भगवान बुद्धांची शिकवण-भाग ८४

जैन तीर्थकांचे आरोप
जैन तीर्थकारांनी पण भगवान बुद्धांना बदणाम करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यशस्वी झाले नाहीत.
त्यांना वाटू लागले की, श्रमण गौतमाच्या प्रभावामुळे लोक आता आपणास आदर दर्शवीत नाहीत. एवढेच नव्हे तर आपल्या अस्तित्वाची देखील त्यांना जाणीव दिसत नाही.
म्हणून त्याचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी त्यांनी एका सुंदरीची मदत घेतली.
तिला दररोज सांयकाळी जेतवनाकडे श्रमण गौतमाकडे त्यांच्या गंधकुटीत राहण्यास चालले असल्याचे खोटेच सांगायला सांगितले.”
काही दिवसांनंतर तीर्थकांनी मारेकऱ्यांकडून तिला ठार मारण्यात आले आणि गौतमाच्या गंधकुटीजवळच्या कचराकुंडीत तिचा देह फेकून दिला.
सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने शोध करताना कचरापट्टीत तिचा देह त्यांना आढळला.
आपल्या गुरुंची अब्रू वाचविण्यासाठी सुंदरीची हत्या केल्याचा आरोप तीर्थकांनी तथागतांच्या शिष्यांवर केला.
सुंदरीची हत्या केल्याबद्दल मिळालेल्या धनाची वाटणी मारेकरी दारुच्या गुत्त्यात करीत असताना आपआपसात भांडू लागले.
सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब पकडले आणि त्यांनी गुन्हा कबूल केला. ज्यांच्या प्रेरणेने ही हत्या करण्यास प्रवृत्त झाले त्या तीर्थकांचाही त्यांनी उल्लेख केला.
अशा प्रकारे तीर्थकांचा उरलासुरला प्रभावही त्यांनी गमावला.
त्यांनी दुसऱ्यांदा आणखी एक प्रयत्न करून पाहिला. ह्यावेळी त्यांनी अनैतिकतेचा आरोप केला.
त्यांनी श्रमण गौतमांच्या चारित्र्याबद्दल कंडी पसरवून संघाला बदनाम करण्याचा गुप्त कट रचला.
त्यावेळी श्रावस्तीमध्ये चिंचा नावाची ब्राम्हणी योगिनी राहत असे. तिचा देह आणि रुप आकर्षक होते, आपल्या अंगविक्षेपांनी ती वासनोत्तेजक प्रभाव निर्माण करु शकत असे.
तीर्थकांपैकी एका कुटील तीर्थकाने सुचवले की, चिंचाच्या सहाय्याने गौतमाबद्दल कंडी उठवून त्याला बदनाम करणे सुलभ होईल. बाकीच्या तीर्थकांनी ह्या सूचनेस संमती दिली.
स्त्रीसुलभ आकर्षणकलेत आणि नैसर्गिक सौंदर्यविशेषात चिंता कुशल होती. श्रावस्तीत नागरिक जेतवनातून प्रवचन ऐकून परत येत. त्या वेळी रक्त वस्त्र परिधान करुन सुगंध लेवून, हातात पुष्पमाला घेऊन चिंचा जेतवनाकडे निघे.
तिच्या वागण्यातून लोकांच्या मनात संदेह निर्माण होई.
तिने सांगण्यास सुरुवात केली की श्रमण गौतमापासून आपल्याला गर्भप्राप्ती झाली आहे. काही लोकांनी तिच्या ह्या शब्दावर विश्वास ठेवला.
नवव्या महिन्यात तिने एक लाकडाची फळी आपल्या पोटावर बांधली आणि कीटकदंशांनी हात सुजवून घेऊन ज्या स्थानी तथागत बुद्ध भिक्खू व गृहस्थांसमोर प्रवचन करीत होते तिथे जाऊन ती म्हणाली, “हे महान उपदेशक, आपल्याशी संबंध येऊन मी गर्भवती झाले आहे आणि माझा प्रसुतीसमय समीप आला आहे.”
“आपण माझ्या प्रसुतीची व्यवस्था करावी.” आपले प्रवचन अर्धवट सोडून अत्यंत संयमाने, गंभीर स्वरात तथागत बोलले,
“हे भगिनी, तू जे काही आता सांगितलेस त्याची सत्यासत्याला फक्त आपण दोघासच माहीत आहे.”
चिंचा जोरजोराने खोकत म्हणाली,
“होय गुरुवर्य, असली गोष्ट फक्त आपण उभयतासच माहित असणे संभाव्य आहे.”
तिच्या खोकल्यामुळे पोटावर बांधलेल्या फळीच्या दोऱ्याची गाठ सैल होऊन ती फळी सरकून तिच्या पायाशी पडली. चिंचा ह्यामुळे अस्वस्थ झाली.
लोकांनी काठ्यांनी आणि दगडांनी तिला हाकलून दिले.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.६.३.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ खंड सहावा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत