भीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

समानतेला धर्म मानणारे युगपुरुष

 भारतभूमीमधल्या नवरत्नांच्या खाणीतले अतिशय दिव्यरत्न म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. ज्यांना युगपुरुष म्हटले गेले. क्रांतीसूर्य म्हटले गेले. महामानव म्हटले गेले. अशा अनेक पदव्या लोकांकडून प्राप्त झालेले ते एकमेव महापुरुष ठरतात. आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन केले जाईल. प्रचंड विद्वत्ता आणि पददलित समाजाविषयीची प्रचंड तळमळ असलेल्या बाबासाहेबांनी नेहमीच संपूर्ण देशाचा आणि समाजाचा विचार केल्याचे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक कृतीवरून दिसून येते. आपल्या एका भाषणामध्ये त्यांनी आपले मनोगतच बोलून दाखवले होते. माझे तीन गुरू आहेत. भगवान बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले. माझी तीन दैवते आहेत. विद्या, विनय आणि शील. माझे तत्त्वज्ञान तीन शब्दांमध्ये गुंफता येते. ते म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव आणि शेवटी ते म्हणतात की, माझ्या वडिलांचे घर हे जसे धर्मासन होते. तसे ते विद्यासनही होते. खरे तर या मनोगतामध्ये बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवनाचे सार सामावले आहे. त्यांचे वडील धार्मिक होते. परंतु ते कबीराचे भक्त होते. कबीराचे अनेक दोहे त्यांना पाठ होते. त्यांनी आपल्या मुलाला म्हणजेच बाबासाहेबांना तू विद्वान हो. आपण गरीब असलो तरी चिंता करू नकोस, अशा प्रकारचे प्रोत्साहन दिले होते. कोणतेही व्यसन नसलेले हे घराणे विद्या किंवा शिक्षणाचे व्यासंगी म्हणूनच ओळखले जाते. बाबासाहेब आपले तीन गुरू सांगताना त्यातच विद्या, विनय, शील या तीनही गुणांचे दर्शन ते घडवतात. आणि या तीनही गुरूंच्या माध्यमातून समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचाही उद्घोष नकळतपणे करून जातात. गौतम बुद्धांचे संपूर्ण जीवन हे आध्यात्मिकदृष्टया उच्च दर्जाच्या स्वातंत्र्याचाच उद्घोष करणारे होते. समता आणि बंधुतेची केवळ शिकवणच नाही तर आचरण करून समाजाच्या हितासाठीच समर्पण करण्याची प्रेरणा त्यातून व्यक्त होते.
    बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान
 बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम किंवा ज्ञान प्राप्त करून घेण्याची लालसा ही किती प्रचंड स्वरूपाची होती हे त्यांनी मिळवलेल्या पदव्यांवरून लक्षात येतेच.  परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी एकूणच धर्म या संकल्पनेचे पुनर्जागरण घडवून आणले. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी जे तत्त्वज्ञान स्वीकारले ते पूर्णपणे मानवतेच्या उच्च मूल्यांचे जतन करणारे होते. म्हणूनच त्यांनी अनेक वेळेला असे म्हटले होते की, माझ्या या तत्त्वज्ञानाची पाळेमुळे धर्मात आहेतच. परंतु मी स्वीकारलेल्या धर्माचे दुसरे नाव बंधुता आणि मानवता आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म जरी स्वीकारलेला असला तरी या धर्मातली दोन महत्त्वाची जीवनमूल्ये बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवनाचा आधार होती. स्वातंत्र्य हवे असेल तर त्यासाठी शिक्षण किंवा विद्येशिवाय पर्याय नाही. अन्यथा जगाच्या सगळ्याच इतिहासामध्ये ही विद्या नसल्यानेच माणसाला गुलामासारखे वागवले गेल्याचे पाहायला मिळते. विद्या मिळाल्यानंतरही विनयशीलता हा सर्वात मोठा दागिना ठरतो. म्हणजेच आपण घेतलेल्या शिक्षणातून आपल्या आचरणाचे दर्शन घडले पाहिजे. हेच आचरण आपले शील किंवा चारित्र्य म्हणून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.  बाबासाहेबांनी लिहिलेली ग्रंथसंपदा तर अफाट आहेच.  परंतु त्यांच्या पदव्यांचा विचार केला तर एम. ए. कोलंबिया, एलएलडी कोलंबिया, डी लिट उस्मानिया, पीएचडी कोलंबिया आणि डीएससी लंडन ही त्यांची पदव्यांची यादी आहे. याशिवाय त्यांनी अर्थशास्त्र, राज्य शास्त्र, धर्मशास्त्र अशा अनेक विषयांवर लिहिलेली ग्रंथसंपदा म्हणजे एकूणच मानवी जीवनाचे सखोल चिंतन करणारी संपदा ठरते. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अपमानाचे अनेक प्रसंग सहन केले. परंतु कुठेही आपण घेतलेल्या विद्येचा आणि सभ्यतेचा अपमान होईल असे व्यवहार त्यांनी केले नाहीत, अन्याय होणाऱ्या समाजाचे मार्गदर्शन आणि अन्याय करणाऱ्यांचे प्रबोधन घडवून आणण्याचे मोलाचे काम त्यांच्याकडून घडले. म्हणजे ज्यांच्यावर अन्याय होत होता त्यांना सन्मानाची नवी वाट दाखवली तर अहंकारामुळे वाट चुकलेल्यांना त्यांची मूळ जागा दाखवून देण्याचे काम बाबासाहेबांनी आपल्या प्रत्येक कृतीतून करून दाखवले.

     तीच खरी आदरांजली
 आज त्यांच्या या सगळ्या जीवनप्रवासाचे किंवा विचारधनाचे सर्वात मोठे संचित भारताला संविधानाच्या रूपाने लाभले आहे. हे संविधान म्हणजे भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा सन्मान टिकवणारे अमूल्य असे साधन आणि माध्यम आहे. संविधान तयार करण्याची जबाबदारी जेव्हा बाबासाहेबांवर सोपवली गेली त्याचवेळेला ही अभूतपूर्व आणि ऐतिहासिक जबाबदारी पार पाडताना आगामी शेकडो पिढ्यांच्या कल्याणाचा आणि भारतासारख्या विविधता असलेल्या देशाचे सार्वभौमत्व चिरंतन कसे राहील याचाच विचार त्यांनी केलेला पाहायला मिळतो. संविधानातले प्रत्येक कलम ही सामान्यातल्या सामान्य माणसांच्या हक्कांचा, अधिकारांचा म्हणजेच पर्यायाने त्याच्या भवितव्याचाच विचार करणारी आहेत. या संविधानाच्या निर्मितीलाही पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. संविधान निर्मितीचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अनेक प्रकारच्या समस्या, अडचणीचे मंथन करून संविधानाचे हे अमृत त्यांनी देशाच्या हाती दिलेले आहे. ज्याला आपल्या धर्माचे मूळ मानले त्याच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन तत्त्वांवर हे संविधान आधारलेले आहे. यातल्या एकाही तत्त्वाचा ज्यावेळेला संकोच होईल त्यावेळेला त्याच्या इतर दोन तत्त्वांनाही बाधा पोहोचेल. बौध्द धर्माचा स्वीकार करूनही बाबासाहेबांनी या समता, बंधुतेला धर्माचे हे दुसरे नाव दिले आणि म्हणूनच संविधान हा भारताचादेखील तितकाच मोठा धर्म ठरतो. संविधान समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम बाबासाहेबांचे जीवन समजून घ्यावे लागेल. आणि बाबासाहेबांचे जीवन समजून घ्यायचे असेल तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तीन तत्त्वे सर्वप्रथम सगळ्यांना आचरणात आणावी लागतील. आणि तीच त्यांना सर्वांत मोठी आदरांजली ठरेल. अशा या महामानवास आमचे विनम्र अभिवादन.        साभार   :"नवा काळ", 

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!