महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसामाजिक / सांस्कृतिक

भगवान बुद्धांची शिकवण-भाग ६५


आर.के.जुमळे

अधम्म म्हणजे काय?

यज्ञयागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे

ब्राम्हणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता. काही यज्ञांना नित्य यज्ञ म्हणत. काहींना नैमित्तिक. नित्य यज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो किंवा न मिळो, ते करणे आवश्यक होते. नैमित्तिक यज्ञ हे याजक संसारिकाच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जात. ब्राम्हणी यज्ञात सुरापान, पशूबलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे. तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्ये समजली जात.
अशा यज्ञांवर आधारलेल्या धर्माला तथागतांनी मान्यता दिली नाही. प्राण्यांचे बळी देणे ही निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊच शकत नाही. जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देईन म्हणतो, तो धर्म हीन धर्म आहे.”

काल्पनिक अनुमानावर आधारलेला धम्म हा धम्मच नव्हे

मी कोण होतो, कुठून आलो या प्रकारचे प्रश्न नेहमीच विचारले जात. त्याचप्रमाणे विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जात. विश्व कसे निर्माण झाले? ते चिरंतन आहे काय? या प्रकारचे. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही असे म्हणत की, प्रत्येक गोष्ट ब्रम्ह्याने निर्माण केली. दुसरे काही म्हणत, सर्व प्रजापतीने निर्माण केले आहे. असल्या प्रश्नांना बुद्धांजवळ थारा नसे. त्यांच्या मते केवळ असले प्रश्न चुकीचा विचार करणारेच लोक विचारू शकतात. जो धर्म असल्या सिद्धांताला आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो बुद्धांच्या मते स्वीकारार्ह नाही.
आत्म्यासंबंधी काही प्रश्न विचारीत. तथागत बुद्धांच्या मते असले प्रश्न फक्त चुकीचे लोकच विचारू शकतात.
बुद्धांनी या तीन कारणास्तव धार्मिक सिद्धांतांचा धिक्कार केला.
प्रथमतः या सिद्धांतांना धर्माचा एक भाग मानण्याचे कारण नव्हते.
दुसरे असे, या प्रश्नांची उत्तरे द्यायला अंगी सर्वज्ञता पाहिजे (required omniscience) आणि ती कोणाच्याही अंगी नसते. या गोष्टीवर त्यांनी आपल्या प्रवचनातून भर दिलेला आहे. ते म्हणतात, एकाच वेळेला कोणालाही सर्वच दिसत नाही किंवा जाणता येत नाही. ज्ञानाला अंत नाही. कारण नेहमीच आधिकाधिक जाणायचे बाकी राहते. (Knowledge is never final. There is always something more to be known.)
भगवान बुद्धांचा या सिद्धांतावरील तिसरा आक्षेप म्हणजे हे सर्व सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाच्या रूपाचे आहेत. त्यांची कधीच कसोटी घेतलेली नसते; आणि त्यांना कधीही कसोटी लावता येत नाही.
अनिर्बंध कल्पनेचे ते परिणाम आहेत. त्यांच्यामागे वास्तवता अशी काहीच नाही.
शिवाय या काल्पनिक अनुमानांचा माणसा-माणसांच्या सबंधात काय उपयोग आहे? अर्थात काहीच नाही.
जगाची निर्मिती कोणी एकदाच केली आहे यावर भगवान बुद्धांचा विश्वास नव्हता. जगाची उत्क्रांती झाली आहे असे ते मानीत असत. (He believed that the world had evolved.)

धर्मग्रंथांचे केवळ वाचन म्हणजे धम्म नव्हे

भगवान बुद्ध, सर्वांना शिक्षण असावे या मताचे होते. ‘मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो’ यालाच बुद्ध ‘केवळ विद्येपेक्षा’ अधिक महत्व देतात. आणि म्हणूनच बुद्धांनी सांगितले की, जो विद्वान आहे त्याच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे; कारण शीलरहित विद्या नाशकारक आहे.
विद्या आणि शील यांपैकी शीलाचे महत्व कसे अधिक आहे हे भगवान बुद्धांनी भिक्खू पटिसेनाला जे सांगितले त्यावरून स्पष्ट होते.
“विद्या अधिक नसली तरी चालते. कारण शील हीच प्रथम महत्त्वाची व सर्वोत्तम गोष्ट आहे.”
“माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी त्याला त्यातील ओळींचा अर्थ कळत नसेल तर त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनुसार आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो, तो मनुष्य श्रेष्ठ आहे. हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे? ऐकलेले शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे आपल्या मुक्तीचा मार्ग चोखाळण्यासारखे आहे.”
“माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असली तरी जोपर्यंत तो त्याचा आशय विशद करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पठणाचा उपयोग काय? धर्माचे एकच वाक्य समजावून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण ठेवले, तर त्यायोगे सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे.”

क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१६.२.२०२४
(संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तृतीय खंड भाग चवथा

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!