“माणदेशातील, डबईवाडीचा आकुबा ”

आयु.विलास खरात
माणदेशातील डबईवाडी मध्ये आकुबा हा आपली पत्नी सुंदराबाई, आई वालाबाई, भाऊ बयाजी, सुभाना व बहिणी चतुराबाई व सगुना असा त्यांचा परिवार होता. दुष्काळी डबई वाडी या गावात वडिलांच्या निधनानंतर घराची सर्व जबाबदारी आकुबावर येऊन पडली होती. आकुबास लिहिता वाचता येत नव्हते, परंतु उपजत बुद्धीमुळे व चांगल्या स्वभावामुळे घर प्रपंचा व्यवस्थित चालवीत होता. त्यास त्यांची पत्नी सुंदराबाईची मोलाची साथ मिळत होती. आकुबाने वडिलार्जीत २२ एकर माळरानावरील जमिनीतील दगड, धोंडे, खडकाळ असणाऱ्या या जमिनीची आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन मेहनत, मशागत करून सदर जमिनीवर ज्वारी, बाजरी, मटकी, भुईमुग, हुलगे, तुर इत्यादी पिके घेत होते. परंतु डबईवाडीत पाऊस काळ म्हणावा असा पडत नसलेमुळे पिके म्हणावी अशी येत नव्हती. पावसाच्या भरोशावर येणाऱ्या पिकावर व मेंढरावर आकुबा हा निसर्गाच्या या ही परिस्थितीशी सामना करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत असत. आपल्या लाडक्या दोन्ही बहिणींची लग्ने सोसायटीकडून कर्ज काढून केलेली होती.
एके दिवशी आकुबा, सुंदराबाई, बयाजी, सुभाना हे डबईवाडी जवळील म्हसोबाच्या डोंगराजवळील कुरणात मेंढरेत चारायला नेहमीप्रमाणे घेऊन गेलेले होते. मेंढरे चारून येथे वेळीस एका लांडग्याने मेंढराच्या कळपावर हल्ला करून एक कोकरू पळवून नेले होते. त्यावेळी आकुबा यांनी सुंदरा व सुभानाकडे पहात म्हणाले, तुम्ही दोघे मिळून मेंढरे घेऊन पाटलाच्या वस्ती जवळील वगळीच्या वरच्या टेकडा जवळ जाऊन थांबा. मी व बयाजी जाऊन लांडग्याने कोकरू पळविले आहे ते घेऊन येतो असे म्हणून आकुबाने इशारा करताच बयाजी हा पर्शी कुऱ्हाड घेऊन दोघेही लांडग्याच्या पाठीमागे पळत सुटले, कुरणातील मोठ्या खैराच्या व भोंगळाच्या झाडा जवळून लांडगा तोंडात कोकरू घेऊन चालला होता, त्यावेळी आकूबाने लांबूनच लांडग्यावर दगडाचा वर्षावर केला. बयाजी जोर-जोरात ओरडू लागला. त्यामुळे कुत्रे लांडग्याच्या अंगावर धावून जाऊन भूकू लागले होते. आकुबाचा एक दगड लांडग्याच्या डोक्याला वर्मी लागले मुळे लांडग्याने त्याच्या तोंडातील कोकरू तिथेच टाकून, लांडगा पळून गेला. त्यानंतर आकुबाने कोकरू उचलून पोटाशी धरून पुन्हा आपल्या मेंढराच्या कळपाकडे निघून आले. त्यामुळे मेंढरे घरी घेऊन येणेस बराच उशीर झाला होता. दिवे लागणेची वेळ झाली मुळे आकुबाच्या वयस्कर आईने कशीबशी उठत जावून घरात उजेडासाठी रॉकेलची चिमणी पेटवली होती. घराच्या दिवळीत चिमणी ठेवण्यासाठी घेऊन जात असताना वालाबाईचा पाय अडखळला, त्यामुळे पेटती चिमणी ही मेंढरांना ठेवलेल्या वाळलेल्या गवतावर नेमकी पडलेली असलेमुळे, गवतातून धूर निघू लागला होता. त्यामुळे गवत हळूहळू धूपू लागलेले होते. वालाबाई ची नजर कमकुवत असलेमुळे गवतातून धूर निघतो हे तिला समजले नाही, त्यामुळे वाळलेल्या गवतास आग लागणेस सुरुवात झालेली होती, आकुबाचे घर हे गव्हाच्या काडाने शेखरलेले होते. हळू-हळू आगीच्या ज्वाला घरात पसरू लागलेल्या होत्या. त्यामुळे काडाचे घर पेटायला सुरुवात झालेली होती.
आकुबाने आपल्या घरातून धुराचे लोट पाहून त्याचे मन घाबरले, अनेक शंका येऊ लागल्या, अंग थर-थर कापू लागले होते. तो पळतच आपल्या घरात येऊन त्याने आपल्या आईस प्रथम घराबाहेर उचलून आणले. त्यावेळी सुंदरा, बयाजी, सुभाना हे सुद्धा घरातील सामान जे हाताला येईल ते बाहेर काढीत होते. आकुबाने घरातील लाकडी पेटी बाहेर आणून लिंबाच्या कट्ट्यावर ठेवली. त्यावेळी सर्वांचीच अंगे आगीच्या ज्वालांनी घामाघुन झाली होती. मेंढरे एका जागेला उभी होती. आपल्या घरातून निघणाऱ्या आगीच्या ज्वाला व धुराकडे पाहत आकुबाच्या व त्यांच्या कुटुंबातील सर्वांच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. आपले पेटते घर पाहून त्यांच्या मनाची दयनीय अवस्था झाली होती. वाडीतील सर्व लहान- थोर मंडळी आकुबाचे पेटते घर पाहून हळहळीत होते. त्यावेळी आकुबाचा चुलता येकुबा हा काठी टेकत-टेकत त्यांच्याजवळ येऊन थांबला व म्हणाला आकुबा कशामुळे घराला आग लागली आहे ! त्यावर आकुबा हा म्हणाला, नशिबाचा खेळ आहे.जे भाग्यात लिहिलं आहे ते टाळता येणार नाही ? दोष कुणाला देऊन उपयोग नाही, असे म्हणून पेटलेल्या घराकडे उदासपणे पाहत होता. त्यावेळी येकोबा म्हणाला, जे व्हायचे ते होऊ दे, नशिबाला दोष देत बसू नकोस, होणाऱ्या गोष्टी होतच असतात. आकुबा आता तुमचे सामान उचलून, माझ्या घराच्या सोप्यात ठेवा. नंतर पुढे काय करायचे ते बघू, असे येकोबा म्हणताच, आकुबास आधार वाटू लागला होता. त्यानंतर वाडीतील तरुण पोरांनी सर्व सामान उचलून येकोबाच्या घरी नेऊन ठेवले होते. त्यानंतर आकुबा, सुंदरा, वालाबाई, बयाजी, सुभान हे एकोबाच्या घरी येऊन विसावले व मेंढरे त्यांच्या घराजवळच्या वाड्यात आणून सोडली होती. त्यावेळी येकोबा म्हणाला होता, संकट काळी नाती जपायचे असतात, वाऱ्यावर सोडायचे नसतात. या शब्दाचा आकुबा बराच वेळ विचार करीत झोपी गेले होते.
आकुबाच्या घरातील पैसा, अडका, धान्य इत्यादी सामान जळून गेलेले होते. त्यामुळे आकुबाने घरातील सर्वांचाच विचार घेऊन काही मेंढरे गावच्या म्हाकू मुकादमास विकून टाकण्याचा निर्णय घेवून म्हाकू मुकादमा कडे हेलपाटे घालीत होते. त्यावेळीस म्हाकू मुकादम म्हणाला, मी मुंबईला जाऊन माझ्या नातेवाईकांकडून पैसे घेऊन येतो. त्यासाठी तू थोडे दिवस थांब, त्यावेळी आकुबा म्हणाला ठीक आहे. तोपर्यंत आम्ही जागेची साफसफाई करून घेतो, असे म्हणून तो येकुबाच्या घरी येऊन बसला होता. सुंदरा, बयाजी, सुभाना हे अजून मेंढरे घेऊन काही आलेले नव्हते. त्यांचीच वाट पाहत विचार करीत असताना राघू जवळ येऊन आकुबास म्हणाला, काय विचार करताय, त्यावेळी आकुबा म्हणाला, घर बांधायचा विचार सुरू आहे, तुमच्या घरात किती दिवस राहायचे असते? त्यावेळी राघू म्हणाला, आम्ही काय परके आहोत काय, असे म्हणून राघुने विजारीच्या खिशातून तंबाखूचा बटवा काढत म्हणाला, तुमचे घर जळलेले पाहून मला अत्यंत वाईट वाटलं बघा. परंतु घर बांधायला सरकारकडून मदत मिळवून देतो, जळतीच्या घराला शासनाकडून मदत मिळते, आकुबा तुमची इच्छा असेल तर, उद्याच तालुक्याला जाऊन सरकारी कार्यालयात अर्ज सादर करूया. त्यावर आकुबा म्हणाला, कशी काय मदत मिळते, त्यावर राघू म्हणाला, सरकारी दरबारात माझे वजन आहे. सगळ्या वाडीची कामे करून देतोय, तुम्ही तर घरचेच माणूस आहे ना, त्यामुळे उद्या तालुक्याच्या सरकारी कार्यालयात जाऊन कागदावर तू नुसता अंगठा उठवून बाजूला थांब. माझे मी पुढे काय करायचे ते सगळे बघतो. अशा वेळी मदत करायची नाही तर कधी करायची, असे राघू बोलताच, आकुबास समाधान वाटले व तो तालुक्याला जायला तयार झाला. त्यावेळी राघू म्हणाला, आकुबा मी सकाळी लवकर तालुक्याला जातो, तू लगेचच पाठीमागून ये, त्यानंतर दोघांचे ठरले, त्यावेळी आकुबाचे मन आनंदाने भरून आलेले होते.
दुसऱ्या दिवशी आकुबा तालुक्याच्या गावाला आला. त्यावेळी राघू व बळवंत हे दोघेही आकुबाची वाटच पहा थांबले होते. राघूने आकुबास सरकारी कार्यालयात घेऊन जाऊन त्याने आकुबाचा अंगठा कागदपत्रावर उठवून घेतला. त्यानंतर हॉटेलमध्ये राघू बळवंत हे आकुबास घेऊन जाऊन हॉटेलमधील मिसळ- भजी खाऊन बाहेर आले. त्यावेळी राघू आकुबास म्हणाला, आता तुम्ही डबईवाडीला जावा, तुमच्या घरच्या मदतीचे माझे मी पाहून घेतो, काळजी करू नका, त्यानंतर आकुबा हा वाडीला निघून आला होता. त्यानंतर एक आठवडा झाल्यानंतर आकुबा हा राघूसम्हणाला, घराच्या मदतीच्या अर्जाचे काय झाले, त्यावर राघू म्हणाला लवकरच तुम्हाला मदत मिळेल हे सरकारी काम आहे थोडे दिवस थांबावे लागतील असे म्हणून राघू निघून गेला त्यानंतर एक दोन आठवडे होऊन गेले परंतु आकुबास सरकारी कार्यालयातून मदत काही मिळेना राघुला विचारले तर तो म्हणत असे, आज होईल, उद्या होईल अशी अशा दाखवीत होता. त्यामुळे आकुबाने वैतागून शेवटी म्हाकू मुकादमास काही मेंढरे विकली व त्या पैशातून त्याने गवंडी व मजूर लावून चिखलाच्या भेंड्याचे घर उभे केले त्यानंतर वाडीतील सुतारा कडून वासी आडवे तिडवे घालून नवीन काडाचे घर शेकरून घेतले एकदाचे घर झाल्यावर घराची पूजा करून घर प्रवेश केला स्वतःचे घरात सर्व कुटुंब आनंदाने राहू लागलेले होते.
आकुबाने व सुंदराबाईने विचार करून बयाजी व सुभानची लग्ने ठरविली होती. जवळच्या गावातील पाहुण्या कडील मुली पाहून लग्नाची तारीख ठरवलेली होती. त्यामुळे लग्नासाठी लागणाऱ्या पैशाची जुळवाजुळ करण्यासाठी आकुबाची हालचाल सुरू झालेली होती. त्यामुळे आकुबा हा सकाळी सोसायटीचे चेअरमन काशिनाथ यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांना सांगितले मला कर्ज काढायचे आहे? दोघा भावांची लग्न ठरविलेली आहेत ? त्यासाठी पैशाची गरज आहे ? त्यावर चेअरमन म्हणाले, अरे आकुबा, तू मोठा खातेदार आहेस, तुला कर्ज मिळेल, काळजी करू नकोस, परंतु सोसायटीच्या सेक्रेटरीकडे जाऊन कर्जाचा अर्ज सादर कर, त्या अर्जास सातबारा व खाते उतारा जोडून दे, बाकी माझे मी बघतो. काय करायचे ते सेक्रेटरीकडे जावा असे सांगितल्यावर आकुबा गावच्या चावडीकडे चालत निघाला होता.
आकुबाने गावचावडीत येऊन तलाठी यांच्याकडे सातबारा उताऱ्याची मागणी केल्यावर, तलाठी यांनी सात बाराचे पुस्तक तपासले, तर त्यामध्ये आकुबाचे नाव सातबारा उताऱ्यास दिसून येईना, त्यामुळे त्यांनी बारकाईने पुस्तक व फेरफार चे दप्तर तपासले व म्हणाले, आकुबा तुम्ही कुणाला जमीन विकली आहे का ? तुमच्या नावाच्या पुढे सातबाराला कंस केला आहे. त्यावर लगेचच आकुबा म्हणाला, तलाठी साहेब, मी कुणाला जमीन विकली नाही, त्यावर तलाठी म्हणाले, तुमच्या नावाला कंस करून तुमच्यापुढे राघूचे नाव सातबारा उताऱ्यावर लागले आहेत हे तलाठी यांचे शब्द ऐकताच, आकुबाच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. त्यास झटका बसल्यासारखे झाले, त्यांचे डोके गरगर फिरायला लागले. आपल्या धोतराच्या सोग्याने चेहऱ्यावरील घाम पुसत म्हणाला, हे कसे काय झाले, त्यावर तलाठी म्हणाले, खरेदी पत्राने झालेले आहे, हे ऐकताच आकुबास धक्काच बसला. त्यानंतर तलाठी व आकुबाचे बोलणे झालेवर तलाठी म्हणाले, तुम्ही ही कागदपत्रे घेऊन ताबडतोब वकिलाची भेट घ्या, असे म्हटल्यावर आकुबा हा कागदपत्रे घेऊन बाहेर येऊन मारुतीच्या मंदिराच्या कट्ट्यावर येऊन विचार करीत बसला होता.
आकुबा हा तालुक्याच्या गावाला येऊन धैर्यशील वकिलांची भेट घेतली, कारण याच जमिनीचा दावा धैर्यशील वकिलांच्या वडिलांनी कोर्टातून जिंकून दिलेला असलेमुळे आकुबाने धैर्यशील वकिलाकडे तलाठी यांचे कडून आणलेली सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे दिली व म्हणाले, वकील साहेब माझ्या चुलत भावाच्या मुलाने माझी फसवणूक केलेली आहे, माझे आगीत घर जळलेले होते, त्यासाठी शासनाकडून मदत मिळवून देतो म्हणून मला सरकारी कार्यालयात आणून काही कागदपत्रावर माझे अंगठे उठवून घेतलेले आहेत, जळीत झाले वर त्यांच्याच घरात सामान ठेवलेले होते, त्याने लाकडी पेटीतील कागदपत्रे घेऊन हा बनाव केलेला आहे, त्यामुळे माझी फसवणूक करून, जमीन बळकावली आहे. त्यावर धैर्यशील वकिलांनी कागदपत्रे पाहून म्हणाले, आकुबा तुम्ही घाबरू नका, तुम्ही लवकर आलात, बरे केले आहे, तुमची जमीन तुम्हाला मिळवून देतो, तुम्ही निर्दास्त रहा, काळजी करू नका, त्यावर आकुबा म्हणाला, वकील साहेब, तुम्ही काय करायचे ते करा, पण ह्याच महिन्यात माझ्या भावाची लग्ने आहेत, घरात ही बाब कळली तर सर्वांना वाईट वाटेल, त्यावर धैर्यशील वकील म्हणाले, ठीक आहे. त्यावेळी आकुबास बरे वाटले, त्यावेळी त्यांच्या तोंडास कोरड पडलेली होती. त्यामुळे वकिलांच्या घरातील तांब्यातील पाणी घटा-घटा पिऊन तो समाधानाने डबईवाडीकडे दमदार पावले टाकीत निघाला होता.
आकूबाने गावच्या दामोदर सावकाराकडून कर्ज काढून, बयाजी व सुभानाची लग्ने समाजाच्या चाली व परंपरेनुसार केली. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. वालाबाई अत्यंत समाधानी होती. तिच्या नजरेसमोर सर्वांची लग्न झाली होती. थोरला मुलगा आकुबाने जबाबदारी पार पाडलेमुळे वालाबाई ही पंढरपूरच्या पांडुरंगाचे आभार मानत होती. काही दिवसांनी येकुचा मुलगा राघूस कोर्टाचे नोटीस आलेनंतर येकोबाने ते नोटीस घेऊन आकुबाच्या घरी आले. त्यांनी आकुबाच्या पुढ्यात नोटीस टाकत म्हणाले, हे नोटीस माझ्या मुलास कशापाय पाठविले आहेस, राघू वर कोर्टात दावा कशापायी उभा केला आहेस, अरे आकुबा तुझा बाप आणि माझा बाप हे याच जमिनीच्यासाठी कोर्टात दावे खेळून दोघांच्याही घराचे वाटोळे झाले आहे. हे तुला माहीत असून सुद्धा तू शहाणा माणूस या कोर्टाच्या पायरीला कशापायी गेलात, असे येकोबा म्हणताच, वालाबाई, सुंदराबाई, बयाजी, सुभाना हे सर्वजण आश्चर्याने आकुबाकडे पाहू लागले होते. त्यांना काय समजेना, ही काय भानगड आहे, म्हणून गोंधळलेल्या अवस्थेत एकमेकांकडे पाहू लागले होते.
त्यावेळी आकुबा म्हणाला, येकोबा तू माझा भाऊ आहेस, वडिलांचे कोर्टातील दावे हे मला सुद्धा माहित आहेत, परंतु तुझा पोरगा राघूनी माझी फसवणूक केली आहे. माझ्या जळालेल्या घरासाठी शासनाकडून मदत मिळवून देतो, असे म्हणून त्याने तालुक्याच्या कचेरीत घेऊन जाऊन आमची २२ एकर जमीन नावावर करून घेतली आहे. येकोबा याला काय म्हणायचे, विश्वास राहिला आहे का ? नितीमत्ता कुठे गेली, जनाची नाही, मनाची तर लाज पाहिजे ना ! त्यावर येकोबा म्हणाला, राघू तर म्हणत होता, बयाजी व सुभानाच्या लग्नाला पैसे दिले, त्या मोबदल्यात जमीन घेतली आहे, असे आम्हाला सांगत होता, त्यावर आकुबा म्हणाला, येकोबा माझ्या भावाच्या लग्नासाठी दामोदर सावकाराकडून पैसे घेतलेले आहेत जाऊन त्यांना विचार असे आकुबा म्हणताच, येकोबाचा चेहरा काळवंडला व म्हणाला आकुबा तुझे काय चुकत नाही. तू रितीने वागला आहेस. माझ्याच पोराची चाल चुकलेली आहे. तुला दोष देण्यात अर्थ नाही असे म्हणून येकोबा काठी टेकत घराकडे निघून गेला होता. त्यावेळी जमिनीचा दावा कोर्टात गेला आहे, हे ऐकताच वालाबाईने धसका घेतला. तिला पूर्वीचे दिवस आठवू लागले, त्यामुळे ती काळजीत पडली, सुंदराबाई, बयाजी, सुभाना यांना भूकंप झाले सारखे वाटू लागले होते.
आकुबा हा कोर्ट कामासाठी तालुक्याच्या गावाला सातत्याने जाणे-येणे वाढलेमुळे कामधंदा ठप्प झाला, सावकाराचे कर्जाचे व्याज वाढत चालले होते, त्यामुळे आकुबाने घरातील सर्व मेंढ्या विकून टाकल्या व सावकाराचे सर्व कर्ज व्याजासह भागविले. घर प्रपंचासाठी व कोर्ट कामासाठी त्याने सुंदराबाई च्या अंगावरील सर्व दागिने गहाण ठेवले व कोर्टाची तारीख खेळत होता. आकुबास विचारायचे हे धाडस त्यांच्या भावना होईना, बयाजी व सुभानाने विचार करून ठरवले, आता इथे राहणे योग्य नाही, मेंढरे सुद्धा नाहीत, जमीन नाही या गावात आता करायचे काय, त्यामुळे दोघांनी विचार करून आकुबाची भेट घेण्यासाठी घरात येऊन बसले. सर्व रंग-राग पाहून बयाजी म्हणाले, दादा माझा मेव्हणा म्हणत होता की, मुंबईला गोदीत कामगाराची भरती सुरू झाली आहे. सध्या घरात काही काम नाही, त्यामुळे आम्ही दोघे नवरा बायको मुंबईला कामासाठी जाऊ का ? एक वेळ आकुबाने बयाजीकडे पहात म्हणाले, ठीक आहे, जावा असे सांगितलेवर बयाजी दुसऱ्या दिवशी बायकोला घेऊन मुंबईकडे निघून गेला. त्यानंतर थोड्याच दिवसात सुभाना सुद्धा आपल्या बायकोला घेऊन सासुरवाडीला निघून गेला. त्यामुळे वालाबाई व सुंदराबाई यांना आपल्या कुटुंबाची काळजी वाटू लागली होती.
आकुबा हा कोर्ट कामासाठी जातेवेळीस त्याचा पेहराव डोक्याला पटका, अंगात बाराबंदीचा सदरा, धोतर खांद्यावर घोंगडे व डोक्या एवढ्या उंचीची काठी सोबत असत. कोर्टात तारखावर तारखा पडत होत्या, तरीसुद्धा आकुबा आपल्या विचारावर ठाम होता. त्याला वाटत होते की, आपल्या पूर्वजांनी अनेक संकटावर मात करीत ही जमीन वारसासाठी सांभाळून ठेवलेली होती. त्यामुळे आपले कर्तव्य आहे की ,जीवात जीव असेपर्यंत ही जमीन राघू या लांडग्याच्या घशात जाऊ द्यायची नाही. त्यांचे भाऊ त्यास सोडून गेलेले होते. परंतु आकुबा हा डगमगला नाही. घरातील परिस्थिती नाजूक झालेली होती. तरीसुद्धा आकुबा हा सुंदराबाईस भरोसा देत होता की, हे दिवस सुद्धा जातील येणाऱ्या दिवसाला तोंड खंबीरपणे देऊन उभे राहू या, असे म्हणून धीर देत होता. डबईवाडीतील उजाड माळ रानावरती चिटी बोराची भरपूर झाडे होती. आकुबा हा कापडी पिशवीत चिटी बोरे घेऊन घरी घेऊन येवून त्यांची पत्नी सुंदराबाई कडे चिटी बोरे आणून देत असत. सुंदराबाई ही चिटी बोरे उन्हात ठेवून वाळवत असे. चिटी बोरे वाळलेनंतर, घरातील उकळामध्ये चिटी बोरे मुसळाने कुठून घेऊन त्यात थोडासा गूळ टाकून त्या कुटलेल्या चिटी बोराचे लाडू बनवीत असत. आकुबा हा कोर्ट कामासाठी तालुक्याला गेल्यावर त्यास भूक लागली तर चिटी बोराचे लाडू खात असत. सुंदरा ही शेतमजूरी करण्यासाठी गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या रानातील हरण धोंडी कुंजीराची भाजी पात्रची भाज्या घरी घेऊन येऊन संध्याकाळी तव्यावर कांदा, लसूण, हिरव्या मिरच्या घालून भाजी बनवीत असत. काही वेळा कोवळ्या उंबराच्या दोंड्याची भाजी बनवीत असत नेपत्याच्या फळापासून लोणचे बनवून ते गाडग्यात ठेवीत होती. त्याचबरोबर माळ रानावर येणाऱ्या शिंगोळ्याची सुद्धा भाजी बनवीत होती. अशा प्रकारे आकुबा- सुंदराच्या प्रपंचाचा गाडा सुरू होता. आकुबा हा रोज सकाळी- संध्याकाळ पांडुरंगाच्या नावाने नामस्मरण करीत असत.
आकुबाचा लहान भाऊ सुभाना हा अनेक दिवसापासून सासुरवाडीत आरामशीर रहात होता. एके दिवशी सुभानाचा सासरा म्हणाला, जावई पाव्हणे असे, किती दिवस तुम्ही आराम करणार आहे, कुठेतरी काम धंदा बघा, हातपाय हलवायला शिका ? नुसते मांढीवर- मांढी किती दिवस घालून बसणार आहात ? हे सासऱ्याचे बोल ऐकल्यावर सुभाना गप्प ऐकून घेत होता. त्यावेळी सुभानाचा सासरा म्हणाला, उद्या तालुक्याच्या बाजारात कापूस विकायला जायचे आहे, सकाळी लवकर उठून कापसाची पोथी बैलगाडीत भरून ठेवा व बाजाराला माझ्याबरोबर चला असे म्हणताच, सुभानाने मान हलवून होकार दिला, सुभाना हा सकाळी लवकर उठून कापसाची पोती गाडीत भरून कासऱ्यांनी बांधून घेतली व तालुक्याच्या बाजारासाठी बैलगाडीच्या पाठीमागून चालत निघाला, तालुक्याच्या बाजारात सासऱ्याने कापसाची पोती व्यापारास विकून टाकली, त्यानंतर बाजाराच्या एका बाजूला बैलगाडी उभी करून लिंबाच्या झाडाला बैल बांधून सासरा हा बाजारातील भाजीपाला व किराणाचे सामान आणण्यासाठी निघून जाते वेळीस सुभानास म्हणाला, मी बाजारातून येऊ स्तर बैलांवर नजर ठेवा, असे सांगून निघून गेला होता.
सुभाना हा बैलगाडीवर नजर ठेवून झाडाखाली तंबाखू मळत बसला होता. त्यावेळीस आपल्या चुलत भावाचा मुलगा राघू हा त्यास दिसला. त्याने राघूस जोराने हाक मारून बोलावून घेतले. सुभानास पाहताच राघू जवळ येऊन म्हणाला, तुम्ही आज इकडे कसे काय आला आहात, अशी विचारपूस करू लागला, त्यावेळी सुभाना मनाला, राघू अरे आई, दादा, वहिनी हे कसे आहेत, ठीक आहेत का ? त्यावर राघू म्हणाला, तुझ्या घरातील सर्व माणसे सुखात व आनंदात आहेत, त्यांची काळजी करू नकोस, पण, तुझे कसे काय चालले आहे ? बरेच दिवस गावाकडे आला नाहीस ? अशा प्रकारे इतर गप्पागोष्टी झाल्यावर सुभाना म्हणाला, तुझ्या ओळखीने मला कुठे काम धंदा मिळतोय का बघ ? अरे सासरवाडीला किती दिवस आयते खात बसायचे ? त्यावर राघू थोडावेळ विचार करून म्हणाला, तुला काम मिळवून देतो पण, तू काम करशील का ? त्यावर सुभाना म्हणाला, कसलेही काम लाव, माझी काम करायची तयारी आहे, त्यावर राघू म्हणाला, ठीक आहे, पुढच्या शनिवारी इथेच बाजारात भेट, तुला काम मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. काळजी करून नकोस, त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर राघू निघून गेला.
दुसऱ्या शनिवारी आठवड्याच्या बाजारात सुभाना हा येवून राघूची वाट पाहत झाडाखाली बराच वेळ थांबलेला होता. राघूस पाहताच सुभानाचा चेहरा उजळला होता. त्यावेळी राघू सोबत एक इसम आलेला होता. राघुने बुलेट गाडी झाडाच्या सावलीत उभी केली, त्यावेळी तो सुभाना जवळ येऊन उभा राहिला व म्हणाला, सुभाना हे बळवंतराव आहेत. त्यांची जमीन बागायती आहे, त्यांना साल गड्याची गरज आहे व तुला कामाची आवश्यकता आहे. यांच्या शेतात काम करशील का ? त्यावेळी सुभाना हा आनंदाने म्हणाला, करतो काम. कामाची काळजी करू नका. त्यावर बळवंतराव म्हणाले, तुला सालगडी म्हणून शेतातील जे काम सांगेल ते करावे लागेल, हे मान्य आहे का ? त्यावर सुभाना होय म्हणताच, बळवंतरावांनी खिशातून दोनशे रुपये चा इसार म्हणून सुभानाच्या हातावर ठेवले. सुभानाने दोनशे रुपये पाहतास, त्यास अत्यंत आनंद झाला. त्याच्या आनंदास पारावर राहिला नाही. त्यावेळी बळवंतराव व रघु हे काय बोलतात याकडे त्यांचे लक्षच नव्हते. बळवंतरावांनी पिशवीतील स्टॅम्प पेपर बाहेर काढून त्यावर अंगठा उठव असे सांगताच, सुभाना हा राघूकडे पाहू लागला. त्यावेळी राघू म्हणाला, सुभाना तू काय घाबरू नकोस, सालगडी म्हणून व्यवहाराने स्टॅम्प पेपरवर अंगठा उठव, मी आहे ना ? असे म्हणून गोड बोलून सुभानाचा अंगठा स्टॅम्प पेपरवर उठवून घेतला, त्यावेळी राघूने साक्षीदार म्हणून स्टॅम्प पेपरवर सही केली, त्यावेळी बळवंतराव म्हणाला, सुभाना उद्यापासून तू कामास ये, आम्ही आता निघतो आहे, आम्हास अनेक कामे आहेत असे म्हणून ते दोघे निघून गेले. त्यानंतर सुभानाने बाजारात जाऊन त्यांच्या बायकोस लुगडे खरेदी केले व खाऊ घेऊन खुशीत सासरवाडी कडे चालत निघाला होता.
दुसऱ्या दिवशी सुभाना हा कपडेलता व इतर सामान घेऊन बळवंतराव यांच्या घरी पोहोचला. त्यानंतर बळवंतरावांनी सुभानास घेऊन शेतातील सर्व कामे समजावून सांगितली. त्यानंतर तो गावात निघून गेला. त्यानंतर सुभानाने बैल नांगरास झुपून शेताची नांगरट करून लागला. सुभाना सकाळीच लवकर आलेला होता. त्यामुळे त्याने बायकोने दिलेल्या भाकरी खाऊन पुन्हा शेतजमिनीची नांगरट सुरू केली. त्यानंतर बळवंतराव हे तालुक्याच्या गावाला येऊन नेहमीच्या हॉटेलमध्ये राघूची वाट पहात थांबले होते. थोड्या वेळानंतर हॉटेलमध्ये राघू आल्यावर, त्यांनी अगोदर एकमेकांना टाळी दिली, त्यानंतर बळवंतरावांनी दोन मिसळ व भज्याची ऑर्डर दिली. त्यावेळीस बळवंतराव म्हणाले, राघू हा सुभाना नावाचा ताजा बकरा आता आपल्या फासात बरोबर अडकला आहे, बिनपगारी मला सालगडी मिळवून दिल्याबद्दल आज संध्याकाळी घरच्या जेवणाला ये, असे सांगताच, राघूला समाधान वाटले. त्यावेळी बळवंतराव हे राघूस म्हणाले, आकुबाच्या जमिनीच्या दाव्याचा निकाल लागल्यावर ११ एकर जमीन माझ्या नावावर लगेच करायची, त्यावर राघू म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, कोर्ट दाव्यासाठी व इतर माझ्या अडचणींसाठी तुम्ही बरेच पैसे खर्च केले आहेत, हे मी विसरणार नाही, जमिनीचा निकाल तर लागू द्या, त्यावर दोघेही एकमेकांकडे पाहून हसू लागले व संध्याकाळी मटणाच्या पार्टीची वेळ ठरवून दोघेही आपापल्या कामासाठी निघून गेले.
सकाळी दिवस उगवायला बळवंतराव हा शेतात येऊन उभा राहिला होता. त्यावेळी सुभानाकडे पाहून म्हणाला, शेत नांगरायचे अजून शिल्लक ठेवलेल्या दिसते, त्यावर सुभाना म्हणाला, मालक आज राहिलेले काम पूर्ण करून घेतो, काळजी नसावी, त्यावेळी बळवंतराव म्हणाले, सुभाना मी काल तालुक्याच्या गावाला गेलो असलेमुळे यायला उशीर झाला, त्यामुळे रात्रीचे जेवण देता आले नाही, त्यावर सुभाना म्हणाला, रात्री भूक लागल्यावर उसाच्या फडातील ऊस काढून खाल्ले, कामाचा शिणवटा आल्यामुळे झोपून गेलो, त्यानंतर बळवंतरावांनी नांगरट झाल्यावर ऊसाला पाणी द्यायचे झाल्यावर गव्हाला पाणी सोड असे सांगून शेतजमिनीत फेरफटका मारून बळवंतराव घरी निघून गेले. दुपारी सुभानाने बळवंतरावाने दिलेले जेवण उघडले तर रात्रीच्या भाकरी व हिरव्या मिरचीचा खर्डा पाहिला, त्याने तसेच जेवण करून शेतात काम करू लागला होता. सुभाना हा बळवंताच्या शेतात राबराबीत होता सकाळपासून ते दिवस मावळेपर्यंत काम करीत असत.
एके दिवशी बळवंतरावच्या घराकडून सुभानाचे जेवण आले नाही, त्याने बराच वेळ वाट पाहिली, परंतु जेवण कोणी आणून दिले नाही, त्यामुळे सुभानास भूक लागले मुळे शेजारच्या वस्तीवर भाकरी मागणीसाठी गेल्यावर त्या वस्तीवरील श्रीपती ने दोन भाकरी कापडयात बांधून दिल्या व म्हणाले तुमचे नाव काय आहे, त्यावर सुभान म्हणाला, माझे नाव सुभाना आहे. मी जवळच्या गावचा आहे. त्यावर श्रीपती म्हणाले, सुभाना तुम्ही दिवसभर काम करीत असता हे आम्ही बघतोय,पण सुभानराव तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ऐका बळवंतराव दिसतो एवढा सोपा नाही, तुम्ही येण्याच्या अगोदर त्याचे दोन गडी होते, त्यांना बळवंतरावांनी काढून टाकले आहे, त्यामुळे तुम्ही सावधगिरीने वागा असे म्हणताच, सुभानाने श्रीपतीचे आभार मानून भाकरी घेऊन आला, त्यानंतर प्रत्येक दिवशी बळवंतराव हा सुभानास शेतात राबवून घेत होता. त्यास घरी सुद्धा जाऊ देत नव्हता, असे दोन-तीन महिने फक्त काम म्हणजे काम त्यामुळे सुभाना हा वैतागून गेला होता व त्यास वाटू लागले आपण माणूस आहे जनावर नाही. बळवंतराव हा आपल्याला गावात दाढी करायला सुद्धा जाऊ देत नाही. त्यामुळे सुभाना जाम वैतागला होता. आपल्या बायकोला सुद्धा भेटायला जाऊ देत नाही. त्यामुळे तो बळवंतराव ची वाट पाहत होता.
बळवंतराव शेतात आल्यावर सुभानाने हातातील काम थांबवून तो म्हणाला, मालक मला दोन दिवस सासुरवाडीला जायला परवानगी द्या आणि खर्चाला पैसे द्या, तीन महिने होत आल्यात मला घरातील सर्वांचे आठवण येत असते, त्यांना भेटून दोन दिवसात परत येतो. त्यावेळी बळवंतराव हा सुभानाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तो शेतातील कामच सांगत होता, त्यावेळी सुभाना पुन्हा पुन्हा विनंती करीत होता, त्यावेळी बळवंतराव वैतागून म्हणाला, घरी जाऊन काय करणार आहेस, त्यावेळी परत सुभाना म्हणाला, मालक दोन दिवसात परत येतो, त्यावेळी बळवंतराव म्हणाले, माझे शेतातील चालते काम सोडून जातो आहेस काय ? त्यावर सुभाना म्हणाला, मालक तुमचे हे असे असेल तर शेतातील कामे करायला मला जमणार नाही, माझा काय हिशोब झालेला असेल तो मला द्या, मी उद्यापासून कामावर येणार नाही, त्यावेळी बळवंतराव रागाने म्हणाले, माझे घेतलेले इसारचे पैसे दे आणि कुठे जायचे आहे तिथे जा, त्यावर सुभाना म्हणाला, मालक तुम्ही मला इसारा दाखल फक्त दोनशे रुपये दिलेत. आज मला इथे येऊन तीन महिने होत आलेत त्या होणाऱ्या मजुरीतून दोनशे रुपये वजा करा आणि रितीने राहिलेली मजुरीचे पैसे मला द्या, त्यावर बळवंतराव म्हणाले, सुभाना इसाराच्या वेळी तुला मी दहा हजार रुपये दिले आहेत, त्याचा साक्षीदार म्हणून तुझा राघू हा भाऊ आहे आणि पैसे तुला दहा रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेवून दिले आहेत, त्यावर तुझा अंगठा आहे, एक तर माझे दहा हजार रुपये दे आणि खुशाल कुठे जायचे असेल तिथे जा नसेल तर मुकाट्याने शेतातील काम कर आणि येथून तू निघून गेलास तर इसाराचे पैसे बुडवले म्हणून तुझ्यावर फिर्याद दाखल करेल आता काय करायचे ते ठरव आणि सकाळी मला सांग असे म्हणून बळवंतराव हे शेतातील कामे सांगून निघून गेले होते.
बळवंतरावचे हे शब्द ऐकताच सुभानाच्या हातापायास कापरे भरू लागले, घशाला कोरड पडू लागली होती, विचार करून त्यांचे डोके सुन्न झाले होते, आपण ह्या लांडग्याच्या जाळ्यात अलगदपणे फसलेलो आहे ? याला काय मार्ग काढायचा म्हणून बराच वेळ विचार करीत बसला होता. आता सासरवाडीला कोणीही आधार देणार नाही, आता जायचे कुठे या विचाराने त्यांचे डोके सुन्न झाले होते. त्यास अचानक आपल्या थोरल्या भावाची आठवण झाली, त्यावेळी सुभानाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले, आपण आकुबा सारख्या भावावर गैर विश्वास दाखवून सासुरवाडीस येऊन राहिलो, याचा त्यास आता पश्चाताप होऊ लागला होता, त्याने पूर्ण विचार करून आकुबाकडे जाण्याचा निर्धार केला, कारण आताच्या संकटातून मात्र आकुबाच वाचू शकतो, त्यामुळे अनायसे आधार वाटू लागला. त्या विचारात तो झोपी गेला. पहाटे लवकर उठून जनावरांना कडब्याच्या पेंड्या त्यांच्यापुढे टाकून तो दिवस उगवायला डबईवाडीच्या रस्त्याला लागला.
सुभाना डबईवाडीत येऊन आई वालाबाई, आकुबा, सुंदरा वहिनीच्या पाया पडला, त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू पडू लागलेले होते. त्यांचा रडका चेहरा पाहून आकुबा म्हणाला, सुभाना काय झालेले आहे ते तरी आम्हाला कळू दे, त्यावेळी सुभानाने डोळे पुसत बळवंतरावांच्याकडे घडलेल्या सर्व घटनांचा खुलासा जसाच्या तसा सांगितला व म्हणाला दादा मला या संकटातून वाचव माझ्याकडून गुराढोरा सारखी मेहनत करून मला बळवंतरावने व राघूने फसविले आहे. त्यावर आकुबाने त्यास धीर दिला व म्हणाला काय काळजी करू नकोस असे म्हणून सुभानास घेऊन ताबडतोब तालुक्याच्या गावी येवून वकिलाची भेट घेतली. त्यांना सुभानाच्या बाबतीतील वृत्तांत सांगितला त्यानंतर धैर्यशील वकील यांनी आकुबास व सुभानास घेऊन येऊन पोलीस स्टेशनला बळवंतराव व राघूच्या विरुद्ध तक्रार दाखल केली व फौजदार साहेबांना सुभानाची वस्तुस्थिती सांगितली त्यावेळी फौजदार साहेबांनी ठाणे अंमलदास सांगितले बळवंतराव व राघु यांना उद्या पोलीस स्टेशनला हजर करा असे सांगितल्यावर फौजदार साहेब म्हणाले, वकील साहेब, या दोघांना सुद्धा उद्या पोलीस स्टेशनला घेऊन या, त्यानंतर तिघेही बाहेर निघून आले.
दुसऱ्या दिवशी फौजदारांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले, त्यांना खरे कोण बोलते व खोटे कोण बोलते हे समजले नंतर फौजदार साहेब म्हणाले बळवंतराव तुमच्या बद्दल अनेक तक्रारी आहेत तुम्ही व राघूने मिळून सुभानाच्या बाबतीत कुबाड रचलेले आहे हे दिसून येते आहे त्यामुळे खरे काय ते बोला अन्यथा तुम्ही दोघांनी मिळून अनेक लोकांना फसवलेले आहे त्यांना लुबाडलेले आहे असे अनेक लोक आकुबाने सोबत आणलेले आहेत. त्यांची तक्रार घेऊन तुम्हाला जेलमध्येच टाकतो असे दरडावून बोलताच बळवंतराव व राघुने कबूल केले की, मुद्दाम आम्ही सुभानास फसवलेले आहेत, कोऱ्या स्टॅम्प पेपरवर अंगठा घेतला होता, आम्हाला माफ करा, इथून पुढे त्यास त्रास देणार नाही. तीन महिन्याची त्यांची मजुरी पण देऊन टाकतो, पण आम्हाला जेलमध्ये टाकू नका, त्यावर फौजदार म्हणाले, गरीब लोकांना फसवणे हा सुद्धा अपराध केला आहे, त्यावेळी राघू हा साहेबांचे पाय धरून, माप करा असे म्हणू लागला, त्यावेळी धैर्यशील वकील म्हणाले फौजदार साहेब, राघूने सुद्धा आकुबास असेच फसवून अंगठा घेऊन त्यांची २२ एकर जमीन खरेदी केली आहे हे फौजदार साहेबांनी ऐकताच त्यांनी राघूच्या थोबाडीत जोराने मारलेमुळे राघूचे डोळे पांढरे झाले. त्यावेळी राघू हात जोडून म्हणाला, मला माफ करा, मला मारू नका, आकुबाची जमीन त्यास मी परत करतो, साहेब या बळवंतरावच्या नादाने हा खेळ केला होता साहेब, असे म्हणून राघु सर्वांच्याच पाया पडू लागला व हात जोडून म्हणून लागला, आजच कोर्टातील दावा रद्द करून आकुबाची जमीन त्याच परत देऊन टाकतो असे म्हणून गयावया करू लागला त्यावेळी फौजदार साहेबांनी सर्वांना समजून सांगितले व म्हणाले बळवंतराव इकडे लक्ष द्या गावातील गरीब अडाणी आणि विधवा बायांच्या जमिनी फसवून करून बळकाऊ नका कायदा व परमेश्वर तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही दोघांनी परत चूक केली तर मी तुम्हाला सोडणार नाही असे सांगितल्यावर सर्वांनी साहेबांचे आभार मानून बाहेर निघून आले होते.
कोर्टाच्या तारखेवेळी येकुबाने आकुबाच्या बाजूने साक्ष दिली त्या जबानीत येकुबा न्यायाधीशास म्हणाले, माझा मुलगा राघूने आकुबाची फसवणूक करून त्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेतलेला आहे. आकुबाचे घर जळलेले होते, त्यांचे सामान त्यावेळी माझेच घरात होते. त्यातील कागदपत्रे घेऊन आकुबास सरकारी कार्यालयातून जळीत घरास मदत मिळवून देतो म्हणून कार्यालयात घेऊन गेला होता. परंतु त्यांनी त्या ठिकाणी खरेदी पत्रावर आकुबाचा अंगठा उठवून घेतला होता. एका भोळ्या माणसास फसवून त्याने फार मोठा अपराध केलेला आहे. राघू जरी माझा मुलगा असला तरी, त्याने जात सोडली व पात ही सोडली, त्यामुळे नियती त्याला माफ करणार नाही. माझ्या वडिलांनी सुद्धा आमची जमीन ही बाय, बाटली व मोठी पणात जमीन घालवली आहे. दुसऱ्याच्या जमिनीवर डोळा ठेवणे योग्य नाही, आकुबाची जमीन त्यास मिळावी अशी विनंती. अशी साक्ष दिली होती. त्यावेळी कोर्टातील सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यामुळे राघूचे सुद्धा मन चल बिचल झाले त्यास पश्चाताप होऊ लागला त्याने कोर्टात हात जोडून सांगितले की बळवंतरावची नजर आकुबाच्या जमिनीवर होती. त्याने मला जमीन मिळवून देण्यासाठी जुनी बुलेट गाडी घेऊन दिली होती व जमिनीतील निम्मा हिस्सा देण्याचे कबूल केले होते. त्या लालसेला मी फसलो, त्यामुळे माझ्याकडून हा अपराध झाला आहे. आकुबाची जमीन त्यास परत मिळावी, त्यासाठी माझा दावा आज रोजी मागे घेत आहे, आणि तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे ,म्हणून आपल्या वडिलांकडे पाहू लागला होता. कोर्टाने आकुबाच्या बाजूने निकाल दिला व राघुस शिक्षा सुनावली होती.
आकुबास व त्यांच्या कुटुंबास अत्यानंद झाला. आपला चुलत भाऊ येकोबाने योग्य साक्ष दिली म्हणून आकुबाने राघूच्या मुलांचे नावे दोन एकर जमीन खरेदी करून दिली व त्याने निर्णय घेतला की, आता इथून पुढे घरातील मुलांना शाळेत घालून त्यांना शिकवून मोठे करायचे, कोणीही अडाणी राहायचे नाही असे ठरविले होते. त्यानंतर आकुबा हा आपल्या कुटुंबासह डबईवाडीत पुन्हा जोमाने उभा राहिलेला होता.
आयु. विलास खरात
लेखक – आटपाडी जि.सांगली
मो.नं.९२८४०७३२७७
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत