आर्यअष्टांगिक मार्ग भाग ३७

समाधी
समाधीमध्ये सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी हे तीन मार्ग येतात. यापैकी सम्यक व्यायाम व सम्यक स्मृती या दोन मार्गाची माहिती मागील भागात घेतली आहे. या भागात सम्यक समाधी मार्गाची माहिती घेऊया.
३) सम्यक समाधी
अष्टांगिक मार्गातील आठवा आणि शेवटचा मार्ग सम्यक समाधी हा आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम व सम्यक स्मृती प्राप्त करुन घेण्यासाठी लोभ, द्वेष, आळस, व सुस्ती, संशय आणि अनिश्चय हे पाच अडथळे येत असतात. ते दूर करण्याचा मार्ग म्हणजे सम्यक समाधी हा होय. कोणतेही कार्य करण्यासाठी सम्यक समाधी महत्वाचे कार्य करते.
मनाला स्थायी व कायम स्वरुपाचे वळण सम्यक समाधीद्वारे लावता येते. चित्ताला स्थिर करण्याचे कार्य सम्यक समाधी करतो. सम्यक समाधी मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेचे काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते. त्यामुळेच अकुशल कर्माकडे आकर्षित होणार्या मनाच्या प्रवृतीला दूर ठेवते. सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीचाच नेहमीच विचार करण्याची सवय लावते. सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशीच प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते.
मिलिंद प्रश्नामध्ये समाधीचे गुण सांगितले आहेत. समाधिस्त व्यक्ती स्वत: आपला रक्षक बनतो. त्याच्यामध्ये अजेय शक्ती निर्माण होते. त्याच्या सर्व अवगुणाचा नाश होतो. सर्व अपयश दूर होतात. यशाची वृध्दी वाढते. संतुष्ट होतो. असंतोषापासून तो दूर राहतो. भयभीत होत नाही. आळस राहत नाही. उत्साहित होतो. राग, द्वेश, मोह, गर्वापासून तो दूर राहतो. त्याचा संदेह दूर होतो. त्याचे चित्त स्थिर होते. प्रसन्न राहतो त्याचे चित्त मृदु बनते. गंभीर होतो. त्याला चांगला लाभ प्राप्त होते. आदरनिय बनतो. प्रितिवान बनतो. अप्रमादापासून दूर राहतो. त्याला सर्व संस्काराचे दर्शन होते. पुनर्भव होत नाही.
विपश्यना भावना करणार्याला जे अहर्ताचे ज्ञान प्राप्त होते ते यथार्थ ज्ञान असते. समाधीमध्ये मनाला आनंद वाटते. सम्यक समाधीमुळे ताबडतोब फळाची प्राप्ती होत असते. सम्यक समाधी विद्या आणि ज्ञानाचे सार आहे. योग्यप्रकारे छावलेल्या घरात जसे पाणी शिरत नाही, तसेच समाधिस्त चित्तामध्ये राग, लोभ इत्यादी मनोविकार शिरत नाहीत असे सम्यक समाधीचे फायदे व महत्व धम्मपदामध्ये सांगितले आहे.
मानसिक स्थिरतेसाठी ध्यान-भावनेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. केवळ सम्यक समाधीच बिघडलेल्या चिंतन, मननाला शांत राखू शकते.
पी.नरसु या लेखकाने ‘बौध्द धर्म का सार’ या पुस्तकात दहा प्रकारचे फायदे सागितले आहेत. ते असे-
१. जेव्हा माणूस विधीपूर्वक ध्यान-भावनेचा अभ्यास करतो तेव्हा त्याचे सर्व इंद्रिय शांत व गंभीर होतात आणि त्याला हे माहित पण पडत नाही. तो त्यात आनंद घेऊ लागत असतो.
२. मैत्री भावना त्याच्या हृदयाला भिडून जात असते आणि तो सर्व प्राण्यावर आपल्या बहिण-भावासारखे प्रेम करीत असतो.
३. प्रेमाची आंधळी इर्षा सारख्या विषारी आवेशाला तो आपल्या चित्तातून हळूहळू काढून टाकतो.
४. सर्व इंद्रियांचे निरिक्षण केले जात असल्यामुळे ध्यान-भावना माराच्या आक्रमणापासून सुरक्षित राहते.
५. जेव्हा हृदय पवित्र व प्रवृती शांत होत जाते; तेव्हा ध्यान-भावना करण्यावर कोणत्याही खालच्या स्तरावरचा आवेश त्याच्यावर आक्रमण करीत नाहीत.
६. जेव्हा चित्त वरच्या स्तरावर एकाग्र होतो; तेव्हा तो सर्व प्रकारच्या आकर्षणापाासून आणखी दूर राहतो.
७. जरी चित्त अहंकारापासून दूर राहिला तरी तो ऊच्छेदवादाच्या जाळ्यात गुंतून राहत नाही.
८. जीवन-मरणाच्या जंजाळामध्ये कितीही गुंतून असला तरीही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला दिसत असतो.
९. धम्माच्या खोलात जात असल्यामुळे भगवान बुध्दाच्या शिकवणीनुसार तो आपले जीवन व्यतीत करीत असतो.
१०. त्याला कोणत्याही प्रकारचा लोभ, मोह होत नाही.
ध्यानभावना असा एक अभ्यास आहे की, जो प्रकाशाकडे घेऊन जातो. जगाकडे त्याला एका नवीन रुपाने पाहण्याची दृष्टी येते. तो आसक्तीरहित, रागरहित व द्वेषरहित बनतो. ध्यानभावना हे चित्ताला विकसित करण्याचे एक साधन आहे.
अशा प्रकारे प्रत्येकांने अष्टांग मार्गाचा म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी ह्या सदाचार मार्गाचा अवलंब केल्यास एक माणूस दुसर्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा यापासून तो दूर राहील.क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१९.१.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत