
भाजपला पराभूत करायचे म्हणजे काय ? निवडणुकीत पाडायचे ! बस्स ! एव्हढेच ! अन् त्यांनी जे जीवघेणे धोरण लादले, लावले त्याचे काय ? ते वाऱ्यावर सोडून द्यायचे ! असे होत नाही ! आधी ते स्पष्ट व्हावे. आमची मते मागणाऱ्यांनी आधी ते सांगावे अशा कडक शब्दात आंबेडकरी विद्यार्थी युवक नेते बोलत होते.
हे तरुण दोस्त खास भेटीला आले होते. मन मोकळे करुन गेले. अक्षरशः खदखदत होते. यात अतुल खोब्रागडे, विक्रम बोरकर, मनोज गजभिये हे होते.
बोलतच होते. त्यांनी आम्हा व्यवस्था दु:खीतांचे (ओबीसी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक) संविधानिक जे जे हिसकले त्याचा आधी उपाय हवा. जाब हवा. जे जे हिसकले ते सर्व पूर्ववत होईल काय ते आधी सांगावे. तसे जाहीर करावे. तेव्हा विचार होईल. केवळ व्यक्तीनिहाय (मोदी, शहा, अडाणी, अंबानी) बोलले जाते. तेव्हढाच आमचा विषय नाही. आमचा विषय जाहीरनाम्याशी ‘कनेक्ट’ व्हावा.
अलीकडे भाजपला पाडायचे विषय घेऊन चर्चा झडत आहेत यावरून ते बोलत होते.
ते म्हणाले, आधी या प्रश्नांची उत्तरे हवीत. ‘लॅटरल ऐंट्री’ने शेकड्यात भरले गेले. त्यांचे काय करणार आहात. त्यांची सुटी करावी. त्याजागी पूर्ववत पदभरती व्हावी. बजेटमध्ये अनुसूचित जाती जमाती चा आर्थिक कोटा पूर्ववत करावा. रद्दबातल केलेले कामगार कायदे पुन्हा बहाल करावे. सध्याचे मालकधार्जिणे कायदे रद्द व्हावे.
सरकारी नोकरीच्या कंत्राटीकरणावर बंदी यावी.रोजगार भरती व निर्मिती चे निश्चित धोरण सांगावे.सार्वजनिक उपक्रमांना विकणारे वा भाड्याने देणारे चलनीकरण धोरण निकालात काढावे. शैक्षणिक धोरणाची झालेली हिंदुत्व दीक्षा बदलवून धोरण आधीसारखे ठेवावे. बॅंकेच्या कर्ज माफी धोरणाची स्पष्टता काय ? या आणि अशाच आशयांच्या धोरणाचे निश्चित आश्वासन असेल तरच विचार करु असे या तरुणांचे मत दिसले. याशिवाय, सत्ताकारणात बौद्ध समाजाचे प्रतिनिधित्व किती यावर या तरुणांचा फार कटाक्ष दिसला. टीचभर समाजांना ढीगभर प्रतिनिधित्व हे वास्तव असतांना सत्ताकारणात बौध्दांची कोंडी यावर ते चिंतीत दिसले. ही चिंताच नवी घुसळण असू शकेल ! प्रत्येक बाबतीत सामाजिक स्तरावर चर्चा व लोकांच्या सूचना बाब नेतृत्वविहिन समाजाकडे तर जाणार नाही यावरही ते गंभीर दिसले.
वंचित आघाडीला इंडिया वाल्यांनी दिलेल्या वागणुकीवर या तरुणांचा रोष दिसला. मात्र, भावनिक आंदोलनावर ते मनापासून नाराज दिसले.
ऐकत होतो. ते बोलत होते. तरुणांच्या मनात काय चाललय.. याचा हा झरोका असू शकतो !
–रणजित मेश्राम
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत