मेल्यावर मिळालेला न्याय अपूर्ण असतो.

आपल्या गावाला १९ पुरस्कार प्राप्त करून देणाऱ्या संतोष देशमुख या उमद्या सरपंचाची खंडणी मागणाऱ्यांना विरोध केली म्हणून बीडमध्ये क्रूर हत्या झाली आणि काहीच दिवसात परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या उदयोन्मुख वकिलाचा कोठडीत अमानुष मारहाण करून जीव घेतला. त्याचा दोष काय तर घटनेच्या प्रतीची विटंबना झाली म्हणून त्यानं निषेध नोंदवला. संतोष देशमुख मराठा आरक्षणासाठी लढणारा तर सोमनाथ आंबेडकरांनी दिलेल्या हक्कांसाठी झगडणारा. दोघंही हक्कांसाठी लढणारे. विरोधात जाणाऱ्याला संपवणं हा दोघांच्या मृत्यमागील समान धागा.
आपल्याकडे कोठडीत मृत्यूला अनेक वर्षांची परंपरा आहे. आणि हे ९०% मृत्यू(खून) दलित समुदायातील आहेत वाचनात आलं. सत्ता, राजकारण, जात, गुंडगिरी, कायद्याचा धाक आणि बरंच काही…ज्यावर बोलायला हवंय.
या दोन्ही मृत्युंमध्ये आणखी एक निर्दयी साम्य आहे ते म्हणजे या दोघांना झालेली अमानुष मारहाण आणि छळ. अनेक जखमांमुळे शॉक/धक्का लागून मृत्यू हेही दोघांच्या पोस्टमार्टंम अहवालात मृत्यूचं कारण लिहिलेलं. एखाद्या माणसाला चापट मारली तरी अनेक दिवस तोंड दुखतं. या दोघांचं रक्त साकाळून
मृत्यू होईपर्यंत मारलं म्हणजे किती मारलं असणार. किती भयाण वेदना झाल्या असतील दोघांना? कितीओरडले, रडले, विव्हळले, तडपडले असतील. मदतीसाठी कुणाकुणाचं नाव घेतलं असेल? न राहवून देवालाही साकडं घातलं असेल(कुठंय देव?). दोघे शेकडो वेळा मारू नका म्हणाले असतील, माफी मागितली असेल(कदाचित.),आणाभाका दिल्या घेतल्या असतील; तरी मारहाण करणाऱ्यांना त्यांची दया आली नाही.
एवढी क्रूरता कुठून येते माणसांमध्ये?कशी माणसं तयार झाली आहेत? विरोधात गेला म्हणून मारहाण करणे समजू शकते, मात्र या पातळीवरील मारहाण. एवढा राग, द्वेष कसा काय उत्पन्न होतोय माणसांमध्ये? करुणा सोडली तर दया, सहानुभूती पण नाही. एकालाही वाटलं नसेल का आपण थांबवावं सगळं? एखाद्याचा जीव घेऊनच सगळं संपवायचं ही कसली क्रूरता? एखादं माणूस वेदनेनं तडपत असताना आनंद होतो अशी माणसे माणसात राहण्याच्या लायकीची नसतात. मात्र अशी माणसे प्रशासनात आणि सत्तेत आहेत. आणि लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे. जातधर्मीय राजकारण करणाऱ्या सामान्य माणसांनी यावर चिंतन करावं.
आपल्या घरातलं एखादं माणूस वृद्धापकाळानं गेलं तरी कोण शोक होतो. पण आपल्या लेकराला अख्खं शरीर काळंनिळं होईस्तोवर मारलं, त्याच्या छातीवर बरगड्या मोडेपर्यंत नाचलं, पाणी मागितलं तर तोंडात लघवी केली, लिंग, डोळे जाळले (हे लिहितानाही प्रचंड त्रास होतो आहे, वाचणाऱ्यांनाही होईल), ज्या पोलिसांनी रक्षण करायचं, ज्या न्यायालयीन कोठडीवर सुरक्षित राहिल म्हणून विश्वास आहे तिनेच लेकराला मरेपर्यंत मारण्याची साक्ष द्यावी..काय झालं असेल, होत असेल त्या आई बापांचं? जीवंत असेपर्यंत प्रत्येक सेकंद आई बाप पोरांना झालेल्या यातना आठवून अश्रू गाळत राहतील. लेकरानं नुसतं “आई ग” म्हटलं तरी “काय झालं?” म्हणून काळजाचं पाणी होणाऱ्या आईचा लेकराच्या अंगावरील जखमा बघून श्वास थांबला असल.
मारणारे पण कुणाची तरी लेकरं आहेत. आपल्या आईबापांना दवाखान्यात नेत असतील, रोज मुलांना अंगाखांद्यावर खेळवत असतील, बहिण बायकोशी बोलत असतील…हीच माणसं एवढी हिंसक वागतात.
आता जलदगती न्यायालये चालतील… कमिट्या, चौकशा, पुरावे, शासकीय आर्थिक मदत, आंदोलने, मोर्चे, तारखा, शिक्षा (कितींना, कधी होईल..अनिश्चित आहे)..सगळं होईल.
पण न्याय?
मेलेली माणसे कधीच परत येत नाहीत.
मेल्यावर मिळालेला न्याय अपूर्ण असतो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत