भगवान बुद्धांची शिकवण-भाग १०४ आणि शेवटचा

उपसंहार
‘भगवान बुद्धांची शिकवण’ या लिखाणाबाबत थोडीशी माहिती…
मी जिथे जिथे नोकरीला होतो, त्या त्या ठिकाणी सामाजिक कार्य करीत असताना मला असे आढळून आले होते की, लोकात सामाजिक कार्याप्रती जागृती आणि बांधिलकीचा अभाव, ह्यामुळे कमालीची उदासिनता दिसून आली होती. परिणामतः त्यांना नकारात्मक भावनेने घेरलेले दिसत होते.
मी विद्युत मंडळात नोकरी करून लेखाधिकारी या पदावर सेवानिवृत्त झालो. खरं सांगायचं म्हणजे विद्युत मंडळाच्या वसाहतीत अशी परिस्थिती होती की, निम्म स्तरातील कर्मचारी एकवेळ कार्यक्रमात भाग घेऊन समाजात मिसळत होता. पण अधिकारी आणि अभियंता वर्ग काही अपवाद सोडला तर सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळायला मागेपुढे पहात असत. कदाचित शिक्षण आणि कार्यालयीन अधिकारांमुळे त्यांच्यात अहंकार व वरिष्ठपणाची भावना निर्माण होत असावी. त्याशिवाय कदाचित आपली ओळख उघडी तर पडणार नाही ना, याचीही अनामिक भीती त्यांना वाटत असावी.
मी अंकेक्षक (ऑडिटर) असल्याने माझा संबंध अधिकारी वर्गांशी नेहमी येत होता. माझ्या कार्यालयीन पदांमुळे म्हणा किंवा सामाजिक कार्यामुळे म्हणा ते माझं थोडंफार ऐकत असत. म्हणून मी चर्चेत त्यांना जाणीव करून देत होतो की, आपण उच्च शिक्षित असल्याने जेव्हा कोणत्यातरी निमित्ताने समाजात जाऊ; तेव्हा समाजातील लोकांची सहज अपेक्षा असते की, आपण बौध्द धम्माबाबत त्यांना मार्गदर्शन करावे. पंचशील, चार आर्यसत्य, अष्टांगींक मार्ग, दहा पारमिता, प्रतीत्य समुत्पादाचा सिद्धांत इत्यादी धम्माच्या मौलिक सिद्धांताबाबत आपल्याला कोणी विचारले आणि आपण सांगू शकलो नाही तर मान खाली घालावी लागेल. अशी नामुष्कीची परिस्थिती आपल्यावर येते.
काय होतं की, लोक जेव्हा सामुदायिकरीत्या त्रिशरण-पंचशील म्हणतात; तेव्हा त्यांच्या बरोबरीने आपल्यालाही म्हणता येतं. पण एकट्याला म्हणायची पाळी आली की अवघडच होतं. आधी ‘अदिन्नदाना वेरमणी’ आहे की पाणातिपाता वेरमणी आहे, ते कळत नाही. मग पंचशीलाचा अर्थ सांगणं तर दूरच राहिलं. अशी नामुष्कीची परिस्थिती आपल्यावर ओढवू नये म्हणून आम्ही भुसावळ येथील वसाहतीत ‘बुद्धिस्ट स्टडी सर्कल’ स्थापन करून धम्माचा अभ्यास करू लागलो.
मी मा. कांशीरामजी यांच्या ‘बामसेफ’ व ‘पे बॅक टू द सोसायटी’ या संघटनेत सक्रियपणे काम करीत होतो. म्हणून या संघटनेत त्यांचा सहभाग वाढावा हाही माझा दृष्टिकोन होता.
त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दिशानिर्देशानुसार ‘शासनकर्ती जमात’ बनण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी चळवळीला वेळ, बुद्धी व पैसा अर्पण करणे कसं आवश्यक आहे, याची पण चर्चा करीत होतो. अशारीतीने त्यांच्यात सामाजिक दायीत्वाची जाणीव निर्माण होत होती.
त्याशिवाय समाजकार्यात काम करताना मला असाही अनुभव आला होता की, सारेच नोकरीदार वर्ग समाजकार्यापासून अलिप्त असतात असे नव्हे. त्यांच्यात जागृतीचा अभाव आणि ज्ञान नसल्याने ते समाजकार्यात भाग घेत नव्हते. आपण आंबेडकरी चळवळीचे लाभार्थी आहोत, हा मुद्दा त्यांना समजावून सांगितल्याने त्यांच्यात पण सामाजिक दायीत्वाची जाणीव निर्माण होऊन समाजकार्याशी जुळू शकतात, असा मला अनुभव आला होता.
याच अनुषंगाने मला भगवान बुद्धांच्या शिकवणीची माहिती देणारी छोटेखानी पुस्तक असावे अशी कल्पना सुचली. म्हणून मी या विषयावर टिपणी लिहायला सुरुवात केली. पुस्तक पण तयार केलं आणि ते ऑमाझान किंडलवर ईबुकच्या स्वरूपात टाकलं. परंतु ते अपुरं होतं. म्हणून या पुस्तकात आणखी भर टाकून ही लेखमाला तयार केली.
मोठमोठे प्रकरण असले की वाचायला कंटाळा येतो असे सर्वसामान्य वाचकांचा अनुभव आहे. म्हणून मी लहान लहान १०३ भाग करून फेसबुक व व्हाटसऍप गृपवर टाकत आलो. तसेच काहीजणांना वैयक्तिकरित्या पण पाठवीत आलो.
आणखी सांगायचं म्हणजे हे भाग नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या ‘बहजुन सौरभ’ या दैनिकात पण प्रसिद्ध होत आहे. त्याशिवाय ‘दैनिक जागृत भारत’ व ‘घटनेचा शिल्पकार’ या दैनिकात सुद्धा प्रकाशित होत आहे. या दैनिकांच्या संपादकांचे आभार व्यक्त करून धन्यवाद देतो.
आनंंद या गोष्टीचा वाटतो की, या लेखमालेला सर्विकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. मला काहीजणांनी फोन करून व्यक्तीश: चर्चा पण केली आहे. त्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे.
आता मात्र ही दिर्घकाळ चालत आलेली लेखमाला मी येथेच संपवीत आहे.
या लिखाणात अनवधानाने काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या माझ्या लक्षात आणावे, जेणेकरून त्यावर विचार करता येईल.
यथावकाश मी पुस्तक छापण्यासाठी कार्यवाही करणार आहे. पुस्तक प्रकाशनानंतर परत आपल्याशी जरूर संपर्क करीन. धन्यवाद…
समाप्त
जयभीम…!!!
आर.के.जुमळे,
अकोला
दि. २६.३.२०२४
मो. ९३२६४५०५०६
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत