स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीपर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं राष्ट्रपती मुर्मू यां आवाहन…
आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केलं. यावेळी त्या म्हणाल्या, की देश स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या दिशेनं पुढं निघाला असून, अमृतकाळाच्या सुरूवातीच्या टप्प्यात आहे. संविधानानं आखून दिलेल्या मूलभूत कर्तव्यांचं पालन करून, स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीपर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणं, ही प्रत्येक नागरिकाची महत्वपूर्ण जबाबदारी आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. संघर्षग्रस्त प्रदेशांमध्ये संघर्ष सोडवण्याचे तसंच शांतता प्रस्थापित करण्याचे मार्ग शोधले जातील अशी आपण आशा करूया, असं राष्ट्रपती म्हणाल्या. वैश्विक पर्यावरण संकटावर मात करण्यासाठी भारताचं प्राचीन ज्ञान जागतिक समुदायाला मार्गदर्शक ठरू शकतं, असंही त्या म्हणाल्या. हा युगांतर घडवून आणणारा परिवर्तनशील कालखंड आहे. देशाला नव्या उंचीपर्यंत नेण्याची सुवर्णसंधी आपल्याला प्राप्त झाली आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी प्रत्येक नागरिकाचं योगदान अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. आजचा भारत आत्मविश्वासानं पुढं वाटचाल करत आहे. सुदृढ आणि स्वस्थ अर्थव्यवस्था या आत्मविश्वासाचं कारणही आहे आणि परिणामही आहे. सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, ही आपल्या युवा पिढीची इच्छा आहे. समानतेशी जोडल्या गेलेल्या शब्दजालात न अडकता प्रत्यक्ष समानतेच्या आपल्या अमूल्य आदर्शाच मूर्त रूप त्यांना अनुभवायचं आहे. आपल्या युवावर्गात असलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावरच भावी भारताची निर्मिती होत आहे, असं त्या म्हणाल्या. संस्कृती, रूढी आणि परंपरांचं वैविध्य हा आपल्या लोकशाहीचा वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहे. ही विविधता समतेच्य़ा पायावर आधारित आहे, ज्याचं संरक्षण न्यायव्यवस्था करते. हे सारं काही स्वतंत्र वातावरणातच शक्य होऊ शकतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रबुद्ध मार्गदर्शनानं प्रवाहीत, या मूलभूत मूल्य आणि सिद्धातांमध्ये समरसलेल्या संविधानाच्या भावधारेनं, सर्व प्रकारचे भेदभाव संपवण्यासाठी सामाजिक न्यायाच्या मार्गावर आपल्याला अविचलित ठेवलं आहे. प्रजासत्ताकाच्या मूलभूत भावनेनं १४० कोटीहून अधिक भारतीयांना एका कुटुंबात बांधलेलं आहे.सध्या जगात अनेक ठिकाणी युद्धं होत आहेत, जगातले अनेक भाग हिंसाग्रस्त आहेत. अशावेळी, वैरानं वैर शमत नाही, शत्रुत्व सोडूनच ते शमवता येतं, ही भगवान गौतम बुद्धांची शिकवण महत्वाची वाटते. अहिंसा हा अवघड आदर्श नाही तर ती स्पष्ट शक्यता आहे, हे प्रत्यक्ष आचरणात आणलेलं वास्तव आहे, याचं उदाहरण वर्धमान महावीर आणि सम्राट अशोक यांच्यापासून ते महात्मा गांधीपर्यंत भारतानं समोर ठेवलं आहे. जगातल्या सर्वात मोठ्या अशा या कुटुंबासाठी सहअस्तित्वाची भावना ही भूगोलानं लादलेलं ओझं नाही तर सामूहिक उल्हासाचा सहज स्रोत आहे, असं त्यांनी सांगितलं.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत