“हळदीकुंकू वाद” हा स्त्रियांची मानसिक गुलामगिरी दृढ करणारा

मानसिक गुलामगिरी हि शारीरिक गुलामगिरी पेक्षा अधिक घातक असते कारण त्यात आपण गुलाम असण्याची जाणीवच होत नाही.
म्हणून परंपरेनी बहाल केलेल्या सणावारांची चिकित्सा न करता त्यांना रहाटगाडग्यासारखे सुरु ठेवल्यास मानसिक गुलामीचा विळखा अधिकाधिक घट्ट होत जातो. हळदीकुंकूवाच्या निमिताने स्त्रियांचे स्नेहवादी मिलनाची परंपरा हे असेच एक लोंढणे होय. मुजोर गाई बैलाच्या गळ्यातही गावखेड्यात लाकडी ओंडक्याचे लोढणे बांधतात. परंतु ते ओझेरूपी लोढणे लवकर सोडता येते. मात्र स्त्रियांच्या मेंदूत भिनलेले खुळचट परंपरांचे लोंढणे निघाल्याशिवाय स्त्रिया स्वसन्मानाची भाषा बिल्कुल करणार नाहीत.
हळदी कुंकू लावणे म्हणजे काय? तर परंपरांच्या सौभाग्याला दीर्घायुष्य चिंतणे. म्हणजे नेमके काय? हळदी हे सौभाग्याचे प्रतिक व ते प्रतिक नवऱ्याचे अस्तित्वाशी निगडीत आहे; म्हणूनच कुमारिका आणि विधवांसाठी हा सण नसतो कारण कुमारिका (कौमार्य भंग न झालेल्या) स्त्रियांचे भाग्य अद्याप फडफडलेले नसते तर विधवांचे भाग्य तडफडलेले असते (नवरा नसणे या अर्थाने). म्हणून विवाहित स्त्रियांनाच सौभाग्यवती संबोधन आहे. तर कुमारिका लग्नासाठी तयार होते तेव्हा विवाहपत्रिकेवर चि. सौ. का. चिरंजीव सौभाग्याची (आ)कांक्षिणी असे-लिहिले जाते.
पुरुषांसाठी नुसते ची(चिरंजीव)चालते; ‘त्यांचेसाठी चिरंजीव सौभाग्याचा(आ)कांक्षीण्या’(ची. सौ.का.)अशा प्रकारच्या संबोधनाची गरज नसण्यबाबत कोणी ठरवले? तर अधर्मी संस्कृतीच्या नायकांनी. म्हणूनच तर स्त्रियांसाठी वट – सावित्री आहे. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून नवरोबा (सॉरी, पती परमेश्वर)च्या दीर्घायुष्याची कामना करायला लावणारा सण किती लोकप्रिय (स्त्रीप्रिय)आहे. स्त्रियांची बदनामी करणारा तुळशी विवाह, स्त्रियांचा पुरुषांनी जाहीर फोदा करणारा होळीचा पाडवा अस्तित्वात आहे.
मात्र स्त्रियां बिचाऱ्या जणूकाही मुक्या गाईसारख्या फक्त माना डोलवित जगतात; नव्हे त्यात अभिमान शोधतात . चतुरश्रेणीवादी संस्कृतीतस्त्रियांसाठी जेवढेही प्रमुख सण आहेत ते त्यांना नवऱ्याभोवती नाचायला लावणारे आहेत .
आपल्या बायकोने दीर्घायुषी व्हावे अशी कामना करायला लावणारा एक तरी सणवार या संस्कृतीत आहे का? नाही…. कां?’ कारण त्याची पुरुषाला गरजच नाही. हे कोणी शिकवले? संस्कृतीने.?
अशा संस्कृतीत वाढणारी पिढी म्हणूनच विज्ञानाचे शिक्षण घेवूनही अविचारी, रूढीवादी व स्त्री विरोधी तयार होते. म्हणूनच तर भाऊ हा पुरुष आपल्या बहिणीच्या नवऱ्यासाठी व बाप हा पुरुष आपल्या मुलीच्या नवऱ्यासाठी जावयासाठी हुंड्याची व्यवस्था करतो. हि खरेदी-विक्री कोणाची होते? तर एका स्त्रीची होते. याचा विचार कोणताही बाप-भाऊ करीत नाही. त्यामुळे बिनबुडाच्या लोट्यासारखी स्त्रीची अवस्था आहे. म्हणूनच तर तिचे दान केले जाते आणि पुरुष दानशूर बनतो (दान देणारा बाप व घेणारा जावई ) यात तिची फक्त जागा बदलते कारण ती हस्तांतरनीय(Transferrable ) असते.
म्हणून हळदीकुंकू हे नुसतेच हळदीकुंकू नाही तर सांस्कृतिक गुलामीची खरुज आहे. जिचा प्रसार /प्रसार मकरसंक्रातीला व्यापक स्तरावर केला जातो. पण त्या खरूजेचेही जतन स्त्रिया केवळ यासाठी भक्तीभावाने करतात कारण त्यांचा सबंध धर्माच्या परंपराशी लावला जातो.
परंतु या ‘खुळचट परंपरांचा त्याग आणि समतामूलक परंपराची निर्मिती’ हि प्रक्रिया सुरु केल्याशिवाय स्त्रिया मध्ये मेंदू नावाचा अवयव आहे असे म्हणता येणार नाही. धर्माच्या नावावर जर स्त्रीविरोधी परंपराचा धिक्कार स्त्रिया करणार नसतील तर नुसतीच सावित्रीमाई जयंती साजरी करून काय फायदा?
त्यापेक्षा तर सत्यवान सवित्रीचा आदर्श घेणे चांगले. अज्ञानवंश असल्याने नवरोबाला यमाच्या तावडीतून सोडविण्यासाठी बिचारी प्रयत्नांची पराकाष्ठा करते.
परंतु तसाच एखादा तरी सत्यवान या परंपरेनी कां निर्माण होऊ दिला नाही जो आपल्या बायकोसाठी एवढा व्याकूळ होतो. उलट
बायको मेल्या नंतर लगेच दुसऱ्या तरुणींच्या प्रतीक्षेत असतो.
म्हणूनच तर एका स्त्रीवर अधिकार दाखविणाऱ्या पाच भावांचा आदर्श सांगणारी संस्कृती आपली दुष्कृति ठरविली जात नाही.
दुसऱ्या पुरुषांच्या सांगण्यावरून आपल्या वाग्दत बायकोला त्यागणारा पुरुषोत्तमही देव ठरून पूजनीय मानला जातो.
तेही कमी ठरेल की काय स्त्रियांचे कपडे पळवून त्यांना कपडे परत करण्याविषयी विचार करायला लावणारा स्त्रीलंपट देवपुरुष ‘महान’ ठरतो.अर्थात पुरुषांनी आपल्या स्वार्थाखातर हे केले म्हणून त्यांसाठी असे भोगवादी संस्कृतीचे भोक्ते असणारे “देव-पुरुष” असणे आश्चर्याचे नाही.
परंतु अशा भोगदेवांची पूजाअर्चना करायला लावून आमच्या चौथ्या दर्जाच्या हिंदू भगिनींनी आपल्या मुलामुलींवर कोणते संस्कार घडतील याचा विचार का करू नये??? संकलन.. अँड. प्रियांका
सदधर्म संदेश , फेब्रुवारी २०१२, मासिक मधून.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत