तुळसा यांना स्मृतिदिनानिमित्त त्रिवार अभिवादन!

बाबासाहेबांची वडील बहीण तुळसा हीचा मृत्यू दिनांक १३ एप्रिल १९२९ ला झाला.
सर्व बहिणींत तुळसा बाबासाहेबांना फार आवडे. लहानपणापासून तुळसाने त्यांच्यासाठी खस्ता खालेल्या होत्या. ते बी ए ची परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत तुळसाकडे येऊन जाऊन राहत. तुळसाचे यजमान धर्माजी कातेकर रेल्वे वर्कशॉप मद्धे गेटकिपर चे काम करीत असत. पत्र्याच्या चाळीत डेव्हिड मिल समोरची खोली त्यांना राहायला मिळाली होती. तेथे बाबासाहेब कित्येक दिवस मुक्काम करीत व तेथूनच ते हायस्कूलला, कॉलेजला जात असत. १९१७ साली ते लंडनहून मुंबईला परतले तेव्हा त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी तुळसा, रमाबाई व धर्माजी कातेकर या तीन मूर्ती बिलार्ड पियर च्या फाटकाबाहेर सकाळपासून साहेबांच्या बोटीची वाट पाहत बसल्या होत्या.
प्रवाशी बोटीतून उतरून साहेब घरी चालले तेव्हा त्या तीन मूर्ती फाटकाच्या बाजूला उभ्या राहून साहेबांची वाट पाहत होत्या. त्यांना साहेब दिसले नाहीत की साहेबांना ते दिसले नाहीत. कारण मद्धे भिंत होती. साहेबांना वाटले, कोण येथे येणार आहे भेटायला आपणाला घरून? हातात बॅग घेऊन साहेब फाटकातून बाहेर पडतात न पडतात तोच तुळसा ओरडली, ‘ भिवा!’ ती धावत गेली व भिवाला मिठी मारून रडू लागली. रमाबाई बाजूला उभ्या राहून रडत होत्या. धर्माजी कातेकरांनी साहेबांच्या हातातली बॅग घेतली. आनंद मिश्रित दुखःश्रूंचा पूर ओसरल्यावर साहेबांनी रुमालाने डोळे पुसत पुसत सर्वांचे कुशल विचारले. साहेबांनी व्हिक्टोरिया केला तो मस्जिद बंदर रेल्वे स्टेशन पर्यंतच. कारण परळ पर्यंत व्हिक्टोरियाने जाण्याईतके साहेबांच्या जवळ पैसे नव्हते. ते चौघेजण तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून परळ स्टेशनला उतरले व सिमेंटच्या चाळीत आले.
बाबासाहेबांना हा प्रसंग आठवला की नेहमी गहिवरून येत. तुळसा, रमाबाई आणि कातेकर ह्या त्रिमुर्तींची त्यांना सारखी आठवण येई.
( सुभेदार रामजी आंबेडकर हे ह्याच मुलीचे दागिने गहाण ठेऊन बाबासाहेबांना पुस्तके विकत आणायचे आणि त्यांना पेन्शन मिळाली की लगेच ते दागिने सोडवून परत तुळसाला द्यायचे.)
संदर्भ: भीमराव रामजी आंबेडकर खंड २ पा. क्र. २६९
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत