भगवान बुद्धांची शिकवणभाग ५९

धम्म म्हणजे काय?
निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे.
“निब्बाणासारखे खरे सुख दुसऱ्या कशानेही लाभत नाही,” असे बुद्धांनी सांगितले आहे.
भगवान बुद्धाने शिकविलेल्या सर्व सिद्धांतांचा निब्बाण हा केंद्रवर्ती सिद्धांत आहे.
भगवान बुद्धांच्या निब्बाण कल्पनेत तीन विचारांचा, संकल्पनांचा अंतर्भाव होतो.
आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार.
जिवंतपणी ह्या सर्व संसारात असताना मिळणारे सुख हा निब्बाणाचा दुसरा विचार.
तिसरा विचार म्हणजे “सदैव प्रज्वलित असणाऱ्या विकारांच्या ज्वालांवर निग्रह साधणे.”
गयेत राहात असताना बुद्धांनी भिक्खूंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्नीसारखे होत हा आहे. बुद्धांनी सांगितले:
“अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे. चक्षुरिंद्रिय, डोळे हे पेटलेले आहे. दृश्य, विविध रुपे हे पेटलेले आहेत. डोळ्यांनी होणारी जाणीव (चक्षुसंस्कार) ही पेटलेली आहे. चक्षुसंस्कारापासून उद्भवणा-या सुखकारक, दुःखकारक, अदु:खकारक गोष्टी ह्याही जळत आहेत. त्या रागाग्नीने, द्वेषाग्नीने, मोहाग्नीने, जन्म, जरा, मृत्यू, दु:ख, दौर्मनस्य त्याचप्रमाणे उपायास आणि निराशा यामुळे जळत आहेत. कान जळत आहे. शब्द जळत आहे. घ्राणेंद्रिय जळत आहे. गंध जळत आहे. जिव्हा जळत आहे. रस जळत आहे. शरीर जळत आहे. चित्तातील संकल्प-विकल्प जळत आहेत. चित्तसंस्कारापासून ज्या सुखवेदना, दुःखवेदना, अदुःखवेदना उत्पन्न होतात, त्या सर्व वेदना जळत आहेत. त्या रागाग्नीने, मोहाग्नीने, जन्म, जरा, मृत्यू, दुःख आणि निराशा यांच्यामुळे जळत आहेत.”
हे जाणल्यावर, प्रज्ञावान श्रेष्ठांच्या मनात उपेक्षा (विरक्ती) उत्पन्न होते. या उपेक्षेमुळे त्यांच्या ठिकाणचे रागाग्नी, लोभ, आदि विकार मावळतात आणि विकाराच्या अभावामुळे तो मुक्त होतो आणि मुक्त झाल्यावर त्याला आपल्या मुक्तीची जाणीव होते.
निब्बाणामुळे सुख कसे मिळते? एक सर्वसामान्य समजूत आहे की, माणसाला पुरेसे मिळाले नाही की, तो दुःखी होतो. परंतु ही समजूत काही त्रिकाळ सत्य नाही. भोवती समृद्धी आणि संपन्नता असूनसुद्धा मनुष्य दुःखी राहतो. हा लोभाचा परिणाम आहे, आणि लोभ हा गरीब आणि श्रीमंत या दोघांच्याही जीवनाचा शाप आहे. लोभाने लुब्ध आणि रागाने क्षुब्ध, मोहाने मूढ झाल्यामुळे माणसे स्वतःच्या व इतरांच्या दुःखाबद्दलचे विचार मनात घोळवू लागतात आणि त्यामुळे त्यांना मानसिक वेदना आणि पीडा अनुभवाव्या लागतात. परंतु जर लोभ, राग, मोह यांचा पूर्ण उच्छेद केला तर माणूस स्वतःच्या दुःखाने दुःखी होत नाही, अथवा मानसिक वेदना आणि पीडा अनुभवीत नाही. आणि असे झाले की, ते हवेसे वाटणारे आणि आकर्षक आणि जे बुद्धिवान श्रावकांनाच साध्य असे ते निब्बाण भविष्य-जीवनात नव्हे तर ते इहजन्मी हस्तगत होऊ शकते.
राग-द्वेषाच्या आधीन होण्याने मनुष्य दुःखी होतो. राग, द्वेष हे विकार म्हणजे मनुष्याच्या निब्बाणस्थितीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणाऱ्या शृंखलाच आहेत. ज्या क्षणी मनुष्य ह्या विकारांपासून मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमू लागतो.
भगवान बुद्धांच्या मते ह्या विकारांचे तीन प्रकारचे वर्ग आहेत.
पहिल्या वर्गात, तृष्णेतून उद्भवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात.
दुसऱ्या वर्गात, वितृष्णेतून उद्भवणारे घृणा, क्रोध आणि द्वेष हे दोष येतात.
तिसऱ्या वर्गात, अविद्येतून उद्भवणारे जडता, मूर्खता आणि मूढता हे दोष येतात.
पहिल्या (राग) व दुसऱ्या (द्वेष) अग्नीचा संबंध भावना आणि इतरांसंबंधीचा दृष्टीकोन आणि भूमिका यांच्याशी निगडित आहे. तर तिसऱ्या प्रकारचा अग्नी (मोह) हा जे सर्व विचार सत्यापासून भिन्न असतात त्यांच्याशी निगडित आहे.
निब्बाण म्हणजे तीव्र वासनांपासून मुक्त निर्दोष जीवन. (release from passion) निर्दोष, सदाचारी जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे.
भिक्खू सारीपुत्ताने निब्बाणाचा अर्थ असा सांगितला:
लोभ, हाव हा दोष आहे. व्देष हा दोष आहे. हा लोभ आणि हा द्वेष घालविण्याचा मार्ग, मध्यममार्ग होय. हा मार्ग आपल्याला पहायला शिकवतो, दृष्टी देतो, जाणायला शिकवतो आणि ज्ञान देतो. तो आपणाला शांती, अभिज्ञा, बोधी आणि निब्बाण याजकडे नेतो. मध्यममार्ग म्हणजे महान अष्टांगमार्ग होय. सम्यक् दृष्टी, सम्यक् संकल्प, सम्यक् वाणी, सम्यक् कर्मान्त, सम्यक् आजीविका, सम्यक् प्रयत्न (व्यायाम), सम्यक् स्मृती आणि सम्यक् समाधी. हा ‘मध्यममार्ग’ आहे.”
क्रोध, द्वेष, ईर्षा, मत्सर, कृपणता, लालचीपणा, ढोंग, लबाडी, उद्धटपणा, मोह, प्रमाद, हे सर्व दुष्ट विकार आहेत.
मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यममार्गाने होतो; त्याच्या योगाने पाहायला दृष्टी मिळते. हा मार्ग आपणाला पहायला शिकवितो, दृष्टी आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती, अभिज्ञा, बोधि आणि निब्बाण याकडे नेतो. निब्बाण हे दुसरे तिसरे काही नसून तो अष्टांगमार्ग आहे. निब्बाणात जो मुलभूत विचार आहे तो म्हणजे सदाचाराचा अष्टांगमार्ग. अष्टाङ्गमार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही.
प्रवृतींचा संपूर्ण उच्छेद आणि परिनिब्बाण ही दोन विरुद्ध टोके आहेत आणि निब्बाण हा त्यांतील मध्यममार्ग आहे.
संदर्भ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तृतीय खंड भाग तिसरा
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१०.२.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत