अनित्यतेच्या सावटात मरणाला चकवण्यासाठी झगडणार्या जगाला अनित्यतेची पहिली जाणीव देणार्या तथागत बुद्धांच्या जयंती सोहळ्या प्रित्यर्थ आपल्याला कोणत्या सदीच्छा द्याव्यात बरं?

जयवंत हिरे
आधुनिक जग युद्ध पिपासेतून होणाय्रा रक्तपात,शोषण,विध्वंसातून मुक्त होऊन मानवतेचे नवे आयाम निर्माण करेल सर्व प्रकारच्या भेदभाव आणि शोषणातुन मानवी समाजाला मुक्त करेल;हीच सदीच्छा!
भेजाची कवाडे उघडु या।
नवनव्या सत्यांचा शोध घेवु या।
मानवतेच्या मार्गाने जावु या।।
तुझे वेगळेपण
जिथे तु प्राप्त केलेस ज्ञान….
अन्…..
अवघ्या जगाला दिलीस दिशा
अत्त दीप भव!स्वयं दीप हो!!
तिथेच तुझ्या अहिंसेच्या विचारांना गाडण्यासाठी
हिंसेचे कुणी तरी रचतेय कारस्थान.
तरी तुझ्या ओठांवर
करुणामय हासु विलसतच राहिलेय.
तुझ्या तत्वज्ञानाच्या रक्षणार्थ
ना कुणी वाहिले रक्ताचे पाट
ना कुणी मांडला प्रेतांचा सरीपाट.
हेच तर तुझे वेगळेपण…
मानवतेला दीपस्तंभ झालेलं.
खरं तर तुला गाडायचे
झालेत सारे प्रयास कुचकामी.
तुझ्या महापरिनिर्वाणानंतर त्यांनी
मद्य,मांस,मिथ्या,मैथुन,मंत्र मकारांचा
करुन पाहिला प्रचार-प्रसार चीवरं पांघरुन.
हिंसेच्या त्यांच्या विकृतिला दैवी करुन.
तुझ्या दिशेच्या वाटसरुंच्या कत्तलींचे
रचले त्यांनी विकृत इमले
शंभर सुवर्ण मुद्रांना मुडक्यांचा भाव लावत.
तरी तुझा धम्ममार्ग ते गाडु शकले नाहीत.
प्रतिक्रांतिच्या त्यांच्या प्रत्येक आघातावर मात करत
विश्वाच्या कानाकोपर्यात निनादत पसरले
तुझ्या प्रज्ञेचे प्रतिध्वनी….
युद्ध हवे की बुद्ध हवा.
जेव्हा ते झगडत होते,लढत होते
कत्तली करीत होते
विश्व निर्माण करणार्या
चराचर सृष्टीची काडीकाडी रचणार्या
जग हलवणार्या,डुलवणार्या,चालवणार्या
स्वत:च्या सर्वशक्तिमान ईश्वराच्या रक्षणासाठी
दुसर्यांच्या तश्याच सर्वशक्तिमान ईश्वरांच्या,
धर्मसंस्थापकांच्या अन् धर्मानुयायांपासुन
रक्षणासाठी धर्मयुद्धे करीत होते.
रक्ताच्या नद्या वाहात होते.
‘यदायदाही धर्मस्य……’अन्
‘खतरे में है’च्या आरोळ्या ठोकत होते
तेव्हाही तुझे,तुझ्या तत्वज्ञानाचे रक्षण करण्यासाठी
तुझ्या अनुयायांना
या सार्या धर्मयुद्धांत उतरायची
विध्वंसन अन् कत्तलींचे खच पाडायची
गरजच वाटली नाही.
हेच तर तुझे वेगळेपण…
धर्मांपलीकडे जाऊन
माणसांतले माणूसपण जागवणारे.
धर्म,धर्मसंस्थापकांनी सांगीतलेलं अन्…
धर्मग्रंथांनी मांडलेलं ग्रंथप्रामाण्य
अंतिम सत्य म्हणून धर्माज्ञा ठरवणार्या
आकाशातल्या बापाला खोटं पाडलं म्हणून
खरं सत्य शोधणार्याला पाखंडी ठरवणार्या
सुळावर चढवण्याच्या विकृतिला
ना दिलास तु थारा.
हेच तर तुझे वेगळेपण….
सत्य आणि मानवतेच्या सार्या कसोट्यांवर
खणखणीतपणे पारखून घ्यायला सांगणारे.
सत्ता-संपत्तिच्या मदोन्मत्त आरोहनात
श्रमिकांच्या सत्तेचे रक्ताच्छादित उत्तर देणार्यांनी
समतेसाठी हिंसेचे माजवले जरी अराजक.
तु मात्र दु:खाचे कारण तृष्णा म्हणत
न्यायाच्या तराजुत मानवता तोलवण्याचा दिलास विचार.
हेच तर तुझे वेगळेपण….
शोषणाच्या चरकातुन मुक्त करुन
समतेची दिशा देणारे.
तुझा धम्मविचार सांगतांना
फक्त पुरुषांसाठी!
स्रियांना प्रवेश अधर्मच्या
दिल्या नाहीस धर्माज्ञा.
लैंगीक पवित्र-अपवित्रतेच्या साखळदंडांनी
तु कुणाचे स्वातंत्र्य हीरावुन घेतले नाहीस.
हेच तर तुझे वेगळेपण….
जखडबंद मेंदुला प्रज्ञेची दिशा देणारे.
कोणत्याही हिंसा-अमिषाविना
सत्ता-संपत्ती-दैवतीकरणाविना
रक्ताच्या सड्यांविना
तुझे धम्मचक्र फिरतेय
सार्या विश्वाला दिशा देत मानवतेची.
तुझी करुणामय हाक ऐकायचे
नाकारले जरी त्यांनी
देव-धर्मांचे खूंटे कानात ठोकुन
धर्मांच्या बद्यांनी तुलाही वेठीला धरायचा केला प्रयास
धर्मांधतेने भेजा जखडबंद करुन.
त्यात विद्वेषाचे जहर भरुन.
पोखरणमध्ये विध्वंसाच्या चाचण्या करताना
त्यांनी तुलाही हसवायचा केला प्रयास.
पण,विध्वंसासाठी ते तुझा वापर करु शकले नाहीत.
हेच तर तुझे वेगळेपण….
सत्य हे सत्य म्हणून
असत्य हे असत्य म्हणून आकलण्याचे.
मानवतेचे गाणे माणसांसाठी गाण्याचे
मेंदुतील विध्वंस आणि विकृतिच्या बाॅम्बला
मानवतेचे ज्ञान द्यायचे
मानवतेचे दान द्यायचे.
-जयवंत हिरे
क्रांतिकारी जनता
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत