राष्ट्रसंत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हंसराज कांबळे ✍️
8626021520
नागपूर.
महाराष्ट्रातील इतर संत आणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांनी स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्यासाठी संतांनी ज्वलंत प्रबोधन केले. जनजागृती केली आणि अखिल मानव समाजाला विश्वधर्माची शिकवण देणारे महापुरुष म्हणजे राष्ट्रसंत होऊन गेलेत. ज्यांनी राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभिमान व धर्माचा विशाल दृष्टिकोन समाजाला पटवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले हे तितकेच खरे आहे.
राष्ट्रसंताचा धर्माचा अर्थ कर्तव्य कर्म असा होता. खऱ्या अर्थाने निष्काम कर्मयोगी होते. समाजात धार्मिक सलोख्याचे वातावरण निर्माण करून अंधश्रद्धा, जातीय विषमता, भेदाभेद नष्ट करण्याचा फक्त प्रयत्न केला. समाजातील धार्मिक दंभगिरी, धार्मिक अत्याचार सारे उघड्या डोळ्यांनी संतांनी पाहिले. भ्राम्हक गोष्टीला ईश्वराला व आत्म्याला मानत नव्हते. या सर्व गोष्टी कल्पनावादी असून वास्तव्यास देव वगैरे काही नाही हे पटवून देण्याचा त्यांनी फक्त कसोशीने प्रयत्न केला.
आपल्या गोरगरीब बांधवांसाठी गुलामीतून, अंधश्रद्धेतून कर्मठांच्या विषमतेतून मुक्त करण्याकरता त्यांनी विचारपूर्वक निग्रहाने संसार त्याग केला व वैराग्य धारण केले...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीला दहन करून भगवान बुद्धांच्या तत्त्वाची पाळेमुळे रुजवून भारतीय संविधान लिहून सर्व धर्मातील लोकांनी आपापल्या धर्मानुसार आचरण करावे आणी सर्व जातीतील लोकांना समानतेचा अधिकार राज्यघटनेनुसार प्रदान केला.आणी स्वतः ते म्हणतात -
मी भारतीय घटनेचा शिल्पकार आहे, मी ती घटना तयार केली आहे
संदर्भ – खंड. क्रं.18 भाग – 3. पृष्ठ. क्रं.414.पैरा – दुसरा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतातल्या जातीय वाद्यांकडून अतोनात छळ आणी शिव्याशाप खाव्या लागल्या. ते म्हणतात -
ज्या देशात इतके पूर्वग्रहण दूषित मनाचे लोक असतात त्या देशात जन्म घेणे हे फार मोठे पाप आहे. मला सर्व बाजूंनी शिव्याशाप खावे लागते. तरी मी केलेले कार्य पुष्कळ मोठे आहे आणि मी माझे हे कार्य मृत्यूपर्यंत चालू ठेवीन...संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. धनंजय किर. पृष्ठ. क्रं.550. पैरा - शेवटचा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन दुःखात गेले होते त्यावर ते म्हणतात -
माझ्या इतके कस्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही. म्हणून माणसाचे जीवन सुख - समाधानाच्या अभावी कसे कस्टमय होते याची जाणीव मला आहे. आर्थिक चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो त्या चळवळी विरुद्ध मी नाही. माणसाची आर्थिक उन्नती व्हावी अस पाहिजे.
संदर्भ – खंड.18. भाग – 3. पृष्ठ. क्रं.518. पैरा – 1.
आपणा सर्वांची शिक्षणाची व्यवस्था, आरक्षण, न्यायदान प्रक्रिया हे सगळे त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेत करून ठेवली असून राज्यघटनामुळेच भौतिक जीवनात सर्व सुख - सुविधा भोगीत आहोत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार आणि ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. म्हणून ते म्हणतात -
धर्मासाठी माणूस नाही, माणसासाठी धर्म आहे.
दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे तीन हेतू होते -
पहिला हेतू –
माणसाला बुद्धीवादी बनविणे.
दुसरा हेतू –
माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे.
आणी तिसरा हेतू-
ज्या भ्राह्मक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्याचे उगम स्थानच नष्ट करणे.
यालाच बुद्ध धम्माचा कम्म सिद्धांत अथवा हेतू वाद म्हणतात. हा हेतूवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवादी शिकवतो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते.
संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. पृष्ठ. क्रं.192. अनु. क्रं.13 ते 22. तृतीय खंड भाग चवथा. प्रकरण – 1.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हयातीत कृतीतून राबविलेली चळवळ आणि संघर्ष हा मरणप्राय असा असून माझ्या जागी दुसरा असता तर त्याचा समूळ नाश झाला असता असे म्हणून ते ओक्साबोक्सी दुःखतिशयाने म्हणतात -
माझ्या लोकांना सांग की, जे काही मी केले आहे ते मी अनंत हालअपेष्टा आणि आयुष्यभर दुःख भोगून आणि माझ्या विरोधकांशी लढून मी मिळविले आहे. महतप्रयासाने हा काफिला जिथे दिसतो आहे तेथे आणून ठेवला आहे. मार्गात कितीही अडचणी आणि संकटे आली तरी तो काफीला आता मागे फिरता कामा नये. जर माझ्या सहकाऱ्यांना तो काफीला पुढे नेता येत नसेल तर तो तिथेच त्यांनी ठेवावा. पण काही झाले तरी तो मागे नेता कामा नये. हाच माझ्या लोकांना माझा संदेश आहे
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. धनंजय कीर. पृष्ठ. क्रं.550 – 551. पैरा – शेवटचा पहिला.
जर एखादा मनुष्य आपल्या युक्तीप्रमाणे कृती करीत असेल बोले तैसा चाले असा वागत असेल तर तो पूज्यच मानावयास पाहिजे. परंतु एखादे चांगले तत्त्व मान्य असूनही त्या तत्त्वाप्रमाणे जर आचार करण्याचे धैर्य काही मनुष्याच्या अंगी नसेल तर त्यामुळे तत्वाच्या खरे पणाला बाधा येतो असे नाही.जगाच्या पाठीवरून सामाजिक विषमता संपूर्णपणे नष्ट अशी कधीच होणार नाही याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात –
सामाजिक समतेचे तत्व हे समाजाचे स्थैर्यासाठी कोनशिले इतकेच महत्त्वाचे आहे. नीतीच्या भक्कम पायावर समाजाची उभारणी करावयाची असेल, तर समाजाच्या प्रत्येक घटकाला धार्मिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रात समतेचे तत्व लागू करणे आवश्यक आहे.
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. धनंजय किर. पृष्ठ. क्रं.152. पैरा – खालून शेवटचा.
असहकारतेच्या चळवळीत असंख्य लोक कृती करतात. क्रांती हा असहकारितेचा प्राण आहे व धावपळ दाणादान ही तिची रीत आहे. अशी धावपळ व दाणादान मोठ्या प्रमाणावर केली तर तिचा शेवट बंडात होणे क्रमप्राप्त असते. यासाठी क्रांती म्हणजे काय? याविषयी बोलताना आणि लिहिताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात –
क्रांती रक्तलंच्छीत वा रक्तहीन असो परिणाम एकच. क्रांती म्हणजे स्थितंतर. क्रांती सुरू झाली म्हणजे तिच्या निर्णयाविषयी सारीच अनिश्चितता असते. तिच्या ओघात गोंधळ व धोका यापासून जास्त भय असते. क्रांती पुष्कळदा अटळ असते. तरीसुद्धा क्रांती व खरे खरे सामाजिक स्थित्यतर यातील फरक विसरता कामा नये. क्रांती एका पक्षातून दुसऱ्या पक्षाच्या वा एका राष्ट्राकडून दुसऱ्या राष्ट्राच्या स्वाधीन राजकीय सत्ता करते. अस्पृश्य वर्गांनी ( आताचे बौद्ध ) नुसत्या राजकीय स्थित्यतरावरच कोरडे समाधान म्हणून राहू नये. राजकीय सत्तेची अशातऱ्हेची विभागणी झाली पाहिजे की , त्यामुळे समाजात खरा पालट होऊन समाजात वावरणाऱ्या परस्पर बळाबळांच्या शक्तीत फरक पडेल.
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र. धनंजय किर. पृष्ठ. क्रं.164 – 165. पैरा – शेवटचा पहिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्य आणि समता याचे पुरस्कर्ते होते. त्याचे उल्लंघन होऊ नये म्हणून केवळ संरक्षण म्हणून निर्बंधाला स्थान आहे. परंतु निर्बंध हा स्वातंत्र्य आणि समता यासंबंधी होणाऱ्या उल्लंघनाविरुद्ध आम्ही देऊ शकतो याविषयी बोलताना लिहिताना म्हणतात –
माझ्या तत्त्वज्ञानात बंधुतेस फार उच्च स्थान आहे. स्वातंत्र्य आणि समता यांच्याविरुद्ध संरक्षण फक्त बंधू भावानेच आहे. त्याचे दुसरे नाव बंधुता किंवा मानवता आणि मानवता हेच धर्माचे दुसरे नाव आहे.
संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं.508 – 509. पैरा – शेवटचा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक तत्त्वज्ञाने हिंदू धर्माच्या शृंखला तोडून हिंदू समाजाला संघटित करण्याचे आव्हान दिले होते. त्यांचे तत्त्वज्ञान हिंदू तत्त्वज्ञानाचे पुनर्जीवन करावयास, जातिभेदाचे उच्चाटन करावे सांगते. साधुसंतांच्या भक्तीभावा विषयी ते लिखित स्वरूपात म्हणतात -
भक्त ही खुळचट गोष्ट आहे. भक्तीने त्यांना तेजोहीन बनविले आहे. देव भोळेपणाच्या वृत्तीमुळे त्यांचे मज्जातंतू ठिसूळ, क्षीण आणि दुर्बळ झाले आहेत.
संदर्भ – उपरोक्त. पृष्ठ. क्रं.516. पैरा – पहिला शेवटची ओळ.
म्हणून राष्ट्रसंत हे त्यांच्या हयातीत जातीयवाद्यांच्या विरोधात आणि सर्वसामान्य लोकांसाठी अंधश्रद्धा दूर करणे, जनजागृतीचे काम करणे एवढेच कार्य त्यांचे सीमित असून पण जातीयता व ब्राह्मणवाद नष्ट करू शकले नाहीत. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातल्या सर्वसामान्य जनतेसाठी भारतीय संविधानाची निर्मिती करून उन्नतीचा मार्ग मोकळा करून दिला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत