारी ३ वाजता घरी परतायची. २० ऑगस्ट २०१८ पासून हा सिलसिला सुरू झाला.
त्याच सुमारास स्वीडनमध्ये सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली. ग्रेटाचा विषय गाजू लागला. तिच्याभोवती हजारो लोक गोळा झाले. ती म्हणते की, ही माणसं नेहमी होतीच. फक्त माझ्यामुळे त्यांना विषयाचे महत्त्व कळले. तिला या जमावापुढे भाषण करायचे होते. परंतु इतकी छोटी मुलगी काय भाषण करणार असे तिच्या आईवडिलांना वाटले. ग्रेटाने मात्र जिद्द केली. तिने अत्यंत सुंदर भाषण केले. अनेकांनी तिचे भाषण फोनवर टेप केले. तिचे फोटो काढले आणि ती एकदम प्रसिद्ध झाली.
पर्यावरण या विषयावर डावोस येथे शिखर परिषद भरली. सर्व देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते, प्रत्येक जण अनुभवी होता. निर्णय घेण्याची ताकद त्यांच्यात होती. या शिखर परिषदेला ग्रेटाला बोलावले. ग्रेटा थनबर्ग तेव्हा १६ वर्षांची होती. तिने न घाबरता तिथे भाषण केले. ती चारच ओळी बोलली, पण या चार वाक्यात संपूर्ण विषय तिने सामावून घेतला. ग्रेटा म्हणाली की, तुम्ही सर्व जण पर्यावरण जपण्याबाबत आशावादी आहात. पण मला तुमचा आशावाद नको आहे. तुम्ही भयभीत व्हावं अशी माझी इच्छा आहे. पर्यावरणाचा नाश झाल्याने जे संकट कोसळणार आहे त्याचे तुम्हाला भय वाटावे ही माझी इच्छा आहे. तुम्ही घाबरून जावे आणि त्यातून मार्ग काढावा ही माझी इच्छा आहे.
गेले आठ महिने ग्रेटाचा लढा सुरू आहे. तिला वाढता पाठिंबा मिळतो आहे. जगभरातील विद्यार्थी पर्यावरण रक्षणासाठी शाळांतून मोर्चे काढत आहेत. हजारो तरुण-वृद्ध पर्यावरणासाठी आंदोलनात उतरत आहेत. त्यांना नेता मिळाला आहे. ग्रेटा गेल्या काही महिन्यांत फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटली, जर्मनीच्या चॅन्सलरना भेटली. अनेक शाळांच्या मोर्चात ती सामील झाली. तिला असंख्य पुरस्कार मिळाले. नोबेल पुरस्कारासाठी तिचे नामांकन झाले. पण अजूनही ती स्थिर आहे. तिने एक पुरस्कार नाकारला. कारण तो पुरस्कार घ्यायला तिला विमानाने जावे लागले असते आणि ती विमान प्रवास करीत नाही. कारण विमानाच्या इंधनाने पर्यावरण हानी होते. तिच्या आईवडिलांनी त्यामुळेच इलेक्ट्रीक गाडी घेतली आहे त्यातून ती प्रवास करते.
ऑगस्ट २०१८ मध्ये सुरू केलेले आंदोलन अजूनही सुरू आहे. ऊन, पाऊस, बर्फ काहीही असो ती आजही दर शुक्रवारी बोर्ड घेऊन स्वीडनच्या संसद भवनासमोर बसते. मात्र आता ती एकटी नसते. तिच्या आंदोलनाचा परिणाम झाला आहे का? ती यशस्वी झाली आहे का? सर्व देश पर्यावरणाच्या बाबतीत जागृत होतील अशी तिला आशा वाटते का? २८ मे या दिवशी जगभरात पर्यावरणासाठी मोठे आंदोलन छेडले जाणार आहे त्याचा परिणाम चांगला होईल का? ग्रेटाला हे असंख्य प्रश्न विचारले तेव्हा ती म्हणाली की, मी जे करते आहे आणि आम्ही सर्व जण मिळून जे करीत आहोत त्याने काही फरक पडणार आहे की नाही हा विचारच माझ्या मनात येत नाही. कारण मी जे करते आहे ते करणे आवश्यक आहे. अगदी सर्व आशा संपली तरी आपण आपली जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीने प्रयत्न करीत राहिलेच पाहिजे, इतकेच मला समजते.
ग्रेटाचे हे शब्द म्हणजे अंतिम उपदेश आहे. यानंतर काही बोलायचीच गरज नाही. केवळ कर्म करण्याची गरज आहे. आता ऐन निवडणुकीच्या काळात या विषयावर अग्रलेख का लिहिला, असा प्रश्न अनेकांना पडेल. माझ्या मनातही हा विचार क्षणभर आला. पण हा विषय आताच मांडणे महत्त्वाचे आहे. कारण निवडणूक कोणत्या विषयावर लढली जाते त्यावर देशाच्या नागरिकांची प्रगल्भता सिद्ध होते. आज जात आणि धर्मावर निवडणूक लढणारा आपला देश ख-या समस्यांना महत्त्व देईल तेव्हाच ख-या अर्थाने ताकदवान होईल. ग्रेटा अस्वस्थ आहे. आपणही अस्वस्थ झाले पाहिजे. होय ना?

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!