नरेंद्र मोदी यांना 6 वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी घालावी – दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली : जबाबदार पदावर असतानाही धार्मिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये करणे, देवा धर्माच्या नावाने मते मागणे, पूजा स्थळाच्या नावाने मते मागणे या बाबी आदर्श निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर कलम 153-अ नुसार गुन्हा नोंद करण्यात यावा आणि लोक प्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत कारवाई करत 6 वर्षांसाठी निवडणूक लढविण्यावर बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ९ एप्रिलला उत्तर प्रदेशात केलेल्या भाषणात हिंदू आणि शीख गुरूंच्या नावाने मते मागितली. तसेच पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांना मुस्लिमांशी जोडले. असे करणे म्हणजे लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन होय. पंतप्रधान मोदींना निवडणुकीसाठी अपात्र घोषित करा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणामुळे लोकसभा निवडणुकीत मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन पंतप्रधानांवर कारवाई करावी, असंही याचिकाकर्त्यांने म्हटलं आहे.
पंतप्रधान विमानाने देशभर फिरत आहेत आणि अशी भाषणे करत आहेत, ज्यामुळे एखाद्या समुदायाविरुद्ध द्वेषाचे वातावरण निर्माण होऊ शकते. देशभरात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी अशा भाषणांवर बंदी घातली पाहिजे, असे आरोप करत मोदींविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
15 एप्रिल 2024 रोजी वकील आनंद जोंधळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायमुर्ती सचिन दत्ता यांच्यासमोर आज दिल्ली उच्च न्यायालयात याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. कोर्ट ही याचिका स्वीकारते की फेटाळते हे आज समजणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत