“मानसिक गुलामगिरी सोडून “सत्याचा शोध घेण्याची मनात ज्योत पेटविणारा सिनेमा म्हणजे “सत्यशोधक”

स्त्री शिक्षणाचे प्रणेते, जातिभेदाच्या भिंती दूर सारत शोषितांच्या मुलांना शिक्षणाची कवाडं खुली करून देणारे महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य इतपतच मर्यादित नाही. थोर व्यक्ती अंगी थोरपणा घेऊनच जन्माला येत नाहीत. सर्वसामान्यांसारखंच त्यांचंही आयुष्य असतं, मात्र योग्य वेळी पटलेला विचार कृतीत आणण्याचं धाडस, कोणाचीही तमा न बाळगता योग्य विचार आणि कृती सातत्याने करत राहण्याचा ध्यास यातूनच कार्य उभं राहतं, समाज घडत जातो. एका महात्म्याच्या आयुष्याचा वेध घेताना त्याची जडणघडण कशी झाली ? शिक्षणामुळे मिळालेले विचार आणि स्वत:च्या सखोल निरीक्षण-अभ्यासातून त्याने कमावलेले विचार समाजात कसे झिरपत गेले याचे अत्यंत सहज आणि वास्तवदर्शी पद्धतीने केलेले चित्रण ‘सत्यशोधक’ या चित्रपटात पाहायला मिळते.खरं तर, ही आभाळा एवढी माणसं आहेत त्यांचं कार्य अफाट आहे. चित्रपट किंवा पुस्तकात मावणार नाही पण अतिशय सुंदर पणे ज्योतिबाच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहतात. ज्योतिबाच्या आयुष्यातील नेमक्या अतिशय महत्वपूर्ण गोष्टी छान मांडल्या आहेत. अशा चित्रपटांची समाजाला नितांत गरज आहे. एक विशेष आवडलेली गोष्ट ,जोतिबांचा मृत्यु दाखवला नाही. 50 वर्षानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तात्यांचे कार्य पुढे चालू ठेवले अन् आता आपल्या वर ती जबाबदारी आहे हे सांगितले. ज्योती – सावित्रीच्या विचारांना समजून घ्यायचं असेल, याशिवाय मनोरंजनासोबतच बुध्दीला खाद्य हवं असेल तर सत्यशोधक आवर्जून बघावा. अडीच तास ज्योती – सावित्रीचा जीवनप्रवास आपल्याला प्रेरणा देतो, अवस्थ करतो आणि स्वतःपलीकडे बघायला भाग पाडतो एवढं नक्की… !!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत