सिंबॉल ऑफ नॉलेज..!
— प्रा. शिवाजी वाठोरे
बोधिसत्त्व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ वा जयंती उत्सव नुकताच संपूर्ण देशभर साजरा करण्यात आला. काहींनी नाचून तर काहींनी बाबासाहेब वाचून साजरा केला. बाबासाहेब म्हणजे ज्ञानसूर्य. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गरिबीचे भांडवल न करता स्व कष्टाने तमाम भारतीय जनतेसाठी रात्रंदिन मेहनतीने मानवी मूल्यांचे संवर्धन करण्याचा कसोशीने प्रयत्न करणारे महामानव म्हणून ज्यांची सबंध विश्वभर ख्याती आहे, त्या महामानवाची जयंती विश्वातील १५२ पेक्षा अधिक देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महान ज्ञानपिपासू, राष्ट्रप्रेमी, शिक्षणतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, तत्त्ववेत्ता, कायदे पंडित समाजकारणी, राजकारणी, द्रष्टा नेता अशा अनेक गुण वैशिष्ट्यांनी ओतप्रोत भरलेले हे महामानवाचे व्यक्तित्त्व.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर खरे तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आणि जो जो म्हणून बहिष्कृत, वंचित, मागासलेला अशा प्रकारच्या माणसांसाठी आपले संपूर्ण जीवन व्यतीत करणारा सूर्य. भारताचे संविधानकर्ते म्हणून सर्वांनाच ते माहीत आहेत. मात्र, काही नतद्रष्ट आणि कृतघ्न लोक “संविधान मसुदा समितीमध्ये आणखीही सहा जण होते, मग बाबासाहेब एकटेच संविधान निर्माते कसे? ” असा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करतात. हे सत्य आहे, की मसुदा समितीमध्ये अध्यक्षपदी बाबासाहेब (सेड्युल्ड कास्ट फेडरेशन) होते. तर सदस्य म्हणून एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. के. एम. मुंशी (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सईद मोहम्मद सादुल्ला (मुस्लिम लीग), अल्लादी कृष्णस्वामी अय्यर (अपक्ष), बी.एल. मित्तर (अपक्ष) आणि डी. पी. खैतान (अपक्ष) ह्यांची नेमणूक केलेली होती. मात्र, हे सर्व सदस्य काम करीत नव्हते. बाबासाहेबांनी एकट्याने संविधान लिहिले नाही, अशा वल्गना करणाऱ्या मुढांना हे माहीत नसते, की संविधान मसुदा समितीमधील एका सदस्याचे निधन झालेले होते. दोघे आजारपणाचे कारण देऊन कोणत्याही बैठकीस कधीच उपस्थित राहिले नाहीत. एक परदेशात गेलेले होते. या देशातील तत्कालीन सामाजिक स्थिती बघता यातील दोन सदस्यांची काम करण्याची तयारी नव्हती. सबब सर्व मसुदा बाबासाहेबांनी एकट्यानेच तयार केलेला आहे, हे जगजाहीर आहे. असे असले तरीही काही जण वैचारिक गोंधळ निर्माण करण्याकरिता अधून – मधून काहीतरी वावड्या उठवत असतात.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्राची राजधानी म्हणून आपण ज्या मुंबईचा उल्लेख करतो, ही मुंबई म्हणजे खरे तर महाराष्ट्राची शान आहे. मोठ्या प्रमाणावर केंद्र शासनास मुंबईकर कर देत असतात. ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. गुजराथचे व्यापारी, वकील आणि तत्सम मंडळींनी मुंबई गुजराथला जोडणे कसे योग्य आहे, हे पटवून देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता परंतु बाबासाहेबांनी एकट्यानेच त्यांचे म्हणणे खोडून काढत मुंबई महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्रातच राहील, हे ठासून सांगितले आणि रीतसर पुराव्यानिशी दाखवून दिले तेव्हा कुठे मुंबई गुजराथ्याच्या कचाट्यात जाता – जाता वाचली. याचे सर्व श्रेय बाबासाहेबांचे आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
बाबासाहेबांचे आणखी एक अधुरे राहिलेले स्वप्न म्हणजे त्यांना राजकीय क्षेत्रात निपुण असे प्रामाणिक कार्यकर्ते, नेते तयार करण्यासाठी तशी महाविद्यालये स्थापन करावयाची होती. तद्वतच १४ ऑक्टोबर १९५६ च्या धर्मांतर सोहळ्या नंतर आणखी एक मोठा धर्मांतर सोहळा घडवून आणायचा होता. मात्र, त्या नंतर काही दिवसातच त्यांचे महापरिनिर्वाण झाले आणि भविष्यात करावयाच्या काही बाबी राहूनच गेल्या.
“तू आहे सूर्यापरी राहिली कोठे दिशा
एवढे आम्हा कळे ही तुझी आहे दिशा”
असे गझलसम्राट सुरेश भट म्हणतात, ते अगदी खरे आहे. बाबासाहेबांचे आधुरे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता तुमची आमची सर्वांची आहे.
(लेखक प्रख्यात साहित्यिक, समीक्षक आणि सामाजिक चळवळीचे अभ्यासक आहेत.)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत