बौद्धांना बुद्धाची मूळ शिकवण समजली काय ?

मानिक वानखेडे, वर्धा
*हा प्रश्न अनेकांना पडतो. जर समजली असेल तर त्यांची मूळ शिकवण कोणती ? आणि जर समजली नसेल तर त्याचे कारण काय ? जेंव्हा आपण ह्या दोन प्रश्नांचे योग्य आणि तर्कसंगत उत्तरे शोधू तेव्हाच बुद्धाची मूळ शिकवण कोणती ती समजून येईल अन्यथा नाही. प्रथम आपण बुद्धाची मूळ शिकवण का समजू शकलो नाही ? तर त्याचे उत्तर अगदी सोपे आणि सरळ आहे. कारण त्यावेळी लिपीचा शोध लागला नव्हता. जर लिपीचा शोध लागला असता तर सिद्धार्थाने गृहत्याग करण्याआधी २९ वर्षांपर्यंत शिक्षण ग्रहण केले असते आणि जेव्हा त्यांना शाक्य संघाच्या नियमानुसार गृहत्याग करण्याची शिक्षा दिल्यानंतर आणि ज्ञानप्राप्तीच्या ध्येयाने अग्रेसर होऊन खडतर तपश्चर्या केल्यानंतरही शरीर अस्थिपंजर होऊनही काहीच ज्ञान प्राप्त झाले नव्हते. अशावेळी संयोगाने म्हणा किंवा सुजाताने नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यावर तिने एका सोन्याच्या पात्रात स्वतः शिजवलेले अन्न गौतमाला वाढले. आणि तरोताजा होऊन त्यांनी उरूवेला सोडून गयेला गेले आणि तेथे चिंतन मनन केले. त्यांनी स्वाभाविकपणे स्वतःला पहिला प्रश्न विचारला की, “व्यक्तिमत्त्वाला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती ?”
त्याचा दुसरा प्रश्न असा होता की, दुःख नाहीसे कसे करता येईल ? या दोन्ही प्रश्नांचे बिनचूक उत्तर त्याला मिळाले, ते उत्तर म्हणजे सम्यक संबोधी, (खरी ज्ञानप्राप्ती ) संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रुष्ठ क्र,६५ अनु क्र ५,६ आणि ७. अशा प्रकारे त्यांनी चार आठवडे चिंतन केल्यानंतर अंधकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. पृष्ठ क्र.६४ अनु क्र १०. जर त्यावेळी लिपी आणि शिक्षण उपलब्ध असते तर राजकुमार सिद्धार्थ निश्चितच शिकले असते आणि ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे आत्मचरित्र आणि मूळ शिकवण लेखी स्वरूपात लिहून ठेवली असती.
पण लिपीचा शोध न लागल्याने ही गोंधळून टाकणारी आणि अवघड परिस्थिती निर्माण झाली. म्हणून ज्योतिबा फुले म्हणतात त्याप्रमाणे –
विद्ये विना मती गेली
मती विना निती गेली.
निती विना गती गेली
गति विना वित्त गेले.
वित्त विना शूद्र खचले
एवढे अनर्थ एका अविद्येने केले.
किती सार्थक मांडणी केली आहे ज्योतिबा फुले ने !
ज्याप्रमाणे एका अविद्याने एवढे अनर्थ केले अगदी त्याचप्रमाणे विद्येच्या ( शिक्षणाच्या) अभावाने बुद्धाची मूळ शिकवण समजण्यात अनर्थ झाले. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथात म्हणतात –
भगवान बुद्धाचे जीवन आणि शिकवण सुसंगतपणे व संपूर्णतः सादर करणे हे जो बौद्ध नाही त्याला साध्य होणे कठीण आहे. (पण वस्तुस्थिती ही आहे की जे बौद्ध आहे त्यांनाही साध्य होणे कठीण आहे ) निकायावर अवलंबून राहून बुद्धाची जीवनकथा सुसंगतपणे सादर करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ती किती कठीण गोष्ट आहे हे प्रत्ययास येते. त्याहूनही त्यांच्या शिकवणीचा काही भाग सादर करणे अधिक अडचणीचे आहे असे आढळते. जगात जेवढे धर्मसंस्थापक होऊन गेले त्यात बौद्धधर्माच्या संस्थापकाचे जीवन व शिकवण सादर करण्यात जी अडचण निर्माण होते की गोंधळून टाकणारी नसली तरी पुष्कळ अवघड आहे. असे म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही. हे प्रश्न सोडवावे आणि बौद्ध धर्म समजून घेण्याचा मार्ग मोकळा करावा हे आवश्यक नाही काय ? जे बौद्ध धर्मीय आहेत त्यांनी निदान साधारण चर्चेसाठी तरी हे प्रश्न मांडावेत आणि त्यावर जितका प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा ह्यासाठी अजून योग्य वेळ आली नाही काय ? ह्या प्रश्नावर चर्चा व्हावी म्हणून येथे उद्धृत करण्याचे मी योजित आहे.
ह्यात डॉक्टर बाबासाहेबांनी हे आव्हान 1956 साली केले होते परंतु मराठी आवृत्ती 1970 साली प्रकाशित झाल्यामुळे आज 53 वर्षानंतर सुद्धा ह्यावर चर्चा करण्याचे टाळतो आहे, हे कल्पनातीत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, प्रश्न मांडून जेवढा प्रकाश टाकता येईल तेवढा टाकावा परंतु बौद्धाचार्य, धम्माचार्य, थेरो, महाथेरो म्हणतात ( प्रकाश न टाकता ) जे काही सुत्तपिटकातील निकायात, आणि विनयपिटकात लिहिले आहे तेच सत्य आहे. प्रकाश टाकण्याची आवश्यकता नाही. याचा अर्थ आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणास केलेल्या आव्हानाला दुर्लक्षित करून, निकायात जे काही बौद्ध भिक्षूने लिहिले आहे त्यावरच विश्वास ठेवतो. प्रकाश टाकण्याची आवश्यकता आपणास वाटत नाही. आणि म्हणूनच आपण धम्म समजण्यात, ज्याप्रमाणे आंधळे हत्तीला स्पर्श करून तो कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात, अगदी तोच प्रकार आपण धम्म सांगण्यात करीत आहोत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचे जीवन आणि त्यांची शिकवणूक असे दोन भाग केलेले आहेत.
सिद्धार्थाच्या जीवनाबद्दल सांगायचे झाल्यास अगदी महामायाच्या गर्भधारणेच्या स्वप्नापासून सुरुवात झाली आहे. तसेच सिद्धार्थ कोण होणार, ते भविष्य सांगण्यात आले आहे आणि नेमके तेच घडले आहे. ह्यावरून आपणास नवस, स्वप्नावर व भविष्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडले. आणि येथेच ब्राह्मणांनी त्यांच्या वृतीनुसार स्वप्न आणि त्यांची शिकवण रंगविल्या गेली. कारण कृष्णराव अर्जुन केळुस्करांनी लिहिलेल्या गौतम बुद्ध चरित्र पृष्ठ क्रमांक 40 मध्ये शेवटच्या पॅराग्राफ मध्ये विवाह झाल्यापासून ते 29 वर्षाचा होईपर्यंत त्यांच्याविषयी काही एक माहिती मिळत नाही असा उल्लेख केलेला आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिचय मध्ये जे चार प्रश्न उपस्थित केले त्यातील पहिल्या प्रश्नाचे उत्तर —
सिद्धार्थने चार दृश्य पाहून गृहत्या केला नसून शाक्यसंघाने रोहिणी नदीच्या वाटपावरून निर्माण झालेल्या वादातून त्याला गृहत्याग करावा लागला. संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रुष्ठ क्र २६, अनु क्र १ ते १५ प्रकरण १५. देशत्यागाची तयारी.
दुसरा प्रश्न फारच महत्त्वाचा आणि नेहमीच गोंधळ निर्माण करणारा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चार आर्य सत्य आणि निर्माण केला आहे असे म्हणतात आणि बुद्धाच्या मूळ शिकवणीत त्यांचा अंतर्भाव होतो काय ? हे सूत्र बौद्ध धर्माच्या मुळावरच आघात करते. जीवन हे जर दुःख आहे, मृत्यू हे जर दुःख आहे, पुनर्जन्म हे जर दुःख आहे तर सर्व काही संपलेच म्हणायचे. ह्या जगात सुख प्राप्तीसाठी धर्म किंवा तत्वज्ञान माणसाला कधीच उपयोगी पडणार नाही. जर दु:खापासून मुक्ती नसेल तर धर्म काय करू शकणार ? जन्मापासूनच जे दुःख अस्तित्व होते ते अशा दु:खापासून मानवाची सुटका करण्यासाठी बुद्ध तरी काय करू शकेल ? अबौद्धांनी बौद्धधर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात ही चार आर्य सत्य एक मोठाच अडथळा आहे. कारण ही चार आर्य सत्य बुद्धाच्या आचरणतत्त्वांना निराशावादी ठरवतात. ही आर्य सत्य मूळ शिकवणीत अंतर्भूत आहेत काय की, ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे ?
ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चार आर्य सत्य स्पष्टपणे नाकारले आहे. त्यात त्यांनी दोन ही आर्य सत्य स्वीकार केले नाही. तरीही काही बौद्ध धम्माचे अभ्यासक डॉक्टर बाबासाहेबांनी काढलेल्या निष्कर्षाला नाकारून दोन आर्य सत्य आहेत असा दुष्प्रचार करतात. जे गणित विषयाचे विद्यार्थी असेल त्यांना माहित आहे की, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूमिती आणि गणितामध्ये जे सूत्रे असतात ते पूर्ण लागू केल्या जाते. अर्धे कधीच लागू केल्या जात नाही. हा सिद्धांत आहे. जर अर्धे सूत्र लागू केले तर उत्तर कधीच येणार नाही, ते खात्रीने चुकलेच समजा. हाच प्रकार दोन आर्य सत्य स्वीकार केल्याने होत आहे.
आता आपण ग्रंथात उल्लेख केल्याप्रमाणे चार आर्य सत्य कोणते, ते पाहू –
१) जगामध्ये दुःख आहे.
(२) दुःखाचे कारण आहे.
(३) दुःखाचे निवारण आणि
(४) दुख निवारण करण्याचा मार्ग आहे.
सिद्धार्थला जे ज्ञान प्राप्त झाले ते जगात दोन समस्या आहे.
१) व्यक्तिमत्त्वाला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती ?
२) त्याचा दुसरा प्रश्न असा होता की दुःख नाहीसे कसे करता येईल ?
या दोन्ही प्रश्नाचे उत्तर त्याला मिळाले ते म्हणजे सम्यक संबोधी (खरी ज्ञानप्राप्ती) पृष्ठ क्र ६५ अनु क्र ५,६ आणि ७
जगात दुःख आहे परंतु ते जर जन्मामुळे, आणि मृत्यूमुळे असेल तर त्या दुःखापासून मुक्ती मिळू शकते काय ? ह्या प्रश्नाचे उत्तर बुद्धा जवळ नाही. कारण जन्म आहे तर मृत्यू आहे आणि मृत्यू आहे तर दुःख आहे. आणि ते नैसर्गिक आहे. चार आर्य सत्य मध्ये जो चौथे सत्य, दुःख निवारण करण्याचा मार्ग आहे, तो बुद्धाने जो मध्यम मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग सांगितलेला आहे तो दोषरहित नैतिकतेने जीवन जगण्याचा मार्ग आहे परंतु जीवनात येणारे दुःख त्याने सुद्धा नष्ट होत नाही, निर्दोष जीवन जगता येते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो निष्कर्ष काढला आहे की चार आर्य सत्य हे सूत्र बौद्ध धर्माच्या मुळावरच आघात करते ते नि:संद्धिग्ध सत्य आहे, कारण चार आर्य सत्य नाहीच.
तरीही आपणास बुद्धाची मूळ शिकवण का समजली नाही ? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मार्गदर्शक सूत्रे सांगितलेली आहेत त्याचे आपण अनुकरण केले नाही म्हणून ! ते मार्गदर्शक सूत्रे –
दैवी चमत्कृतिवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे तीन हेतू होते.
त्याचा पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनविणे.
त्याचा दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे.
त्याचा तिसरा हेतू ज्या ब्राह्मक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थानच नष्ट करणे.
यालाच बुद्ध धम्माचा कम सिद्धांत अथवा हेतू वाद म्हणतात.
हा हेतूवाद बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवितो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादांपेक्षा वेगळा नाही. संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रुष्ठ क्र,१९२ अनु क्र १६ ते २१
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी, सांगितलेल्या सुत्रांनुसार आपण उच्च शिक्षित आहोत परंतु बुद्धीवादी बनलो नाही, स्वतंत्रतापूर्वक शोध लावण्यासाठी सिद्ध झालो नाही, आणि आपल्या मनातील भ्रामक समजुती, ज्या माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थान नष्ट झाले नाही. आणि म्हणूनच आपल्याला बुद्धाची मुळ शिकवण समजली नाही.
ह्याशिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अजून काही कसोटी सांगितलेल्या आहेत. त्या पाहा –
यासाठी त्रिपिटकात जे बुद्ध वचन म्हणून मानले गेले आहे ते बुद्धवचनच आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे.
भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की, बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते ते बुद्धाचे नव्हे. म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते ते बुद्ध वचन मानायला प्रत्यवाय नाही.
दुसरी गोष्ट अशी की, जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंदात भगवान बुद्ध कधीच पडत नाहीत. म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते ते बुद्धाच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तूत: ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाही.
तिसरीही एक कसोटी आहे. ती ही की, भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चिंत आहेत आणि ज्या विषयासंबंधी हे निश्चिंत नाहीत अशी विषयांची दोन प्रकारात वर्गवारी केली होती. जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यांच्यासंबंधी त्याने आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहेत. जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्यासंबंधीही त्याने आपले विचार व्यक्त केले आहेत.
या तीन प्रश्नासंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत त्या विषयांबाबत भगवान बुद्धाचे विचार काय होते हे ठरवितांना त्या चर्चेच्या वेळी वरील तीनही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे. संदर्भ – उपरोक्त, पृष्ठ क्र २७० अनु क्र ११ ते १६
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इतके स्पष्ट आणि सोपे मार्गदर्शक सुत्रे आणि कसोट्या सांगूनही आपण त्यावर कधीच गंभीरपणे विचार केला नाही आणि त्या तिन्ही कसोट्या लक्षातही ठेवत नाहीत म्हणून आपणास बुद्धाची मुळ शिकवण समजली नाही.
मानिक वानखेडे, वर्धा
9860761826
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत