डॉ बाबासाहेब आंबेडकरांना, भंडारा लोकसभा निवडणुकीत पाडणाऱ्या महार समाजाच्या भाऊराव बोरकरांची गोष्ट
आत्ता जसे फोडाफोडी करून राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभे करतात, अगदी तसेच काँग्रेसने १९५४ च्या भंडारा लोकसभा निवडणुकीतही शेड्यूल कास्ट फेडरेशनचे (शेकाफे)बाबासाहेबांचे कार्यकर्ते फोडले होते. पैकी भाऊराव बोरकरांना काँग्रेसने उमेदवारी दिली. बाबासाहेबांच्या पराभवासाठी काँग्रेसने ६५ वर्षांपूर्वी केलेली ही खेळी, आता तर सर्वच पक्षांचा ‘पॅटर्न’ बनलाय. लोकशाहीचे उद्गाते अन् संविधानाच्या शिल्पकाराचा त्या वेळी कसा पाडाव केला गेला, यासंदर्भातील खास विवेचन.
मुंबईत १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत बाबासाहेबांचा १४ हजार ३७४ मतांनी पराभव झाला होता. काँग्रेसचे नारायण काजरोळकर यांनी १ लाख ३७ हजार ९५० मते घेतली,
तर बाबासाहेबांना १ लाख २३ हजार ५७६ मते मिळाली होती.
याच दरम्यान भंडाऱ्यातून निवडून आलेले चतुर्भुज जसानी आणि तुलाराम साखरे विजयी झाले होते. पण जसानी ठेकेदार असल्यामुळे त्यांना खासदारकी गमवावी लागली. निवडणूकीपूर्वी नागपुरात ‘शेकाफे’च्या बैठकीत बाबासाहेबांशी रावसाहेब ठवरे यांचा वाद झाला होता. त्यामुळे ठवरेंसह काही कार्यकर्ते बाबासाहेबांवर नाराज होते. या नाराजीचा फायदा घेत काँग्रेसचे तत्कालीन नेते नाशिकराव तिरपुडे आणि मनोहरभाई पटेल यांनी ठवरेंना काँग्रेसमध्ये ओढले. आणि ठवरे समर्थक असलेल्या भाऊरावांना उभे केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्तोपंत ठेंगडी, भास्कराव निनावे यांनी बाबासाहेबांचा प्रचार केला. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, दादासाहेब गायकवाड, दादासाहेब कुंभारे, माईसाहेब आंबेडकर यांनी बाबासाहेबांचा प्रचार केला.
राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहर पटेल, पंडित नेहरूंचे विश्वासू होते. त्यांच्याच नेतृत्वात बाबासाहेबांना पाडण्यासाठी बाळकृष्ण वासनिक, नाशिकराव तिरपुडे, रावसाहेब ठवरे आणि बोरकर या टीमने काम केले (हे सगळे तत्कालीन हरिजन- महारच).
मनोहरभाई आणि जसानींचा विडीचा व्यवसाय होता. विडी मजूर म्हणून दलित वर्ग त्यांच्याचकडे कामाला होता. विडी मजुरी काढू अशी धमकी दिल्यामुळे हवालदिल मतदारांवर त्याचा परिणाम झाला. शिवाय १ रुपया आणि १ मिठाची पुडी मतदारांना दिली. बाबासाहेबांच्या सभेला लोकांनी जाऊ नये म्हणून भारत सेवक सिद्धार्थ या मन्साराम राऊत यांच्या वसतिगृहात जेवण दिले गेले.
मी त्या वेळी १४ वर्षांचा होतो. माझे शिक्षक भास्करराव पांढरीपांडे यांनी श्रीगणेश शाळेतील ११ विद्यार्थ्यांना सभेला जाण्यास सांगितले. पण मी एकटाच गेलो अन् सभेवर टिपणही लिहिले होते. बाबासाहेबांचा ८ हजार ६८१ मतांनी पराभव झाला. १ लाख ३२ हजार ४८३ मते त्यांना मिळाली. बोरकरांनी १ लाख ४१ हजार १६४ मते घेतली. बोरकर विजयी झाले, पण त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भंडाऱ्यातील लोकांनी कायमचा बहिष्कार टाकला होता
-प्रा. वामन तुरिले, निवडणुकीचे साक्षीदार-
अमरावती लोकसभा २०२४ ची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अमरावतीमध्ये पुन्हा आंबेडकर विरुद्ध भाऊराव बोरकर अशी चर्चा रंगली आहे. या निवडणुकीतील भाऊराव बोरकर सध्याचे विद्यमान आमदार असून १९५४ च्या निवडणुकीत ज्याप्रमाणे काँग्रेसने आंबेडकरांना विरोध करण्यासाठी त्यांच्या समाजातील उमेदवाराला उमेदवारी दिली त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये आंबेडकरांना पुन्हा विरोध करण्यासाठी काँग्रेसने बौद्ध समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिली.
अमरावती लोकसभा मतदारसंघात बौद्ध – बहुजन – मुस्लिम एकत्र आल्यास इथे मनुवादी प्रवृत्तीच्या उमेदवारास पाडणे अगदी सोपी गोष्ट होती. परंतु मनुवाद वाढला तरी चालेल पण सर्वांना समान अधिकार देणारा – आंबेडकरवाद वाढू नये, याकरीता काँग्रेसने आपल्या इतिहासातील खेळी, पुन्हा अमरावतीत खेळली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे – नातू, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे – चेअरमन, बौद्धजन पंचायत समितीचे – सभापती, इंदुमिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आंतरराष्ट्रीय पातळीचे स्मारक उभारण्यासाठी लढणारे – सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब, अमरावती लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी तर्फे लढतील असे म.वि. आ. च्या वरिष्ठ नेत्यांनी माननीय आनंदराज साहेबांना मागील महिन्यात कळविले.
परंतु मविआ च्या नेत्यांनी वेळेवर घुमजाव केले. आणि आंबेडकरांविरुद्ध भूमिका घेतली. अवघा महाराष्ट्र ज्या बाबासाहेब आंबेडकरांना आपले दैवत म्हणतो त्यांच्या नातवांना इथले प्रस्थापित पक्ष कायम विरोध करत आले.
कारण या देशात आंबेडकरांनी क्रांती घडवली – जाती, धर्म, पंथ, लिंग, राजा, प्रजा, गुलाम हा भेद नष्ट करून सर्वांना समान अधिकार दिले. हे येथील प्रस्थापितांना सहन झाले नाही.
एक आंबेडकर या देशाला भारी पडले आणि आता पुन्हा दोन आंबेडकर जर निवडून गेले तर या देशात नवक्रांती घडेल. आणि ती काँग्रेसला कधीही सहन होणार नाही म्हणून अकोल्यात श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर विरोधात – संघाचे स्वयंसेवक असलेले डॉ. अभय पाटील व अमरावतीत आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या विरोधात २०२४ मधील भाऊराव बोरकरांना उमेदवारी दिली आणि बोरकरांनी अतिशय आनंदाने ती स्वीकारली…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९५४ साली तत्कालीन महार समाजाचे दुभाजन करून भंडारा लोकसभा निवडणुकीत पाडण्याची षडयंत्र काँग्रेसने यशस्वी केले.
परंतु आताचा शिक्षित असलेला आंबेडकरी समाज यानंतर काँग्रेसच्या खेळीला कधीही बळी पडणार नाही आणि आंबेडकरांना विजयी केल्याशिवाय राहणार नाही…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत