भगवान बुद्धांची शिकवण

भाग ६९
सद्धम्म म्हणजे काय?
जेव्हा धम्म ‘करुणेपेक्षाही मैत्री अधिक महत्त्वाची आहे’ असे शिकवतो, तेव्हा त्याला सद्धम्मरुप प्राप्त होते
धम्माला सद्धम्मरुप प्राप्त होण्यासाठी त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे.
भगवान बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबले नाही. करुणा म्हणजे प्राणिमात्रांसंबंधी दया. भगवान बुद्धांनी यापलीकडे जाऊन मैत्री शिकविली.
“मैत्री म्हणजे अखिल जीव-जाती संबंधी प्रेम.”
केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता, पुढे जाऊन अखिल जीव-जातीवर प्रेम केले पाहिजे अशी बुद्धांची शिकवण आहे.
श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात तथागत बुद्धांनी हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे.
मैत्रीसंबंधी बोलताना तथागत बुद्ध भिक्खूंना म्हणाले, “ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागावत नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजळ सारखे वाहत राहते, त्याप्रमाणे भिक्खूंनो, तुम्ही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्याच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे. मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. असे जर तुम्ही कराल तर कितीही दुःसह गोष्ट घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही. कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात. तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासासारखा अमर्याद असावा, तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश नसावा. माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही; त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे. केवळ वस्त्र आणि अन्न मिळविण्यासाठी भिक्खूंनी मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री-भावना आहे असे मी समजत नाही. ज्याची मैत्री-भावना ही धम्म सिद्धान्तातून उगम पावते, त्यालाच मी खरा भिक्खू समजतो. पुण्यार्जनासाठी केलेली कृत्ये (to acquire religious merit) ही मैत्रीच्या (loving kindness) एका षोडशांशाच्याही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता (loving kindness, which is freedom of heart). ती आपल्यामध्ये सर्व पुण्यकृत्यांना समाविष्ट करून घेते. ती चमकते, प्रकाशते, ती प्रज्वलित होते. सर्व ता-यांचे तेज चंद्रप्रभेच्या एक षोडशांशही नसते. चंद्रप्रभा त्यांचे सर्व तेज आपणांत सामावून घेऊन स्वतः चमकते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी केलेली कृत्ये मैत्रीच्या एक षोडशांशही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता; ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते, प्रकाशते, प्रज्वलित होते. जसा वर्षोऋतूअखेर सूर्य स्वच्छ, निरभ्र अशा आकाशात उगवून सारे किल्मिष नाहीसे करतो आणि स्वतः चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलीत होतो, अगदी त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी योजलेली सर्व साधने ही मैत्रीच्या एक षोडशांश इतकीही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलीत होते.”
धम्माला सद्धम्मरूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत.
धम्माला सद्धम्मरुप प्राप्त होण्यासाठी धम्माने माणसामाणसांत भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत
आदर्श समाज कोणता? ब्राम्हणांच्या मते वेदामध्ये ध्येयरूप समाजाची व्याख्या आहे, आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे, वेदप्रणीत आदर्श समाज हाच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे. वेदप्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण्य. वेदानुसार अशा समाजाने तीन अटी पाळल्या पाहिजेत. पहिली अट म्हणजे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात चार वर्ण असले पाहिजेत. या वर्गांचे परस्परसंबंध क्रमिक विषमतेच्या तत्त्वावर आधारलेले असले पाहिजेत. म्हणजेच हे सर्व समान असता कामा नयेत. तर प्रतिष्ठा, अधिकार आणि विशेष हक्क यांच्या प्रमाणात ते एक दुसऱ्यावर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजेत: ब्राम्हण हे सर्वांच्या वर. क्षत्रिय त्यांच्या खाली पण वैश्यांच्या वर. वैश्य क्षत्रियांच्या खाली, परंतु शूद्रांच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली. चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे. ब्राम्हणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे. क्षत्रियांचा शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे. वैश्यांचा व्यवसाय व्यापारधंदा, शूद्रांचा व्यवसाय वरील तीनही उच्च वर्णांची सेवा. कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करावयाचे नाही. ह्या आदर्श समाजाच्या सिद्धान्ताचा आग्रह धरून ब्राम्हणांनी तो लोकांना शिकवला.
या सिद्धान्ताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्टच आहे. ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राम्हणी धर्माचा शास्त्रसम्मत सिद्धान्त आहे.
भगवान बुद्धांचा ह्या सिद्धान्ताला आमूलाग्र विरोध होता. बुद्ध जातिसंस्थेचा सर्वश्रेष्ठ विरोधक असून, समतेचा सर्वांत पहिला आणि अत्यंत खंबीर असा समर्थक होता. जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही विचार नाही, की ज्याचे त्यांनी खंडन केले नाही. या मुद्यावर भगवान बुद्धांना ब्राम्हणांनी पुष्कळच आव्हान दिले. परंतु बुद्धांनी त्या सर्वांना पूर्णपणे निरुत्तर केले.
“जाती, विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभावच नकोत. सर्व सारखेच आहेत.” असा तथागतांचा उपदेश होता. जसे दुसरे तसाच मी. जसे आम्ही तसेच दुसरे! हा भगवान बुद्धांचा उपदेश होता.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.२०.२.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तृतीय खंड भाग पाचवा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत