दिन विशेषदेशभीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

माझ्या नावाचा जय-जयकार करण्यापेक्षा माझे अपुरे राहिलेले कार्य पूर्ण करा त्यासाठी प्राणाची बाजी लावा ! -विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

विश्वरत्न ,बोधिसत्व, महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
17 ऑगस्ट 1952 रोजी सिद्धार्थ कॉलेज येथे केलेले भाषण.विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

अस्पृश्यांचा उद्धारासाठी एका माणसाला युगात जे काही करता येणे शक्य होते ते मी केले आहे. माझे काही मार्ग यशस्वी झाले, काही झालेले नसतील पण माझे कार्य मी धैर्याने चालूच ठेवले आहे. 25 वर्षात मी तुमच्यासाठी जे कार्य केले ते एवढ्या अवधीत एका व्यक्तीने कधीही कुठे केलेले नाही. हे मी गर्वाने सांगत नाही तर आत्मविश्वासाने सांगतो. ही वस्तुस्थिती आहे माझ्या कार्याची दिशा तीन पद्धतीची होती!
1. अस्पृश्य समाजात प्रथम स्वाभिमान निर्माण करणे हे कार्य पृथ्वीमोलाचे मला वाटले. मी राजकारणात पडण्यापूर्वी अस्पृश्य समाज कोणत्या पातळीवर होता, कसा माणुसकी हीन बनला होता, याचे मी एक उदाहरण देतो. वीस पंचवीस वर्षांपूर्वी जळगाव येथे दरवर्षी ब्राह्मण भोजने घालण्याची प्रथा होती. ती भोजने झाल्यावर त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या गोळा करून अस्पृश्य लोक उकिरड्यावरून नेत असत. काही वेळा त्यांच्यात त्या उष्ट्या पत्रावळ्या बद्दल मोठे तंटे माजत असत.
या अवस्थेत अस्पृश्य समाज होता. केवळ तो माणुसकीहीन बनला होता असे नव्हे तर तसे मानण्यात तो धन्य मानीत होता. मानवी अधःपाताची ती कमाल होती.
मी गेली वीस पंचवीस वर्षात झगडून त्यांना सर्वस्वी सुखी करू शकलो नसलो तरी त्यांच्यात जाज्वल्य स्वाभिमान निर्माण केला आहे. अन्यायाविरूद्ध जगण्याचे सामर्थ्य (POLITICAL CONCIOUSNESS) निर्माण केले आहे हे काही साधेसुधे काम नाही.

  2. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना राजकीय हक्क प्राप्त करून देण्याची. पूर्वी दिल्ली कॅबिनेटमध्ये झाडूवाल्याचे सुद्धा काम मिळत नसे. आज पंचवीस वर्षांनंतर तेथे अस्पृश्य समाजाने मंत्री नेवून बसविला आहे.

  3. तिसरी गोष्ट शिक्षण क्षेत्रातील 25 वर्षांपूर्वी अस्पृश्य समाजाला शिक्षणाची सारी दारे बंद होती ती मी उघडी करून दिली आहेत. अस्पृश्य मुलांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सरकारशी झगडून स्कॉलरशिप व फ्रीशिप्स मिळवून दिल्या आहेत एवढेच नव्हे तर त्यांना आपले म्हणता येईल असे प्रगतीमान सिद्धार्थ नावाचे कॉलेज मी त्यांच्यासाठी काढून दिले आहे. या कॉलेजात 3000 अस्पृश्य विद्यार्थी आहेत. दर वर्षी त्यांना दोन हजार रुपयाच्या स्कॉलरशिप्स दिल्या जातात. त्यांना राहण्यासाठी जोडूनच बोर्डिंग काढले आहे. तसेच औरंगाबादला याच कॉलेजची शाखा उघडली आहे.
   4. आता एक गोष्ट करण्याची माझ्या मते अपुरी राहिली आहे ती म्हणजे मुंबई शहरात आपल्या समाजाच्या मालकीचा एक हॉल बांधण्यात माझा हेतू फार भिन्न आहे. मुंबई तर हॉल आहेत तेथे नाटके तमाशे, खेळ होतात. केवळ अशा तरी च्या करमणुकी करण्यासाठी हॉल बांधण्याचा माझा हेतू नाही. हा हॉल बांधण्यात माझा एक महत्वाचा उद्देश आहे. अस्पृश्य समाजावर हरघडी स्पृश्य हिंदू कडून खेड्यामध्ये अन्याय होत आहेत. आजच मला एक पत्र आले आहे की औरंगाबादच्या एका खेड्यात अस्पृश्य समाजाच्या वस्ती भोवती स्पृश्याने तारेचे कुंपण घालून त्यांना कोंडून टाकून त्यांचे जीवन असह्य केले आहे. अशा एक ना दोन हजारो तक्रारी प्रत्यक्ष माझ्याकडे येत आहेत. ती दुःखी तुमच्या पेक्षा मला जास्त कळतात. या दुःखाचे निवारण करण्यास एक मध्यवर्ती निधी हवा आहे. पैशाची जरुरी आहे. दुसरी गोष्ट ही की, या सर्व तक्रारी एकत्र जमवून ठेवण्यासाठी मुंबईला आपल्या समाजाची एक मध्यवर्ती कचेरी हवी आहे. त्या कचेरीत काम करणाऱ्या लोकांना पगार द्यायला हवा. पण या गोष्टी जमणार कशा? तेव्हा हॉल बांधून झाला तर वर्षाला एक लाख रुपये भाड्याच्या रूपाने आम्हाला मिळतील. हे ठिकाण मध्यवर्ती आहे. तेव्हा हॉल बांधून झाला तर ही एक मोठी अडचण दूर होईल. केवळ माझे नाव घेऊन जयजयकार करण्यापेक्षा जी गोष्ट माझ्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे ती करण्यासाठी प्राणाच्या मोलाने तुम्ही झटा. मी हॉल बांधण्याच्या कार्याला फार मोठे महत्त्व देतो. त्यामुळे अस्पृश्य समाजावर खेडोपाडी घडणाऱ्या अत्याचाराचे तात्काळ आपल्याला निर्दालन करता येईल. तेव्हा तीन महिन्याच्या आत तुम्ही या कार्यासाठी खेड्यापाड्यातून एक लाख रुपये जमवून पाठवा. प्रत्येक गावामधून दहा दहा रुपये जमवा आणि मुंबईला शेड्यूल्ड कास्ट इम्प्रोवमेंट ट्रस्टचे सेक्रेटरी श्री शांताराम आनाजी उपशाम यांच्याकडे पाठवा. तो हाल बांधण्यास मला दसऱ्याला सुरुवात करावयाची आहे मला एक लाख रुपयांची तूट आहे तेव्हा प्रत्येक गावाकडून दहा दहा रुपये प्रमाणे तालुक्यातून एक हजार रुपये जमवून पाठविण्याचे कामाला आज पासून लावा.

संदर्भ :-
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 3 पान नंबर 318

— प्रोटान सोलापूर

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!