भगवान बुद्धांची शिकवण-भाग ९२

तथागतांची मानवता
१. विशाखेचे सांत्वन
विशाखा ही एक उपासिका होती. भिक्खूंना भिक्षा देणे हा तिचा प्रघात होता.
एके दिवशी तिच्याबरोबर राहात असलेली तिची नात सुदत्ता आजारी पडली आणि तिचे निधन झाले. विशाखेचा शोक अनावर झाला.
तिच्या अंत्यविधीनंतर विशाखा तथागत बुद्धांपाशी गेली आणि साश्रू नयनांनी एका बाजूस जाऊन बसली.
तथागतांनी विचारले,
“विशाखा! दुःखी, शोकमग्न आणि अश्रूसिंचन करीत तू अशी बसलीस याचे कारण काय?”
तिने आपल्या नातीच्या मृत्यूचे कारण सांगितले व ती म्हणाली,
“ती अत्यंत आज्ञाधारक मुलगी होती. तिच्या सारखी दुसरी सापडणे कठीण.”
“विशाखा श्रावस्तीमध्ये एकूण किती मुली असतील.”
“तथागत! लोक म्हणतात कित्येक कोटी आहेत.”
“ह्या सर्व तुझ्या नातीसारख्या असतील तर त्यांच्यावर तू प्रेम करणार नाहीस काय?”
“तथागत! खात्रीने करीन.”
“आणि दर दिवशी श्रावस्तीमध्ये किती मुलींचे निधन होत असेल?”
“तथागत! पुष्कळ.”
“मग कुणासाठी तरी शोक केल्यावाचून तुझा एक क्षणही सुना जाणार नाही.”
“तथागत! खरे आहे.”
“तर काय दिवसरात्र रडत तू तुझे जीवन कंठणार?”
“तथागत! आपण ठीक सांगितले. समजले मला.”
“तर मग शोक बंद करा.
२.गौतमीचे सांत्वन
गौतमीचा विवाह श्रावस्तीच्या एका व्यापाऱ्याच्या पुत्राशी झाला होता. विवाहानंतर काही काळाने तिला एक पुत्र झाला.
तो चालता-फिरता होतो न होतो तोच त्याला सर्पदंश होऊन तो मृत्यू पावला.
आपला पुत्र मृत्यू पावला ह्यावर तिचा विश्वासच बसेना. कारण पूर्वी तिने कधी मृत्यू पाहिला नव्हता.
सर्पदंश जिथे झाला तिथे दिसत असलेला लहान लाल डाग हा पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असे तिला वाटले नाही.
म्हणून आपल्या पुत्राचे कलेवर घेऊन विचित्र मनःस्थितीत ती घरोघर फिरत असताना पाहून लोकांना वाटले की तिला वेड लागले असावे.
अखेरीस एका वृद्ध गृहस्थाने तिला सुचविले की, श्रावस्तीत राहत असलेल्या श्रमण गौतमांकडे तिने जावे.
म्हणून ती तथागतांकडे आली आणि आपल्या मृत पुत्रासाठी काही औषध तिने मागितले.
तथागतांनी तिची हकीकत आणि विलाप ऐकला.
तथागतांनी तिला सांगितले,
“तू नगरात जा आणि ज्या घरी एकही मृत्यू झालेला नाही त्या घरातून थोडी मोहरी घेऊन ये. तिने मी तुझा पुत्र जिवंत करीन.”
तिला वाटले ही फार सोपी गोष्ट आहे. आणि म्हणून मुलाचे कलेवर घेऊन ती नगरात गेली.
पण लवकरच तिचा भ्रम दूर झाला. कारण जिथे जिथे ती गेली त्या त्या घरी कुणाचा ना कुणाचा तरी मृत्यू झालेला होता.
एका गृहस्थाने तिला सांगितले, जिवंत आहेत ते थोडे आणि जे निधन पावले ते अधिक आहेत.
ती तथागतांकडे निराश होऊन रिकाम्या हाताने परत आली.
तेव्हा तथागतांनी तिला विचारले की, “मृत्यू हा सर्वांच्या नशिबी असतोच. हे तुला समजले की नाही? तिच्याच बाबतीत ही दुर्दैवी घटना घडली म्हणून तिने शोक का करावा?”
तिने मग आपल्या पुत्राचे अंत्यविधी केले. ते करताना ती म्हणाली,
“सर्व नश्वर आहे; हा निसर्गनियम आहे.”
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१४.३.२०२४
(संदर्भ – भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, खंड-सहा)
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत