आर्यअष्टांगिक मार्ग भाग ३२

शील
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, भगवान बुध्द म्हणतात, “प्रत्येक माणसाने शीलाची ही पाच तत्त्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मुल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की ज्याच्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तवणुकीचे मोजमाप करू शकेल. आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे हीच पाच तत्त्वे किंवा शीले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे. जगात पतितांचे दोन वर्ग असतात. ज्यांच्यासमोर काही आदर्श आहेत असे पतित आणि ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही असे पतित. ज्यांच्यासमोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला आपण पतित आहोत हेच कळत नाही. त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो. याउलट ज्यांच्यासमोर एखादा आदर्श आहे, असा पतित आपल्या पतितावस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो. कारण त्याला आपण पतित आहोत हे त्याला माहित असते. जीवनाचा आदर्श म्हणून हीच तत्त्वे आदर्श आहेत. ही तत्त्वे व्यक्तीच्या हितासाठी आणि सामाजिक हित साधणारी आहेत.”
शील म्हणजे नीतिमत्ता. जो नीतिवान आहे, जो नीतिने चालतो, बोलतो, वागतो त्याला आपण शीलवान म्हणतो. शील म्हणजे माणसाच्या मनाची अशी घडण की ज्यामुळे मनुष्य पापकर्मापासुन, अकुशल कर्मापासुन दूर राहतो. तो कुशल कर्म करतो.
भगवान बुध्द धम्मपदाच्या एकशेत्र्यांशीव्या गाथेत म्हणतात,
“सब्ब पापस्स अकरणं, कुसलस्स उपसंपदा !
सचीत्त परियोदपनं, एतं बुध्दांन सासनं !!
याचा अर्थ, कोणतेही पाप न करणे, शुभ कर्म करणे, वाईट चित्ताला परिशुध्द ठेवणे, हीच बुध्दाची शिकवण आहे.
अकुशल कर्म
अकुशल कर्म तीन प्रकाराचे आहेत. १) कायिक, २) वाचिक व ३) मानसिक
कायिक अकुशल कर्मात पुढील प्रमाणे तीन कर्मे येतात. १) हिंसा करणे, २) चोरी करणे व ३) व्यभिचार करणे.
वाचिक अकुशल कर्मात पुढील प्रमाणे चार कर्मे येतात. १) खोटे बोलणे, २) चुगली-चहाडी करणे, दुसर्याची निंदा करणे ३) शिव्या देणे, कटू बोलणे व ४) व्यर्थ, बाष्कळ बडबड करणे.
मानसिक अकुशल कर्मात पुढील प्रमाणे तीन कर्मे येतात. १) लोभ करणे, २) द्वेष करणे व ३) मोह, मिथ्या दृष्टी बाळगणे. अशा प्रकारे दहा अकुशल कर्मे आहेत.
कुशल कर्म
तसेच कुशल कर्म तीन प्रकाराचे आहेत. १) कायिक, २) वाचिक व ३) मानसिक
कायिक कुशल कर्मात पुढील प्रमाणे तीन कर्मे येतात. १) अहिंसा म्हणजे मैत्री व करुणा, २) अचोरी म्हणजे दान करणे व ३) अव्यभिचार म्हणजे संतुष्ट राहणे.
वाचिक कुशल कर्मात पुढील प्रमाणे चार कर्मे येतात. १) सत्य बोलणे, २) चुगली-चहाडी न करणे, दुसर्याची निंदा न करणे ३) शिव्या न देणे, कटू न बोलणे, प्रिय बोलणे व ४) व्यर्थ, बाष्कळ बडबड न करणे, यथायोग्य बोलणे.
मानसिक कुशल कर्मात पुढील प्रमाणे तीन कर्मे येतात. १) अलोभ करणे, २) अद्वेष करणे व ३) अमोह असणे, मिथ्या दृष्टी न बाळगणे. अशा प्रकारे दहा कुशल कर्मे आहेत.
कर्म कोणत्या हेतूने केले, त्यावर ते कर्म कुशल आहे की अकुशल आहे ते अवलंबून आहे. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करीत असताना एखादा रोगी मरण पावला तर त्याला अकुशल कर्म म्हटल्या जाणार नाही. परंतु एखाद्यांनी जर कुणाच्या पोटात सुरा खुपसून त्याला मारले असेल तर ते अकुशल कर्म होईल.
निंदा न करणे, नेहमी जागृत राहणे, रात्रंदिवस मनाला नियंत्रणात ठेवणे, निर्वाणासाठी नेहमी प्रयत्नशील राहणे, वाणीचा संयम बाळगणे इत्यादी कुशल कर्मे धम्मपदात सांगितले आहे.
कुशल कर्माबाबत भगवान बुध्द धम्मपदाच्या त्रेपन्नाव्या गाथेत म्हणतात-
यथापि पुप्फरासिम्हा कबिरा मालागुणे बहूं।
एवं जातेन मच्चेन कत्तब्बं कुसलं बहुं ॥
याचा अर्थ, ज्याप्रमाणे कोणी पुष्पराशीतून माळांचे सर (हार) करावेत, त्याप्रमाणे जगात जन्माला आलेल्या प्राण्यांनी अनेक कुशल कर्मे करावीत.
तसेच धम्मपदात पन्नासाव्या गाथेत सांगितले आहे की-
न परेसं विलोमानि न परेसं कताकतं।
अत्तनो’च अवेक्खेय्य कतानि अकतानि च ॥
याचा अर्थ, ना दुसर्याच्या दोषाला, ना दुसर्याच्या कृत-अकृत्याला बघावे (माणसाने फक्त) आपल्याच कृत-अकृत्याला बघावे.
क्रमशः
आर.के.जुमळे
दि.१४.१.२०२४
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत



