महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठसंपादकीयसामाजिक / सांस्कृतिक

‘नामविस्तार’ झालाच नसता तर…?

◆ दिवाकर शेजवळ
ज्येष्ठ पत्रकार.

●●●●●●●●●●●●●●

■ मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा १९७८ ते १९९४ पर्यंत म्हणजे तब्बल १६ वर्षे चालला. त्यात करण्यात आलेले लाठीमार- गोळीबार,सांडलेले रक्त, बलिदान, आक्रोशातील अश्रू, मोर्चे- आंदोलने यांची मोजदाद नाही. मराठवाड्यातील हिंसाचारी नामांतरविरोधी उद्रेकात असंख्य घरा- दारांची राखरांगोळी जशी झाली, तशीच नंतरच्या संघर्षात झोकून दिलेल्या तरुणाईचे मातेरे झाले. अगणित पँथर्स- भीमसैनिकांच्या संसारांचीही त्या अग्निदिव्यात आहुती पडली. त्याची दखल, नोंद- गणती कुठल्याही अहवालात नाही.

■ मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार होऊन आता तीन दशके उलटली आहेत. आज वयाच्या तिशीच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुण पिढीमध्ये ‘पँथर’ विषयी कमालीचे आकर्षण आजही दिसत असले तरी नामांतर लढ्याच्या संघर्ष पर्वाबाबत नवी पिढी अनभिज्ञच आहे. त्यामुळे दलित पँथरच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सव साजरा केलेल्या ज्येष्ठांच्या मागील पिढीने नामांतर लढ्याचाही अस्सल इतिहास पुढील पिढ्यासाठी सांगण्याची गरज आहे. अन्यथा त्याचाही पँथरच्या इतिहासाप्रमाणे विपर्यास केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

■ मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या मागणीमागे त्या प्रदेशाच्या शैक्षणिक विकासात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे असलेले योगदान जसे कारणीभूत होते, तसेच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत संमत झालेल्या नामांतर ठरावाचे वैधानिक अधिष्ठान त्या मागणीला प्राप्त झालेले होते. इथे महाडच्या चौदार तळ्यावरील सत्याग्रह आणि नामांतर आंदोलन या दोन्हीत असलेले विलक्षण साम्य अधोरेखित करावे लागेल. महाडचा सत्याग्रह हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलित मुक्ती लढ्याचा आरंभबिंदू ठरला. सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्याचा हक्क अस्पृश्यांना मिळाला पाहिजे, ही बाबासाहेबांची मागणी साधी नव्हती. ‘अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठी सार्वजनिक पाणवठे खुले झाले पाहिजेत’ या रावबहादूर सी के बोले यांच्या त्यावेळी विधिमंडळात संमत झालेल्या ठरावाचे वैधानिक अधिष्ठान बाबासाहेबांच्या मागणीला लाभलेले होते.

■ त्या पार्श्वभूमीवर, मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न हा केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानाचा वा दलितांच्या अस्मितेचा उरला नव्हता. विधिमंडळातील ठरावाची अंमलबजावणी स्थगित करण्यात आल्यामुळे तो प्रश्न संसदीय प्रथा आणि लोकशाहीच्या प्रतिष्ठेचाही बनला होता!

■ त्या ठरावाप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाच्या कमानीवर झळकले नसते तर……..? थोर समाज सुधारकांची महान परंपरा असलेल्या महाराष्ट्राच्या माथ्यावर तो कायमसाठी कलंक ठरला असता. अन आंबेडकरी समाजाच्या त्या काळातील तरुणाईच्या आणि भावी पिढीच्याही कपाळी ‘पराभूत समाज’ असा शिक्का बसला असता!

■ ही नामुष्की टाळण्यासाठी आंबेडकरी समाज ‘वंशसंहार’ आणि ‘सर्वस्वाची होळी’ ला सामोरा गेला, पण मागे हटला नाही. मोठी किंमत मोजत नामांतराची लढाई जिंकून भारतीय संविधानाच्या जनकाचा सन्मान आणि लोकशाहीची प्रतिष्ठा अबाधित राखली!

■ मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न सुटलाच नसता तर…… त्यासाठी कोणतेही दिव्य करण्याच्या मन:स्थितीत आणि निर्णयाप्रत त्यावेळी आंबेडकरी समाज आला होता,हे खरेच आहे. गौतम वाघमारे यांच्या आत्मदहनाने पहिली ठिणगी टाकली होती.

■ नामविस्तार झाला नसता तर ‘ आम्ही नक्षलवादी बनलो असतो… पँथर्सनी मग सरळ बंदुका हाती घेतल्या असत्या…
ना. रामदास आठवले यांचे हे विधान अतिशयोक्त मुळीच नाही.


नामविस्तार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
त्या लढ्यातील शहिदांच्या बलिदानाला आणि सोबतच्या तमाम ज्ञात- अज्ञात पँथर्स, भिमसैनिकांनी केलेल्या तरुणाईच्या समर्पणाला कडकडीत स्याल्युट!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!